शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

थंडीची चाहूल : वितंडगड

थंडीची चाहूल : वितंडगड


बरेच दिवस हापिस एके हापिस करणारी मंडळी आज सकाळी साडे सहा वाजता जुजबी आवरून तयार झाली होती. पुरते उजाडले तर नव्हतेच, त्यात थंडी मी-मी म्हणतच होती. थंडीशी प्रतिकार  करत मंडळी कोथरूडडेपोच्या एका अर्धवट तुटलेल्या पारावर सूर्यनारायणाची प्रतीक्षा करत बसली. मोजक्या मफलरी अन कानटोप्या पोटापाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. रोज तुडुंब वाहणारा रस्ता कोवळ्या उन्हाची वाट बघत पहुडला होता. थोड्याच वेळात थंडरबर्ड नावाचा आमचा वारू आला आणी तिकोना किल्ल्याच्या दिशेने  मार्गक्रमण झाले.

आत्ता बऱ्यापैकी वाटणारी थंडी पौड जाताच प्रचंड वाटू लागली. धुक्यात वाट काढत काढत जाताना निसर्गाच्या करामतींची मौज वाटू लागली.काही अंतरात वातावरण बदलले होते. नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली पण रानावनात मनसोक्त गच्च भरलेल्या थंडीने त्याला काही दाद लागू दिली नाही. सर्वत्र धुके पसरले होतेच, वाहत्या गारव्याने ते आता माळरानात उतरू पाहत होते. झाडांच्या पानापानातून वाट काढू पाहणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांशी जणू काही त्याची शर्यंतच लागली असावी.


पहाटे पहाटे उठून, गार पाण्याने अजून थंडी वाजेल म्हणून तोंडही न धुता, दिवाळीनंतर कपाटातून खाली काढलेले स्वेटर चढवून, बगलेत हात धरून फिरायला निघालेले बालपणीचे क्षण डोळ्यासमोर असे तरळून गेले. हातमोजे वैगरे अश्या गोष्टी फारच 'वाढीव' म्हणून हात बगलेत घट्ट ठेवून चालत राहिले कि थोडीफार ऊब यायची. पहाटे गाड्यांच्या काचांवर जमलेले  दव, त्यावर आपली कारीगरी करत अन तोंडातून वाफाळलेल्या चहासारखी वाफ काढायची स्पर्धाच जणू लागून जायची आमच्या सगळ्यांच्यात. आजही अजाणतेपणाने आलेल्या जांभईने आज मला स्पर्धक नसल्याने विजेताच केले असावे. पण बदलले मात्र आजही काहीही नव्हते. आजही रोमारोमात थंडी भरली तर होतीच अन हातही निमूट बगलेत विसावले होते.


पौड, कार्मोळी, चाले, कोलवा,जवण अशी छोटी-छोटी गावे मागे पडत गेली तसे तिकोना किल्ला सकाळच्या धुक्यात ध्यानस्थ बसल्यासारखा दिसायला लागला. आजूबाजूच्या शेततळ्यामध्ये सूर्याचे बिंब परावर्तित होऊन सगळं परीसर सोनेरी झाला होता. सगळी गावे सह्याद्रीच्या कुशीत निवांतपणे विसावली होती. ना कुठं कसली धावपळ ना कसला माग.
आळसावलेल्या खेड्यांमध्ये आत्ताशी कुठं मंदिरे जागी होत होती. तुंग किल्ल्याने तर आज आपले अस्तित्वच धुक्याच्या हवाली केले होते. पवना धरणाच्या पाण्याने त्या धुक्याच्या रंगात आपला रंग मिसळून तुंग किल्ला बेमालूमपणे लपवला होता. सूर्यप्रकाशाचा सोनेरी मुकुट घालून तुंगीचा सुळका ढगांशी दोन हात करत उभा असेल असे अपेक्षेप्रमाणे आज काही होणे नव्हते. हा पठ्ठया तर ढगात डोकं खुपसून, पवना नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता. 'तिकोनापेठ' गाव थोडे मागे सारून आता स्वारी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली होती.


जवळपास पाचवी भेट असल्याने मार्ग वैगरे शोधण्याचा प्रश्न नव्हता. एका  दमात मंडळी किल्ल्याच्या पूर्व धारेवर येऊन पोहोचली. पिरॅमिड सारखा त्रिकोणी मुकुट आणि डोंगराला फूटलेल्या तीन धारा व त्यावरच्या  तीन वाटा म्हणून तिकोना. सुमारे अर्धा तासात आपण पहिल्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. पहारेकरीच्या ओवऱ्या ओलांडून पुढे आले की पुरुषभर उंचीची रामभक्त मारुतीची 'पुच्छते मुरुडिते माथा" या ओळींची आठवण करून देणारी उभ्या दगडात कोरलेली मूर्ती पाहून हात आपोआप जोडले जातात. त्यात आज शनिवार.!नमो नमो !

आल्यापावली दर्शन पण घेऊन टाका. 

येथूनच थोडे पुढे एक गुहा लागते. सातवाहनकालीन असावी बहुतेक. गुहेत पूर्वी एक साधू राहायचे, येणाऱ्या प्रत्येकाला हात उंचावून आशिर्वाद देत असत. आज त्याचे काही दर्शन झाले नाही. असो! परिवर्तन म्हणूया ! याशेजारीच देवीचे मंदिर दिसते. गुहेसमोरच जलप्रपाताने तयार झालेल्या पाण्याच्या टाक्याला डाव्या हाताशी ठेऊन आपण गुहेत प्रवेशते होतो. ध्यानस्थ होऊन जातो आपण असे वातावरण. नमस्कार,चमत्कार झाल्यावर गुहेच्या समोरच बघता चुन्याचे भलेमोठे जाते दिसते. हे बघता किल्ल्याची आजपर्यंत अभेद्य तटबंदीचे रहस्य समजते. तटबंदी बांधताना दगडांमध्ये चुन्याचे मिश्रण बाँडींगसाठी टाकले जायचे. 

आता येथून दोन वाटा फुटतात. एक सरळ जाते ती बालेकिल्ल्यावर तर एक उजवीकडून खाली जाऊन चोरदरवाजाकडे . चोरदरवाजा आज काही वापरात नाही आणि वारेमाप वाढलेल्या गवताने शोधणेही महामुश्किल. डोंगराच्या तीन धारेपैकी एक धार पकडून येणारी ही वाट असावी. त्याच्या परस्पर विरोधी बाजूला म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडून 'जवण' गावातून वरती येणारी हि तिसरी वाट आज कालानुरूप योग्य नाही.

गुहेपासून दिसणारा बालेकिल्ला. 

पूर्वेला क्षितिजाकडे बघता आता पुरते उजाडले होते. रेंगाळलेल्या धुक्याची अजूनही मागे हटायची तयारी नव्हती. डोंगरांच्या कुशीत खोल वसलेल्या वस्त्या व गावे आता जागी होत होती. वाटेतील 'जवण' गावात असलेली लगीनघाई स्पिकरवरुन कळत होती पण तेवढाच काय तो कोलाहल. बाकी निरव शांतता. 

सुवर्णमयी सकाळ:मुख्य दरवाजाशी येऊन ठेपलो. अजूनही खूप चांगल्या स्थितीत असंलेल्या किल्ल्याच्या स्थापत्याचे कौतुक वाटत राहते. येथून मग पुढे टुरिस्ट टाईप आलेले असंख्य पब्लिक चुकवत महादेवाचे मंदिर गाठले आणी छोटेखानी किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो.


अजूनही तुंग किल्ल्याची आम्हाला दर्शन द्यायची इच्छा दिसत नव्हती. ५ स्लिप्स  लावल्यावर बॅट्स्मनची अवस्था होते तसे काहीतरी धुक्याने पुरते जखडून ठेवले होते. शोधायचे दोन,तीन व्यर्थ प्रयत्न केले आणी परतीचा रस्ता धरला. थोडा पोटोबा करू म्हणून पाठपिशव्या सोडल्या तर एक उंचपुरा मावळा तेथे अवतरला. कमरेला केशरी शेला आणि डोक्यावर "मी मावळा आहे" सदृश्य टोपी. मावळ्याने महाराजांचा जयघोष केला व उपस्थितांच्या कंठातून "जय ssss " अश्या आरोळ्या फुटल्या. 

सूर्य डोक्यावर आला आणी परतीचा प्रवास चालू झाला. सकाळी ६ ला निघून १ पर्यंत परत घरी पोहोचलो पण. शॉर्ट अँड स्विट. खूप दिवसांनी जरा कुठेतरी भटकल्याचे समाधान मिळाले. रोज वेळ नाही वेळ नाही म्हणताना, दिवस खरा केवढा मोठा असतो हे पुनश्च जाणवले. घरी जाताना पौडला ताजी भाजी मिळते म्हणून घेतली आणी हातातल्या भाजीसकट इहलोकात परतलो.
वाचत रहा.