रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

मुठा , मोसे , आंबी नद्यांचे खोरे [ ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे ]

 रविवारचा ट्रेक : मुठा , मोसे , आंबी नद्यांचे खोरे

ताम्हिणी - धामणओहोळ - रेडे खिंड - दापसरे




तीन मावळात वाहणाऱ्या, सोनकीने बहरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्याकंच कड्यांवरून उगम पाऊन मुठा नदीत विलीन होणाऱ्या तीन नद्यांच्या खोऱ्यातून मनसोक्त केलेली भटकंती.  
तीन गावांदरम्यानची गर्द जंगलातील वाटचाल, मधूनच ऐकू येणारी हुप्य्यांची आरोळी, पावसाने समृद्ध केलेले वन्यजीवन, नजर जाते तोपर्यंत पसरलेले सह्याद्रीचे अवाढव्य रूप, आसमंतात चालू असलेला ऊन सावलीचा खेळ, चढाईवर धाप लागून उर धपापू लागताच दिसलेले इडलिंबूने यथोचित बहरलेले झाड, छोट्या छोट्या कीटकांनी अव्याहत चालवलेला उद्योग, आणि माणसाचा मागमूस नसलेल्या एवढ्या दुर्गम ठिकाणी अवचित प्रकट होणारी आणि पाड्यावरच्या घरात बोलावून जेवायला विचारणारी आभाळएवढी उंच माणसे. सगळे काही शब्दातीत. जंगल वाचण्याची प्रत्येकाची परिभाषाच वेगळी.

"नद्या या मानववस्तीच्या जीवनवाहिन्या आहेत" तत्सम छापील वाक्य आपण कधीतरी पुस्तकात वाचतो आणि सोडून देतो. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या नद्या नेमक्या कुठून उगम पावल्या असतील? किती मोठाले अंतर कापत, आपल्या कित्येक भावंडाना भेटत मार्गक्रमण करत असतील? प्रत्येक नदीच्या उगमाशी शिवाची स्थापना कोणी आणि केव्हा केली असेल याबद्दल कधी विचार करण्याची वेळ हि येत नाही.

यावेळेस योग आला तो पुण्यनगरीस पुरवठा करणाऱ्या, तीन मावळातील तीन नद्यांची खोरी भटकण्याचा.

ताम्हिणी गावातून सुरु झालेल्या चढाईने सुरवातीलाच दम काढला. मोडलेल्या वाटा तयार करत मंडळी पुढे जात होती. लुसलुशीत गवतावर गव्याने घातलेली लोळण आणि पायाचे ठसे बघून इथे बरेच दिवसातून कोणी फिरकले नसावे. सुमारे ८०० मीटर चढून मुठा खोरे ओलांडून आता पोहोचलो होतो मोसे खोऱ्यात. धामणओहोळ गावात. येथील डोंगरात मोसे नदी उगम पावते आणि त्यावर पुढे बाजी पासलकर म्हणजे वरसगाव धरण बांधलेले आहे. गावात पोहोचताच थोडी पेटपूजा झाली आणि चावडीवर गप्पा टाकत बसलेल्या मंडळींना राम राम केला. पाठीवरचा पिशवीतील ऐवज पोटात गेल्याने थोडी तरतरी आली होती. धामणओहोळ गावात नदीकाठच्या भैरवनाथाला वर्षातला तिसरा नमस्कार झाला आणि आता सुरु झाली रेडे खिंडीची चढाई.

ताम्हिणी ते धामणओहोळ मधील टप्पा. मुठा नदीचे खोरे.

पहिल्या काही मिनिटातच सर्वांगावरुन घामाचा वर्षाव चालू झाला. येथून पुढची चढाई सुमारे ९०० मीटरची होती आणि जेवणकरून सुस्त झालेली आमच्यासारखी मंडळी लिंबू पाणी, इलेक्ट्रॉलचा धावा करू लागली. सुमारे दोन तासांच्या चालीनंतर रेडे खिंड दृष्टीक्षेपात आली. भर धो धो पावसात इथे काय परिस्थिती असेल असा विचार करतच चालताना "जेवायचं का हो तुम्हाला" अशी ओढ्याच्या दिशेनं हाक ऐकू आली. रेडेखिंड वाडी मधल्या एक आज्जी भांडी धुवायला घेऊन इथपर्यंत आल्या होत्या . त्यांच्यामागे वाडीची वाट धरली आणि त्यांच्या घरासमोर पोहोचताच पेला भरून ताक समोर आले. यांच्या माणुसकीचा झरा हा आटण्यासाठी नसतोच. ताक पिऊन जीवाची क्षुधा शांती झाली आणि पाऊले दापसरे गावाच्या दिशेने चालू लागली. रेडे खिंड ओलांडून आता आपण अंबी नदीच्या खोऱ्यात प्रवेशते झालो होतो. दापसरे आणि त्याच्यापुढे वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव "घोळ" या दरम्यानच्या उंचच उंच डोंगरांमध्ये आंबी नदीचा उगम होतो आणि पुढे जाऊन त्यावर पानशेत धरण बांधले गेले.

पानशेत बॅकवॉटर
भटकंतीची आता अंतिम चाल बाकी होती. एका छोटेखानी मनोरा भासेल अश्या दगडावर बसून आजूबाजूचा परिसर न्याहाळून घेतला. समोरच पुसटसा कोकणदिवा दिसत होता तर पश्चिमेकडे आलेल्या केशरी झळाळीमध्ये ठिपठिप्या घाट लक्ष वेधून घेत होता. साखळेवाडी गावातील काही थोडीथोडकी घरे ओळखू येत होती. अश्या दुर्गम ठिकाणी सुखाने नांदणाऱ्या सह्याद्रीपुत्रांना मनोमन नमस्कार करून आंबी नदीच्या प्रवाहात उतरलो.

अंदाजे अठरा ते वीस किलोमीटरची पायपीट झाली होती.आमच्यातल्या काही मंडळींनी लवकर येऊन फक्कड चहा बनवलेला पाहिला आणि "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" या प्रश्नाला "मी" असे वाटून गेले. गाडीत बसताच निद्रादेवी प्रसन्न झाली. वाटेत एक ठिकाणी गाडी थांबली आणि शेजारून "स्वारगेट-घोळ" हि "यष्टी" जाताना पाहिली. एवढ्या दुर्गम ठिकाणी, एवढ्या रात्रीचे, आणि टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्यांवरून तुफान गाडी हाणणाऱ्या ड्राइव्हर ला मनातच दंडवत घातला. अश्या लोकांकडे खरंच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारात पुण्यनगरी अवतरली.

एकंदरीत काय तर, सह्याद्री आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो, आपण आपल्या कुवतीप्रमाणे आयुष्याच्या ओंजळीत भरून घ्यायचं !



सोनकीचा बहर

रेडे खिंडीच्या दिशेने चढाई चालू.

रेडे खिंड

ताक आणून देणाऱ्या दापसरे गावातील आजी.

आभाळाचे पांघरून आणि दगडाची उशी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी.

दापसरे डोंगरावरून दिसणारा विहंगम नजारा.

सागर शिवदे