रविवार, ८ जानेवारी, २०१७

२०१६! जुना गडी , राज्य नवे !



आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही.मागच्या वर्षी थोडासा बारीक आणी त्या आधीच्या वर्षी थोडा गोरा झालो होतो पण ती पुण्याई फार काळ टिकू शकली नाही. असो.

नवीन संसार आणी नवीन सुरवात. आपली भटकंतीची आवड जोपासणारा जोडीदार मिळाला तर मग काय आपल्याला सगळं रानच मोकळं. आयुष्यातल्या या गुलाबी क्षणांनाही मुकायचे नाही आणी स्वस्थही बसायचे नाही अश्या द्वंदात "पुराव्यांनी शाबित ... " या चालीवर वर्षभरात कुठे कुठे भटकंती झाली याची हि चित्ररुपी झलक .


जानेवारी :  मांगी-तुंगी 

२६ तारखेची सुट्टी जोडून आली आणी जोडीने ट्रेक करायचा योग आला. पहाटेच्या लुकलुकत्या चांदण्यात, गुलाबी थंडीत चढून जाऊन, किल्ल्याच्या माथ्यावरून सूर्योदय पाहायची मजाच वेगळी. 



मांगी-तुंगी वर चढाईचे पूर्व लेख येथे वाचायला मिळतील. 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

फेब्रुवारी : देवगिरी 

मित्राच्या साखरपुड्याचे निमित्त काय झाले आणी औरंगाबादची वर्दी आली. कार्यक्रम आटोपला आणी स्वारी निघाली देवगिरी किल्ल्यावर. किल्ल्याचे स्थापत्यशास्त्र फारच कमाल आहे. 

मार्च : राजापूर, धोपेश्वर 

याही वर्षी राजापूरच्या गंगेत आमचे घोडे नाहले आणी तेही जोडीने! 
रात्नांगीची ती आंबा पोफळीची वने, कौलारू घरे, जलदुर्गांची रेलचेल, चिरंतन निसर्ग सौंदर्य, आगळा वेगळा शिमगोत्सव आणी आजूबाजूला अनेक "अंतू बर्वा" सदृश्य मंडळी. कमाल !



यावर बरेच लेख लिहायचे आहेत. सुरवात तर झाली आहे येथून राजापुरी वर्दी देऊन या !
पहिले प्रेम
राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 

 

एप्रिल : सफर-ए-जलदुर्ग : आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग  

जिथे दर महिन्याला एक ट्रेक जमवायची मारामार त्यात एकाच ट्रिप मध्ये २ दिवसात ४ किल्ले म्हणजे मेजवानीच.
यावेळी गाडी घेऊन गेलो असल्याने राजापूर-आंबोळगड- यशवंतगड- रत्नदुर्ग- रत्नागिरी- पावस-पूर्णगड- गणपतीपुळे असा साग्र संगीत भटकंती झाली.


मे : गोवा 

जरा कुठे स्वस्थ बसतो न बसतो तोच फर्मान आले .... गोवा... 



जुन : हंपी, बदामी 

जून म्हणजे आला लग्नाचा वाढदिवस. आणी त्यातही पहिलाच. हंपी आणी बदामी जायचे ठरवले तर लोकांनी वेड्यात काढले. लोक अश्या वेळेस बीच साईड वा परदेशात जातात आणी आम्ही दगड धोंडे बघायला जाणार होतो. पण खर सांगतो, हि ट्रिप खरोखर अनिव्हर्सरी गिफ्ट होऊ शकते. ३ दिवसांचा मूळ प्लॅन बदलून आम्ही तेथे ५ दिवस राहिलो होतो. फोटो बघून कल्पना येईलच पण हे ठिकाण त्याही पेक्षा भारी आहे. दोघांना एकमेकांसाठी निसर्गात वेळ काढायचा असेल अन कॉल्ड टूरिस्ट प्लेसेस नको असतील तर हंपी बेस्ट ! 


जुलै :  निळकंठेश्वर

आता घरच्यांनी बंड पुकारण्याचा आत आपले भटकणं बंद करू म्हणत गपचूप २-३ आठवडे काढले. आता जुलै म्हणजे पावसाळा आणी त्यात आपण घरी.. अरेरे.. शेवटी जवळच्या जवळ जाऊ म्हणून निळकंठेश्वर प्रदक्षिणा झाली.



ऑगस्ट:अंजनेरी 

आता या सगळ्यात सह्याद्री मी-मी म्हणत होता. त्यालाही न्याय दिलाच पाहिजे नाही का? वाढलेल्या वजनाला आणी सुटलेल्या पोटाला तर त्याही आधी न्याय दिला पाहिजे म्हणून सरळ एक दिवशी रात्री त्रंबक बस पकडून अंजनेरी.

आता यावरही एक लेख खरडला गेलाय. येथे टिचकी द्या बरे. ढगातील डोंगरदेव

सप्टेंबर :रामशेज , चामरलेणी

नाशिक जाणे झालेच होते तर आल्या पावली पासष्ठ वर्ष झुंजणाऱ्या रामशेजला इतिहास विचारून येऊ म्हणत चामरलेणी पण पादाक्रांत करण्यात आल्या.


ऑक्टोबर :
या महिन्यात कोठेही जाणे झाले नाही. काही प्लॅन नसले भटकायला तर एक फेरी तिकोना पॉईंट व्हायलाच पाहिजे नाही का? व्हॅलेन्टाइन डे इथे साजरा करणारी आम्ही लोक आहोत यावर अजून काही सांगत नाही. :) 




नोव्हेंबर :सुधागड 

बल्लाळेश्वराचे बोलावणे आले आणी आल्या पावली सुधागड पण काबीज झाला.

डिसेंबर: दिल्ली, आग्रा, मथुरा 

वर्षाच्या शेवटी आमचे 'नवा गडी नवे राज्य' जाहले. खुप दिवस टुरिझम बिजनेसमध्ये यायची इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाली. ११ लोकांची पहिली टीम "'दिल्ली मथुरा वृंदावन आग्रा या सहलीला घेऊन गेलो होतो. आल्यानंतर लोकांचे अभिप्राय ऐकुन ऍटलिस्ट आपण हे करु शकतो इतपत विश्वास आला आहे.



वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच लिहिता येईल असे नाही कारण डोळ्यात साठवलेले क्षण, जोडीने केलेली भटकंती, भल्या पहाटेची चांदण्यातली चढाई आणि ११ लोकांना घेऊन जाताना आलेले प्रवास अनुभव हे केवळ शब्दातीत.

कोकणात धोपेश्वरच्या जंगलात डॉक्युमेंट्रीचा निष्फळ प्रयत्न केला गेला होता. जाता जाता त्यावरही नजर टाकू शकता. 




चला, आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.


भेटत राहू …… वाचत राहा ….अभिप्राय कळवत राहा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: