शनिवार, २ मे, २०१५

जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट 
जीर्णनगरी मुशाफिरी : थरारक !! 
 
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर  

नवीन वर्षाच्या भटकंतीची सुरुवात कमाल झाली. दरवेळी प्रमाणे नवीन वर्षाचा संकल्प सोडताना यावेळी जरा वेगळी कल्पना लढवायचा प्रयत्न केला गेला. टोटल सोलीट्युड ! 
कुठे आणि कसे जायचे हे ही न ठरवता, कोणालाही बरोबर न घेता, डबा , पाण्याची बाटली इतकेच घेऊन काहीही प्लान न करता, मिळेल ती गाडी पकडून रन टाईम किल्ला ठरवून, एकटेच हिंडायला जायचे. समोर जे येईल त्याला एकटेच तोंड द्यायचे. कुठेही काहीही खर्च न करता,कमीत कमी खर्चात मनसोक्त भटकणे.
माणसाळलेला शिवनेरी असो वा एकलकोंडा कोकणदिवा. कधी सिमेंटच्या पायऱ्यानी भेटणारे महादरवाजे तर कधी ऊन पावसाशी अखंड टक्कर देत देत तसूभर ही न झीजणारा उभा प्रचंड कातळ.  कधी रुजलेल्या वहिवाटीच्या पायवाटा तर कधी जंगल सदृश्य वाटावी अशी घनदाट झाडातील गुरांच्या वाटा. कधी डोके ढगांच्या दुलईत खुपसून बसलेली शिखरे तर कधी नतमस्तक करणारी सर्वोच्च शिखरावरील मंदिरे. 
शांत, गूढ अश्या पुर्वाचीन अश्या लेण्या, त्यात कोरलेली आणी प्राचीन सुवर्ण युगाची आठवण करून देणारी भित्तीचित्रे.
कधी पाबे घाटात गाडी लावून एकट्यानेच बसून काढलेले दोन तास, कधी तोरण्याला गवसणी घालून लाल मातीत टायरची नक्षी काढत डोंगर दरयात केलेला मुक्त विहार. दिवाळीच्या दिवसात झगमग वातावरण सोडून सिंगापूर नामक गावातील फराळ वाटप, त्याक्षणी तेथील मुलांचे कोणत्याही झगमगाटाला लाजवतील असे उजळलेले चेहेरे !
अश्या अनेक गोष्टींचा त्या क्षणाचा केवळ एक मूक साक्षीदार. टोटल सोलीट्युड. !!! 

असो. 
वरती जे काही खरडले आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिला डेमो झाला तो किल्ले शिवनेरी.परत येताना विचार केल्यास असे उमगले की आपला संकल्प अगदीच चुकीचा नाही. येथे अनेक लोक असल्याने एखाद्या निर्जन ठिकाणी एकटे गेल्यास खरे अनुभव येतील. 
मग यावेळेस तो अनुभव घेण्यासाठी ,सकाळी उठलो,डबा घेतला आणी निघालो ते डायरेक्ट हडसर गाव. तेथे उतरल्यावर एका मुलाबरोबर खुंटीच्या वाटेच्या खिंडीत आलो. वास्तविक किल्ल्याचा अभ्यास केला तेव्हा दोन वाटा माहिती होत्या त्या अतिशय सोप्या होत्या. ही खुंटीची वाट ऐनवेळी आल्यावर कळली. 
एकटाच आहात तर या वाटेने जाऊ नका असे सल्ले आले पण म्हंटले जाऊन तर बघू नाही जमले तर परत फिरू.
खुंटीच्या वाटेने चढायचे आणी दुसऱ्या बाजूस असलेल्या पायऱ्यांच्या वाहीवाटेने उतरायचे असे ठरवले. 
सकाळी काही न खाल्याने पोट गडबड झालेले. त्यातच ऊन लागल्याने डोके जरा जड झाले. पायथ्याशी बसून गोड शिरा खाऊन घेतला. थोडावेळ तरतरी आली पण परत चढाई चालू केल्यावर फार त्रास जाणवू लागला. सुमारे १ तास चढाई केल्यावर वाटले कि बास ! आहे इथून परत जाऊ. इथे चक्कर वैगरे आली तर मदत तर सोडाच कोणाला काही कळायलाही वाव नाही. पूर्ण निर्मनुष्य प्रदेश आणी तेथे मी एकटा. 
बरेच पाणी पिऊन अजून अर्धा तास चढाई केली. आता मात्र असह्य झाल्यावर एका दगडाच्या सावलीत बसलो. 
समोर पाहिले तर ४०-४५ फुटी कातळकडा. पुढे कोठेच वाट सापडेना म्हंटल्यावर तो कातळकडा निरखून पहिला आणी मग साक्षात्कार झाला कि हाच कडा आपल्याला एकट्याला चढून जायचे आहे. हीच ती खुंटीची वाट. उभ्या कातळात खुंट्या मारून हातानं पकडण्यासाठी सोय केलेली आहे. म्हणून खुंटीची वाट.

आवरा ! जमणार नाही म्हणून परत गावात जायचे ठरवले. आता १२ वाजून गेलेले. परत उतरणार कधी आणि गावातून दुसऱ्या वाटेने चढणार कधी? गप्प बसून राहिलो सावलीत. तब्बल अर्धा तास एकाच जागी बसून काढल्यावर मग बरे वाटायला लागले. मग मात्र रिस्क घेतली आणी चढाई चालू केली.

त्यानंतर जे काही अनुभव आले ते म्हणजे केवळ थरारक. अविस्मरणीय !!
चढाई चालू केली. बूट घालून चढता येत नव्हते म्हणून बूट काढले. पण आता ते ठेवायचे कुठे असा प्रश्न आला. कॅमेरा bag पण होती.चढाई करताना फोटो काढायची पण खाज होती. 
मग, पाठीला sack, डाव्या हातात मानेवरून कॅमेरा bag, उजव्या हातातून मानेला कॅमेरा लटकवला. शूज चा अजून हिशोब लागत नव्हता मग त्यांची लेस सोडून, मोठी करून दंडाला शूज बांधले. T-shirt चे हात छोटे केले आणी अश्या अवतारात चढाई चालू. निव्वळ थ्रिल. 
खाली एका दगडावर पांढरा बाण दिसतोय तो बेस होता.  

वरून खाली पाहिले मग मात्र भीती वाटायला लागली. येथून खाली उतरणे तर अज्जीबातच शक्य नव्हते. सो तो विचारच सोडून दिला. गणपतीचे नाव घेत पुढे चढत गेलो आणी नशिबाने सुस्थितीत वरती पोहोचलो.

हा बघा पोहोचलोच !! याचसाठी केला होता अट्टाहास !! 

शेवटच्या टप्प्यात जरा जीवात जीव आला. सुखरूप पुढे पोहोचू शकू असा आत्मविश्वास आला. मग जरा डोकेही चालायला लागले. सामान जर कोंबून कोंबून शिफ्ट केले. अर्धा लिटर पाणी पिउन घेतले आणी जीवाची शांती करून घेतली. माणसात आल्यावर राहिलेले थोडे चढून किल्ल्याच्या मार्गी लागलो.
 हा पट्टा थोडा सोपा होता. 


एका ढासळलेल्या बुरुजापाशी आल्यावर किल्ल्याचा अंदाज घेतला. कुठे काहीच दिसत नव्हते. सगळीकडे पुरुषभर उंचीचे गवत. समोर छोटा डोंगर दिसत होता म्हंटले तो चढून वर गेल्यावर काहीतरी कल्पना येईल म्हणून त्यादिशेने कूच केले. बरेच गवत तुडवत चालताना एका ठिकाणी सळ sss सळ sss आवाज आला. डोकावून बघितले तर भलामोठा साप. मग जे काही टरकलो की जीवाच्या आकांताने परत बुरुजापाशी आलो. 

वाट सापडत नव्हती त्यातून मी एकटाच. बाकी साप आणी ससाणे होते जोडीला पण मला त्यांचा फराळ बनायचे नव्हते सो दुसरी वाट पकडली अन चालू लागलो. या वाटेत २ पाण्याची टाकी लागली मग मात्र हुश्श केले.

माझ्याकडे दीड लिटर पुण्याचे पाणी होते म्हणून आनंदाने हा फोटो काढता आला. नाहीतर अवघड होते. वेल, हरगडला अश्याच टाक्यातील पाणी ५ वेळा गाळून घेऊन पिले होते त्यामुळे याचे नो कौतुक.

थोडे अजून चालल्यावर महादेव मंदिर दिसले अन मग काय विचारता, पळत पळत ते गाठून पहिल्यांदी अर्धा लिटर पाणी पिले. देवाचे आभार मानले आणी फ्रेश होऊन मंदिरात गेलो.
आपोआप हात जोडले गेले.
आताशा दीड वाजत आला होता. पोटात पण सळसळ ( कावळे वैगरे नाही सगळीकडे सापच दिसत होता.) चालू झाली होती. मंदिरात प्रवेश केला तर गारेगार आणी समोरच गरुडरुपी हनुमान ! आता काय शहाम्मत आहे कोणाची चावायची! 
खच्याक ! खच्याक! फोटो परत चालू झाले. थोडेसे खाऊन घेतले. आणी निघालो दुर्गदर्शनास. 

किल्ल्यावर महादेव मंदिर, तलाव, धान्य कोठार/गुहा, बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. समोर उभा ठाकलेला निमगिरी पर्वत. लांबवर दिसणारा माणिकडोह, किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य. आणी इतर बरेच काही. पण या सगळ्यात सगळ्यात बघणेबल गोष्ट म्हणजे वाहीवाटेने येताना लागणारे अभेद्य दरवाजे आणी दगडात लपलेल्या मुख्य दरवाज्याला जोडणाऱ्या पायऱ्या. बघता क्षणी टाच आपटून साल्युट!
धान्य कोठार वा गुहा :
 
 येथून आत गेलो तर छोटे काहीतरी खपदाड असेल असे वाटले होते. मुख्य दरवाज्यातून आत गेलो तर फुल अंधार. एकदोन वटवाघुळे माझ्यावर सुट्टीचे डिस्टर्ब केले म्हणून केकाटत पेटून गेली. flash मारत आत बघितले तर ती साधी सुधी गुहा नव्हती तर अख्खा २ BHK FLAT होता. 
 

आता वाहिवाटेने उतरायला चालू केले.  इतके कमाल आर्किटेक्चर होते न बास! लांबून सुगावा पण लागणार नाही असा लपवलेला महादरवाजा. अत्यंत सुबक कोरलेल्या पायर्या, पावसाळ्यात पायर्यांवर पाणी येउन त्या घसरड्या होऊ नयेत यासाठी पायर्यांच्या सुरवातील पावसाळी पन्हाळी. एवढे डिटेल काम कोणी केले असेल राव?


मुख्य दरवाजा :
 वाह ! कमाल !


या अभेद्य उभ्या ठाकलेल्या महादरवाज्यावर ज्या कोणी निलेश ने नाव लिहिलंय न त्याच्या तर पिंडाला कावळा शिवलाच नाही पाहिजे. ( आमची मजल इथपर्यंतच) :)

पूर्ण किल्ल्यावर मी एकटाच हिंडत होतो. मनसोक्त फोटो काढले. एक उंच दगड बघितला आणी बसलो टेहळणी करत अर्धा तास.
वेळ बघितली आणी उडालोच. सव्वा चार! सव्वा पाच शेवटची ST होती. पटकन गाशा गुंढाळला आणी पळत सुटलो.
किल्ल्याचा/दुर्ग-दर्शनाचा म. सा. वी अजून बाकी होता. ROCK COVERED STEPS !!

उभ्या कातळात खोदलेल्या आणी तेतक्याच बेमालूमपणे दगडात लपवलेल्या मुख्य दरवाज्याकडे जाणार्या पायऱ्या.
ब्रिटिशांनी जेव्हा हडसर ताब्यात घेतला तेव्हा ह्या पायऱ्याची बरीच नासधूस केली. त्यांनी हरीहरचा न्याय इथे लावला असता तर? असो ब्रिटिशांवर आपला नो राग !
 


जवळच एक पुरातन छोटेखानी मंदिर होते, त्यातला गणपती.
कमाल आर्किटेक्चर !!

खटाखट क्लिक मारले आणी पळत सुटलो. उतरताना पायर्यांच्या वाटेने उतरलो आणी मधूनच एक शोर्टकट मारला. पायर्यांची वाट २ किमी पुढे उतरते. तीही चालली असती कारण आमचा ट्रेकी दोस्त निमगिरीहून येणार होता.
 उतरताना एक गावकरी भेटला त्याने सांगितले की "किल्ल्याच्या पोटात आख्खे गाव मावेल एवढी गुहा आहे. आम्ही पावसाळ्यात तिथेच जातो रहायला. चला दावतो ! " म्हंटले नको गाडी जायची. पावसाळ्यात नक्की येतो राहायलाच.!
मी हडसर गावात पोहोचायला आणी आमचा, लाल शर्ट घालून हिंडत फिरणारा दोस्त यायला एकच वेळ झाली.


माणिकडोह धरण : येथेच टायगर रिझर्व आहे. जुन्नर परिसरात पकडण्यात येणारे वाघ/ बिबटे पकडून येथे ठेवतात. सध्या २२ वाघ आहेत.
उतरताना एक गोल्डन ईगल दिसला.

जुन्नर पोहोचलो. एक इको कारवाला मला गाठून पुणे सोडतो म्हणाला, तसे आम्ही कायम यष्टीनेच फिरणारी लोक. म्हंटले जाऊ एकदा म्हणून बसलो. चांगला माणूस होता. पण त्याला लेफ्ट साईड जजमेंट अज्जिबात नव्हते. आणी मी साईड सीट बसलेलो. जाम टरकून तीन तास देवाचा धावा करत होतो. त्याला म्हंटले की प्रेमाने चालव रे बाबा गाडी, अजून लग्न व्हायचे आहे माझे! :)

त्याचा फोन बंद होता आणि त्याला कोणालातरी फोन करायचा होता. मी विचारले की बंद झाला का मोबाईल? तर म्हणाला नाही चालू आहे पण विमान आलंय स्क्रीनवर!

विमान ?????
स्क्रीनवर ????

आज अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल हे ऐकायला जिवंत नाही या विचाराने मला गदगदून आले. त्याचेही डोळे स्वर्गात नक्कीच डबडबले असणार! कसले विमान आले आहे बघायला फोन घेतला तेव्हा कळले की प्लेन मोड वर फोन गेला होता. मग आम्ही ते "एअर चायना" व्यवस्थित टेक ऑफ करून दिले. :)

असो. तर ९ ला पुण्यनगरी गाठली आणी एका थरारक ट्रेकची समाप्ती जाहली.हडसर खरच जाण्यासारखा तर आहेच पण या छोटेखानी गडावर एकटे हिंडायची मजा काही वेगळीच भासली. समोरच निमगिरी बोलावत होता पण त्याला म्हंटले नेक्स्ट टाईम भेटू !!

एकंदर खासच अनुभव होता. 
सकाळी जुन्नर समजून औरंगाबादची पकडलेली ST, कंडक्टरने "सभ्य" शब्दात केलेला अपमान, स्वतावरच हासत दोन किलोमीटरची केलेली पायपीट, खुंटीच्या वाटेचे थरारक अनुभव, किल्ल्यावर १-२ साप दिसल्यावर एकट्यानेच वाळलेल्या गवतातून जाताना मनात असलेली प्रचंड भीती आणी त्यात वाट सापडत नसल्याने हेल्पलेस कंडीशन आणी देवाचा धावा. न सापडणारी वाट सापडल्यावर झालेला आनंद, किल्ल्याचे दुर्गवैभव पाहून निवलेले डोळे,महादेवाच्या मंदिराच्या समोरच गरुडरूपातील हनुमान.वाळलेल्या गवतातून जाणवणारी सळसळ, किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाला एकट्यानेच बसून केलेली टेहळणी, अश्या जन्नत ठिकाणी डबा उघडला असता गोड शिरा आणी लोणचे. अहाहा !! सगळेच शब्दातीत. 

चला, आता पाने घेतो. नेक्स्ट टाईम भेटू निमगिरीवर ! त्यावेळी सोलीट्युड वैगरे फालतूपणा न करता जोडीला कोणीतरी असेल याची खात्री वाटत आहे.

वाचत राहा !!