सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

परमार्थात स्वार्थ : किल्ले नळदुर्ग

परमार्थात स्वार्थ : किल्ले नळदुर्ग

लेखाच्या शिर्षकावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, मंडळी कोठेतरी परमार्थ साधायला गेलेली आणी येता येता त्यांनी किल्ले नळदुर्गची दुर्गवेधी सैर ही पदरात पाडून घेतली.

हो तर झाले असे की, दोनाचे चार हात झाल्यापासून मंडळी कुलदेवतेच्या दर्शनास तुळजापूरला जाऊ जाऊ म्हणत २ वर्षे उजाडून गेली. आता जोडून आलेली सुट्टी त्याकारणी लावावी असे ठरल्यावर उस्मानाबादला जायचेच आहे तर किल्ले नळदुर्ग ही पाहता येईल असे वाटले.

आता उस्मानाबाद म्हंटल्या म्हंटल्या पहिला आठवला तो नळदुर्ग. एरवी उभ्या आयुष्यात मी कधी उस्मानाबादला जाईन असे मला देखील वाटले नव्हते.मला तो कायम अवर्षण ग्रस्त भाग वाटत आलाय. पण तेथे गेल्यावर दिसला तो कमाल असा हा भुईकोट किल्ला. ११४ दगडी बुरुज,  किल्ल्याच्या भोवतीने वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी प्रवाह बदलून किल्ल्यात घेऊन केलेला अद्वितीय पाणीमहाल व नैसर्गिक आणी अभेद्य तटबंदी असलेला या किल्याला भेट देणे म्हणजे मस्ट डू थिंग.


सकाळी ५ ला पुण्यनगरीतून जे निघालो ते सोलापूर हायवेच्या कृपेने ११ वाजता तुळजापूर. इतका मस्त रस्ता होता की टोलच्या पैशांचे दुःख नाही . :)  भिगवणला आल्यावर सूर्यदेवांनी आपण आल्याची वर्दी दिल्यावर त्यांना मान देणे साहजिकच होते.





तुळजापूरला पोहोचल्यावर नमस्कार, चमत्कार,जेवण  वैगरे आवरून १ वाजता मोकळा झाल्यावर मोर्चा वळवला नळदुर्ग किल्ल्याकडे. सकाळी निघताना नळदुर्ग होईल असे वाटले नव्हते म्हणून कॅमेरा घेतला नव्हता. त्यामुळे मोबाईल चे फोटो सांभाळून घ्या या वेळेस.


नळदुर्ग किल्ला म्हणजे गतकालीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. इ स. ५६७ च्या इतिहासात आपण क्षणात  जाऊन पोहोचतो.  इ.स. १३५१ ते १४८० मध्ये तत्कालीन बहामनी राजाने मातीचा हा किल्ला काळ्या बेसॉल्ट दगडांनी बांधून अभेद्य बनवला. आदिलशहाच्या काळात किल्ल्याच्या स्थापत्य रचनेत बदल झाले.

बोरी नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून, तो किल्ल्यातून खंदकातून फिरवून घेतला आहे. चारही बाजूंनी फिरवून घेतलेला नदीचा प्रवाह किल्ल्याला संरक्षण देतो तर त्याच्या जोडीला खंदकास लागून असलेली किल्ल्याची भक्कम दुहेरी तटबंदी आणि त्यासम शंभर एक बुरुज हे किल्ल्याला अभेद्य बनवतात. खंदकातील पाण्यावर बांध घालून बांधलेला पाणी-महाल हा म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अद्वितीय नमुना आहे. या बंधाऱ्याला आत जायला पायऱ्या आहेत. सुमारे ४ मजली असलेला हा बंधारा उतरून आत जाताच आपल्याला एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. "या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल." असा काही अर्थ त्या शिलालेलेखातून उमगतो. पावसाळ्यात जेव्हा या खंदकातून नर -मादी धबधबे जन्माला येतात, तेव्हा आपण पाणीमहालाच्या सज्ज्यात उभे असताना सज्ज्याच्या दोन्ही बाजूने ओघळणारे धबधबे पाहिले कि शिलालेखाचा अर्थाची खऱ्या अर्थाने प्रचिती येते. त्याकाळी या वास्तूने काय वैभव अनुभवले असेल असा विचार करतच आपण किल्ल्यात प्रवेशतो.

दुपारी ३ च्या उन्हात आम्ही नळदुर्ग पोहोचलो. २० रुपडे माणशी तिकिटे काढून किल्ल्यात शिरलो. आम्ही आणी सुरक्षारक्षक एवढेच काय ते किल्ल्यात उपस्थित होते त्यामुळे विदाऊट गर्दी किल्ला पाहता आला. ज्युनिअरची पहिलीच गडफेरी असल्याने त्यांना काखोटीला बांधून आमची मंडळी पायपीट करणार नसल्याने किल्ल्यात पर्यटनासाठी उपलब्ध बॅटरी वरच्या गाडीत माणशी ५० रुपडे देऊन आम्ही विसावलो. एक प्रायव्हेट कंपनी ला हा किल्ला चालवायला दिला असल्याने किल्ल्याची अवस्था चांगली होती. नवबुरुजाचे ( एक मोठ्या बुरुजाला ९ पाकळ्या आहेत) काम चालू असल्याने तिथे गेलो नाही तर मग पोहोचलो ते उपळ्या बुरुज आणि पाणीमहाल बघायला.

 मुख्य प्रवेशद्वार :


किल्ल्यात प्रवेश केल्यावर दिसणाऱ्या देवड्या.





एक मोठ्या बुरुजावरून पाणीमहालाचे दृश्य.

फोटोत दिसणाऱ्या बंधाऱ्यावरून जाऊन आपण पाणीमहालात उतरतो. उजव्या हाताला दिसतोय तो उपळ्या बुरुज. किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज.



पाणीमहालाकडे जाताना :

वरती उल्लेख केलेली खंदकाची दुहेरी तटबंदी ती हीच. या दुहेरी तटबंदीतून आपण चालत खाली बंधाऱ्यावर उतरतो.

कमाल आर्किटेक्चर :





 
सुस्थित तटबंदी आणी बॅटरीची गाडी :




पाहीमहालातून घेतलेले दृश्य.
जास्तीचे पाणी बंधाऱ्यातुन वाहून पुढे नदीत जाते.


उपळ्या बुरुजाकडून मुख्य प्रवेशद्वारा कडे जाणारी भक्कम तटबंदी. या फोटोवरूनच किल्ल्याच्या अभेद्यतेची कल्पना येईल.


पाणीमहालाकडून उपळ्या बुरुज :

१५०-२०० पायऱ्या असाव्यात.

उपळ्या बुरुजावरून दिसणारा किल्ला परिसर :



उपळ्या बुरुजावरील मगर-तोफ :  देवगिरी किल्लावर पाहिलेल्या मेंढा तोफेशी साधर्म्य वाटते.


बोरी नदीचा प्रवाह व दूरवर दिसणारा बुरुज. यावरून किल्ल्याचा आकार लक्षात येईल.



उपळ्या बुरुजावरून दिसणारा धान्य / दारुगोळा कोठार.


पाणीमहाल, उपळ्या बुरुज पाहून परत येताना मध्ये एक बोटिंग स्पॉट आहे. किल्ल्यातील अडवलेल्या पाण्यात बोटिंगची सोय कंपनीने केली आहे. भर दुपारी साडे तीनच्या उन्हातही एक हौशी कुटुंब बोटिंग करत होते.


मशीद, बोटिंग स्किप करून परतीचा रस्ता धरला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बुरुजावर चढून तेथील हत्तीशिल्प पाहून पुण्यनगरीच्या दिशेने निघालो. वाटेत अक्कलकोट ला जाऊन स्वामी समर्थांचे आशिर्वाद घेऊन रात्री घरी पोहोचलो.

हत्तीशिल्प


पावसाळ्यातील नर-मादी धबधब्याचे विलोभनीय दृश्य.

( (आंतरजालावरून साभार )

 पॅनारॉमिक फोटो :



 वाचत रहा.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: