रविवार, १७ एप्रिल, २०२२

किल्ले दुर्गभांडार | ब्रह्मगिरी | "हत्तीची मेट" वाट | मेटघर किल्ला | नाशिक

 

अपरिचित अशी "हत्तीची मेट" वाट | मेटघर किल्ला२०२२ या वर्षाची सुरुवात काही खासच झाली होती. वर्षाच्या शेवटच्या दिवशीचा मुक्काम किल्ले कावनईवर ठरलेला. इगतपुरी भागात भटकंती असल्याने किल्ले मोरधन, कावनई , गडगडा , रांजणगिरी व बहुला असा भरगच्च प्लॅन होता. नाशिकवरून एक मित्र आणि मी असे दोघेच असल्याने सगळी भटकंती बाईकवर. फुल्ल मजा. तर दोन दिवस मनोसक्त भटकल्यानंतर मित्राला घरी तातडीने येण्याचा निरोप आला. तिसऱ्या दिवशीचा रविवार किल्ले बहुलासाठी राखीव ठेवलेला कारण इथे फक्त रविवारीच जाता येते असे ऐकलेले. आता तिसऱ्या दिवशी मी एकटाच असल्याने दोन पर्याय समोर उभे राहिले - ठरल्याप्रमाणे बहुला जायचं किंवा मग त्रंबक गाठून ब्रह्मगिरी दुर्गभांडार जायचं, दुपारी नाशिक येऊन रात्रीपर्यंत पुण्यात. मग यामध्ये दुसऱ्या पर्यायाने जायचं ठरवलं. 

गाडी मित्राच्या घरी लावून सकाळी सातला नाशिक पालिकेच्या बसची वाट बघत स्टॉपवर आलो. डुगुडूगु चाललेल्या बसने त्रंबक पोहोचलो. मागे बसलेल्या काकू सकाळपासून कावलेल्या होत्या. "कालचा डायवर गाडी फास्ट मारत होता, सायकलवाले पण पुढे निघून गेलेत"  हे वाक्य चौथ्यांदा कानी पडले तेव्हा अंजनेरी फाट्यावर बस दम खात उभी होती. अखेरीस त्रंबक पोहोचलो, महादेवास दुरूनच नमस्कार करून ब्रह्मगिरीचा रस्ता पकडला. पाठीवरचं १५ किलोचं बिऱ्हाड एका दुकानात ठेवून काठी घेऊन चढाई चालू केली. 

रविवारीच ब्रम्हगीरी म्हणजे गर्दीच गर्दी. पण ही गर्दी मात्र धोपट मार्गाने जाते हे बरे. वाटेत एका धर्मशाळेच्या मागे चांगली पंचवीस तीस फूट खोल पायऱ्यांची फार सुंदर विहीर होती तेथे कोणीही भटकत नव्हते. इथे छोटासा ब्रेक घेऊन दोन सफरचंदांना न्याय देऊन पुढे निघालो. सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात जिथुन होते असे मानतात , गोदावरीच्या उगमाचे पवित्र असे हे स्थान जागोजागी पडलेल्या कचऱ्याने बकाल झालेले  होते. जसे वरती चढून गेलो तसे मात्र शिळेत अखंड कोरलेल्या दोन दरवाज्याने आणि त्यावर कोरलेल्या सुबक शिल्पांनी मनाचा ताबा घेतला. उभा कातळ कापून काढलेला मार्ग, मारुतीची भलीमोठी कोरलेली मूर्ती, त्याच्या पायाखालील राक्षसाचे हावभाव, ब्रह्मदेवाचे शिल्प, कोरलेली गुहा आणि त्याबाहेर दगडाचेच कोरलेले ऋषींच्या दोन मुर्त्या, दरवाज्याच्या वरती वेलबुट्टीचे कोरीवकाम तर खाली हत्तीचे शिल्प. एक बघून अचंबित व्हावं तर दुसरे आश्चर्य समोर. 

माथ्यावर पोहोचलो तेव्हा दहा वाजत आलेले. एका लिंबू सरबत विकणाऱ्या काकांना किल्ल्यावर काय काय बघता येईल ते विचारले. ब्रह्मगिरी मंदिर, जटा मंदिर, दुर्गभांडार किल्ला हे तर बघायचेच होते पण "पंचगंगा शिखराच्या मागे एक हट्टीमेटाचा बुरुज म्हणून जागा आहे. त्याकाळी तीन टप्प्यात बांधकाम केलेली वाट आहे. त्याकाळी हत्ती त्या वाटेने येत असावेत. दगडी तटबंदी बघाल तर डोळे विस्फारातील" - इति काका. 
"किती लोक आहेत? "
"मी एकटाच आहे."
"मग जाऊ नका हो एकट्याने. एकट्याने हरवलात तर काय आणि माकडांचा खूप त्रास आहे तिकडे." 

हे ऐकून हट्टीमेटाचा बुरुज हे प्रकरण काय आहे याचे कुतूहल चाळवले. दुर्गभांडार भटकताना कोणी ट्रेकर ग्रुप भेटला तर त्यांना घेऊन जाऊ या विचाराने निघालो. जटा मंदिर पाहून दुर्गभांडार किल्ल्याच्या दिशेने निघालो. दुर्गभांडार किल्ल्याला जायची कातळातून खोदलेल्या पायऱ्यांची वाट आणि किल्ल्याला जोडणारा नैसर्गिक पूल म्हणजे काय वर्णावा. त्याकाळी कोणतीही साधने नसताना हे सर्व कसे काय खोदले असेल या विचारातच किल्ला भटकत राहिलो. किल्ला भटकून परत ब्रह्मगिरी मंदिरात आलो तेव्हा बाराच वाजले होते अजून दोन-तीन तास हातात होते. एका ग्रुपला हत्तीबुरुज बघायला येता का विचारले तर "इथपर्यंतच कसं आलोय आम्हाला माहित ! " 

ब्रह्मगिरीच्या मंदिरात दर्शन घेऊन पुढे एका मंदिरात दगडाखाली गुप्त शिवलिंग आहे तेथे आलो. गर्दी संपल्यावर पुजारीकाकांना हत्तीमेटाची वाट विचारली. "एकटे असल्याने काय होतंय ? काठी घेऊन बिनधास्त जा!" या शब्दाने धीर आला. जशी येथून पुढची वाट धरली तशी जनता शून्य झाली. औषधालाही कोणी नाही. पंचगंगा शिखर वळसा घालून पुढे जायचे होते त्या दिशेने जवळपास तासभर चालत गेल्यावर दूरवर एक झेंडा दिसला. तो झेंडा बघताच मनात एक सुरक्षिततेची भावना आली. आपल्या हिंदू संस्कृतीची एक गोष्ट मला फार आवडते ते म्हणजे कितीही दुर्गम ठिकाणी जा, एखादे छोटेसे मंदिर वा कातळात कोरलेले मारुतीबाप्पा दिसतातच. वीस मिनिटात झेंड्यापाशी पोहोचलो. भैरवनाथाचे छोटेसे मंदिर होते. मनोमन नमस्कार करून आणि देवाला साथीला घेऊन मेटाला निघालो. 

इथून आता पंचगंगा शिखराचे अनेक पदर उलगडत होते यामध्येच कुठेतरी हत्तीमेटाची वाट असणार या उत्साहाने पुढे निघालो. माकडांचेच एक काय ते टेन्शन होते पण त्यांचा अजून मागमूसही नव्हता. तीन-चार पदर ओलांडून जसा पुढे गेलो तसं शेवटच्या पदरातला काळाकभिन्न कातळ चकाकू लागला. बस्स! युरेका! हीच ती वाट! बरेच जण सापडणार नाही म्हणाले होते पण शोधायला फार काही अवघड झाले नाही. 

जे काही डोळ्यासमोर उलगडत होते ते काय वर्णावें? खिंडीतून वरती येताना तीन टप्प्यात बांधलेली तटबंदी वरूनच लक्ष वेधून घेत होती. पहिला दरवाजा चांगला १०-१५ फूट असावा पण पूर्ण मातीखाली गाडला गेलाय. हेच महाद्वार असावे. सध्या आपण त्या द्वारावरून उडी मारून खाली येऊ शकतो. उभा कातळ कोरून बांधलेले प्रवेशद्वार त्यावर दगडाची कोरलेली कमान, बरोब्बर मध्यभागी कोरलेला गजानन. त्यावर दोन फुलांची शिल्पे आणि त्यामध्ये कोरलेली घंटा. घंटेची साखळी आजही तेवढीच उठावदार आणि त्रिमितीय भासावी अशी! कमानीच्या वर दोन्ही बाजूला दोन "शरभ" शिल्पे आणि मध्यभागी द्विदलीय कमलपुष्प त्यात कोरलेला कलश! त्यावर परत वेलबुट्टीचे कोरीवकाम आणि एक मुखशिल्प. एकाच प्रवेशद्वारावर केलेला एवढा कलाविष्कार . अहाहा! काय ती कलात्मकता! काय ती प्रतिभा!

येथून आता खाली खिंडीत उतरायला सुरु केले. प्रवेशद्वारावरून नजर वळवली तसे बाजूला कोरलेला भलामोठा मारुतीबाप्पा आणि त्या शेजारी कोरलेला भैरव वा गडदेवता ! हि शिल्पे आता पडझड झाल्याने अर्धी मातीत गाडली गेलीयेत काही वर्षात नामशेषही होतील. कातळात केलेल्या खोबण्या, अगदी देवाचे वाहन घोडादेखील स्पष्ट दिसतो. शेजारी हात जोडलेला बुद्ध वाटावा अशी मूर्ती व त्यावरही मंदिराचे कोरीवकाम. खूप म्हणजे खूप सुंदर! 

ह्या सगळ्या कोरीवकामाच्या वर बुलंद असा बुरुज आणि अखंड तटबंदी. येथून खाली नाळेत उतरायला चालू केले. हा पहिला टप्पा! येथून थोडं खाली गेलो तसे दोन बुरुज दिसले आणि गुहा. त्याशेजारी महादेवाचे मंदिर आणि त्यात सुबक अशी पिंड. गुहेत थोडा काळ विश्रांती घेऊन पुढे निघालो. येथून पूर्ण नाळ ढासळून गेलेली होती. दगडांचा अंदाज घेत खिंडीतच्या मधल्या तटबंदीजवळ पोहोचलो. येथून आता खाली "मेटघर" गाव दिसू लागले. या गावातील लोक याच रस्त्याने ब्रह्मगिरीला येतात. येथून तिसऱ्या टप्प्यात खाली उतरायला मस्त २०-२५ फुटाची शिडी बसवलेली आहे. पूर्वी खिंडीच्या मधल्या तटबंदीखालून दरवाजा असावा असे अवशेषांवरून वाटते. शिडी उतरून खाली उतरलो आणि नाळेच्या अर्ध्यात आलो. पुढची वाट मेटघर गावात उतरत असल्याने येथून परत फिरायचे ठरवले. तिन्ही टप्प्यात नाळेच्या दोन्ही बाजूनी आजही भक्कम अशी तटबंदी आहे. त्याकाळी या वास्तूचे वैभव काय असावे? या विचारात शिडी चढून गुहेत आलो. 

सकाळी लिंबू-सरबतवाले काका म्हणाले तसे हे सगळे दुर्गवैभव पाहून खरंच डोळे विस्फारलेले. हे सगळे बघण्यात एकटा असलेली भीती कुठे पळून गेलेली. पण हे एवढे सोपे होणे नव्हते. गुहेतून परत नाळ चढायला लागलो तसा एक मोठा दगड वाटेत पडलेला. त्याला वळसा घालून थोडासा वर आलो तर समोर हि मोठ्ठाली माकडाची टोळी जमलेली! "पोटात गलबला येणे" या वाक्याचा अर्थ त्याक्षणी मला पुरेपूर उमगला. जे पाहायचे होते ते सगळे पाहून झाले होते. मग मारुतीबाप्पाचे स्मरण करून जिवाच्या आकांताने पळतच नाळेतून चढाई चालू केली. हातात काठी असल्याने थोडा फायदा झाला खरा पण जसे माकडाचे एकमेकांना दिलेले "कॉल" ऐकू येऊ लागले तसे मला समस्त "देवगण" आठवले. तीन टप्पे उतरायला जेव्हा वीस एक मिनिटे लागली होती ते टप्पे पळतच पाच-सहा मिनिटात चढलो आणि एकदाचे पहिल्या टप्प्याच्या बुरुजावर येऊन थांबलो. येथून दोन घोट पाणी पिऊन जे सुटलो ते येताना लागलेल्या झेंड्यापाशी थांबलो. मागे आता कोणीही नाही हे लक्षात आल्यावर जमिनीवर बसकण मारून छातीभर श्वास घेतला. शेवटच्या काही क्षणात चांगली पाकपुक झालेली !

येथून ब्रह्मगिरी जाऊन परतीचा मार्ग पकडला. सुमारे दोन-अडीचच्या सुमारास ब्रह्मगिरी उतरून आलो आणि बस पकडून नाशिक निघालो. तीन दिवस छानपैकी सार्थकी लागले होते. नाशिकला शिवशाही बसच्या तिकीटाची आराधना करण्यात तब्बल अडीच तास घालवले आणि पुण्यनगरीस रवाना झालो. 

असो! जे काही दुर्गवैभव पाहता आले त्याचा व्हिडिओ बनवलाय. ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडारचे असंख्य व्हिडीओ युटूबवर आहेत म्हणून त्यात माझी भर घातली नाही. ब्रह्मगिरी गेलात तर आवर्जून जावे असे हे ठिकाण आहे. दुर्गसंवर्धनची इथे खरी गरज आहे. चिखलाने भरून गेलेला दरवाजा मोकळा झाला तर त्याखाली अजून काय काय दडलेले असेल हा कुतूहलाचा भाग आहे. 

युट्युब व्हिडीओ मध्ये पूर्ण शिल्प आणि वास्तू आलेल्या आहेत. खाली फोटोंमध्ये काही शिल्पांचे फोटो नाहीत. युट्युब व्हिडीओ आवर्जून बघा. 

हट्टीमेटाच्या वाटेचा युट्युब व्हिडीओ बघा - ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या धर्मशाळेमागील बारव 

धर्मशाळा 


दुर्गभांडार किल्ला 

हट्टीमेट कडे जाताना वाटेत लागणारे छोटेसे मंदिर 


वाटेतले पाण्याचे टाके 


हट्टीमेटाचे प्रथम दर्शन -बुलंद अशी तटबंदी 


ब्रह्मगिरीची मागील बाजू 


हट्टीमेटाचा महादरवाजा .. सध्या पूर्ण मातीखाली गाडला गेलाय . कमानीवर गणपती आणि घंटेचे कोरलेले शिल्प. त्यावर शरभ शिल्प आणि त्यामध्ये मध्यभागी द्विदलीय कमलपुष्प त्यात कोरलेला कलश!


वेलबुट्टीची कोरीवकाम 

सुमारे वीस फुटांची तटबंदी आजही शाबूत आणि बुलंद आहे 


येथून खाली दुसरा , तिसरा टप्पा आणि खाली मेटघर गाव. 


तटबंदी , बुरुज आणि गुहा. निवडुंगाच्या मागे मंदिर आहे


छोटेसे मंदिर 


पंधरा वीस माणसे राहू शकतील अशी गुहा 


तिसरा टप्पा उतरताना .. 
मेटघर गाव 


मध्यभागी मोठी कामं आणि प्रवेशद्वार असावे असे वाटते 
फोटोच्या खाली उजवीकडे बघा येथेही तटबंदी बांधलेली आहे. येथे एक खोली सारखे आहे. 


या डोंगराच्या मागे आपण होतो 


ब्रह्मगिरी मंदिरापासून समोर दिसणारे हरिहर आणि भास्करगड वाचत रहा! भटकत रहा !
सागर शिवदे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: