दुर्गदुर्गेश्वर रायगड परिक्रमा.
पुण्यनगरीतून आदल्या दिवशी पाचाडला प्रयाण केले. पहाटे पाचाडला पोहोचलो तेव्हा जावळीच जंगल निद्राधीन झालेलं होत. चहा घेतला आणि उरली सुरली थंडी पळून गेली. चित्त दरवाज्याला पोहोचलो तेव्हा पूर्वेकडे आकाशात मंगलमय सोहोळा चालू झाला होता. गुलाबी आसमंतात टकमक टोक उठून दिसत होते.
नारळ फोडून आणि शिवजयजयकार करून पुढचा ट्रेक चालू झाला. पूर्वेकडील आसमंतात आता केशरी झालर चमकू लागली होती. जंगलाही आता जागे होत होते. कोवळ्या किरणांचा टकमक टोक कड्यावर वर्षाव होऊ लागला तसे त्याचे रांगडे रूप अभेद्य भासत होते. इथल्या कातळकड्यांमधून फक्त वाऱ्याला वर जाण्याची आणि पाण्याला भूस्पर्श करण्याची परवानगी आहे. महाराज म्हणाले होतेच-
"राजा खास जाऊन पाहता , गड बहुत चखोट ... कडे तासिल्याप्रमाणे दिड गाव उंच ... पर्जन्यकाळी या कड्यांवर गवतही उगवत नाही ... पाखरू बसू म्हणेल तर जागा नाही ... तख्तास जागा हाच गड करावा"
टकमक टोक
असो , परिक्रमेस सुरुवात झाली आणि सुमारे सात तासांच्या चढाईत पायाचे,गुडघ्याचे,मानेचे आणि पाठीचे अगणित व्यायाम झाले. युथ हॊस्टेल, महाड या ग्रुपचे लोक दरवर्षी हा मार्ग तयार करतात आणि खुणा करतात असे समजले पण लॉकडाऊन नंतर सुमारे वर्षभर तेथे कोणी न फिरकल्याने आणि निसर्ग वादळामुळे सगळ्या वाटा मोडून आणि ढासळून गेल्या आहेत. कुठल्या खिंडीत जायचंय हे माहित असल्याने मग काय .... कोयत्याने झाडे कापत, नळीच्या वाटेने घसरत, तीन फूट झाडांच्या बोगद्यातून रांगत, वाटेतल्या काटेरी झाडांचा थोड्या थोड्या वेळाने नियमित प्रसाद घेत तंगडतोड चालू झाली. असंख्य पडलेली झाडे आणि जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेले वेलींचे साम्राज्य वाटा अडवत होत्या. पायात वेली अडकून कपाळमोक्ष व्हायचे काही प्रसंग झाले म्हणून खाली बघून चालायचे तर डोक्यावरच्या फांद्या टोपी उडवायच्या.त्यातून पाठीवरच्या बॅगेने 'मी प्रत्येक झुडुपात अडकणार' असा चंग बांधलेला. मग नमतं घेऊन गुडघ्यात वाकून चालायच्या करामती करायच्या. या सगळ्यात दोन्ही बाजूंनी काटेरी झाडे मी मी म्हणत सलगी करत होतीच.अर्ध्यापर्यंत पोहोचलो तेव्हा काहींच्या चेहेऱ्यावर , हातावर बँडेजचा दागिनाही चढला होता.
सोनसळी सकाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा