शनिवार, १२ मार्च, २०१६

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

विश्वास ठेवा अगर ठेऊ नका ............ भूतांचे अस्तित्व मिटत नाही .............२७ डिसेंबर २००७ रोजी हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर नामक गावी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी वेळ लाउन काढलेला हा फोटो !!! ४ डिग्री अश्या कडाक्याच्या थंडीतही भुताचे अस्तित्व कायम रहाते !!!


सध्या काय टीव्हीवर वाढीव हेल काढून बोलणाऱ्या वाढीव लोकांची वाढीव सिरियल चालू झाल्यापासून कोकणातील भुतांना फारच गडद फुटेज मिळालेले दिसते. आता भूतांना भूतांची भिती वाटते का? या आमच्या शंकेचे निरसन झाले नसल्यामुळे आम्हाला भूतांची भिती तर सोडाच पण त्यांचा सावधान पोजिशन मधला फोटू काढण्या पर्यंत आमची मजल गेली आहे. 

आमच्या कुंडलीतच कुठला तरी ग्रह कुणाच्या तरी नीच स्थानी असून ते बापडे एकमेकांकडे वक्राकार वैगरे बघत असल्याने आणि अश्या दुर्मिळ ग्रहयोगामुळे आम्हाला अत्यंत दुर्मिळ असा स्पोर्ट्स शूज घातलेला आणि सावधान पोजिशन मध्ये खिशात हात घालून उभे असलेल्या भुताचे दर्शन घडले. आणी ते पण कुठे कोकणा-बिकणात न जाता चक्क हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर नामक गावी. 

आता हे गाव भौगोलिक दृष्ट्या मुंबई आणी अहमदनगरच्या सीमेवर आहे म्हणता अहमदनगरच्या पाणी-टंचाईची झळ त्याला बापड्यालाही बसलेली असणार म्हणूनच टेबलावर ठेवलेल्या बिसलरी बाटलीकडे भूत आकृष्ठ झाले असणार. पाण्याची शक्यता वगळता तिथे ठेवलेल्या डब्यातील गुळाच्या पोळ्यांचा मोह होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

असो लोक आजूबाजूला झोपली असतानाही त्यांचा निद्राभंग न करता, मागे टेबल असूनही शिस्तीत उभा राहणारे, चार डिग्री अश्या कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेले हात खिशात लपवलेले, कोणताही अक्राळ-विक्राळ मेकअप न करता फुल पँट घालून आलेले, भूतांची सावली पडत नसूनही शंकेखोर लोकांच्या समाधानासाठी आपली सावली पाडणारे हे एका पुण्यात्मा माणसाचेच ते भूत असावे असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. ( काहीही निष्कर्ष का निघेनात, आपल्या 'बा' चे काय जातंय.) 

पण एक मात्र नक्की. विश्वास ठेवा अगर ठेऊ नका ............ भूतांचे अस्तित्व मिटत नाही .

(घाबरलेला) सागर