गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

ऐतिहासिक मढे घाट आणि सातसडा, लक्ष्मी , नाणेमाची तीन नेत्रसुखद धबधब्यांची मेजवानी.

 
केळद - मढे घाट उतराई - लक्ष्मी धबधबा - पडवळ कोंड - सातसडा धबधबा - शिवकालीन बारव - धनगरवाडा - नाणेमाची  धबधबा - मढे घाट चढाई - केळद. अशी २१ किलोमीटर्सची भटकंती. 

पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. दुधासारख्या जलप्रपातांचा साज अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!

 

असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला ऐतिहासिक मढे घाट आणि तीन नेत्रसुखद धबधब्यांची मेजवानी अनुभवण्याचा. ऑगस्ट महिन्यात विश्रांतींनंतर दोन छोटे ट्रेक झाले होते त्यामुळे आजचा बेत म्हणजे अंतराचे, वेळेचे गणित सांभाळत जोरदार तंगडतोड करण्याचा. कोथरूड ते केळद प्रवासात भट्टी खिंड ओलांडली तशी कोकणपट्ट्यात ढगांच्या चादरीने आजचा ट्रेक सुंदर होणार याची वर्दी दिली. पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. मढे घाटातून दिसणारा सकाळचा नजर काय वर्णावा! यथेच्छ फोटो काढून घाट उतरायला सुरुवात केली. लक्ष्मी धबधब्याचे लोभस रूप पाहून पडवळ कोंड या वस्तीपाशी पोहोचलो.  पुढचे लक्ष्य होते सातसडा धबधबा. वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रवाहाने कातळ कापून या आविष्काराची निर्मिती झालेली. पाण्यात उतरून फुल टू मजा. प्रवाहाचा जोर इतका होता की आत जायचे धाडस न करता मंडळींनी डुंबून घेतल. येथून पुढे महाराजांनी बांधून घेतलेली शिवकालीन बारव पाहायला निघालो. रस्त्याने चालताना सहज एका आजोबांना विचारले तर तेथून ९० अंशात वळण घेऊन ती बारव होती. योग्य ठिकाणी योग्य वेळेस ते बाबा भेटले. आज सर्वपित्री असली तरी सगळे मनासारखं होणार याची खात्री पटली. 
 
बारव पाहून नाणेमाचीच्या दिशेने मोर्चा वळवला. रस्त्याने नाणेमाची गावात जाऊन फार लांब पडले असते त्यामुळे धनगरवाड्यातून दिसणारा समोर आभाळात उठलेल्या नाकाडाच्या डोंगरसोंडेचा मार्ग धरला. एव्हाना सूर्यदेव ढगांमधून आपली किरणे सोडवून त्यांची दखल घ्यायला भाग पाडत होते. कोकणातले दमट हवामान, प्रखर ऊन आणि छातीवरची ७० अंशांतलीं खडी चढाई.  या चढाईने छातीचा भाता धपापू लागलेला. तासाभरात माथ्यावरच्या डोंगरसोंडेवर पोहोचलो आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या उत्कृष्ठ नजाऱ्याने आणि जोरदार वाऱ्याने घाम पुसायचेही भान राहिले नाही. ढगांच्या आणि सूर्याच्या पाठशिवणीच्या खेळामुळे दर थोड्या वेळाने वातावरण बदलत होते. फोटो काढायचेही त्राण उरले नव्हते. एका छानश्या झाडाखाली विश्रांती घेऊन नाणेमाची धबधब्याच्या दिशेने मंडळी निघाली.  


नाणेमाची धबधब्याचा आवाज अवघ्या परिसरात घुमत होता. येथे थोडीफार गर्दी होती पण त्या रौद्र जलप्रपाताच्या सौदर्यापुढे सगळे प्रश्न थिटे! धबधब्याकडे तोंड करून दोन मिनिटे सुद्धा उभे राहू शकत नाही असा वारा आणि पाण्याचा प्रवाह होता. पाण्याच्या चक्क लाटा बनून अंगावर येत होत्या एवढा जोरदार वारा. आमच्या ग्रुपमध्ये एका भिडूकडे वॉटरप्रूफ कॅमेरा असल्याने त्याचीही मजा करून झाली. आता हा आनंद द्विगुणित करायला पावसानेही हजेरी लावली. अर्ध्या तासापूर्वी निळेशार दिसणारे आकाश आता ढगांनी व्यापून गेले. दोन वाजत आले होते आणि येथून आता आल्यापावली मढे घाट परत चढून जायचा असल्याने जास्त वेळ न घालवता आम्ही निघालो. वाटेत पोटोबा करून परत धनगरवाड्यात उतरणारी घसरगुंडीची वाट धरली. मगाशी चढाई करताना जोरदार ऊन आणि खडी चढाई परवडली पण आता पावसाने घसारा झालेली उतराई नको अशी अवस्था झालेली पण पर्याय नव्हता. मग गणपतीचे नाव घेऊन, चिखलाचा प्रसाद घेत घेत खाली उतरलो. चढताना घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेलो तर उतरताना पावसाने ओलेचिंब. आता वेळ घालवून चालणार नव्हते नाहीतर मढे घाट माथ्यापर्यंत अंधार झाला असता. धनगरवाड्यापाशी साखळी करून पाण्याचा मोठा प्रवाह ओलांडला आणि मग येथून न थांबता दीड तासात मढे घाटाची चढाई करून पश्चिमेचे मावळतीचे रंग बघायला लक्ष्मी कड्यावर पोहोचलो.  पश्चिमेच्या केशरी कागदावर नयनरम्य रंगसंगतीचा कोरस उमटलेला. मावळत्या दिनकराला नमन करून आजची २१ किलोमीटर्सची कसदार भटकंती संपली. 

असो! फोटोंचा आनंद घ्या!


मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली

  

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली 
ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस गणपती बाप्पा पेण वरून घरी आले तेव्हापासून महिनाभर भटकंतीला विराम मिळाला होता. जसे बाप्पा कैलासी परतले तसे मग आमच्या पण दिंड्या सह्याद्रीकडे परतायला सुरुवात झाली. पाऊस पण अजून मस्त लागून राहिलाय तर मग एका छोटेखानी पिकनिक ट्रेकला जायचे ठरले. सकाळी सहाला मंडळी ताम्हिणी घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पौड सोडताच ढगांच्या दुलईत अलगद पहुडलेल्या डोंगररांगा स्वागतास सज्ज जाहल्या. प्लस व्हॅली मध्ये उतरून मजा करून पुढे सावळ घाटाने अर्ध्यात उतरून ताम्हिणी परिसराचा निसर्ग न्याहाळणे एवढाच आजचा बेत असल्याने मंडळी निवांत होती. 


   


सुमारे आठच्या दरम्यान व्हॅलीच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारा निसर्ग पाहून हरकून गेलो. डोळ्यांच्या नजरेत न मावणारे निसर्गचित्र. दोन डोंगरांच्या दरीचा संपूर्ण भाग ढगांनी व्यापलेला. कुठे क्षितिज संपते आणि आकाश सुरु होते याचा थांगपत्ताही लागणार नाही असे दृश्य. नारायणाच्या साक्षीने निसर्गात चाललेला मंगलमय सोहोळाच जणू. आणि हा असा निसर्गसोहोळा चालू असताना आपण तिथे उपस्थित असणे म्हणजे डोंगरदेवांचे आशीर्वादच ते. 

 "य" फोटो काढून दरीत उतरायला प्रारंभ केला. संपूर्ण ढगांनी व्यापलेली दरी सूर्यनारायणाच्या आगमनाने तळ दाखवू लागली. सुरुवातीला "आज काही दिसणार नाही" असे वाटत होते पण दरीच्या तळाशी उतरताच सूर्यकिरणे साथीला येऊ लागली. असंख्य धबधबे खळखळत त्या निरव शांततेत एक नाद निर्माण करत होते. तेथेच एक मोठाल्या दगडावर पथारी पसरून एका भिडूने आणलेल्या न्याहारीच्या आस्वाद घेतला आणि पुढची वाटचाल चालू केली. 


घळीत पुढे जाताना सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. पाण्याचे मोठे प्रवाह लागतील याची कल्पना होतीच पण शेवाळे आणि चिखल याची युती होऊन ठिकठिकाणी प्रसाद मिळत होता. गणपतीचे नाव घेत मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या मारत, मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत  वाटचाल चालू होती. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. दोन पुराणपुरुष भासावेत अश्या दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीमधून वाटचाल सुरु होती.  सूर्यकिरण पडताच झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा आणि तळ दाखवणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. माथ्यावरून अलगद कोसळणारे धबधबे त्या सुंदरतेत भर घालत होते.  आता दरीच्या शेवटच्या टप्य्यात पोहोचलो. समोर दिसणारा निसर्ग काय वर्णावा? येथूनच खाली देवकुंडचा धबधबा आहे. समोर सावळ घाटाने कोकणात उतरणारी घाटवाट, गर्द जंगल, आणि शेवटचे दोन मोठ्ठाले पाण्याचे डोह. डोहात मनसोक्त डुंबून खच फोटोग्राफी झाली. शेवाळ साठलेल्या प्रवाहातून घसरगुंडीचा कार्यक्रमही झाला. एव्हाना बारा वाजत आले होते. चार-पाच वेळा डोहात अंघोळ झाल्यावर दरी चढून परत येताना घामाने अंघोळ झाली. मग त्या श्रमपरिहारासाठी ताम्हिणी घाटातल्या अजून एक धबधब्यात जाणे आले.  


असो. अश्या प्रकारे एक नितांतसुंदर भटकंती पदरात पडली आणि यावर्षीचा पावसाळा सुफळ संपूर्ण झाला. 
वाचत राहा.