शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

आंबी-काळ नदीचे खोरे : घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल

आंबी-काळ नदीचे खोरे :   घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल [ १५ किमी. ]
पहाटे पहाटे भर पावसात मंडळी घोल गावाच्या दिशेने रवाना झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच सात वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक वर आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथील निसर्ग आजही तसाच आहे. गावातून वाट्याड्या घेऊन सुरु झाली अजून एक वेगळ्या वाटेवरची भटकंती.

घोल गाव चहुबाजूनी उंचच उंच डोंगरांनी वेढले आहे. दोन दिवसात एकदा मुक्कामी एसटी येते. पण पानशेतचा रस्ता खचल्याने सहा दिवस गाडी आलेली नव्हती. पावसाळी शस्त्रे अंगावर चढवून, चहा घेऊन खिंडीची वाट धरली. खिंडीतून उजवीकडे चढत सुमारे तासाभराच्या चढाईने माथ्यावर येऊन पोहोचलो. येथून डोंगरांनी वेढलेला आजूबाजूचा नजारा आणि कोकणपट्टा बघणे म्हणजे नेत्रसूखच पण आज पावसाच्या कृपेने हे होणे नव्हते.
माथ्यावर एके ठिकाणी सतीमंदिर लागते ते सोडले तर पूर्ण घनदाट जंगल. इथे हरवला तर आठवडाभर भेट होणे नाही असा भाग. त्यात जोरदार पावसाने चिखलमय झालेल्या वाटा तुडवत, घसरगुंडी करत जायची मजाच वेगळी. सती मंदिरापाशी नमन करून उजवीकडच्या धारेने आंबे धनगरवाडीची वाट धरली. स्थानिक आंब्याचा दांड म्हणतात. येथे वाटाड्या नसेल तर अवघड आहे. सगळ्या वाटा पावसाने मोडून गेलेल्या आहेत. वाट काढत आणि असंख्य प्रवाहांमधून प्रवास करत अंदाजे तीन चार तासांनी धनगरवाड्यात पोहोचलो.येताना घरून लहान मुलांचे दोन पोती कपडे आणले होते. घोल आणि गारजाईवाडी गावात एकही लहान मुलं नाहीये. लहान काय तरुण लोकही सगळी बाहेर. म्हणून मग ग्रुपमधील सवंगड्यांच्या मदतीने ती दोन पोती इथपर्यंत आणली होती. भर पावसात- सोसाट्याच्या वाऱ्यात बिनधास्त बागडणाऱ्या छोट्या मित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून आजची पायपीट वसूल झाली म्हणता येईल.

आंब्याचा दांड येथे पोटोबा करून धारेवरून खाली उतरायला चालू केले. दिवसभर पाऊस येत-जात होता पण जशी उतराई चालू झाली तशी आमची मजा बघायला तो पुन्हा जोरात आला. डोक्यावर अखंड पाऊस सोसत, लाल मातीच्या चिखलातून सटकत, प्रसाद घेत मंडळी एकदाची गारजाईवाडीत पोहोचली. गावात जाऊन दोन फणस डोईवर घेऊन यात्रा पुढे निघाली. आता येथून मोठाल्या धबधब्याची रांग लागलेली. कुठे भिजू कोठे नाही असे झालेले. शेवटचा जलप्रपात तर केवळ कमाल. अर्धा तास तेथे डुंबत राहिलो. गावात पोहोचलो, येथील इंद्रायणी तांदूळ म्हणजे अहाहा! मग इंद्रायणी,नाचणी, वरई खरेदी झाली. चहा पिऊन सात तासांची १५ किमीची भटकंती संपवली आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

घोळ खिंडीत पासून पश्चिमेकडे पडणारा पाऊस कोकणातून सुमारे हजारभर किलोमीटर चा प्रवास करून अरबी समुद्रात विलीन होतो तर खिंडीच्या पूर्वेकडील पाऊस पानशेत वरून देशावरील जवळपास पंधराशे किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात जातो. हाये की नाय आपल्या सह्याद्रीची गम्मत !
सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

पुरंदर ते कात्रज [ P2K]

 कालचा वर्षाविहार - P2K [ पुरंदर, नारायणपूर ते कात्रज ]सध्या पावसाने दडी मारली असली तरी पावसाळी बेडकं मोठया प्रमाणावर बाहेर पडलीयेत. वर्षाविहाराचा आनंद घ्यायचा म्हणजे कुठेतरी आडवाटेवर तुफान तंगडतोड करायला हवी या विचाराने दहा भिडू लोक्स घेऊन पुरंदर ते कात्रज चा प्लॅन ठरला. पहाटे पाचला नारायणपूर पोहोचून पावसाची आभूषणे चढवली आणि गणेशाचे नाव घेऊन पायपीट चालू केली. रस्ता काही माहित नव्हता आणि त्यात अंधार. त्यात अजून भर म्हणजे  ढगांनी व्यापलेला आसमंत. कुठून कुठे जायचे माहित नाही आणि आजूबाजूला माणसाचा मागमूसही नाही. मग अश्या वेळेस gpx फाईल कामाला आली. आमच्या काही ट्रेकर दोस्तांनी मागच्या वर्षी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी दिलेल्या gpx फाईल मुळे पुढचे मार्गक्रमण करता आले. सुरवातीलाच पावसाने स्वागत केले म्हणून रेनकोट चढवला होता. आता जशी चढाई चालू झाली तशी निवडुंगाच्या आणि काटेरी झाडांच्या मधून वाट काढताना त्यांनी आणि रेनकोटची गळाभेट व्हायची. "मी फ़ाटेन पण अडकणार नाही"  अश्या रेनकोटच्या भूमिकेमुळे संघर्ष टिपेला पोहोचण्याआधी बॅगेत घालून ठेऊन दिला. सुमारे एक दिड तासात अंगावरचा चढ चढत, चिखलातून सटकून प्रसाद घेत घेत कानिफनाथ मंदिरात पोहोचलो. जोरदार वारा आणि दृश्यमानता शून्य. येथून पुढे चिखलातून घसरा-घसरी करत पुढे खंडोबाच्या मंदिरात पोहोचलो. येथून पुढे उतराई चालू झाली आणि दूरकर वाडी गावाच्या दिशेने मंडळी निघाली. दूरकर वाडीत उतरलो तेव्हा आता कुठे वातावरण स्वच्छ व्हायला लागले. पाच तास पाऊस आणि ढगांमधून वाट काढत आलो आणि पुढे पावसाचा मागमूस नव्हता. दूरवर चतुर्मुख मंदिर दिसू लागले तसे चालण्याचा उत्साह अजून वाढला. वाटेत एका आंब्याचा झाडाचा शेवटचा स्टॉक रिकामा करून हापेवाडीत पोहोचलो. पाणी भरून घेऊन दरे गावाच्या दिशेने प्रस्थान केले. आताशा १६ किमी चालणे झाले होते. डोक्यावर सूर्यदेव तळपू लागले होते. भर उन्हात दरे गाव ते चतुर्मुख मंदिराची चढाई घाम काढत होती. चतुर्मुख  मंदिरात पोहोचलो तसं सात आठ कुत्र्यांनी जोरदार गलका केला. त्यांना गाडीतून येणाऱ्या टापटीप सेल्फी लोकांची सवय असल्याने चिखलाने हातपाय माखलेली मंडळी आली तरी कुठून हा प्रश्न पडला असावा. येथे मस्त पेटपूजा करून अर्धा तास निद्रादेवीची आराधना केली. दुपारी दिड वाजता जड झालेले पाय उचलत गोगलवाडी गावाच्या दिशेने उतरायला लागलो. म्हशी वळायला आलेल्या ग्रामस्थांनी पुढची वाट समजावून सांगितली आणि आम्ही कात्रज खिंडीच्या दिशेने निघालो. 
मी महिन्यात रेहेकुरी अभयारण्यात गेलेलो तेव्हा दिसले नाही तेवढे प्राणी कालच्या ट्रेकमध्ये दिसले. बिबट्याच्या पायाचे ठसे/ विष्ठा , हरीण, घोरपड, मुंगूस , घोणस, आणि ट्रेकच्या शेवटी अगदी कात्रजच्या मागच्या डोंगरवर झुपकेदार शेपटीची कोल्ह्याची जोडी. कात्रज पोहोचलो तेव्हा चार वाजत आले होते. दिवसभरात पहाटे पाच ते दुपारी चार अशी अकरा तासांची आणि २६ किलोमीटर्सची छान भटकंती झाली. 


असो! फोटोंचा आनंद घ्या!