शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

गडांचा राजा... राजीयांचा गड .. राजगड प्रदक्षिणा

 गडांचा राजा... राजीयांचा गड .. राजगड प्रदक्षिणा 

भुतोंडे खिंड - संजीवनी माची - पाली दरवाजा - पद्मावती माची - सुवेळा माची - संजीवनी माची


मध्यरात्री दिडच्या सुमारास गाडी वाजेघर गावाच्या दिशेने मार्गस्थ होत होती. मार्गासनी पासून साखर कडे वळल्यावर संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. साखर गावापासून गाडीच्या टायरचे मेदुवडे बनतील असा रस्ता सुरु झाल्याने अनेकांच्या एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर डोलणाऱ्या साखरझोपा मोडल्या. भुतोंडे खिंडीत पोहोचलो तेव्हा आमच्या स्वागताला फक्त रातकिडे उपस्थित. पाठपिशव्या चढवल्या, विजेरी हातात घेऊन भुतोंडे खिंडीतून संजीवनी माचीच्या दिशेने चढाई चालू केली. रात्री अडीच वाजता संजीवनी माचीच्या तटबंदी खाली पोहोचलो तेव्हा माचीचा बुरुज अंधारातही उंच उंच आकाशाला भिडलेला. 

आजपर्यंत अनेक वेळा राजगडी जाण्याचा योग आला. अळू दरवाज्याने राजगडाचा निरोप घेऊन संजीवनी माचीच्या अभेद्य तटबंदीखालून तोरण्याकडे जाताना अनेकदा संजीवनीचे रूप मनात भरायचे. साडे तीनशे वर्षे अभेद्य अशी दुहेरी तटबंदी पाहता त्याकाळी येथील दगडा -दगडाने काय दुर्गवैभव पहिले असावे या विचारातच भुतोंडे खिंड यायची. तेव्हाच असे सुवेळा माचीच्या खालून त्याचे दुर्गवैभव पाहताना काय मजा येईल असे वाटायचे. डोंगरदेवांच्या कृपेने आज तो योग आला.

रात्री अडीच वाजता "अमानवीय" वाटावी अशी काही टाळकी घामाच्या धारा पुसत माचीवर पोहोचली. एका मोठ्या दगडावर महाराजांची प्रतिमा स्थापित करून त्या प्रतिमेची पूजा केली. महाराजांनी आयुष्यातला मोठा काळ राजगडावर घालवला असल्याने महाराजांचा जयघोष करून प्रदक्षिणेला सुरुवात केली. "आज आपण उभे आहोत तेथे महाराजांची पावले अनेकदा पडली असतील", "अश्याच रात्रीच्या प्रहरी बहिर्जी नाईक यांसारखे मावळे अनेकदा रूप बदलून टेहळणी करत असतील" अश्या विचारातच कारवीच्या जंगल घुसलो आणि पाली दरवाज्याच्या दिशेने प्रस्थान केले. 
आज आम्ही गडावर जाणार नव्हतो तर संजीवनी, पद्मावती, सुवेळा माचीच्या बुरूजाखालून कड्यांवरून भटकणार होतो. पूर्ण वाटचालीमध्ये विश्वास ठेवावा असा दोस्त बरोबर ते म्हणजे कारवीचे जंगल! कित्येक जागा अश्या होत्या कि येथे हे झाड नसते तर येथून पुढे जाणे अवघड. तासाभरात पाली दरवाज्याच्या वाटेला लागलो. सुमारे दहा पंधरा पायऱ्या चढून परत जंगलात प्रवेश केला. येथून पुढचा टप्पा होता तो चोरदरवाजाच्या वाटेचा. एका ठिकाणी वाट चुकली आणि विजेरीच्या प्रकाशात काही वाट सापडेना,मग जेमतेम उभं राहत येईल अश्या ठिकाणी उभ्यानेच एक डुलकी काढली आणि उजेडायची वाट बघत बसलो. 

झुंजूमुंजू झाले तसे वाट दिसू लागली आणि पुढची वाटचाल चालू झाली. पद्मावती माची खालून चोर दरवाज्याच्या वाटेल पोहोचलो. आज सूर्यनारायांनी ओझरते दर्शन देऊन ढगांच्या मागून आमची मजा पाहायचे ठरवलेले. कालच्या पावसाने ढग खालपर्यंत उतरलेले. भर एप्रिल मध्ये उन्हाळ्यात आपण आहोत यावर विश्वास बसेना असे वातावरण. हि सगळी दैवी योजनाच आहे असे समजून सुवेळा माचीच्या दिशेने प्रस्थान केले. बालेकिल्ला उंचीकडे डोक्यावर ठेऊन नेढ्याच्या दिशेने पावले चालू लागली. वाटेत मोठ्ठाली १२-१३ मधमाश्यांची पोळी होती आणि दोन दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडलेली ऐकून येथून हळुवार प्रस्थान केले. दिड तासाच्या चालीत नेढ्याच्या खाली पोहोचलो. "मळे" गावातून येथे एक वाट येते तेथे पोहोचलो. नेढं आणि डुब्याचे काही वेगळेच रूप येथून पाहायला मिळाले. येथून पुढे पोहोचलो सुवेळा माचीच्या बुरुजाखाली. येथून मागे उजवीकडे बालेकिल्ला , मध्ये सुवेळा बुरुज, उजवीकडे काळेश्वरी बुरुज असे दृश्य! काय ते राकट रूप. अहाहा !

येथे थोडी पेटपूजा करून सुवेळा ते संजीवनी हा सगळ्यात अवघड टप्पा चालू केला. सत्तर अंशातले कडे, त्यावर तिरपे पाय टाकत चालण्याने पायात आलेले गोळे, जोडीला दोन्ही हाताशी गळाभेट घेणारे कारवीचे जंगल या सगळ्याचा सामना करत एकदाचे अळू दरवाज्याखाली पोहोचलो आणि महाराजांना वंदन करून भुतोंडे खिंडीत उतरून ट्रेकची सांगता झाली. आजपर्यंत न पाहिलेले राजगडाचे रूप या प्रदक्षिणेच्या निमित्ताने पाहता आले. सुवेळा माची ते संजीवनी माची यामध्ये अशी एकही जागा नाही जेथे तटबंदी नाही. आणि आजही तेवढीच बुलंद तेवढीच अभेद्य! काळेश्वरी बुरुजाखालून दिसणारे बालेकिल्ल्याचे रुपडे हि खासच! 

एकंदर १५ किमीची चाल झाली आणि पावसाळी वातावरणामुळे फार मजा आली. असो! फोटोंचा आनंद घ्या!वाचत राहा !

सागर    

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

परमार्थात स्वार्थ - किल्ले हडसर

परमार्थात स्वार्थ - किल्ले हडसर 

ललितापंचमीचे औचित्य साधून रविवारी मंचर जवळील अवसरी खुर्द येथे देवीच्या दर्शनासाठी जाणे झाले. सकाळी लवकर पुण्यनगरीतून निघाल्याने यथासांग देव दर्शन आणि गावात फेरफेटका मारून झाला. बारा पासून पुढे उपलब्ध असलेला वेळ सत्कारणी लावावा म्हणून,  परमार्थात स्वार्थ साधून जुन्नरकडे प्रयाण केले. आता येथून पुढे दाऱ्या घाट आणि दुर्ग-ढाकोबा यातले काहीतरी करू असे ठरवले होते पण बरोबर छोटा मावळा असल्याने मग मोर्चा वळवला तो स्थापत्यकलेतला अद्वितीय असा नमुना असलेल्या हडसर किल्ल्याकडे. 

हडसर गावात येताच, पूर्वी किल्ल्याची पूर्वेकडील खुंटीची वाट एकट्याने चढून आलो होतो आणि तो किती मोठा वेडेपणा होता यांची आठवण झाली. यावेळेस मंडळी बरोबर असल्याने पेठेची वाडी येथून सोप्या वाटेने चढायला सुरुवात केली. थोड्याफार चढाई नंतर आपण किल्ल्यांच्या खिंडीत पोहोचतो आणि मग प्रशस्त अश्या पायऱ्या चालू होतात. 

पाऊण एक तासात खिंडीतून पायऱ्या चढून तटबंदी जवळ पोहोचलो. किल्ल्यापासून वेगळ्या झालेल्या छोट्या टेकडीला किल्ल्यात सामावून घेण्यासाठी बांधलेली अभेद्य अशी तटबंदी बघता , आपल्याला पुढे काय नवल बघायला मिळणार आहे याची प्रचिती देते. या खिंडीतून फक्त पाण्याला खाली जाण्याची आणि वाऱ्याला वर येण्याची मुभा. येथून डावीकडे वळताच नजरेस पडतो गोमुखी रचनेचा कातळात खोदून तयार केलेला अद्वितीय असा कलाविष्कार. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बघता क्षणी टाच आपटून सॅल्यूट !

प्रवेशद्वाराचे कातळ सौंदर्य बघून थक्क व्हायला होते. मूळच्या कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, त्याला अंगच्या कातळाचेच पुन्हा कठडे, पुढे या कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, आतमधील चौकीदारांच्या खोल्या देवड्या, त्यावर कड्यावरचे वहाते पाणी येऊ नयेत म्हणून खोदलेली पन्हाळी आणि त्यामुळे भरपावसात ही कोरड्या असलेल्या पायऱ्या... सगळे शब्दातीत. 

मुख्य दरवाज्याने थोडे वरती चढून आल्यावर खिंडीपलीकडच्या टेकडीवर एक वाट जाते. तेथे गणपतीची एक मूर्ती कोरलेली दिसते. डावीकडे "U" आकाराचे वळण घेऊन दिसतात कातळात बेमालूमपणे लपलेल्या खड्या चढाईच्या पायऱ्या. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गाचा अंदाज येत नाही. येथून पुढे अजून एक गोमुखी रचनेचे दुसरे प्रवेशद्वार लागते. द्वारांच्या कमानी एकाच लयीच्या आणि मितीच्या. येथून अंतिम पायऱ्या चढून किल्ल्यावर पोहोचलो. 

किल्ल्यावर महादेव मंदिर, तलाव, धान्य कोठार/गुहा, वाड्याचे अवशेष अश्या बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. समोर उभा ठाकलेला निमगिरी हनुमंतगड ही जोडगोळी ,लांबवर दिसणारे माणिकडोह आणि किल्ल्याच्या शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य.

छोट्या मावळ्याचा उत्साह बघून शिवमंदिराच्या दिशेने प्रस्थान केले. घंटेचा नाद आसमंतात घुमला. मंदिरातील कोनाड्यात स्थानापन्न असलेले गणेश, मारुती आणि विष्णुभक्त गरुड मूर्ती बघून आपोआप हात जोडले गेले. मंदिराच्या शेजारी असलेले कमानी टाकं तुडुंब भरलेले होते. येथून उजवीकडे थोड्या अंतरावर गुहा दिसते. टाकं पूर्ण भरलेले पाहून त्याच्या जवळ भूभागाला समांतर खोल खोदलेल्या गुहेत कसे काय पाणी साठत नसेल या विचारातच गुहेत शिरलो. गडाच्या माथ्यावर एकटाच असल्याने मनसोक्त फोटोग्राफी झाली. पुढे थोडेफार अवशेष बघून परतीचा मार्ग धरला.  

किल्ला उतरून वाडीत येऊपर्यंत उन्हे कलू लागली होती. पश्चिमेला आभाळात केशरी झालर पसरली होती. आता पावले लगबगीने घराच्या दिशेने पळू लागली. 

आपल्या कालातीत अश्या इतिहासाचा ठेवा आपणच आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला पाहिजे. गोष्टीतले महाराज आणि त्यांचे गडकिल्ले जेव्हा ते स्वतः अनुभवतील तेव्हाच त्यांची रुची वाढेल. 


या चढाईचा युट्युब व्हिडीओ - 

2015 मध्ये खुंटीच्या वाटेने केलेल्या चढाईचा वृत्तांत येथे वाचू शकता. 

जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
थरारक !!