रविवार, ४ जुलै, २०२१

तळपेवाडी - बैल घाट - पेठचा किल्ला ( कोथळीगड ) - कौल्याची धार - तळपेवाडी

तळपेवाडी - बैल घाट - कोथळीगड  - कौल्याची धार - तळपेवाडी 





पावसाने सह्याद्री पर्वतरांगा हिरव्यागच्च होऊन नटल्यात. ढग थोडेसे खाली उतरून डोंगर शिखरांशी सलगी करू पाहतायेत. तळपेवाडीत लख्ख ऊन पडलय. शेतात काळ्याभोर जमिनीत भाताची रोपे तर वरती नाखिंदा टोकावर पवनचक्क्या त्याच लयीत डोलतायेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्यात, मग घराच्या डागडुजीची कामे चालू. गावातून धबधब्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली तेव्हा दक्षिणेकडे आसमंतात पेठच्या किल्ल्याचा ढगात हरवलेला मुकुट. गच्च कारवीच्या झाडोऱ्यामधून सुरु झाली बैल घाटाची उतराई. डोळ्यांची पारणे फेडणारा भीमाशंकर अभयारण्याचा आणि पेठच्या घाटवाटांचा नजारा आणि त्याचे अंतर बघून पोटात आलेला गलबला. 

चार तासांच्या चालीनंतर पेठ खिंडीत, कोथळीगडाच्या पायथ्याशी आलो आणि एवढ्या वेळ निर्मनुष्य जंगलात माणसांची चाहूल लागली. एका पुराण पुरुष भासणाऱ्या वडाच्या झाडाखाली पथाऱ्या पसरल्या आणि इलेक्ट्रोलची काही आवर्तने झाली. आता कोथळीगडाच्या दिशेने वाटचाल चालू झाली. आंबिवलीवरून किल्ल्यावर येणारा लोकांचा महापूर बघून त्यात स्वतःला सामील करून घेतले. किल्ल्यावरून कौल्याची धार इथून स्पष्ट समांतर दिसत होती. किल्ला आधी झाला असल्याने पटकन आटोपून खिंडीतून डावीकडची वाट धरली आणि तळपता सूर्य डोक्यावर घेऊन सुरु झाली कौल्याच्या धारेची खडी चढाई. छातीचा फुललेला भाता थंड करायला मग इलेक्ट्रोल, खडीसाखर, लिंबू पाणी, काकड्या इत्यादी मंडळींची चढाओढ सुरु झाली. 


धारेवरून आता संपूर्ण प्रदेश चांगला दृष्टीक्षेपात आला होता. उजवीकडे बैलघाट , बैलदारा ( पायरीची वाट) तर कोथळीगड मागे पडत लहान लहान होत चालला होता. त्याच्या शेजारी लांबवर पदरगड, पुसटसा सिद्धगड आणि भिमाशंकर दर्शन देत होते. वांद्रे घाटमाथ्यावरून खाली उतरणाऱ्या पदरगडाच्या पोटातल्या वाटांचा आता अंदाज येत होता. अडीच तासांच्या कौल्याच्या धारेची चढाई कस पाहणारी होती. आता चढाई संपली असे वाटले कि दत्त म्हणून उभा पुढचा सुळका पायातले त्राण घालवत होता.  सह्याद्रीच्या बेलाग डोंगररांगा , दरीत कोसळणारे अभेद्य, अतिदुर्गम डोंगरकडे आणि निसर्गाची मुक्तहस्त सौन्दर्याची उधळण पाहताना मात्र जीव सुखावून जात होता.  माथ्यावर पोहोचताच पाण्याच्या ओहोळात तहान भागवली आणि पुढची दोन तासांची तंगडतोड करत तळपेवाडीत पालखी दाखल झाली. दोन घाटवाटांवर एक किल्ला फ्री म्हणत बारा तासात २८ किमीची जोरदार पायपीट झाली. 


एकंदरीत काय तर... जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती, आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !


तळपेवाडीतून धबधब्याच्या दिशेने जाताना ... 

तळपेवाडीतून सव्वा तासात माथ्यावर आल्यानंतर येथून होणारे कोथळीगडाचे प्रथम दर्शन. अजून एवढे अंतर कापायचे आहे. 
बैलघाट संपून किल्ल्याच्या माचीवर आलो. 

पेठ खिंडीतून दिसणारा अप्रतिम नजारा 

कौल्याच्या धारेची चढाई चालू ... 


उजवीकडे काहीतरी चमकतंय ते आंबिवली


वांद्रे कड्यावरील पवनचक्क्या 


पावसाळी ट्रेक म्हणून निघालो खरे पण ऊन्हानेच चांगला दम काढला. 

शेवटचा चढ 

तळपेवाडी माथ्यावर पोहोचलो तसे आभाळ दाटून आले. 





वाचत रहा. भटकत रहा!