शिवमंदिर - अंबरनाथ
मागील महिन्यात झालेल्या जुन्नर मधील मोठ्या ट्रेक मध्ये, चावंड किल्ल्या जवळ असलेल्या पांडवकालीन कुकडेश्वर मंदिराला जाण्याचा योग आला होता. त्या मंदिराचा इतिहास आणि अखंड अश्या शिळेवर केलेले अतुल्य कोरीवकाम बघून मन थक्क होऊन गेले. त्याचा मिळाला तेवढा इतिहास मी त्या धाग्यात लिहिलेलाच आहे पण ते मंदिर बघून पुणे-मुंबई जवळची इतरही अनेक पुरातन मंदिरांचा शोध सुरु झाला.
पुण्याजवळच अशी ५-६ पुरातन मंदिरे आहेत हे आजपर्यंत माहित नव्हते. त्यामुळे आता किल्ल्यावरून आमचा मोर्चा मंदिरांकडे वळवला.
पुणे -मुंबई प्रवासा दरम्यान असलेले अंबरनाथ येथेही असेच पुरातन मंदिर आहे हे कळल्यावर मग तिकडे जायचा बेत केला. अंबरनाथ स्टेशन पासून चालत २०-२५ मिनिटावर हे मंदिर असून सध्या फारच वाईट दिवस भोगत आहे. एवढ्या मध्यवस्तीत असूनही ते अजून तग धरून आहे हेच विशेष.
मंदिराच्या बाहेरून बघताच हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आहे हे आपल्या लक्षात येतेच. त्यावर कोरलेली बरीचशी शिल्पे हे ओळखता येत नाहीत. प्रवेशद्वारात असलेली काही शिल्पे ओळखता आली पण १-२ शिल्पे ओळखून मंदिर पाहिले असे म्हणणे साप चावून न घेताच तो विषारी आहे म्हणण्या सारखे आहे. :)
मंदिराला अंदाजे सहा बाजू आहेत. प्रत्येक बाजूवर वेगवेगळ्या प्रसंग वा संदेश देणारी शिल्पे आहेत. पायथ्यापासून शिल्पांचे नक्षीकाम सर्व बाजूने एकसारखे आहे. गुडघाभर उंचीवर सर्व बाजूने हत्तींच्या आणि माहुतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
बाकी बरेच काही आहे अजून लिहिण्यासारखे. प्रत्येक शिल्पाचा अर्थ लावून त्यावर लिहायला अभ्यासाची गरज आहे. तरच त्या हजारो वर्षापूर्वीच्या शिल्पांना न्याय दिल्यासारखे होईल. ( आता मी या स्थापत्य कलेच्या अत्तुच्य कलेला न्याय देणे म्हणजे गाढवाने स्वतच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यासारखे आहे हा भाग निराळा, पण असो. )
तूर्तास, काही फोटो येथे डकवत आहे. जसा जसा शिल्पांचा अर्थ लागतो तसा डिटेलवार त्यावर लेख लिहीनच.
मंदिराला ४ प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येकाची दिशा फारच परफेक्ट आहे. मंदिराबाहेरून फोटो काढता येतात. आत फोटो काढण्यास मनाई आहे.
हत्ती आणि माहूत
काम दिलेल्या माणसाने मनसोक्त कोरीवकाम केलेले आहे.
येथे विष्णूचे ९ अवतार कोरलेले आहेत.
कुठे काय कोरले आहे तेही समजत नाही एवढे कमाल मंदिर आहे. पूर्ण प्रदक्षिणा मारायला आम्हाला दोन तास लागले एवढे चवीने बघत, फोटो काढत, अर्थ लावत आमची स्वारी चालली होती.
आम्ही त्या मंदिरावर काहीतरी बघून ते ओळखतो आहोत आणि फोटो काढत आहोत हे पाहून बरीच मंडळी आमच्या बरोबर जमली होती. रोज मंदिरात येणाऱ्या पण शिल्पांकडे ढुंकूनही न बघणारी मंडळीही आज उत्साहाने मंदिर बघत होती. प्लस आमच्या हातातील कॅमरे बघून काही लोकांना आपण पण टीव्ही मध्ये दिसू असे वाटले होते जणू, ते प्रत्येक फोटोत लुडबुड करत होती.
असो, पण आमच्या निमित्ताने का होईना अजून चार लोकांनी ते मंदिर डोळे उघडून ( व फाडून) पाहिले याबद्दल शंकराने पुण्ण्याचा एक पोईंट माझ्या अकौंट वर जमा केला असेल एवढे नक्की. :)
सागर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा