सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

सातमाळा सप्तदूर्ग : इंद्राई


 सातमाळा सप्तदूर्ग : इंद्राई ( Fort Indrai) 


पहाटे पाच वाजून पाच मिनिटे झाली आणी मोबाईलमधील घड्याळाने भर एस्टीत कोलाहल माजवला. लोकांच्या अगदी साखरझोपा नसल्या तरी खांदा टू खांदा उडणाऱ्या डुलक्या मात्र उडाल्या. झोपेची थकबाकी गोळा करायला निघावे तोच चाके थांबली आणी झोपमोड झालेल्या जनतेचे सुस्कारे ब्रेकच्या एअर प्रेशर मध्ये विरून गेले. पिशव्यांची जागेवरून उचलबांगडी झाली आणी कंडक्टर काकांचा "मनमाड !" आवाज स्टेशनवरच्या अजून चार चौघांची झोप उडवून गेला.

भर थंडीत, तुरळक लोक स्टेशनवर थंडीशी दोन हात करत उभे होते. स्वेटर आणी पांघरूण दोन्ही असूनही काढायचा कंटाळा केल्याने रात्रभर हुडहुडी भरली होती. मनमाड म्हणजे अगदी वैराण प्रदेश असेल असे उगाच मला वाटत आले होते. दोन हात बगलेत धरून आता चांदवड एसटीची चौकशी चालू झाली. एक पाठोपाठ चांदवड गाड्या आल्या नी गेल्या पण उसवडमार्गे जाणारी गाडी आम्हाला वडबारे फाटा सोडणार होती.

आता गाडी निघाली तशी थंडीने अजून गुलाबी का काय ते रंग दाखवायला सुरवात केली. जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली तशी तशी शाळेच्या विद्यार्थ्यांची गजबज वाढली. मग लक्षात आले अरे आज २६ जानेवारी. सगळे पहाटेच्या सुमारास अंघोळ पांघोळ करून, आवरुन , खिश्याला झेंडे लावून तयार.

वडबारे फाटा आला आणी समोरच इच्छापूर्ती गणेश मंदीर उभे. आमच्या दोन आकृत्या अंधारातही उमटत होत्या. आता बघता बघता अजून एक तिसरी आकृती जोडीला आली. ते होते वडबारे गावातील शाळेतील शिक्षक. "इंद्रायणी किल्ल्यावर जाताय का?" या प्रश्नाने सुरवात होऊन चांदवड, थंडी, पीक,गणेशयाग, २६ जानेवारी, इथला सुपीक प्रदेश अश्या इतर बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली.

आता तांबडफुटीची वेळ झाली होती. गणरायांचे दर्शन घेऊन ट्रेकची सुरवात करूया म्हणून इच्छापूर्ती गणेश मंदीरात पोहोचलो. गणेश जन्म, गणेशयाग ३ दिवसांवर आल्याने मूर्तीची रंगरंगोटी चालू होती. लांबूनच हात जोडून वडबारे गावाचा रस्ता धरला.

पहिल्यांदी राजदेहेर किल्ला करायचा आणी मग इंद्राई असे ठरले होते. पण राजधेरवाडीला इतक्या सकाळी गाडी मिळणे शक्य नसल्याने पहिले इंद्राईकडे कूच करण्यात आले. गावात पोहोचलो तर शाळेत झेंडा वंदनाची तयारी चालली होती. शिक्षकांची ओळख झाली आणी शाळेच्या हापिसातच घरच्या दुधाचा फक्कड चहा झाल्यावर मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आजपर्यंत मी स्वतः शाळेत जाऊन ध्वजवंदन केले असा दैवी योग या देशाच्या वाटेला आजपर्यंत कधी आला नव्हता तो आज सह्याद्रीच्या आणी ४ दिवस जोडून सुट्टी मिळाल्यामुळे आला. तसा मी एकदा सकाळी उठून जायचा प्रयत्न केला होता पण मी अर्ध्या वाटेत असताना विरुद्ध दिशेने शाळेतली मुले ध्वजवंदन संपवून परत निघालेली दिसू लागली होती. असो हे ही नसे थोडके.

जनता विद्यालय, वडबारे या शाळेचा आणी मुलांचा मला फार हेवा वाटू लागला. इंद्राई किल्ल्याने वडबारे गावाला आणी शाळेला अशी कुशीत घेऊन आपल्यासारखेच अभेद्य व्हा असा सल्लाच दिला असावा बहुतेक. डोंगर दऱ्यांतल्या या वस्त्या आणी अश्या शाळा निसर्गाचा खरा वारसा पुढे देत असाव्यात. शाळेतले विद्यार्थी मागच्याच आठवड्यात वनभोजनासाठी किल्ल्यावर जाऊन आले होते. निसर्गात फिरताना जगण्याचे खरे अनुभव त्यांना जगता येत होते. कमाल!

इंद्राई किल्ला म्हणजे प्रचंड पायपीट आहे. वडबारे गावातून दोन डोंगर ओलांडून मोठ्ठं पठार लागतं. दूरवर नजर फेकायची आणी जिथपर्यंत नजर जातीये तिथपर्यंत चालायचंय अशी खूणगाठ मनात बांधूनच सुरवात करायची. सुमारे ३-४ किमी चालल्यावर एक मोठे वडाचे झाड येते आणी त्या बाजूला छोटेखानी मंदिर सदृश्य वास्तू. हीच खूण आपण बरोबर वाटेवर असल्याची. पूर्ण परिसरात असलेल्या एकमेव झाडाखाली थोड थांबून पोटोबा केला.


आता उन्हे वर चढायला लागलेली होती. आता झपझप पाऊल  टाकणे अनिवार्य होते. झाडाच्या सावलीतूनच मार्ग निश्चित केला. किल्ल्याचा कातळात खोदलेल्या पायऱ्या इथूनच दिसत होत्या.


थोड्याश्या अर्ध्या तासाच्या चढाई करून वरती पोहोचलो अन मारुतीरायांचे दर्शन जाहले. समोरचा तीन रोडग्यांचा डोंगर आमची पाठराखण करतो म्हणाला तर त्यामागून चांदवड किल्ला "भिडा तुम्ही... मी हाये" म्हणत होता.


मारुतीच्या मूर्तीला नमन करून पुढची वाटचाल आता दृष्टीक्षेपात होती. समोरच उभा कातळ खोदून खिंडीत घुसणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. एकंदर सगळ्या किल्ल्यांच्या खोदलेल्या पायऱ्यांची उजळणी झाली आणी हे वास्तुरचना कोणत्या सारखी आहे यावर खलबत चालू झाली. काही असो पण त्या कपारीचा आकार आणी त्याचा स्मूदनेस बघता त्याकाळी असे कातळ खोदण्यासाठी काहीतरी प्रगत तंत्रज्ञान असावे या निष्कर्षावर दोन यथाकथित तज्ञांची चर्चा संपली.


यालाही पायऱ्यांना हडसरसारखे दगडी कव्हर असावे असे वाटून गेले.


पायऱ्या चढून येताच प्रवेशद्वार असावे असे वाटावे अशी वास्तू दिसते. येथेच फारसी भाषेत शिलालेख कोरलेला दिसतो.


आता किल्ल्याच्या शिरोभागावर रणरणते ऊन आणी दोन रिकामटेकडी लोक याशिवाय कोणीही नव्हते. किल्ल्यावर बघण्याची ठिकाणे म्हणजे खोदलेल्या गुहा आणी पाण्याचे टाके. याशिवाय वरून दिसणारे राजधेर-कोळधेर आणी आजूबाजूचा मोकळाढाक परिसराची टेहळणी करत आपण तासन-तास बसू शकतो पण वाढते ऊन आणी मेलेल्या जनावरांचा वास यामुळे पुढे पळणे भाग पडते.


गावातील लोक त्यांची निरूपयोगी जनावरे किल्ल्यावर सोडून देतात चरायला. चारा आणी पाणी दोन्ही असल्याने काही दिवस जगून, निसर्गात विलीन होऊन निसर्गसाखळीस हातभार लावत असावेत. त्यामुळे जागोजागी पडलेली हाडे रस्ता बदलायला भाग पडतात. असो.

बाकी किल्ल्याचा माथा प्रशस्त आहे. गुहांचा शोध घेणे चालू केले तर दूरवर एक खडकावर कोरलेल्या पायऱ्या . बघता तेथेच जवळपास गुहा असावी.


मोठमोठ्या दगड-धोंड्यात बेमालूमपणे लपवलेल्या गुहा शोधायला नक्कीच कष्ट पडतात. यातील पाणी काही पिण्यायोग्य नाही सो निघतानाच दोन अडीच लिटर पाणी घेऊनच निघाले पाहिजे.


दूरवर नजर जाईल तोपर्यंत विखुरलेल्या सातमाळा रांगा भर डोईवर आलेल्या सूर्याने तापून निघत होत्या. राजधेर-कोळधेर यांनी लगेचच एक ब्राह्मणी घार आमच्या स्वागतासाठी पाठवली. धोडप, विखारा आणी कांचना यांचे  पुसटसे दर्शन झाले.


घड्याळात बघता एक वाजून गेला होता. ३ वाजता वडबारे गावातून राजधेरवाडी गाडी आहे असे कळाले होते. पण पोटातील भुकेला पण न्याय देणे बाकी होते. परत फिरून अजून काही सापडते का बघून परत खिंडीत आलो आणी पोटोबा केला.इंद्राई किल्ल्याच्या खिंड़ीत जेवणाचे डबे उघडले तर हे महाशयसुद्धा जेवायला आले.पण त्यांचा बेत "वेगळा" दिसु लागल्याने काढ़ता पाय घेण्यात आला.


आता निघताना आल्या मार्गे न परतता पायऱ्यांच्या समोरच्या मुख्य सोंडेवरून उतरायला चालू केले. समोर बघता अजूनही भयंकर पायपीट बाकी होती. येथून उतरणारा मार्ग पुढे अजून निमुळता होत गेला. एका क्षणी अश्या जागेवर आम्ही येऊन पोहोचलो की येथून खालीही उतरता येईना आणी पुढेही कोठे जात येईना. परत आल्यापावली फिरून उतरायचा पेशन्स तर नव्हताच, मग थोडे मागे फिरून कसरत करत, करवंदांच्या जाळीतून मार्ग काढत, आणी हात-पायावर रक्ताच्या नक्षी काढत एकदाचे काय ते आम्ही माचीवरच्या एकमेव घरापाशी पोहोचलो.

डावीकडे दिसणारा डोंगराच्या मागे वडबारे गाव! हैला तिथपर्यंत जायचंय अजून!घरात तर कोणीच नव्हते आणी आजूबाजूने दूरपर्यंत निवडुंगाचे केलेले कुंपण बघता तेथे जाण्यासाठी फार दिव्य करावे लागणार हे बघून पुढचा मार्ग धरला.

निघताना किल्ल्याला शेवटचा बाय बाय केला. एकंदर पायपीट बघता "पुन्हा भेटू" वैगरे शक्यच नव्हते. तीनच्या सुमारास परत शाळेपाशी पोहोचलो तोपर्यंत जीव अर्धा झाला होता.आमचे बाकीचे सामान शाळेशेजारील ज्या घरात जेथे ठेवलेले होते तिथपर्यंत कसेबसे पोहोचून त्यांच्या अंगणातच डेरा टाकला. माठातले गार पाणी आणी आलेयुक्त चहा झाल्यावर कुठे माणसात आल्यासारखे वाटले.

आज कॉलेज न शाळा सुट्टी असल्याने तीनची गाडी येणार नाही असा साक्षात्कार झाला. आता जे जे होईल ते ते पाहणे याशिवाय काहीही हातात नव्हते. मग ओळखी-पाळखी निघून गप्पा आणी चहात अजून एक तास गेला.

साडेचारच्या सुमारास एक बँडची गाडी चांदवडमधील सुपारी "वाजवून" राजधेरवाडीच्या अलीकडील वस्ती पर्यंत चालली होती. घरातले आजोबा गुरांनां चार टाकत होते ते हातातला चारा टाकून रस्त्याकडे धावले आणी त्यांनी सेटिंग करून दिली. वस्तीपासून पुढे चालत जाण्याची मनाची तयारी करत आम्ही गाडीत आसनस्थ झालो.

सुमारे ४-५ किमी गेल्यावर परत सामान खांद्यावर टाकून आमची वरात निघाली. जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात तसे झाले. पुढचे ५ किमी अंतर चालताना आम्ही जे जे काही अनुभवले ते गाडीच्या सरळसोट प्रवासात नक्कीच उमगले नसते. जाताना लागणाऱ्या द्राक्षाच्या बागा, ज्वारी, मिरची, कांदा,हरभऱ्याची शेते अन बरच काही.... ते पुढच्या भागात. 

तोपर्यन्त सायकलचे मागचे सीट पकडून ठेवा आणी तयार व्हा राजदेहेरच्या सफरीसाठी !प्रकाशनाच्या वाटेवर....
सातमाळा सप्तदूर्ग : हातगड
सातमाळा सप्तदूर्ग : धोडप
सातमाळा सप्तदूर्ग : मार्केंडेय
सातमाळा सप्तदूर्ग : सप्तशृंगी
सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर
सातमाळा सप्तदूर्ग :कोळधेर