सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

जीर्णनगरी मुशाफिरी :पांडवकालीन कुकडेश्वर मंदीर


जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर 

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. 

इतिहास : 
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.
ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.
साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.

जायचे कसे : 
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघर ला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही वर्थ आहे असे ते पांडवकालीन मंदिर पाहिल्यावर वाटते.
गावाचे नाव 'पुर ' असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे. 
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे. 

बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०
सद्यस्थिती : 
मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा गावात निर्णय झालाय. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीवकाम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.

आमची मुशाफिरी : 
कुकडेश्वर मंदिरात पोहोचायला जवळपास ७ वाजले होते. जवळपास अंधार पडत आला होता त्यामुळे तिथे पोहोचूनही काही बघायला मिळेल की नाही असे वाटले.
सूर्य नारायण जाता जाता काही राहिले तर नाही ना? म्हणून टॉर्च मारून बघत असावा असे वाटले.
 

आणि जाताना आकाशाला गिफ्ट म्हणून मावळतीचे रंग देऊन जात असावा.  


पश्चिमाभिमुख शिवमंदिर : 
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार :
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम  पूर्वी कधी पहिले नव्हते. 

मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर असून त्यात काय आहे ते कळू शकले नाही. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.(अंधार असल्याने आणि ट्राय पॉड नसल्याने याचे फोटो काही धड आले नाहीत. )

प्रवेशद्वारावरील शिल्पे :

मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित. 
 
त्याच्या पुढच्याच/समोरच्या  खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी.  हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.
 हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.


 महादेव पिंड :

उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
रात्री ८ वाजता एकही लाईट नसताना गडद अंधारात काढलेला फोटो : 


एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.

आमच्या सुदैवाने आम्ही उभे होतो तेथे एक दुधाची गाडी आली. गाडीतली माणसे आजूबाजूच्या गावातील गावकऱ्याकडून त्यांच्या गाई-म्हशींचे दूध घेतात, त्याचा हिशेब ठेवतात. मग ते दूध एकत्र करून घरी येऊन मोठ्या फ्रीज मध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरी ला विकतात आणि हिशेबानुसार लोकांना पैसे देतात. हेच दूध डेअरी मधून प्रक्रिया होऊन ( घट्ट दुधात पाणी घालूनही ) पुणे आणि आजूबाजूच्या गावास जाते. ओह्ह मला वाटायचे की, चितळ्यांच्या गायीच्या दुधाच्या पिशवीत चितळ्यांनीच  पाळलेल्या गायीचे दूध असेल. असो. गाय कोणाचीही असो, शहरात गायीच्या दुधाच्या पिशवीत गायीचेच दूध येतेय हे हि नसे थोडके !

तर त्या दुधाच्या गाडीने आम्ही ५ मिनिटात फाट्यावर आलो. आता एकदम गडद अंधार पडला होता. आजूबाजूला वस्ती नसल्याने आणि पर्यायाने एकही दिवा नसल्याने सारे नभांगण तारकांनी भरून व्यापले होते. या आधी मान वर करून आकाशात तारे कधी पाहिले हे आठवण्यात काही क्षण गेले. मग आठवले की २ वर्षापूर्वी हरिश्चंद्राला गेलो होतो तेव्हा असेच तारे पाहत बसलो होतो.

मधल्या काळात ताऱ्यांनी खुणावलेच नाही का ? का ते बघण्याएवढी मान कधी वरच आली नाही ?
हॉल च्या छताला लावलेले रेडियम चे तारे जास्त जवळचे वाटले? का हातात अख्खी 'गॅलेक्सी' आल्यामुळे ताऱ्यांचे वेडच नाहीसे झालेय?  असो.

पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी हे विचार एकदम तोडले. एकमेव असलेला विजेरी दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात डबा उघडून जेवण चालू केले. आजूबाजूला गर्द अंधार, निरव शांतता, दूरवर मिणमिण करणारे दिवे, जोडीला हा कंदील आणि डब्यात गोड शिरा. अहाहा ! त्या दिवशी 'कॅण्डल लाईट डिनर' चा खरा अर्थ कळला.

जेवण होऊन थोडावेळ एका गावकऱ्याशी गप्पा टाकल्या. थोडा वेळात दोन पिवळे दिवे भयंकर आवाज करत, अंधारातून माग काढत आमच्या दिशेने आले आणि थांबले. मग कळले की ती ST होती. गाडीत बसलो आणी गाडी घाटघर दिशेने पळू लागली. त्यानंतर घाटघरपर्यंत जो काही रस्ता आहे, त्याला 'कच्चा रस्ता' म्हणणे  म्हणजे कुत्र्याला गेंडा म्हणणे आहे. फक्त आणि फक्त 'हमर' घेऊन जाण्यासाठीच तो रस्ता असून हा ड्रायवर उगाच त्यावर ST चालवतो आहे का काय अशी शंका येते. येथे ST मधून उतरताना ड्रायवर, कंडक्टर आणि ST महामंडळ तिघांनाही सलाम ठोकावासा वाटतो. आम्ही ठोकलाही!

घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला. 

राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात. 

अजून काही : 
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय  तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे. 
२. कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे.            गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो ( नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.

जुन्नर तालुक्यातील क- वर्गीय तीर्थक्षेत्रे :
श्रीक्षेत्र पारूंडे जुन्नर
श्रीक्षेत्र आळे ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र ओतूर चैतन्य महाराज समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र आणे, रंगदास स्वामी महाराज  समाधी जुन्नर
श्रीक्षेत्र लेण्याद्री जुन्नर
श्रीक्षेत्र ओझर जुन्नर
श्रीक्षेत्र कुकडेश्वर जुन्नर
श्रीक्षेत्र वडज खंडेराय देवस्थान जुन्नर
श्रीक्षेत्र नारायणगाव मुक्ताबाई व काळोबा मंदिर जुन्नर

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
जीर्णनगरी मुशाफिरी : निमगिरी
जीर्णनगरी मुशाफिरी : दुर्ग ढाकोबा
जीर्णनगरी मुशाफिरी : हरिश्चंद्रगड

सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.


जीर्णनगरी मुशाफिरी :  चावंड किल्ला
बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. 
सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती. 

या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्री च्या बौद्ध लेणी, मानमोडी डोंगरातील जैन गुंफा , ५ धरणे आणि वाघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे. 

यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

जायचे कसे?
पुण्यापासून : पुणे ते जुन्नर  ST ने नवीन जुन्नर स्थानकावर उतरावे. जवळपास अडीच तास लागतात. तिकीट ९८रु. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. नवीन जुन्नर ST स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर  ST पकडून चावंड फाट्यावर उतरावे.
चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. 

बघायचे काय ?
किल्ल्यावर जाताना लागणारा दगडात खोदलेल्या वाटा, पुष्करणी तलाव, २१ पाण्याची टाकी, सप्ततलाव, प्राचीन असे महादेव मंदिर, चावंडा देवी मंदिर, महादेव मंदिरावरील शिल्पे.,किल्ल्यावरून दिसणारे माणिकडोह धरण व आजूबाजूचा प्रदेश, वऱ्हाडी डोंगर, हडसर किल्ला. 
किल्ला चढून पूर्ण फिरायला ४-५ तास पुरतात. 


आम्ही दोनच टाळकी ट्रेक ला असल्याने काही ठरवावे लागले नाही. शनिवारी मी पुण्याहून सकाळच्या निवांत गाडीने साडे दहाला जुन्नर पोहोचलो. आणि मित्र कल्याणवरून साडे आठ च्या गाडीने जुन्नरला आला. तिथून लगेच अंजानावळ गाडी पकडून उतरलो चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी.




पायथ्या पासून किल्ला फारच साधा वाटत होता. कॅमेरे बाहेर काढले, सामान तिथल्या एका घरात ठेवले आणी पायपीट चालू झाली.
रस्ता फारच सोपा असल्याने चुकणे झाले नाही. जाताना एक ग्रुप भेटला तो नुकताच वर जाऊन आला होता. त्यांच्याकडून टिप्स घेऊन आम्ही पुढे निघालो.
पायथ्यापासूनच काही उंचीपर्यंत सिमेंट च्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वैगरे चुकत नाही आणी सरळ जाऊन आपण एका मोठ्या रॉक पॅचला लागतो. पण खरेतर या पायऱ्यांनीच अर्धा जीव जातो.

जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. 

सुमारे अर्धा-पाऊण तासात आपण या रेलिंग पर्यंत येतो. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.

एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही.


उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांना आधार म्हणून मध्येच ही तोफ रोवलेली आहे.
दूरवर पसरलेला माणिकडोह धरणामुळे आजूबाजूचा परिसर अजूनही हिरवा होता. तसेच भर उन्हात हलकी थंडीही वाजत होती.

अवघड असा टप्पा ओलांडून गेलो आणि लगेच प्रशस्त अश्या मोठ्या पायऱ्या लागल्या. अत्यंत विचारपूर्वक खोदलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थेट प्रवेशद्वाराशीच नेऊन ठेवतात.
पहिले प्रवेशद्वार त्या पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. त्यामुळे खालून वा अगदी पायऱ्या चढून आले तरीही प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही. हा बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण करतो.

प्रवेशद्वारावर दगडी कमानीतच गणपती कोरलेला आहे. ह्या किल्ल्याच्या सर्वच द्वारांवर कोरलेले गणपती  अजूनही तसेच सुबक आहेत. हे काम पेशव्यांचे असावे असे वाटते. 


इथे मस्त जागा पाहून जरा वेळ निवांत बसलो. मग येथेच समान ठेवून फक्त कॅमेरे घेतले आणी पुढे निघालो.
थोडे पुढे येताच घोड्यांसाठी पाण्याची सोय दिसली. याचा अर्थ एखादे तरी पाण्याचे तळे जवळपास असणार असा अंदाज लावताच समोर पुष्करणी तलाव नजरेस पडला. 
येथून गडाला प्रदक्षिणा मारत आम्ही निघालो. तलावाच्या मागून बाजूने जाताना अजून दोन मोठी टाकी दिसली. या किल्ल्यावर तब्बल २१ पाण्याची टाकी असल्याने पाण्याचा नो प्रॉब्लेम.
आता इथूनच वरती दिसणाऱ्या छोट्याश्या टेकडीवर आम्ही निघालो. याच टेकडीवर चावंडादेवीचे मंदिर आहे. 
सुमारे पंधरा मिनिटात आम्ही वरती पोहोचलो.

देवीचे दर्शन घेऊन जरा वेळ टेकलो. मस्त सावली पडली होती आणि गार वारा वाहत होता. मंदिरासमोरील दगडावर हे महाशय निवांत पडले होते. 
गडाच्या सर्वोच्च असलेल्या चावंडा देवीच्या मंदिरापासून समोरच हडसर किल्ला दिसत होता. किल्ल्यावरच खाली बघितले तर सप्ततलाव दृष्टीस पडले.

याबाजुला हे बिचारे झाड एकटेच उभे होते. वन ट्री पॉइंट म्हणूनही हा खपला असता.

 आजूबाजूला बघितले तर भटोबा, नवरा-नवरी सुळक्यांची रांग दिसत होती.
ऊन सावलीचा खेळ चालूच होता. 

आता इथून उतरून खाली आलो. थोडेसे पुढे जाऊन लगेचच महादेव मंदिर लागले. याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते. हे मंदिर हि खूप जुने असले पाहिजे. जुन्या काळचे कोरीवकाम आणि दगडांची रचना केवळ अद्भुत.

 हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत. दोन्ही मंदिरे ही एकाच 'शिलाहार' राजघराण्याच्या झांजराजाच्या कारकीर्दीत बांधली गेली असल्याने त्यांची सप्त-देवतांची रचना सारखी असावी. खाली फोटोत असल्याप्रमाणेच सप्तदेवता असलेले दगडात आत खोदून केलेली छोटी मंदिरे जुन्नर मधील बऱ्याच किल्ल्यावर आढळतात.

साधारण इस. ७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे  मंदिर बांधले असावे. महादेव मंदिरात ही एकाच दगडात कोरून तयार केलेली पिंड दिसते. 

मंदिरासमोरच एक डोकं नसलेला नंदी आहे त्यावरून हे महादेव मंदिर ओळखता येते.

मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहत राहावे असे आहे. ते पाहून मनात प्रश्न पडतो की त्या वेळचे कारागीर सुद्धा किती लॉयल, प्रामाणिक असतील राजाशी. एवढ्या उंचावर चढत येऊन असे काही कोरीवकाम करायचे यावरून त्यांची राजावर किती निष्ठा असावी हे कळते. 

आणखी खोलात जाऊन त्या नक्षीकामाची महानता लक्षात येते. एवढे डिटेल काम करायला किती वेळ लागत असेल? पण "आपल्या राजाचे काम करायचेय" अश्या भावनेनेच अशी कामे होत असावीत. केवळ अद्भुत !

येथे जोडूनच जवळपास १० तळी आहेत. बहुतांश तळ्यात पाणी शेवाळामुळे हिरवट झाले आहे. ( दामले मास्तरांची आठवण झाली. :) ) 

येथून म्हणजे महादेव मंदिरापासून खाली गेले की सप्ततलाव दिसतात. किल्ल्यावर जाऊन हे तलाव अजिबात चुकवू नये असे आहेत. एकाला एक जोडून असे सात तलाव असून पहिल्याच्या सुरवातीस प्रवेशद्वार आहे. त्यावरही मस्त असा गणपती कोरलेला आहे.
थोडे वरून पाहिल्यास केवळ २ टाकी आहेत असे वाटते. 
पडक्या कोठाराच्या अवशेष पाहून थोडे पुढे गेल्यास हे एकाला एक जोडलेले सप्ततलाव दिसतात. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी. यातले पाणी बरेच चांगले आहे. पिण्यासाठी वापरण्याजोगे आहे.
सप्ततलाव: 

या सप्त-तलावाच्या सुरवातीला पहिल्या तलावास प्रवेशद्वार खोदलेले असून त्यावरही एकदम सुबक असा गणपती कोरला आहे. प्रवेशद्वाराला हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारा सारखीच नक्षीकाम केले आहे. एक मात्र जाणवले की, जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची ठेवण आणि स्थापत्यकला सारखीच आहे. 



'स्वतःच प्रतिबिंबात माणूस एवढा का रमतो हे काही अजून उलगडले नाहीये. 
 

दीड वाजता चढायला सुरुवात करूनही ५ वाजेपर्यंत संपूर्ण किल्ला पाहून झाला. मग किल्ला उतरून कुकडेश्वर मंदिराकडे प्रयाण केले. रस्त्यात ST वा जीप मिळावी म्हणजे पायपीट वाचेल असा विचार आला तेवढ्यात 'जगातील दहावे आश्चर्य' अवतरले. पण आमचा हा खास मित्र नेमकी उलट्या दिशेने चालला होता. त्याने हॉर्न वाजवूनच आम्हाला पुढच्या ट्रेक ला शुभेच्छा दिल्या. 

मग अजून कोणाची वाट न बघता सरळ कूकडेश्वर मंदिराचा रस्ता धरला आणि चालत सुटलो. 

बसच्या वेळा :
चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट जाण्यासाठी : 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर  सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

अजून काही : 
१. चावंड आणि हडसर किल्ला पण एका दिवसात होतो. चावंड गावातून बोटीने माणिकडोह धरणातून पलीकडे जाता येते.
२. हडसर किल्ल्याच्या बाजूस, राजूर पासून थोड्या अंतरावर वाघ्र प्रकल्प आहे. माणिकडोह परिसरात सापडलेले वाघ, बिबटे पकडून येथे ठेवले जातात. सध्या तेथे तब्बल २८ वाघ आहेत.
३. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबा ला हि जाऊ शकतो.
४. ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोह ला प्रदक्षिणा मारता येते.
 जुन्नर ->चावंड -> कुकडेश्वर -> जीवधन -> नानाचा अंगठा -> नाणेघाट -> निमगिरी -> हडसर -> माणिकडोह  वाघ्र प्रकल्प-> शिवनेरी ->जुन्नर 

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
जीर्णनगरी मुशाफिरी : निमगिरी
जीर्णनगरी मुशाफिरी : दुर्ग ढाकोबा
जीर्णनगरी मुशाफिरी : हरिश्चंद्रगड 

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

घनन-घन, घनन-घन घनगड

कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड

पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला.
भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर. कोथरूड वरून मग आमची वरात निघाली ताम्हिणी घाटात.

"ह्या किल्ल्याला मुळशी रस्त्याने बाइकवर जाऊ नका" असे मिळालेले अनाहूत सल्ले आम्ही न मानता आमचेच 'घोडे' दामटले, आणि मग तेच 'घोडे' पंक्चर झाल्यावर ६ किमी ढकलत नेताना आमचे मालकाचे म्हणणे न ऐकणारे 'गाढव' झाले.

ऐतिहासिक संदर्भ :

भौगोलिक संदर्भ :
मुळशी परिसर हा पावसाळ्यात खरंच जन्नत असते. याच मुळशी मावळच्या पश्चिमेकडे पुण्यातून जवळपास ८० किमी अंतरावर घनगड आहे. लोणावळ्यापासून जवळपास ५० किमी असून येथून रस्ता जर बरा आहे.
घनगडाच्याजवळच तैलबैला, कैलासगड (वद्रे), सुधागड, सरसगड, कोरीगड आहेत.

येण्याजाण्याच्या वाटा : 
घनगडावर जाण्यासाठी 'एकोले' गावातूनच वाट आहे. हे एकदम छोटे असे गाव असून जवळपास १०० लोकांची वस्ती असावी. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मातीचा रस्ता केलेला आहे. गावात गाडी पार्क करूनही किल्ल्यावर जाता येते.
पुण्याहून :
एकोलेगावात पोहोचण्यासाठी पुण्यातून ताम्हीणीमार्गे जाता येते. चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले
 रस्ता फार खराब असून दुचाकीवर जाणे अवघड आहे. टायर चांगले असतील तर ठीक. गाडी पंक्चर झाल्यावर निवे आणि भांबुर्डे गावाशिवाय कोठेही सोय नाही.
स्वारगेट येथून सकाळी नऊला भांबुर्डे बस असून तीच बस दुपारी दोनला परत जाते. एक दुपारची बस येथे मुक्कामी येते.
लोणावळ्याहून : 
लोणावळ्याहून भांबुर्डेगावात येणारी ST बस आहे. ती बस दिवसातून दोन वेळच आहे.सकाळी दहा आणि दुपारी चार. आंतरजालावर मुबलक बस असल्याची नोंद आहे पण तसे नाही.
भांबुर्डे  ते एकोले अंतर २० मिनिटे,३ किमी आहे. रिक्षा व इतर कुठल्याही गाड्यांची सोय नाही.

आमचा ट्रेक अनुभव:
सकाळी नऊ ला आम्ही गाडीला टांग मारली. एक गाडी दोघे जण. बरेच पुढे गेल्यावर अत्यंत गावंढळ पब्लिक कसेही रस्त्यावर हिंडत होते. त्यावरून आम्ही पौड आले हे ओळखले.
ताम्हिणीला लागलो आणि मस्त प्रवासाची सुरवात झाली. सकाळची वेळ असल्याने जास्त गर्दी नव्हती. बरेच अंतर कापून गेल्यावर लोणावळ्याचा फाटा आला. तेथून उजवीकडे वळून घनगडाच्या मार्गास लागलो.

मध्येच येणारे तीव्र चढण आणि खराब रस्ते याने गाडीचा जीव जायची सुरवात झालीच होती. गप्पा टप्पा मारत वेळ कसा गेला ते कळले नाही पण वद्रे गावापर्यंत यायला जवळपास अकरा वाजले होते.
वद्रे गावानजीकच कैलासगड आहे. कैलासगड हा फक्त डोंगर असून त्यावर विशेष पाहण्यासारखे काही नाही. किल्ला चढून उतरायला एक तास पुरेसा आहे. आमचे मुख्य लक्ष घनगड आणि तैलबैला असल्याने थोडा वेळ चढून आम्ही परत खाली आलो.


पूर्णतः निर्मनुष्य रस्त्यावर निवांत गाडी मारत आमची स्वारी चालली होती. 


मध्येच एक भारी स्पॉट लागला. पावसाळ्यात हा स्पॉट जन्नत असेल. चारही बाजूने रखरखते डोंगर कडे आणि मध्ये दरीतून पाण्याला काढून दिलेली वाट. 



एवढ्या रखरखत्या उन्हात मृगजळ दिसावे तसे हि गाडी पार्क केलेली दिसली. काय थाट होता तिचा वा !
 

निवे गावापर्यंत आलो. आता भूक लागली होती पण वेळ घालवायचा नव्हता. मग गाडी चालवतानाच प्याटीस खाऊन घेतले. निवे गावापासून ५-६ किमी आलो आणि फारच खराब रस्ता लागला म्हणून गाडीवरून उतरून ढकलत नेऊन पुढे जायचो. गाडी चालवताना मनात धाकधूक होती ती म्हणजे गाडी पंक्चर होण्याची. आणि थोड्या वेळातच ती धाकधूक संपली कारण गाडी खरंच पंक्चर झाली होती.


हा फोटो काढला आणि गप्प गाडीवरून उतरून गाडी ढकलायला लागलो. बघतो तर टायर शेवटचा श्वास मोजत होता. 


येथे आजूबाजूला सर्वत्र डोंगर रांगा आणि निर्मनुष्य रस्ता. एका माणसाकडून कळले की येथून ५ किमी मागे निवे गावात पंक्चरची सोय होईल अथवा पुढे १२ किमी भांबुर्डे गावात. हे ऐकूनच पोटात गोळा आला. नाईलाजाने ६ किमी गाडी ढकलत नेऊन अक्षरशः छाती भरून आली. एके क्षणी वाटले की "इथेच स्मारक होतेय की काय आपले."
६ किमी गाडी ढकलून 'आडगाव पाझरे' गावात पोहोचलो. तिथे एक आज्जी ना विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील मुलांना आवाज दिला. ती मुले बाहेर आली आणि म्हणाली की " पंक्चर काढणारा बाहेर गेला आहे, आमच्याकडे सगळी हत्यारे आहेत. आम्ही ट्राय करू"
तसेही माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. म्हटले ठीक आहे.
आता 'पंक्चर काढणे' सोहळा सुरू झाला. तीन मुले हत्यारे घेऊन आली, त्यांचे वडील मोठी परात घेऊन आले. आज्जी लगबगीने जाऊन त्यात पाणी घेऊन आल्या. तिघांनी चर्चा करून टायर काढायला चालू केले. 'अरे हे असे कर', ते तसे कर अश्या सूचना पालन करत काम चालले होते. सहा लोक मिळून पंक्चर काढत होते. शेवटी दीड तासाने हा सोहळा संपन्न झाला. आजींनी 'प्रसाद' म्हणून काही कैऱ्या दिल्या आणि थोडे पाणीही दिले. आता त्या पाण्याची चवही आम्हाला अधिक तजेलदार वाटली.

एव्हाना बारा वाजले होते. परत गाडी दामटवायला चालू केले. जाताना हा डोंगर अगदी माहुली सारखा दिसत होता. 'पुण्याचा माहुली' म्हणूनही तो खपला असता. 


भांबुर्डे नावाच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिथून सरळ घनगडाच्या पायथ्याशी. गावात गाडी लावून पुढे चालत जाऊ शकतो पण आम्ही मात्र अर्ध्या वाटेपर्यंत गाडी वर नेली. आता जे काही होईल ते बघून घेऊ असे म्हणत.
पायथ्याकडून दिसणारा घनगड.

गाडी पायथ्याशी लावली आणी थोडे १५ मिनिटे चालत वरती आलो तर लगेच 'गारजाई देवीचे' मंदिर दिसले. थोडा वेळ परत विश्रांती झाली. 

आता येथूनच किल्ल्याचा एक बुरूज दिसत होता. त्याचा माग काढत सरळसोट अश्या रस्त्याने चढाई सुरू झाली.




 येथून थोडे वर आल्यावर घनगड आणि त्या शेजारचा डोंगर यांच्यामधील खिंडीत एक वाट जाते. तेथे एकावर एक दगडांची रास केल्यासारखा एक एक कमाल स्पॉट आहे.


तेथून परत फिरून किल्ल्याची वाट धरली. मग वाटेतच थोडी हौस करून घेतली. 

एवढा सोपा किल्ला असून नेहमीप्रमाणे आम्ही येथून वाट चुकून दरीच्या मार्गाला लागलो. वेळीच पाय आखडता घेतला आणि जीव सांभाळत परत मागे आलो. 

मंदिरापासून अर्धा ते पाऊण तासातच आपण किल्ल्याच्या महादरवाज्याशी पोहोचतो. दोन भक्कम आणि बुलंदी बुरुजांनी झाकले गेलेले प्रवेशद्वार दृष्टीस पडले. 

प्रवेशद्वाराशीच असलेल्या बुरुजाने गडाची सुरक्षितता आणखीनच अभेद्य झाली होती. 





मूळ किल्ल्यात प्रवेश केल्यावर लगेचच पाण्याची टाकी नजरेस पडली.


येथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी येथे एक शिडी लावलेली आहे. आधी या उभ्या कातळात केलेल्या खोबणीतून चढाई करावी लागे. आता ह्या शिडीमुळे फारच सोपे झाले आहे. 


येथून खाली बघितल्यास बुरूज आणि प्रवेशद्वार दिसत होते. 
 आता शिडी चढून वर आलो. थोडा डोंगर बाजूला झाला आणि बालेकिल्ल्यात पोहोचताच दोन बुरूज आणि समोर तैल-बैल कातळकड्यानी लक्ष वेधून घेतले.




 तैल-बैल कातळ कड्यांचे अप्रतिम असे दर्शन झाले. 

दिवसभर उन्हाने तापलेल्या वातावरणात जरा गारवा आला. क्षणात निसर्ग कूस बदलून घेतो याची प्रचीती आली.

थोडे फोटोसेशन झाल्यावर जेवण पदरात पडून घेतले. थोडेसे ढगाळ वातावरण, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच.  गोड शिरा, छोले उसळ. कमाल बेत झाला होता.


थोडी कारागिरी झाली आणि मग परतीची वाट धरली.


 आम्ही किल्ला उतरताच किल्ल्यावर ढग दाटून आले. क्षणात वातावरण बदलले.

पायथ्याशी लावलेली गाडी काढली आणी लोणावळ्याच्या दिशेने निघालो. 




Aamby Vally च्या जवळपास आलो आणि येथून एकदम चांगले रस्ते सुरू झाले. 

कोरीगड आधीच झाला होता त्यामुळे लांबूनच कोरीगडला टाटा केला आणि लायन्स पॉइंट ला निघालो. 



जरा वेळ इथे टिपी केला आणी लोणावळा स्टेशन मार्गे निघालो. भूषण लोणावळ्यावरून मुंबईला गेला आणि मग आम्ही हाय-वे पकडून दोन तासात घरी. 
"कोथरूड ->चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले->भांबुर्डे -> लोणावळा-> चांदणी चौक-> कोथरूड "
एकंदर फारच मोठा राउंड झाला होता पण बरीच ठिकाणे पाहता आली. या प्रदेशात स्वतःची गाडी असेल तर बरीच भटकंती करता येते.  एका दिवसात आरामात "चांदणी चौक-> ताम्हिणी -> कैलासगड -> घनगड -> तैल-बैला -> कोरीगड-> लायन्स पॉइंट-> लोणावळा - चांदणी चौक" अशी ट्रीप /ट्रेक होऊ शकतो.