शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

कुंडलिका व्हॅली ट्रेक - सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट

 

कुंडलिका व्हॅली ट्रेक 


 सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट -  परातेवाडी 





शुक्रवारी पृथ्वीतलावरच्या बेरोजगार लोकांच्या संख्येत एकने आमची भर पडली आणी रिकामटेकडी मंडळी कुंडलिका व्हॅली ट्रेक ला मार्गस्थ झाली. पावसाळ्यात अनेक वेळा या दरीचे ओले-कंच रूप वरून पहिले होते पण त्या दरीत कधी जाणे होईल असे वाटले नव्हते. नशिबाने आणि डोंगरदेवांच्या कृपेने आज काय तो योग आला आणी सह्याद्रीचं रांगडं रूप पुन्हा एकदा मनात घर करून गेलं. 

पाच,सहा तास मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या  मारत दरीत पोहोचायच, पावसामुळे आणी कुंडलिका नदीच्या प्रवाहामुळे दरवर्षी मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल करायची, वाटेतले भले मोठाले रॉक पॅच, पाठीवरच् सामान आणि सुटलेले पोट हे दोन्ही घेऊन उतरायची कसरत , हिवाळ्यातही वाहणारे धबधबे आणी बारमाही पाण्याचे प्रवाह, तळ दाखवणाऱ्या हिरव्यागार पाण्यात पोहणे, दोन पुराणपुरुष भासणाऱ्या डोंगरांच्या घळीतून यथेच्छ भटकायचं, पूर्णवेळ सोबतीला अंधारबन, कुंडलिका आणी नावजी सुळके असतातच. पौर्णिमेचा चंद्र सोबतीला घ्यायचा आणी स्लिपींग बॅग मध्ये शिरून आकाशात ताऱ्यांचे मनोमन आकार बनवायचे, दरीच्या उत्तरार्धात सावळ घाटाच्या पुरातन पण सध्या वापरात नसल्याने मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत खडी चढाई सुरु करायची आणी कितीतरी हजारो वर्षांपूर्वी कोणी अनामिकाने कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणी खोदीव पायऱ्या बघून अचंबित व्हायचं. 

जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !



असो , तर कुंडलिका घळीचा हा ट्रेक मुळशी तालुकातल्या पिंपरी गावापासून सुरू होतो. सिनेर खिंडीमधून वाट काढत आपण कुंडलिका घळीमध्ये उतरतो. येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो आणी पुढे भिरा धरणात या पाण्याने विद्युतनिर्मिती होते. याच प्रकल्पाचे पाणी सकाळी जेव्हा सोडले जाते तेव्हा निसर्गाने पाण्याचा फोर्स वाढतो आणी कोलाड जवळ या पाण्यावर राफ्टिंग केले जाते. 

घळीत पुढे जातानाच सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीत मोठमोठाले दगड-धोंडे निश्चल ऊन खात पडलेले असतात. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मोठमोठाले कातळ कापून काढलेले दिसतात मग हीच वाट पकडायची आणी गणपतीचे नाव घेत या दगडांवर उड्या मारत आपली मार्गक्रमणा चालू ठेवायची. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. थोडक्यात काय तर कुंडलिका व्हॅली आपल्याला मान वर करायलाच चान्स देत नाही. 




सुमारे ९ वाजता घळ उतरायला सुरु केली आणी रमतगमत मंडळी निघाली. वाटेत दिसणारे नजारे मात्र कमाल होते. असंख्य दगडांच्या राशी, त्यात जमलेले नितळ आणी हिरवेगार पाण्याचे प्रवाह, डोंगरांच्या कडयांवर नैसर्गिकपणे तयार झालेल्या काही प्रतिकृती , निर्मनुष्य असा प्रदेश आणी दूरवर दिसणारे घळीचे शेवटचे टोक बघत सुमारे ५ तासांची पायपीट झाली.आज दिवसभर आकाश ढगाळ असल्याने सूर्यनारायचे दर्शन फारच कमी झाले. मध्येच जेव्हा नारायण दिसायचे तेव्हा झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा, सोनसळी गवत किरणे परावर्तीत करू लागायची आणी शांत पाण्याच्या डोहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. हिवाळ्यातही असलेले धबधबे मिळून एक संपन्न निसर्गसोहोळाच बनून जायचा. आजही दिसणारे धबधबे, पावसाळ्यात त्यांचे रौद्र रूप दाखवत असतील हे नक्की. 










पाच-सहा तासांच्या वाटचालीनंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सामान / तंबूची मांडामांड झाली आणी मंडळी भेळ करायच्या कार्यक्रमात गुंतली. येतानाच लाकडे गोळा करून आणल्यामुळे शेकोटीची सोय झाली .नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली. ड्युटी संपवून नारायण डोंगरात लुप्त होऊ लागले तरी किरणांचा कटाक्ष काही चुकार ढगांमधून जाणवत होता.आकाशाच्या छपराखाली आजची रात्र अविस्मरणीय होणार होती ! 




जिथे आमची पथारी पसरली होती त्या शेजारूनच पाण्याचा प्रवाह वाहत होता. थंडीशी दोन हात करायला शेकोटीचा कार्यक्रम झाला. सगळ्या ग्रुप मेंबर्सची ओळखपरेड झाली आणी काही दिग्गज मंडळींशी  भेटी-गाठी झाल्या. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून हा ट्रेकचे नियोजन केले होते पण चांदोबा अजूनही ढगांमध्येच चाचपडत होता. जशी मंडळी निद्राधीन झाली तशी संपूर्ण दरीत निरव शांतता पसरली. स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आकाशातले कवतिक न्याहाळणे एवढाच काय तो उद्योग उरलेला. मध्यरात्री संपूर्ण आकाश निरभ्र झाले आणी चांदोबाने दर्शन दिले. दोन उंच डोंगरांच्या मधोमध खाली दरीतून वरती आकाशाकडे बघताना, डोळ्यासमोर चंद्र डावीकडून उजवीकडे मार्गक्रमणा करत आणी पाठीमागे तार्यांची रांगोळी काढत जाताना दिसला. केवळ शब्दातीत असा अनुभव !









सकाळी उजाडताच आवराआवर करून पुढची वाटचाल चालू झाली. न्याहारी आटपून पुढे निघालो आणी पुढे होते अजून एक सरप्राईज! मोठाले पाण्याचे डोह! मंडळी पाण्यात उड्या  मारायला वाऱ्यासारखी सुटली.गारेगार पाण्यात पोहून जरा आत्मा शांत करून घेतला. इथेच प्रत्येकी दोन लिटर पाणी भरून घेतले. एकदा का सावळघाट चढाई सुरु झाली कि कुठेही पाणी मिळणार नव्हते. 





आता लक्ष्य होते घाटमाथ्यावरचे परातेवाडी गाव आणी मध्ये होता सावळ घाटवाटेचा थरार ! सह्याद्रीतल्या अश्या अनेक प्राचीन घाटवाटा आज मात्र वापर नसल्याने "बिकटवाट" बनल्यात. राबता नसल्याने आणी प्रचंड पावसाने या प्राचीन घाटवाटा मोडून जातात. हजारो वर्षांपूर्वी कोणी अज्ञात लोकांनी खोदलेल्या उभ्या कातळातील पायऱ्या, पाण्याचे कुंड पाहिले की वाटते, सह्याद्रीची भटकंती म्हणजे फक्त डोंगरांवरची तंगडतोड नाही तर हि आहे इतिहासाची जिवंत सफर! 

आता आव्हान होते सावळ घाटाची कुंडलिका दरीत उतरलेली सोंडशोधण्याची  शोधण्याची! दरवर्षी पावसाने वा भौगोलिक बदलाने या वाटा मोडतात किंवा सापडत नाहीत. इथे गरज असते ती अनुभवाची ! मी ज्या ग्रुप बरोबर गेलो होतो त्या सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनचे शिलेदार गेली २० वर्ष सह्याद्रीच्या या घाटवाटांमध्ये मनमुराद भटकत आहेत. अनुभवी ट्रेक लिडरने दरीतुन डोंगरात घुसलेली वाट शोधली आणी कुठे जायचंय हे सांगितले आणी मग हातात कोयता आणि काठ्या घेऊन चालू झाला सावळ घाटवाटेचा शोध !




तीव्र चढण चांगलीच दमछाक करत होती. वाटेचा अंदाज घेत आणी पूर्वीच्या खुणां शोधत सर्व जण निघालो. वाटेतील झाडे झुडपे मान वर करू देत नव्हती त्यांची काटछाट करत, एकमेकांना हाकाऱ्या देत, वाटेतील दगडांवर मागच्या लोकांसाठी खडूने खुणा मारत ७० अशांश कोणातली खडी चढाई सुरु होती. वाटेत निसटते धोंडे आले, घसारा आला वा झाड पडलेले दिसले की मग मागच्या फळीतले उत्साही कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाच्या शोधात पुढे व्हायचे. 





दोन तासांच्या चढाईने डोंगरांच्या घळीत पोहोचलो. आणी अहो आश्चर्यम!  उभ्या कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी. पाणी सध्यातरी पिण्यायोय नाही. एकदा का ही टाकी दिसली की, आपले सावळ घाटाचे दिव्य पार झाले समजावे. शेवटच्या टप्प्यात बांबूची वने लागतात आणी इथे तेथून डावीकडे गेल्यास लागतात खोदीव पायऱ्या आणी मोठाली पाण्याची टाकी. बघता क्षणी मन इतिहासात जाते. कोणी अनामिकाने कितीतरी हजारो वर्षांपूर्वी वाटसरूंच्या सोयीसाठी या पायऱ्या खोदल्या असतील ज्यावरून आज आपण प्रवास करतोय. इतक्या उंचीवर खोदलेल्या आणी अजूनही तुडुंब भरलेल्या टाक्या, त्याकाळी किती लोकांची क्षुधा शांत करत असतील?





इतिहासाचा विचार करता करता थोडे पुढे गेले की निसर्गाचे जे काही रुपडे दिसते त्याची तुलना कशाशीच नाही. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच आपल्या हातात! 









सामान खाली ठेऊन बराच वेळ निसर्गातील करामती बघत राहिलो. बरोबरची मंडळी पुढे निघून गेली होती. नाईलाजाने काढता पाय घेऊन परातेवाडी च्या दिशेने चालू लागलो. घाटमाथ्यावर येताच लाईटचे खांब दिसू लागतात त्याच्या दिशेने परातेवाडी गाव लागते. गावात पोहोचल्यावर थोडीशी पेटपूजा झाली. पुढे आलेल्या मेंबर्सने सगळी तयारी करून फक्कड मुगाची खिचडी बनवली होती. मनोमन त्यांचे आभार मानत  दोन घास खाऊन पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.





एकंदरीत कमाल असा अनुभव होता. खूप सारे सरप्रायजेस आणी निसर्गाचे लोभस रूप. 
जगणातल्या अश्या अविस्मरणीय क्षणांची बेरीज म्हणजेच आयुष्य !

वाचत रहा ! 
खूप दिवस निद्रित अवस्थेत असलेल्या या ब्लॉगला, या ट्रेकच्या निमित्ताने नवसंजीवनी मिळाली आहे. आपले अभिप्राय नक्की कळवा.