रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

सातमाळा सप्तदूर्ग : रंगमहाल (होळकर वाडा)

पूर्व लेख :

सातमाळा सप्तदूर्ग : इंद्राई ( Fort Indrai) 

सातमाळा सप्तदूर्ग : राजदेहेर (Fort Rajdeher)



सातमाळा सप्तदूर्ग : रंगमहाल (होळकर वाडा)

....आता टार्गेट होते ते म्हणजे रंगमहाल. रंगमहाल म्हणजे सरदार होळकर यांचा वाडा. शनिवार वाड्याच्या तोडीचे नक्षीकाम केलेला हा वाडा भरवस्तीत उपेक्षा भोगतोय. असो..

राजदेहेर किल्ल्याच्या पायथ्यापासून भर उन्हात चालत येताना ब्रह्मांड आठवत होत. त्यात देवदूतासारखा (रिक्षा घेऊन)धावलेल्या माणसाने रिक्षात कोणतेही सीट न घेता चांदवड पर्यंत आणले. "अहो काका, तो होळकर वाडा कुठे आहे हो इथे? तो बघायचंय." वाक्य पूर्ण होतानाच त्याला ब्रेकच्या आवाजाची झालर चढली न पुढून आवाज आला "उतरा मग इथेच. ५ मिनिटे चालत आहे आत."

रिक्षाच्या डिकीतली बोचकी पाठीवर घेऊन मंडळी चालू लागली. डाव्याबाजूने चांदवडचा किल्ला आमच्यावर लक्ष ठेऊन होताच. यावेळेस त्याने आम्हाला हुलकावणी दिली होती. सुमारे १० मिनिटे चालत, विचारात विचारत होळकर वाड्याच्या समोर पोहोचलो. आजूबाजूला तुरळक दुकान होती पण मोजून ३ माणसे तिथं उपस्थित होती. आम्हाला पाहून एका दुकानलक्ष्मीचा  आवाज फुटला. "आबा गिर्हाईक!!"
लगेच आबांनी पायजमा झटकला, तोंडातल्या सुवासिक ऐवजाला जमिनीचा रस्ता दाखवला आणी एकदम पेशवे काळात जाऊन पोहोचले. क्षणात इहलोकातून पेशवेकाळात जाणाऱ्या या महा(न)भागांना टाईम मशीन वैगरेची गरजच नाही. 
गाईड पाहिजे का? या वाक्यानंतर दूसरेच वाक्य थेट "तुमचा पुण्याचा शनिवारवाडा झक मारेल या वाड्यापुढे" हे वाक्य आल्यानंतर आबांना कोपरापासून दंडवत घातला. "तुम्ही पुढची गिर्हाईक बघा काका! नका कष्ट घेऊ आमच्यासाठी!"

पण रंगमहाल या शब्दाने आमच्या मनात वाड्याचे एक वेगळेच चित्र झाले होते आणि ते खरेही ठरले. होळकर कालिन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल. राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यशासन काळात (१७६७-१७९५) किल्ले सदृश्य होळकर वाड्याचा(रंगमहाल) निर्माण केला.  पूर्वीच्या काळी हा वाडा होळकर वाडा म्हणून ओळखला जात असे,
पेशवेकाळात बाजीराव पेशव्यांचे होळकर हे सरदार होते. पेशव्यांनी होळकरांना चांदवड जहागिरी म्हणून दिला होता आणी या वाड्याच्या निर्मितीला पेशव्यांचे पाठबळ दिले होते म्हणतात.
या महाकाय प्रवेशद्वारातून आपला वाड्यात प्रवेश होतो. वाड्याची संरक्षण रचना शनिवार वाड्याशी मिळतीजुळती वाटते. प्रवेशद्वारावर लोखंडी शस्त्रांची ढाल दिसून येते ती म्हणजे बाय डिफॉल्ट हत्तींना रोखण्यासाठीच असावी. :)

वाड्यात सध्या नूतनीकरणाचे म्हणजे थोडक्यात ऑइल पेंट फासून विद्रुपीकरणाचे काम चालू आहे. पूर्ण वाड्यात कामगारांची ये-जा चालू होती. कुमार सानू काकांची दर्दभरी गाण्यांनी वाडा गजबजून गेला होता. पण तरीही पॉलीश न केलेल्या लाकडातील नक्षीकाम नजर वेधून घेत होती. सागवानातील केलेले एकसारखे नक्षीकाम पूर्ण वाडाभर पाहून अवाक व्हायला होते.
 

मुख्य दरवाजातुन आत गेले की मोकळी जागा लागते आणि समोर वाड्याचे दुसरे प्रवेशद्वार. याच्या वर बसायला जागा. येथूनच जनतेसाठी राजसभा, न्यायदान केले जात असे. येथून आत गेल्यावर आपण प्रशस्त अश्या चौथऱ्यावर येतो. येथून दुसऱ्या मजल्यावर जायला जिने आहेत. या वाड्यातील खोल्या आणि जायचे रस्ते म्हणजे खरंच कमाल आहे. दुसऱ्या माळावरील काही खोल्या एकसलग जोडलेल्या आणि प्रशस्त व्हरांडे पाहून "स्त्रीवर्ग राजसभेत येथून भाग घेत असावा " असे ऐकलेले मनोमन पटून जाते.
  


घराच्या उंबऱ्यात घोड्याची नाल असणे शुभ मानले जाते. येथेही वरच्या मजल्यावर काही खोल्यांच्या उंबऱ्यावर नाल ठोकलेली दिसत होती. वाड्यातल्या मान्यवरांच्या ह्या खोल्या असाव्यात.



वाड्याच्या बाहेरून एक पायवाट उजवीकडे जाते तेथून थोडे खाली एक तत्कालीन विहीर दिसते. काही दिवसांपर्यंत तेथे जायला बंदी होती पण काम चालू असल्याने गेट उघडले असावे. दगडाच्या भक्कम बांधणीची सुमारे 40-50 फूट खोल असावी. येथेच एक मोट बसवलेली असून त्यासाठी छोटेसे शेड केले आहे. सध्या डागडुजी साठी लागणारे पाणी येथूनच मोटर लावून घेतले जात होते. त्या मोटेवरूनच हा फोटो टिपला. खाली विहिरीत उतरायला प्रॉपर पायऱ्या आणि दरवाजे केलेले आहेत पण तेथे जायला परवानगी नाही.
40 वर्षांपूर्वी येथे वाड्यात अनेक कार्यालये होती. वीजबिल भरणा केंद्र होते. नंतर येथून सगळे हलवले असले तरी 40 वर्ष्यापुर्वीची रद्दी अजूनही पर्यटकांसाठी विरंगुळा म्हणून ठेवली असावी. चांदवड येथील देवीच्या मंदिराची असंख्य रिकामी पावती पुस्तके येथे एका खोलीत पडली होती यावरूनच आपली देणगी नक्की कुठे जाते हे लक्षात येईलच.
बँकेची मिटिंग आहे मार्च मध्ये 11 मार्च 1978. त्यासाठीची नोटीस लावलीये. बघा कोणाला यायचा असेल तर या मीटिंगला. :)

असो तर वाडा बघून लागलीच चांदवड स्टॅन्ड वर आलो. वाटेत एक झोपडीत डब्यातले खाण्यायोग्य पदार्थ देऊन टाकले आणी पुण्यनगरीची बस पकडली. मध्यरात्री पुण्यात पोहोचून स्वारी इहलोकात आली आणी रोजच्या रहाटगाडग्याला जुंपायला सिद्ध जाहली.
वाचत रहा.