रविवार, ९ फेब्रुवारी, २०१४

मी आणी 'ते'

मी आणी 'ते'
आज मी अजून एका बाबतीत थोड्या प्रमाणात का होईना पण मोठ्या लोकांशी बरोबरी केली. दिली नोकरी सोडून. स्वतःच्या आनंदासाठी वा आपली आवड जोपासण्यासाठी काही मोठ्या लोकांनी मोठ्या पगारच्या नोकऱ्या सोडून पाहिजे ते मिळवले अश्या आशयाची एक -दोन लेख मी वाचले होते. आता गब्बर पगार असलेल्या नोकऱ्यांमुळे ती मोठी झाली होती का त्या सोडल्यामुळे मोठी झाली का त्यानंतर केलेल्या कामामुळे मोठी झाली याच्या तपशिलात आपण का पडा? त्यामुळे आता नाममात्र पगाराची का होईना पण नोकरी सोडल्याने मला त्याच्या रांगेत जाऊन बसल्याचे उगाच फुकटचे समाधान लाभतंय. 

अगदीच रिकामटेकड्या आणि बेरोजगार लोकांमध्ये अजून एकाची भर. पण मला मात्र फार भारी वाटतंय. कसलच टेन्शन नाही. आधी प्लेसमेंट व्हायच्या आधीही काही दिवस असेच निवांत होते पण तेव्हा टेन्शन असायचे नोकरी मिळेल का नाही. आता काहीच नाही मागे. कुठेही बोकाळायला मोकळा.
आधी दिवस कसा जायचा हापिसात तेच समजायचे नाही. डोक्यावरचा दिवा सकाळी १० ला आल्यावर ज्या तीव्रतेने चालू असतो तसाच संध्याकाळी ६ ला पण. त्याला काहीच फरक पडत नाही बाहेरच्या दुनियेत काय चाललाय याचे. अगदी तसेच झाले होते रुटीन. बेक्कार बोर झालो होतो. निकालच लाऊन टाकला एकदाचा. 

आता मात्र कुठे कुठे भटकायचे याचा जोरदार प्लान झालाय. पुण्याजवळील काही पुरातन मंदिरे भटकून त्यांचा इतिहास आणि स्थापत्यकला यांचा अभ्यास करणार आहे.बरेच दिवस 'जे बरेच दिवस मनात होते करायचे पण वेळच नव्हता आणि ज्यातून जमा खर्चाचा विषय येणार नाही' असे काहीतरी वा सगळे करणार आहे. त्याचा इथम्बुत वृतांत तुमच्यासमोर आणेनच.
स्वताचा ब्लॉग असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वरती लिहिले आहे तसे काहीही आणि कोणाच्याही परवानगी शिवाय खरडता येते. प्रत्येक लेख अगदी जमुनच आला पाहिजे असे काही नियम नाही इथे. 

हरीतात्यांच्या गोष्टीतला 'मी' म्हणजे जशी इतिहास नामक गोष्ट होती. तसा आजचे आमचे 'ते' म्हणजे मनातलेच सुप्त आणि अचित्रित भाव. कधी तरी 'त्यांना' वा 'तें' ना मोठ्या माणसाची उपमा द्यायची. म्हणजे त्याच्याशी बरोबरी केल्याचे भाव उगाच स्वतः साठी काही केल्याचे समाधान देऊन जातात.
नोकरी असो वा अजून काही, 'तें' ची साथ सुटता कामा नये फक्त. 'तें' कधीतरी चित्ररूप घेतातच हे मात्र अगदी खर.स्वतःची रेषा अजून मोठी करत राहायचे म्हणजे 'तें' हि येतातच बरोबर.
असो, कायमचा 'तें' च्या बरोबर नाही राहता येणार, पोटापाण्यासाठीही काहीतरी केलेची पाहिजे. मग काय, आता दुसऱ्या औताला जुंपायचे आता. कधीतरी परत 'तें' ची आठवण येइलच! पण नव्याने.खरच, आता मात्र मी 'तें' ची बरोबरी केली.

सागर