बुधवार, २८ जानेवारी, २०१५

काही असेच भेटलेले...

काही असेच भेटलेले … मनात घर करून गेलेले 

त्यांचे वय वेगळे …  अनुभव वेगळे ….
त्यांच्या कहाण्या वेगळ्या…  त्यांचे जग वेगळे …
मिळालेल्या आयुष्याचे आनंदात राहून सोने करायचे शिकवण देऊन गेले. 
पण शिकवणच फक्त !!
सुखाच्या शोधात निघालेल्या आमच्या नजरांना कसले आनंद? कसले सोने?
 राहून राहून ते एकच वाक्य पटते,
पूर्वीसारखा माझा चेहरा टवटवीत दाखवणारे आरसे फारसे मिळत नाहीत सध्या !!
--------------------------------------------------------------------------------------------------
"मनात घर, सुखाच्या शोधार्थ निघालेल्या नजरा" वैगरे वैगरे …असे काही लिहिले कि उगाचच एखादा अलौकिक अनुभव घेतल्याचे फिलिंग येते. म्हणून उगाच खरडपट्टी !  हेडिंग हा जर "मथळा" मानला तर वरचे अतर्क्य लॉजिक "कोथळा" मानता येईल. असो.
खरा उद्देश खाली डकवलेले फोटो खपवणे हा असून नुसते फोटो पाहणार्यांना मनस्ताप होईल याची काळजी घेण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी ……… काहीच वाचायची गरज नाहीये. :) 
--------------------------------------------------------------------------------------------------
















मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला

पूर्व लेख: 
3. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.

हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला
अंजनेरी येथील पुरातन मंदिरे बघून आता आम्ही गावात चौकश्या चालू केल्या. ऑफ-कोर्स हरीहरला जाण्याच्या.हरीहर किल्ल्याला कसे जायचे? अनेक मतप्रवाह ऐकायला मिळाले. काही म्हणाले की, त्रंबक ला जा तिथे राहा आणि सकाळी बस पकडा तर काहींचे म्हणणे होते की पेगलवाडी फाटा , घोटी रोडला उतरा तेथून खच गाड्या आहेत त्या पकडून हरीहरला जा आणि तेथेच राहा. काही म्हणाले, "रावा कि आमच्या गावात! मंदिरात झोपा अन हाटेलात या जेवायला.". एकाचे तर आम्ही हरीहर किल्ल्याला जाऊच नये असे जहाल मत होते. "काय बघायचीत ती डोंगर अन दगडे!" असो. 

यस्टी पकडून आम्ही उतरलो पेगलवाडी फाटा! तेथे राहायची काही सोय नाही हे ऐकून भरून पावलो. नंतर मग  गोग्गोड बोलून एका आश्रमात राहायची सोय केली. पण मग पोटाचे काय? फाट्या वरच्या एका अलिशान हाटेलात गेलो तर फक्त चहा होता. जवळपास ४०-५० ट्युबा जाळून बिचारा फक्त चहा विकत होता. खानदानी चहावाला असावा आणी व्यवसायाशी इमानी असावा. :)  असो. 
मग दुसरी यस्टी पकडून त्रंबक. तेथे समर्थ मठात ४० रु मध्ये भरपेट जैन घरघुती जेवण करून परत आश्रमात आलो. बेक्कार तंगडतोड झाल्याने मस्त झोप लागली. 

सकाळी उठून फाट्यावरून जीप पकडली ती डायरेक्ट निरगुडफाटा. जेथे जीप सोडून गेली त्या पाड्यात भात तोडणी ची कामे चालली होती. मोजून १५-२० घरे होती आणी एक शाळा.
जीप सोडून गेल्यावर एक साक्षात्कार झाला. तो असा की वळकटी केलेले पांघरूण जीप मध्येच राहिल्याने निरगुड पाडा पर्यंत पोहोचले आहे. मग गावात जीपवाला ओळखीचा असल्याने परत तो आणून देईल तर घेण्यासाठी सेटिंग लावले आणी मग काय … मिशन हरीहर !!
पायथ्यापासूनचे पहिले दर्शन.




मोजके सामान बरोबर घेतले बाकी गावात ठेवले. सुमारे एक तासात खिंडीत का पठारावर आलो. आता किल्ला दृष्टीक्षेपात येऊ लागला होता.

किल्ला, आजूबाजूचे सगळे डोंगर हिरवागार शालू नेसून आणी त्यावर जांभळ्या फुलांची झालर चढवून तयार होते. जास्त उन नसल्याने स्वछ वातावरण होते. पूर्ण निर्मनुष्य परिसर. पिनड्रोप सायलेन्स!

आजूबाजूचे डोंगर रवळ्या जावळ्या ची आठवण करून देत होते.
थोडे चाललो आणी मग जे पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते ते प्रत्यक्षात आले.
याचीसाठी केला होता अट्टाहास!! आजचा दिवस पावन झाला !!



येथे अजून एक हौशी ग्रुप आम्हाला जॉईन झाला.
हरीहर किल्ल्यावर जायचा प्लान केला तोच मुळी हरीहर किल्ल्याच्या एका अखंड कातळात ७० अंश कोनामध्ये असलेल्या खोदीव पायऱ्या बघूनच. नुसता फोटो पाहूनच आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते.  

प्रत्येक पायरीला वरच्या कातळात आधारासाठी बोटाने पकडायला खाचा केलेल्या आहेत. या पायऱ्या चढण्याचे आणी मुख्यतः पावसाळ्यात उतरण्याचे थ्रिल काही औरच आहे. 


बरीच भंकस करत २-३ तासात आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. थोडे चढून गेल्यावर सपाट पठार लागले. लगेचच समोर हनुमान मंदीर आले. किल्ला म्हंटला की हनुमानाचे मंदिर हे हवेच.
 
सोबतच हे काका भेटले. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. बरीच किल्ल्याविषयीची रहस्ये कळली. त्यांची पर्सनल लाईफ त्यांनी सांगितली. खरेतर त्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. जे काही ते जगलेत आजपर्यंत ते केवळ आणी केवळ भक्ती. रामाचा अद्वितीय भक्त हनुमानाच्या साक्षीने, या आजच्या काळात राहूनही आणी बायको मुले असूनही, संन्यास घेतलेल्या या भक्ताचा त्याच्या गुरुसाठी तीळ तीळ तुटणारा जीव पाहून खरेच काय प्रतिक्रिया द्यावी कळेनासे झाले.
काका, तुम्ही परत कधी भेटाल माहीत नाही, पण जर कधी भेटलात तर थोडासा दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिकवाल मला. सलाम तुम्हाला !!

येथून दिसणारे नजारे डोळ्यात साठवत भटकंती चालू झाली. पठारावर दोन मंदिरे, मोठा तलाव आणी आजूबाजूची डोंगरशिल्पे! बास अजून काय हवंय?



ब्रम्हगिरी पर्वत समोरच उभा ठाकलेला दिसत होता.
मग थोडा बळच क्लिक्लीकाट केला.
हौशी लोक तलावात पोहायला उतरली होती. मस्त थंडगार पाणी होते. आमच्या पत्रिकेत मोठ्या टायपात लिहिलेले "पाण्यापासून भीती' अशी अक्षरे दिसू लागल्याने आम्ही मोह आवरला. :) म्हंटले उगाच रिस्क नको, अजून लग्न करायचे बाकी आहे !! :)


कसलेतरी मंदिर होते. आत गेलो पण कळले नाही.

थोडा वेळ भटकून परतीची वाट धरली. एका ठिकाणी जवळ होते ते खाऊन घेतले. मस्त गाणी म्हणत, ओले गावात तुडवत चालत होतो. जसे काही आमच्याच बापाचा किल्ला आहे. 
तेवढ्यात एका झर्यापाशी सळसळ आवाज आला. बघतो तर काय? भलामोठा घोणस!
गप लैनीत आलो आणी पळत सुटलो !!


तेवढ्यात भूषणने पॉवर सेल्स म्हणजे काकड्या काढल्या. मस्त साली काढून तिखट मीठ लाऊन !! सोललेल्या काकडीच्या सालेने भीमाशंकरचा ट्रेक आठवला. उन्हाने डी-हायड्रेशन होऊन मरणप्राय अवस्थेत त्या काकडीच्या सालींनी आम्हाला जीवदान दिले होते.
५-३-२ आठवले का ?


जवळजवळ १०००+ फोटो झालेच होते. सध्या "दाखवायच्या फोटों"चा क्रंच असल्याने अनेक निष्फळ प्रयत्न झाले. मग एक ग्रुप फोटो झालाची पाहिजे.



संध्याकाळ ४ च्या सुमारास परत गावात उतरलो. गाववाल्यांनी माझे विसरलेले समान घेऊन ठेवलेच होते. त्यांना अनेक धन्यवाद दिले. ज्या घरात समान ठेवले होते तेथे राहिलेले पण न फोडलेले बिस्कीट पुडे दिले. गनबोटेचा मक्याचा चिवडा म्हणजे जीव की प्राण !! तोही दिला. बरीच लहान मुले जमली त्यांनी मस्त स्माईल देऊन आम्हाला निरोप दिला.


मुंबईकर खोडाळा मार्गे गेले तर पुणेकर ५ ची शेवटची यस्टी पकडून नाशिक ला गेले. नाशिक स्थानकाजवळ पोहोचताच "अतिथी" आणी त्यांचा खास म्हैसूर मसाला डोसा मनसोक्त खाल्ला. मग डायरेक्ट घरी.

२ दिवस कसे गेले कळलेच नाही. कांदेपोहे कार्यक्रमात ब्रेक पाहिजेच होता. मस्त रिफ्रेश झालो. २ दिवसात अंजनेरी त्रंबक हरीहर फिरून झाले. थोडे घाई केली असती तर ब्रह्मगिरी पण झाला असता पण जाऊदे! नेक्स्ट टाइम!

डोळ्यात मात्र एकाच नजारा होता पुढचा आठवडाभर !! हरीहर !! केवळ कमाल !!
 

हरीहर करताना वाटेत एक ग्रुप आम्हाला भेटला. हौशी कलाकार होते सगळे. त्यांची बरीच कलाकुसर चालली होती. एकाने मला फोटो काढताना विचारले की तुला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतंय!! मग अनेक गेसेस झाल्यावर तो म्हणाला प्रत्यक्ष नसेल पाहिले, ब्लॉग वा मायबोली असे कुठे लिहितो का? मग आयतीच आलेली ब्लॉगची जाहिरात करायची संधी मीही सोडली नाही.

३-४ दिवस एका लेखासाठी इनवेस्ट करून, फोटो सिलेक्शन, एडिटिंग अशी सव्यापसव्ये करून , BSNL चे  इंटरनेट वापरताना कमालीचा पेशन्स बाळगून हा एवढा लेखनप्रपंच करून, कोणीतरी आपला ब्लॉग (नाईलाजाने का होईना पण) वाचतो आहे हे ऐकून खरोखर आनंद झाला. त्याची अशी पावती मिळालेली बघून हर्षेगडावर हर्ष तर झालाच पण आणखी फिरत राहून त्यावर खरडण्याचा माझा उत्साहही  वाढला.

असो तर मग,
वाचत राहा ! अभिप्राय कळवत राहा !
 

मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

२०१४! काठावर पास !

पूर्व लेख :  


 २०१४! काठावर पास !

लोक्स हो, आमचे पुराण लावण्याआधी सर्व वाचक मित्र-मैत्रीणीना अगदी मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुमचे सगळ्या योजना, संकल्प (थोडे तरी) पूर्ण होवोत ही अपेक्षा. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१४..  आठ-आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही. जरा बारीक झालोय पण नजर लागायला नको म्हणून सांगत नाही.

असो, तर "वर्षभरात मी काय काय केले? वा काय कमावले आणि काय गमावले?" अश्या प्रश्नाने आयुष्याचा, वर्षाचा आढावा घेण्याइतके मी काही केले आहे असे वाटत नाही. काय कमावले आणि काय गमावले या दोन्हीचीही उत्तरे मला सुचत नाहीयेत. तरीही पूर्ण दिवस काढून यावर विचार केला.(म्हणजे पूर्ण दिवस सुट्टी काढून ५-७ मिनिटे विचार केला.)

काय गमावले?
काहीच गमावले नाही. कारण गमावण्यासाठी प्रथम काहीतरी असावे लागते जवळ. (हे तत्वज्ञान आमचे आम्हाला सुचले आहे.)

आणि काय कमावले?
काहीच कमावले नाही. (खरतर मी याची लिस्ट खूप मोठी केली होती पण तीच बनवताना बँकेतून फोन आला आणि त्यांनीच याचे उत्तर दिले.)

असो,
मग, ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यांच्या वाटेला कशाला जा? म्हणून मग प्रश्नच बदलला.

"वर्षभरात मी कुठे कुठे काय काय केले?

हे कुठेतरी वाचल्यासारखे वाटले असेल तर आपण हा ब्लॉग कधीकाळी वाचला आहे याची आम्हास पोचपावती मिळाली. मागच्या वर्षीच्या वृतांतातलेच हे तसेच उचलले आहे.

मागील वर्ष फारसे उत्तम गेलेले नसले तरी समाधानकारक म्हणता येईल. ऑफकोर्स भटकंतीच्या दृष्टीने.
बाकी वैयक्तिक आयुष्यातले दोन short-term गोल होते त्यापैकी एक लगेचच फेब्रुवारीतच पूर्ण झाला. एक मात्र थोडासा हुकला. असो प्रत्येक वेळेलाच रडणाऱ्या चे सांत्वन करता येत नसते.

यावेळी किल्ले कमी झाले पण इतिहासाचा मागोवा घेत फिरणारी भ्रमंती जास्त झाली. प्राचीन देवालये त्यांचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला गेला. कितपत यश आले हा भाग निराळा.

बरेच प्रश्न अजूनही निरुत्तरीतच राहिलेत. निसर्गात इतके फिरून निसर्ग कविता कळलीच नाही असे म्हणता येईल.
मला कविता कळलीच नाही… 
तडजोड कळली … भातपोळी कळली… 
उबदार रजई ची किंमत कळली… 
जुळवून आणायच्या नात्याची उपलब्धता कळली. 
बह्यारुपांवर भुलवणाऱ्या बाहुल्यांची किंमत कळली…… 
मला कविता कळलीच नाही… 
असो.
कांदेपोहे कार्यक्रमाने बहुतेक सुट्टीचे दिवस वाया घालवल्याने थोडीशी जी काही भटकंती झाली त्याची छोटीशी झलक.

जानेवारी :  पिकॉक बे 

वर्षाची सुरवात कुटुंबासोबत …पिकॉक बे … बच्चे मंडळी खुश.





 

फेब्रुवारी : काळभैरव यात्रा (अवसरी) 






खरेतर हे ऑक्टोबर मधील आहे पण फेब ला काहीच नसल्याने इथे डकवले.

 

मार्च :शिवमंदिर अंबरनाथ 





 

एप्रिल :निळकंठेश्वर/ तिकोना पोइंट 



 

मे : सांदण दरी 

केवळ अद्भुत निसर्ग नवल ….






 

जून :कलावंतीण दुर्ग 





 

जुलै :किल्ले चंदेरी 





 

ऑगस्ट:दौलत मंगळ भुलेश्वर आणी पांडवकालीन पांडेश्वर 







 

सप्टेंबर : अंजनेरी पर्वत व रामायणकालीन देवालये 









 

ऑक्टोबर :हरीहर किल्ला 







 

नोव्हेंबर :रायलिंग पठार, लिंगाणा 






 

डिसेंबर:कोकणदिवा 








वा, खरेच मस्त गेले हे वर्ष. ट्रेकचा आकडा 56 वर आलाय तर. बरच काही कमावले म्हणजे मी ! डोळ्यात आणि मनात. डोळ्यात साठवलेले क्षण आणि अनुभव हे केवळ शब्दातीत.

चला आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.लोभ असू द्या.

आता जरा फुकटचे ज्ञान :  :)
 
कुठलेही हरणे - जिंकणे हे फारच क्षणिक असते … हे समजूनही टिकून राहते झुंजायाची रग !
चालत राहा … आपल्या ध्येयाच्या दिशेने… बस चलते जाना है !


भेटत राहू …… वाचत राहा ….


सागर शिवदे
sagarshivade07@gmail.com
९९७५७१३४९४