शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

सासवडचीये नगरी:मल्हारगड /सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा

 पूर्व लेख : 

सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

सासवडचीये नगरी: लोणी भापकर 


सासवडचीये नगरी: मल्हारगड/सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा

आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.

आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. सोनोरी गाव. 

गावात हनुमान मंदिरा मध्ये कसलातरी उत्सव भरला होता. बरीच मंडळी जमलेली होती. तेथून लांबूनच दर्शन घेऊन निघालो किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत. गावात मुरलीधर मंदिर म्हणून कृष्णाचे खूप सुरेख मंदिर आहे असे ऐकले होते. शोधत शोधत तेथे गेलो. मंदिर फार काही चांगल्या अवस्थेत नव्हते. आजूबाजूला घरांचा आणी कचऱ्याचा वेढा पडला होता. तेथे जाऊन बंद मंदिर बघून आजूबाजूला विचारू म्हंटले तर आजूबाजूला कोणीच नाही. फक्त कोंबड्या. मग एका कोंबडी ला घाबरवल्यावर ती ओरडत एका घरात गेली आणी मग तेथून एक आजोबा प्रकट झाले. 
"ह्ये मंदिर बंदच असते. कधीतरी सुट्टीच्या दिवशी मालक येतात न उघडतात. पुण्याला असतात म्हणे."-  इति आजोबा. 
असो नो प्रोब्लेम. तेथून सुटलो आणी पोहोचलो पानसे वाडा.

मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते.त्यांचाच हा वाडा. आजही इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा आपल्या भक्कम ६ बुरुज आणी अजूनही सुस्थितीत अशी तटबंदी अश्या बाहूबंदीने उभा आहे.
पानसे वाडा मुख्य दरवाजा.

मल्हारगड : सुमारे इ. स. १७५७ ते १७६० या काळातबांधला गेलेले शेवटचा किल्ला. किल्ल्यावर लावलेल्या पाटीवरही तशी नोंद आढळते.स्वराज्यातील हा शेवटचा किल्ला असल्याचे तेथे असलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी ६-७ फुट असावी पण बाकी किल्ल्यांची रचना लक्षात घेता ह्याची रचना फारच सरळसोट वाटली.
 असो. पानसे वाड्यावरून ५ मिनिटात गाडीवर पायथ्याशी आलो. लांबच लांब मोकळ्या ढाकळ्या जागेत मल्हारगड वसलेला आहे. जास्त लोकांना माहिती नसल्याने याचा पिकनिक स्पॉट झालेला नाही म्हणून का काय इथली जागा अजूनही स्वछ आहे. थोडी थोडकी कौलारू घरे, काही झोपड्या, आणी काही शेती. बाकी डोंगरच डोंगर.
मल्हारगडाचे पायथ्यावरून दर्शन.
पूर्ण निर्मनुष्य प्रदेश, "किल्ला चढून ये वरती, वरती भेटू!" म्हणत सुर्यनारायण अस्ताकडे निघालेले , उन्हे कललेली, भूस-भुशीत मातीत टायरची नक्षी काढत आणी धुराळा उडवत अस्मादिक एका घरापर्यंत पोहोचले. तेथे घरात असलेल्या मंडळींच्या साक्षीने गाडी त्यांच्या घरासमोर लावून किल्ल्याची वाट विचारून निघालो. सुमारे ५ वाजत आले होते आणी मला सूर्यास्ताच्या आत वरती जायचे होते. पावले झपझप पडायला लागली. इलेट्रिक टॉवर च्या दिशेने चालु लागलो.
किल्ला थोडा दृष्टीपथात येताच मुख्य वाट सोडून सरळ धारेवर चढाई चालू केली. अर्ध्या तासात प्रवेशद्वाराशी पोहोचलो.  न थांबता चढाई करून आल्याने थोडा दम लागलेला म्हणून तसाच एका खंदकात बसलो. उठताना लक्षात आले की, पाठीवर रेलून बसलोय आपण आणी ब्याग मधल्या अंजीरांची भेळ झालीये.


मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच समोर छोटेखानी किल्ला दिसू लागला. आजही शाबूत असलेले भलेमोठे बुरुज दिसू लागले.

मुख्य तटबंदीला समांतर असे बालेकिल्ल्याची तटबंदी आणी चोर दरवाजा दिसू लागला.

चोरदरवाजा :
एक वाट दिवे घाट सुरु होण्यापूर्वी लागणाऱ्या झेंडेवाडी गावातून येते. तेथून एक छोटासा डोंगर चढून आपण या चोर दरवाज्याशी येतो.

संपूर्ण दिवे घाट आणी परीसर यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. या बुरुजावरून दिवे घाट आणी परीसर दृष्टीस पडतो.

बालेकिल्ला दरवाजा :

बालेकिल्ल्यात दोन छान मंदिरे आहेत. एक महादेवाचे आणी एक खंडोबाचे. देवाचे बाहेरूनच दर्शन घेऊन थोडा वेळ मस्त फ्रेश हवा खात बसलो.

पूर्ण किल्ला भटकून घेतला. सगळ्या बुरुजातून खालीडोकावून पाहून झाले. सगळ्यांचे फोटो काढून झाले. मग आता थोडा वेळ येथून टेहळणी करत बसलो.

पश्चिमेच्या कागदाला जसा जसा केशरी रंग चढू लागला तसा उतरायला चालू केले. मुख्य वाट सोडून एका घासार्यावरून घसरत डायरेक्ट पायथ्याला पोहोचलो. थोडे फोटो बिटो झाल्यावर गाडीपाशी आलो. घरातून थोडे पाणी घेऊन फ्रेश झालो. माझ्याकडच्या काही गोळ्या तिथल्या लहान मुलांना दिल्या.

गाडी काढताना एक बैलगाडी चालली होती. आजोबांची एक मस्त फ्रेम काढली. 

 

एव्हाना पाखरेही आपल्या घरट्याकडे निघाली होती.


चला इट्स टाइम टू गो होम नाऊ. दिवसभरात भरपूर भटकंती झाली होती. रविवार सार्थकी लागला म्हणता येईल. येताना जेजुरी पण गेलो होतो पण तिथे असंख्य गचाळ पब्लिक बसच्या बस भरून वाहात होते. सो अर्ध्यातूनच परत फिरलो. पण त्यामुळे मल्हारगड मनसोक्त बघता आला. येथून निघून दिवे घाट->हडपसर-> कोथरूड. 

आज दिवसभरात बरेच काही उमगले होते. प्रवास असा झाला. 
कोथरूड > बोपदेव घाट > सासवड > संगमेश्वर > चांगावटेश्वर > मोरगाव > लोणी भापकर > जेजुरी > मल्हारगड >कोथरूड.

वाचत राहा. भटकत राहा. 

सागर