रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर

भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
बरेच दिवस समाधी अवस्थेत असलेल्या ब्लॉगला आज काही प्रमाणात संजीवनी मिळेल असे वाटत आहे. मनात साचलेले खूप आहे पण खरडायला काही वेळ मिळत नाही. नवीन नोकरी आणि कांदे-पोहे कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अश्या काही मानगुटीवर बसल्यात की गुडघे पार दुखून जातात. ( यातले कोणाला किती कळले माहित नाही,मला काहीच कळले नाही असो. )
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.

तर आमचा प्लान होता पुणे-> यवत-> भुलेश्वर->माळशिरस-> पांडेश्वर-> सासवड->पुणे. आणी ते पण बाईक वर. "माझ्या बाईकची दोन्ही चाके फिरतात आणी ब्रेक लावला की थांबतात." असा एका वाक्यात तिच्यावर निबंध होऊ शकेल. असो.
यवत पासून उजवीकडे एक फाटा फुटतो. रस्त्यावरच भुलेश्वर मंदीर अशी पाटी लावलेली दिसते. पुण्यापासून यवत ५५ किमी आणि तेथून बोपदेव घाटातून भुलेश्वर १५ किमी.बोपदेव घाट संपला की लगेच एक फाटा फुटतो तेथून उजवीकडे भुलेश्वर मंदीर.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता) 
मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा ढग भरून आलेच होते. मस्त हिरवागार,निर्जन परिसर, हलकासा पाऊस. मजा आली. हलकाश्या पाऊसात निवांत गाडी चालवत गप्पा टप्पा करत चाललो होतो. एखाद दुसरी दुधाची गाडी ये जा करत होती.
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.

येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
 
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.

बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.

प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.

ऐरावातावळ

प्रत्येक शिवमंदिरात प्रवेशद्वाराशी कासव का असते याचा अभ्यास करायला हवा. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पण सोमेश्वर मंदिरात असेच कासव होते.

मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.

महानंदी
मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके चक्रावून जाते.
महाभारतातील अर्जुन-कर्ण युद्धाचा प्रसंग.
युद्ध दर्शवताना हवेत मारलेले बाणही स्पष्ट दिसतात.





























२ टिप्पण्या:

विचारमंथन म्हणाले...

वाळलेल्या झाडाचा फोटो सुंदर टिपला.

अनामित म्हणाले...

Surekh