रविवार, २६ जून, २०२२

यावर्षीचा पहिला वर्षाविहार : नाखिंद डोंगर


आसमंतात पावसाची चाहूल लागलीये. विविध आकाराच्या काळ्या ढगांची आभाळात ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड चालू झालीये तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. मातीचा सुगंध वाऱ्यावर स्वार होऊन अवघे वातावरण शुचिर्भूत करतोय. सोनेरी गवताची पाती हिरवीगार होण्यासाठी आसुसलेली आहेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून वरुणराजाची आराधना करण्यात मग्न झालीयेत. आता पाऊस येणार आणि हा निसर्गसोहोळा अजून अजून खुलत जाणार!

 असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला एका छोटेखानी पण आगळ्या-वेगळ्या वर्षाविहाराचा. नाखिंद डोंगराचा. पुणे -कर्जत - वांगणी - बेडसेवाडी प्रवास करून किल्ल्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. सकाळचे स्वच्छ वातावरण पाहून माथ्यावरून लांब-लांबपर्यंतचे दर्शन होईल म्हणून मनात उत्साह संचारला. पावसाचा थेंब थेंब अभिषेक चालू होता पण वाऱ्याने मात्र पाठ फिरवली होती. घामाच्या वर्षावात ओले चिंब होत सुमारे पाऊण तासात माचीवरच्या वाडी गाठली. त्याचे नाव वाघिणीची वाडी! येथे सुमारे साठ घरे आहेत आणि पाचवीपर्यंत शाळा सुद्धा आहे. आज येथे गाव आणि शाळा दत्तक घेतलेल्या कंपनीचा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता. तो अजून सुरु झाला नव्हता पण बच्चे मंडळी मोठ्या संख्येने जमलेली. त्यांना गोळ्या वाटप करून शाळेच्या मागून नाखिंद माथ्याची वाट पकडली. 


येथून पुढच्या खड्या चढाईने छातीचा भाता धपापू लागलेला. तासाभरात माथ्यावरच्या डोंगरसोंडेवर पोहोचलो आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या उत्कृष्ठ नजाऱ्याने आणि जोरदार वाऱ्याने घाम पुसायचेही भान राहिले नाही. येथून समोर चंदेरी, म्हैसमाळ, श्री मलंग, ताहुली डोंगररांग तर डावीकडे माथेरान, इर्शाळगड, प्रबळगड, कलावंतीण, कर्नाळा असे दूरवर दिसणारे दुर्गवैभव. येथून सुमारे सत्तावीस किल्ले दिसतात असे तेथील फलकावर लिहिलेले होते. ढगांच्या आणि सूर्याच्या पाठशिवणीच्या खेळामुळे दर थोड्या वेळाने वातावरण बदलत होते. येथील नेढ्यात बसून वारा खात पोटोबा करून घेतला आणि माथ्यावर जायला सज्ज जाहलो. 


माथ्यावरून डोळेभरून आजूबाजूचा परिसर पाहात बसून राहिलो आणि "चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो" या वाक्याची प्रचिती घेतली. एवढा वेळ फक्त डोंगरमाथ्याशी सलगी करणाऱ्या ढगांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकला. बघता बघता समोरचे दिसेनासे झाले एवढे ढग आणि जोरदार वारा. अशी सगळी तयारी पाहून पावसाचे आगमन होणारच होते. चढताना घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेलो तर उतरताना पावसाने ओलेचिंब. हा सगळं सोहोळा आपल्यासाठीच घडत आहे कि काय असे वाटून गेले. डोंगर उतरून परत वाडीवर आलो आणि तेथून बेडसेवाडी. अश्या प्रकारे पावसाळी भटकंतीचा श्रीगणेशा तर झाला. असो! फोटोंचा आनंद घ्या!