रविवार, ४ डिसेंबर, २०१६

पासष्ठ महिन्यांची झुंज : रामशेज किल्ला / चामरलेणीपासष्ठ महिन्यांची झुंज : रामशेज किल्ला

अंजनेरी पायथ्यापासून नाशिक बस पकडून नाशिक स्थानकावर आलो. पेठ बस लागलेलीच होती.
"मास्तर २ पेठ द्या.".

पेठ पासून अर्ध्‍या तासाच्‍या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते रामशेज किल्ल्याच्या पायथ्‍याशी असलेले गाव.आशेवाडी गावाच्‍या फाट्यावर उतरून ५ मिनिटात आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्‍ल्यावर चढाई करता येते. गावातून दृष्टीक्षेपात असलेल्या गडावर पोचण्‍यासाठी एक तास पुरतो.

आशेवाडी गावातून दिसणारा रामशेज किल्ला. गावात असलेल्या  दुकानांमधून टाईम पास पोटोबा करून किल्ल्याच्या दिशेने वाटचाल चालू होते. गावाबाहेर पडताच आजूबाजूचा मोकळा निसर्ग मी-मी म्हणू लागतो. आजूबाजूला चालू असलेले खाणकाम दुर्लक्ष करण्यास भाग पाडतो. मोरांचा आवाज ऐकत त्यांना लोकेट करत करत आपण अर्धा किल्ला चढलेला असतो.

गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ला डावीकडे ठेवत वाटचाल करत सुमारे दहा मिनिटात किल्ल्यावरील मंदिर व गुहा दृष्टीपथात येते आणि वाटेचे कन्फर्मेशन देते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या लागतात.किल्ल्याची उंची पाहता खरेच हा किल्ला पासष्ठ महिने  कसा काय लढवला असेल असे वाटून जाते. मुघलांनी किल्ल्याच्या उंचीचे लाकडी मचाण बांधून त्यावरून तोफमारा चालवला होता हे खरेच वाटायला लागते. कुठे मचाण बांधली असेल? किल्ल्यावरून त्या मचाणावर दगडफेक करून त्या कश्या उधवस्त केल्या जात असतील? या विचारातच आपण रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो.

आता इतिहासातून बाहेर येऊन आजूबाजूला मान वळवली की, आपली चढाई आपोआप थांबते. आपल्या मनात ऐतिहासिक द्वंद्व चालू असताना इथे तर निसर्गाचा निसर्गासाठीचाच अद्वितीय सोहळाच चालू असतो. आकाशभर काळ्या ढगांनी ढकलाढकली चालू केलेली असते. एका उंच टेकाडाशी रिंगण करून फेर धरल्यासारखा भास होत असतो. सूर्यनारायणांचे लक्ष असतेच त्यामुळे या रिंगणाला सोनेरी किनार लाभते. टेकाडा-पलीकडून उंची घेतलेला वारा आता आपल्यापर्यंत येऊन ढगातील चोरून आणलेल्या दवाने आपले पापणीचे केसही भिजवतो.
Felicitation by Nature to Nature !


घड्याळाकडे लक्ष जाते आणी आपण कल्पनेतून वर्तमानात येतो. पायऱ्या चढून भल्यामोठ्या चाफ्याचा झाडापाशी आलो की चाफ्याच्या वासाने मंदिरात शिरताना आपले मनही शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते.

गडावर शिरताना वाटेत एक गुहा दिसते. त्‍या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक बारमाही टाके आहे. त्‍यामुळे गुहेत एकदम गारेगार वातावरण असते. पुजारी काकांशी थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी गुहेखाली असलेल्या पाण्याच्या टाकीत उतरायची वाटही दाखवली. वर्षातून एकदा पावसाळ्याच्या आधी गावातून वीज पंप येथे आणून या टाकीतील सगळे पाणी काढून साफ सफाई ते करतात. बारमाही जिवंत झरा असल्याने दोन दिवसात परत टाकी भरून जाते आणि अतिरिक्त पाणी खालूनच वाहून  झाडांना जाते.

राम मंदिर व  प्रशस्त गुहा. 


गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्‍यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. येथूनच थोडे खाली बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने आपण अर्ध्या तासात आशेवाडीत पोहोचतो. येथूनच समोरचा देहेरगड व भोरगड किल्ला दिसतो. सद्यस्थितीत तेथे मिलिटरी बेस असल्याने तेथे जाण्यास परवानगी घ्यावी लागते.
गुप्त दरवाजापासून वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते तेथून देहेर व आजूबाजूच्या परिसराचे मस्त दर्शन होते. तेथून फिरून आल्यावर परत पायऱ्यांच्या सुरवातीला आल्यास तेथून एक वाट खाली जाते. तेथे किल्ल्याच्या अभेद्य दरवाज्याचे दर्शन होते. येथून खाली गुहे सदृश्य जाणारी वाट ही राम मंदिराच्या बाजूस असलेल्या गुहेत निघते.येथून बाहेर येऊन थोडे डावीकडे पठार लागते. येथे छोटी तळी आणि असंख्य मासे. गार पाण्यात पाय सोडून तळव्यांना थंडक द्यायची आणि थोडा पोटोबा करून घायचा.येथून पुढे मोकळ्याढाक पठारावर थोडी वामकुक्षी घेतानाच वर नजर जाताच समजते कि, किल्ल्यावर आपल्याखेरीज अजून कोण तरी आहे आणि आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.
ब्राम्हणी घार आपल्या जोडीला असतेच. दोन तीन पंख मारून मग खूप वेळ निवांत उडत असलेली घार आणि उतारावर गाडी बंद करून फुकट जाणारा मी या दोघात का कुणास ठाऊक साम्य वाटून जाते.
आता उन्हे सरली आणि पाय परतीच्या वाटेला लागले. जाताना वाटेतच चामरलेणी आहेत त्याही करायच्या होत्या. किल्ला उतरून आल्यावर रस्त्यावरच यष्टीची वाट बघत ठाण मांडली. सुमारे पंधरा मिनिटात यष्टी आली आणि दहा रुपयात चामरलेणी फाटा.

रामशेज किल्ल्यावरून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.

चामरलेणी म्हणजे भयंकर पायपीट आहे. खासकरून जेव्हा एक ट्रेक करून येऊन तुम्ही ह्या सुमारे ८०० पायऱ्या चढताय तर ब्रह्मांड आठवतं.  जैन लेण्या आणि जैन तीर्थस्थाने हि सगळी अश्या उंच डोंगरावर वसलेली आहेत. चामरलेण्यांच्या पायथ्याशी जैन आश्रम व संस्थान आहे. येथे थोडीफार खाणे-पिणे व फ्रेश व्हायची व्यवस्था आहे
.
चामरलेणी 


सुमारे ८०० पायऱ्या चढून वरती बघण्यासारखे काहीही नसल्याने चिडचिड होऊन परत मार्गी लागलो. मांगी-तुंगी ची आठवण काढत आणि दम खात एकदाचे वाटेला आलो. लेण्यांच्या शिखरावरूनच शॉर्टकट  बघून ठेवला होता. येथून चालत भूषणची सासुरवाडी गाठून तेथून पाहुणचार घेऊन हायवेला आलो. 

येथूनच पेठ-पुणे गाडी मिळाली आणि पुढच्या ७ तासांची निश्चिती झाली. रात्री पुण्यनगरी गाठली आणि परत औताला जुंपायला अस्मादिक सिद्ध जाहले. 

बरं तर मग,  मराठ्यांनी मोघलांना दिलेली पासष्ठ महिन्याची झुंज आणि त्या लढाईचे वर्णन वाचायचे असेल तर येथे वाचायला मिळेल.


वाचत राहा.