रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर


 सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

सॉलीट्युड हौसेचे दुसरे व्हर्जन म्हणून सासवडला प्रयाण केले. सकाळी ७ ला उठलो, चहा पाणी झाल्यावर आईला शाळेत सोडायला निघालो. "जवळच पुढे कुठे तरी जाऊन येऊ " असा विचार करून एक पाण्याची बाटली आणी थोडा खाऊ पाठीवर पाठ -पिशवीत टाकले आणी निघतानाच घरी सांगितले की संध्याकाळी घरी येईन थोडा फिरून.
सासवड मधली शिवमंदिरे व लोणी भापकर येथील यज्ञवराह याबद्दल बरेच वाचले होते अंतरजालावर . सो 'सॉलीट्युड'च्या हौशी प्रमाणे ऐनवेळी ठरलेली भटकंती आणी ऐनवेळी ठरलेले ठिकाण हे समीकरण जुळून आले. कोथरूड पासून वारजे ला निघालेलो मी, पुढे सासवड, मोरगाव, जेजुरी, लोणी भापकर असा फिरत फिरत येताना त्यातही हौस म्हणून एक छोटेखानी किल्ला पण करून ९ च्या आत घरात आलो. 

कात्रजला कात्रज डेअरी मध्ये जाऊन ४ पिशव्या फ्लेवर्ड मिल्क/ पिस्ता स्वादाचे दुध घेतले आणि गाडीला टांग मारून पोहोचलो बोपदेव घाटात. २ पिशव्या तेथे फस्त केल्यावर अजून उत्साहाने पुढे सरकलो. सकाळी साडे सातला निघालो घरातून ते वारजे, कात्रज कोंढवा रोड ने सासवड पर्यंत येताना १० वाजले होते.

पहिले डेस्टीनेशन होते संगमेश्वर मंदिर. भर सासवड गावात, सासवड-चौफुला फाट्यापासून ३-४ किमी अंतरावर नदीच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर बरेच प्रसिद्ध आहे.

आजूबाजूचा मस्त शांत परीसर. त्या शांततेत फक्त कपडे धुणाऱ्या बायकांचा कलकलाट. मंदिरात माझ्याखेरीज अजून कोणीच नव्हते. एक छोटासा पूलाने आपण मंदिराच्या समोर पोहोचतो. थोड्या पायऱ्या चढून आपण मंदिराच्या सभा मंडपात पोहोचतो.
पूर्ण मंदिर दगडातून बांधलेले असल्याने भर उन्हातही आत मस्त थंडगार वाटत होते.

पोहोचताच थेट गाभाऱ्यात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. बाहेर पडून मग मंदिराची प्रदक्षिणा मारताना त्यावरची शिल्प आणी त्याचा इतिहास याचा सांगड घालण्याचा प्रयत्न सुरु झाला.

मंदिर एकाच दगडात कोरून काढले असावे असे वाटले. याचा कळस सोडला तर मुख्य मंदिराची रचना बरीच साध्यर्म असलेली वाटली. येथूनच उजवीकडे एक छोटी वाट खाली जाते तेथेही छोटी छोटी मंदिरे आहेत.

कळसावर केलेले मुर्तीकाम वा कातळकला लक्ष वेधून घेत होती.

येथे कळसावर खूप पक्षी बसले होते आणी सगळे एकत्र मिळून ओरडत होते. तो एक कलकलाट. पण हा मात्र हवाहवासा वाटणारा होता. रोज पारवे बघणाऱ्या नजरांना तेवढाच हिरवागार चेंज. असो.

हे महाशय बराच वेळ कळसावर फुटलेल्या एका झाडावर बसून टेहळणी करत होते.

एकटाच असल्याने यथेच्च फोटो काढत काढत फिरताना घड्याळाकडे लक्ष गेले आणी एकदम पुढचा लोणी भापकर पर्यंतचा बाकी असलेला प्रवास दिसू लागला. 
चला आता येथून पाने घ्यायची वेळ झाली. येथून पुढे 'चांगवटेश्वर' मंदिरात जायचे होते. कसे जायचे याची खात्रीजमा झाल्यावर दम खात बसलेल्या गाडीला टांग मारली आणी निघालो.

मंदिरासमोरच्या पुलावरून काही फोटो काढले त्यातला हा खालचा. मंदिरापासून संगमावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत तेथे हा गणपती आहे. एरवी वरून दिसला नसता.



थोडीशी पेटपूजा करून निघालो 'चांगवटेश्वर' मंदिरात.संगमेश्वर मंदिरापासून १० मिनिटांवर चांगवटेश्वर आहे.
हे सुद्धा पूर्णतः दगडात कोरलेले मंदिर असावे. तेथील पुजारी काकांनी येथे बरीच डागडुजी केलेली आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कुल-पुजारी म्हणून मन असलेल्या या मंदिराचा इतिहास जाणून घेऊन स्व-हस्ताक्षरात एक माहिती फलक लिहिलेला आहे.

आत आजूबाजूला बरीच छोटेखानी मंदिरे आहेत. त्यांचीही थोडी पडझड झाली असली तरी मुख्य मंदिर सुरक्षित आहे.

येथील प्रत्येक खांबांवर यथेच्च शिल्पकला केलेली आहे. भुलेश्वर मंदिराप्रमाणे येथेही महाभारतातील काही युद्धाचे वा द्वंदाचे प्रसंग कोरलेले आहेत.

सभा मंडपापासून ते गाभारा आणी पूर्ण मंदिरभर कातळ कलेचे अप्रतिम दर्शन येथे घडते. मंदिराच्या उजव्या बाजूस मोठ्ठे बकुळीचे झाड आहे. दुसर्या वेळेस पावसाळ्यात तेथे गेलो तेव्हा ते झाड पूर्ण पांढऱ्या फुलांची शाल पांघरून उन खात पहुडलेले होते.

येथे फोटो काढायची परवानगी घ्यावी लागते. पुजारीकाकानी लगेच परवानगी दिली पण जाताना दानपेटीत स्वइच्छेने काहीतरी देण्याच्या बोलीवर.  असो. एकंदर आजूबाजूचा स्वछ परीसर पाहून देणगी देताना काही वाटले नाही. ( नाहीतरी आम्ही देऊन देऊन किती ती देणगी देणार? पण असो फुल न फुलाची पाकळी.)

येथेही अज्जिबात गर्दी नव्हती. मी, पुजारीकाका आणी एक नुकतेच लग्न ठरलेले दोघे. माझा कॅमेरा बघून "त्याने" मला तेवढ्यातल्या तेवढ्यात "त्यांचे" सोनेरी क्षण टिपण्याच्या बिनपगारी कामास लावले.

आता जवळपास बारा वाजले होते. येथून डबा खाऊन पुढे जाणार होतो पण मला जेवण लोणी-भापकरलाच करायचा होता म्हणून मग उरलेल्या दोन पिस्ता मिल्क पाठीवरून पोटात ढकलले आणी निघालो पुढे मोरगाव …
मोरगावला पोहोचलो ते डायरेक्ट मंदिराच्या मुख्य दरवाज्यापर्यंत गाडी घेऊन. एकदोन "भक्त" मंडळी डाफरली पण "जल्दी जानेका हय रे बाबा मेरेकू."
येथे तुरळक गर्दी होती. अष्टविनायक टाईप पब्लिक आलेले होते. गणपती सोडून त्यांना बाकी सगळ्यात इंटरेस्ट होता. काही "महान" भक्तांनी रांगेत उभे असल्याचा त्रास रिफ्लेक्ट करत गणपतीला मोबाईलवर गाणी लाऊन साद घातली होती. अश्या लोकांचे पाप उदरात घेणारा धन्य तो लंबोदर ! प्रणाम !
रांगेत वैगरे उभे राहणे शक्यच नव्हते. लांबूनच नमस्कार केला आणी थोडावेळ बसून तिकडची स्पेशल अंजिरे पोटात ढकलली.

आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता पोहोचलो लोणी-भापकर.

यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!

त्याबद्दल पुढील भागात :
सासवडचीये नगरी : लोणी भापकर
सासवडचीये नगरी :मल्हारगड / सोनोरीचा किल्ला

वाचत राहा.

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

"नवसंजीवनी"

"नवसंजीवनी"

नमस्कार लोक्स, आज या पोस्टने माझ्या समाधी अवस्थेत जाऊ घातलेल्या ब्लॉगला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळत आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला शेवटच्या लेखाला.मधील काळात बऱ्याच सुखद घडामोडी घडल्या त्यांना वेळ देत यावा म्हणून हा आमचा लक्ष्मण असाच संजीवनी आणायला गेलेल्या हनुमानाची वाट बघत होता. 

असो, वाचक लोक नवीन लेखांच्या प्रतीक्षेत व्याकूळ झाली आहेत, आणी लेख पडताच त्यावर कधी तुटून पडतोय अश्या आशेने माझ्याकडे नवीन लेखांची लाडीक मागणी करतायेत, लेख आणी अक्षर दोन्हीचे तोंड भरून कौतुक करतायेत असे दिवस आम्हाला कुठले दिसायला? आम्ही मात्र कधी दिवाळीच्या चकल्या संपवतो आणी इथे चकल्या पडायला येतो अशी मानसिक अवस्था घेऊन लाडू संपवतो आहोत. हे ही असो. 

पुरेसे बोर करून झाल्यावर मूळ मुद्द्यावर येतो.मध्यंतरी 'एबीपी माझा'ची 'ब्लॉग माझा' स्पर्धा आयोजित झाली होती. त्यात प्रवेशिका पाठवली होती. आणी अनपेक्षितपणे "शिसारा उवाच" ला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. शेकडो ब्लॉग्जपैकी फक्त 13 दर्जेदार ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान या परीक्षकांसमोर होतं म्हणे :) 
असो, उत्तेजनार्थ बक्षीस का असेना, माझ्याखेरीज अजून कोणीतरी मी खरडलेले काहीतरी वाचतोय हे ही नसे थोडके.

पुरस्कार सोहोळ्या ला पोटापाण्याच्या गोष्टींमुळे उपस्थित राहाता आले नाही याची आता खंत वाटते. नंतर तो कार्यक्रम प्रसारीत झाला आणी एका नातेवाईकाचा फोन आला तेव्हा कळले. गेलो असतो तर तेवढाच लग्नातला ब्लेझर खपवता आला असता. त्यांच्या साईटवर नाव आले आणी चार-पाच लोकानी केलेले 'कवती क' हाच काय तो आमचा आनंद.
त्यांनी आम्हाला पुरस्काराचे बक्षीस ही पाठवले होते म्हणून ते मिळाले की त्याचा फोटू टाकून वाचकांना "पुराव्यांनी शाबित" करून दाखवता येईल म्हणून थांबलो होतो पण त्या देवाचे अजून मंदिरात येणे झालेले नाही.

या वर्षीचे पुरस्कार विजेते आणी उत्तेजनार्थ ब्लॉग्स खालच्या दुव्यावरून बघता येतील. विजेत्यांचे अभिनंदन.
http://abpmajha.abplive.in/mumbai/blog-majha-winners-134721 


मधला शांत काळात आमचे ब्लॉग लिहिणारे हात दोनाचे चार झाले. आता अधिकधिक भटकंती होऊन चार हातानी नवीन उर्जेने लेख लिहीन असे म्हणतोय. तसे मी बरेच दिवस बरेच म्हणतोय पण तूर्तास थांबतो. 

मध्ये एका रविवारी मुंबईच्या 'मी मराठी' नावाच्या दैनिकात ह्या ब्लॉगची एक पोस्ट छापून आली होती. त्याचे चित्र खाली चिटकवत आहे. ( अंधुक दिसत असेल तर चित्रावर क्लिक करून मोठे करा. तरीही अंधुक दिसत असेल तर चष्मा लावा. त्यातूनही अंधुक दिसत असेल तर वरचे अगम्य वाचून तुम्ही भावूक झालेले दिसता, तोंड धुवून या ( स्वतःच).)


 असो तर मग हासत रहा, वाचत रहा , रियाज करत रहा("कट्यार"पासून हे एक नवीन.( घ्या चालवून :) )

निरोप.