सोमवार, २८ मार्च, २०२२

प्रबळगड, कलावंतीण परिक्रमा.

 रविवारची भटकंती - प्रबळगड, कलावंतीण परिक्रमा. 

पहाटे तीन ते दुपारी तीन, बारा तासांची, २० किलोमीटर्सची भटकंती.



मागील महिन्यात रायगड परिक्रमा झाल्यानंतर यावेळेस योग आला तो प्रबळगडास प्रदक्षिणेचा. शनिवारी अकरा वाजता पुण्यनगरीतून ठाकूरवाडीच्या दिशेने निघालो. रात्री तीन वाजता "अमानवीय" वाटावी अशी काही टाळकी प्रबळ माचीच्या दिशेने चालू लागली. विजेरीच्या प्रकाशात, मळलेल्या प्रशस्त वाटेने प्रबळमाचीच्या दिशेने चढाई चालू केली.वाऱ्याचा जरासाही मागमूस नव्हता. दमट हवेशी दोन हात करीत पाऊण तासात जेव्हा माचीवर पोहोचलो तेव्हा सर्वांगाला घामाने अंघोळ झालेली. पूर्ण परिक्रमेत कोठेही पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने पाठीवरच्या पाच लिटर पाण्यापैकी मोजून काही घोट घश्याखाली उतरवले आणि गणरायाचे नाव घेऊन सुरू झाली प्रबळगडाची प्रदक्षिणा.


पूर्ण खोरे अंधारात गुडूप झालेले. लांबवर पनवेल परिसर लक्ष दिव्यांनी उजळलेला. सगळी जनता मस्त सुखाची झोप घेत होती तेव्हा आम्ही चेहेऱ्यावरचा घाम पुसत पाठीवरची वजने सांभाळत माचीवरून प्रबळगडाच्या पूर्वेस प्रयाण केले. प्रबळगड ते इर्शाळगड ट्रेकची वाट असल्याने वाट बऱ्यापैकी मळलेली होती. रात्रीच्या अंधारातही सोबतीला डोईवर पूर्णचंद्र असल्याने बॅटरी शिवायही चालता येऊ लागले. सुमारे पाऊण एक तासाने एक शिवमंदिर आले तेथे छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा चालायला सुरुवात केली. सूर्योदय होण्याच्या आत पूर्व-उत्तर दिशेला पोहोचायचे या उद्देशाने झपाझप पाऊले उचलायला लागलो. प्रबळगडाच्या पूर्व टोकाच्या बरोब्बर खाली पोहोचलो तेव्हा आसमंतात केशरी झालर उमटू लागलेली. काही क्षणातच सूर्यदेवाचे आगमन झाले. ढगांनी अगोदरच गर्दी करून तो सोहोळा काही काळ लांबवला खरा पण निसर्गाचा हा पाठशिवणीचा खेळ फक्त डोळे भरून पाहावा असाच. 

 मध्यरात्रीच्या भटकंतीत चंद्र आहे साक्षीला.. 


झुंजूमुंजू झाल्यावर कोवळ्या किरणात पहुडलेला इर्शाळगड 

आज आम्हाला या ढंगांचीच आज जास्त मदत होणार होती. जसे सूर्यनारायण थोडे वरती येऊ लागले तसा डावीकडे प्रबळगडाचा काळा बुरुज अजूनच काळाकभिन्न वाटू लागला. त्याच्याही डोक्यावर आता आसमंताची निळेशार टोपी चढलेली आणि त्यात ढगांची पांढरीशुभ्र पिसे. मागे पाहिले तर इर्शाळगड ढगांशी सलगी करत कोवळी किरणे अंगावर घेत निश्चल उभा होता. सूर्योदयाचे खूप सुंदर असे फोटो मिळाल्यावर त्या आनंदात पोटात थोडे ढकलून पेटपूजा केली. 

ढगांनी झाकोळलेला सूर्योदय 

येथून पुढे प्रबळगडाचा पूर्ण उत्तर बाजू पादाक्रांत करायची होती. प्रबळगडाच्या काळा बुरुजाचे एक टोक ते कलावंतीण दुर्गचे दुसरे. येथून खरी कसरत चालू झाली कारण येथून वाट अशी काहीच नव्हती. जिथे कमी झाडोरा दिसतोय तेथून वाकून, रांगत , कोयत्याने झाडे तोडत, निसर्गाची मुक्तहस्त उधळण बघून स्तब्ध होत वाटचाल चालू झाली. आता येथून समोर विस्तीर्ण पसरलेले माथेरान पठार दिसू लागले. आंबेवाडी , हाश्याची पट्टी गावे खाली तर पठारावर गार्बेट पॉईंट दिसू लागल्यावर मागील वर्षीच्या " आंबेवाडी - हाश्याची पट्टी - माथेरान - जुमापट्टी - नेरळ" ट्रेकची आठवण झाली. आंबेवाडी ते हाश्याची पट्टी गावांदरम्यानचा खतरनाक चढ आठवून आत्ताही श्वास वाढलेला जाणवत होता. 

प्रबळगड काळा बुरुज 

माथेरान पठार 

प्रबळगडाच्या प्रदक्षिणेचा उत्तर भाग 

मोरबे धरण 

जोरदार उन्ह असेल म्हणून टोपी, रुमाल, इलेक्ट्रॉल ,पाच लिटर पाणी, फळे, लिंबू सरबत अशी जय्यत तयारी केलेली पण निसर्गाच्या कृपेने आकाशात सकाळपासून ढगांनी जी काही गर्दी केली त्यामुळे टोपी घालायची ही वेळ आली नाही. त्यात माणसांचा मागमूस नसलेले घनदाट जंगल त्यामुळे उन्हाचा त्रास काही झाला नाही. वर्षानुवर्षे एकमेकात गुंतून वाढलेल्या वेली, मोठमोठाली ४०० -५०० वयोमान असलेली झाडे, हुप्प्यांच्या आरोळ्या, जमिनीवर, झाडावर अविश्रांत कार्य करणाऱ्या कीटकांचे समांतर जग. पावसाने वाहून जाऊ नये म्हणून झाडावर बांधलेले वारूळ आणि कित्येक अश्या गूढ गोष्टी. 


पूर्ण उत्तर वाट अश्या जंगलातून होती. मानेचे पाठीचे अगणित व्यायाम झाले

मजल - दरमजल करत आता उत्तर बाजू ओलांडून पश्चिमेकडे आलो. येथून आता मागे उंच कलावंतीण दुर्ग दिसत होता तर समोर लुईसा पॉईंट, विकटगड, चंदेरी, श्री मलंग , ताहुली पीक दिसू लागले. रामराया जन्मला ती भर बाराची वेळ असूनही ढगांनी त्याची चाहूल लागू दिली नाही. येथे उदरम भरणम झाल्यावर आता कलावंतीण सुळक्याला प्रदक्षिणा चालू झाली. निसर्गाची मजा अनुभवत एकदाचे परत सुरुवात केली तेथे माचीवर आलो तेव्हा तीन वाजत आलेले. तब्बल बारा तास अविश्रांत पायपीट करून सुमारे १७-१८ किलोमीटर्स झालेले. येथून आता परतीची वाट धरली. 


माचीवरील काही घरातील लहान मुले होळीची सुट्टी संपवून परत शाळेत पनवेल ला चालली  होती. आता मे महिन्याची सुट्टी लागू पर्यंत महिनाभर घरच्यांशी भेट नाही म्हणून सगळी मुले नाईलाजाने पावले टाकत उतरत होती. माची उतरून मोकळ्या जागेत आलो तसे माचीवरून त्यांच्या आईने त्यांना शेवटचे बाय केले तसे काही मुले रडायला लागली. त्यांचा मोठा भाऊ त्यांना समजावत पुढे घेऊन गेला. मोठा भावनिक प्रसंग होता. 

येथून उतरून ठाकरवाडी आणि चारला निघून सातच्या आत घरात! एकंदर छान अनुभव होता. फोटोंची मजा घ्या !



इर्शाळगड 

माथेरान पठार, खाली आंबेवाडी गाव. येथून हाश्याची पट्टी मार्गे माथेरान जात येते. 


पूर्ण परिक्रमे दरम्यानचा एकमेव पाण्याचा स्रोत. 



चला, भेटत राहू!

सागर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: