शनिवार, १ एप्रिल, २०२३

भैरवगड - घनचक्कर - गवळदेव - कात्राबाई - कुमशेत - आजोबा पर्वत

 भटकंती सह्याद्रीतील सर्वोच्च घनचक्कर डोंगररांगेची : 

 शिरपुंजे - भैरवगड - घनचक्कर शिखर - गवळदेव शिखर - मुडा डोंगर - कात्राबाई शिखर - कात्राबाई खिंड - कुमशेत - आजोबा पर्वत शिखर - कुमशेत 

दोन दिवसांची, कुमशेत मुक्कामी ३६ किलोमीटर्सची भटकंती. दिवस पहिला  - 

शिरपुंजे - भैरवगड - घनचक्कर शिखर - गवळदेव शिखर - मुडा डोंगर - कात्राबाई शिखर - कात्राबाई खिंड - कुमशेत

पहाटे तीनच्या सुमारास गाडी कळसुबाई -हरिश्चंद्र अभयारण्यातून मार्गस्थ होत होती. संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. रात्री अकराला मंडळी निघालेली, ती झोपेची थकबाकी गोळा करत करत शिरपुंज्यात पोहोचली. आजचा बेत होता सह्याद्रीतील सर्वात उंच डोंगररांग पादाक्रांत करण्याचा. घनचक्कर, गवळदेव, आजोबा पर्वत हि नाव आजपर्यंत लेखात वाचलेली पण आज या सह्याद्रीतील शिखरांच्या  "आजोबांची" भेट घ्यायची संधी आली होती. पूर्वेकडे झुंजूमुंजू होऊ लागलेले पाहून आणलेल्या इडल्या आणि वाफाळता चहा यांना योग्य न्याय देऊन त्यांची पोटात बदली करून घेतली. भैरवनाथाचा उदो करून शिरपुंजे गावातून भैरवगड किल्ल्याची वाट धरली. 

सकाळची कोवळी किरणे भाताच्या पात्यांवर पडून आसमंतात परावर्तित होत होती. भैरवाचा डोंगर निश्चल ऊन खात पहुडलेला तर शेजारी घनचक्कर माथा आपल्या उंचीने ढगांशी गळाभेट घेत होता. पायथ्याच्या मारुती मंदिरात मारुतीचे दर्शन घेऊन चढाईस चालू केले आणि सुमारे तासाभरात भैरवगड आणि पतवडी डोंगरांच्या खिंडीत आलो. सर्वांगाला घामाचा अभिषेक झालेला. शिरपुंजे गावातून यथायोग्य मळलेली वाट गडावर येते. नुकतीच भैरवाची यात्रा झाल्याने ठिकठिकाणी खुणा मारलेल्या दिसल्या. स्थानिक लोक भैरवगडावर जोडे न घालता जातात म्हणून खिंडीत जोडे काढून माथ्यावर कूच केले. 
खिंडीत पोहोचताच समोर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दूरपर्यंत उलगडत गेली. सुखावह नजारे बघत गडाच्या माथ्यावर गेलो ते गुहेमध्ये विराजमान अश्वरूढ भैरवनाथाची सुंदर मूर्ती बघायला. गुहेकडे जाताना पाण्याची टाकी लागतात ते पाहून आपण गुहेमध्ये प्रवेशते होतो. भैरवनाथाला मनोमन नमस्कार करून आणि आमच्या पुढच्या मोहिमेसाठी बळ मागून गडाच्या अत्युच्च ठिकाणी गेलो. येथून समोर आता हरिश्चंद्रगड बालेकिल्ला, तारामती शिखर, सीतेचा डोंगर , टोलार खिंड दिसू लागले तर मागे पाबरगड.  पश्चिमेकडे आमचे पुढचे लक्ष्य घनचक्कर शिखर. गडावरची सगळी १६ टाकी, वीरगळ,गुहा बघून आता घनचक्कर जाण्यासाठी परत खिंडीत उतरलो.  येथे खिंडीत वनखात्यानेतर कमालच केलेली आहे. बॅरिकेड्स आणि शिड्या लावून भैरवगडाच्या मार्ग गरज नसताना सुकर केला तर पतवडी डोंगराला वळसा घालून जाणाऱ्या वाटेचा खिंडीतूनच शिडी लावून विषयच संपवून टाकला. असो वेळ नक्की वाचला या समाधानाने घनचक्कर शिखराकडे कूच केले. दोन छोट्या टेकड्या चढून महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाच्या घनचक्कर माथ्यावर उभं ठाकलो. चारही बाजूला डोळे दिपवणारे नजारे. समोर भंडारदरा जलाशयाचे प्रथम दर्शन झाले. पश्चिमेला गवळदेव शिखर आमची वाटच बघत होते. गवळदेव आणि कात्राबाई यांच्यामध्ये आजोबा पर्वत ओझरते दर्शन देऊ लागला. उद्या आम्ही आजोबा पर्वत जाणार होतो म्हणून आज लांबूनच हात जोडून साकडं घातलं. दुर्गरत्न रतनगड, खुट्टा, रतनवाडी, स्पष्ट दिसत होती तर त्यामागे अजून कळसुबाई, अलंग-मदन-कुलंग रांग पुसटशी ओळखू येऊ लागली. 
थोडीशी पेटपूजा करून गवळदेव शिखराची पायवाट पकडली. उत्तरेकडे कलाडगड पासून ते हपटा, नाफ्त्या पर्यंत दुर्गवैभव डोळ्यात मावत नव्हते. छोटासा वळसा घालून गवळदेव पायथ्याशी आलो. येथून माथ्यावर जाणारी घसाऱ्याची वाट घेऊन अर्ध्या तासात गवळदेव माथा! तिसऱ्या क्रमांकाचे अत्युच्च शिखर! त्यावरून होणारे सह्यदर्शनही तसेच अत्युच्च! येथून आता कात्राबाई, करंडा समोर तर रतनगड थोडासा उजव्या हाताला अजून जवळ आलेला भासला. सहयाद्रीचे हे पुराणपुरुष आपल्या असंख्य डोंगरधारेरुपी बाहुतून आमचे जणू स्वागतच करत होत्या. गवळदेव माथ्यावर महादेवाची पिंड पाहून आपोआप हात जोडले गेले. गवळदेव माथ्यावर कोठेही पाण्याचे टाक नव्हतं पण तरी ओलावा कसा असे वाटाड्याला विचारताच त्याने एक छोटासा दगड बाजूला केला तर ते छोटेसे छिद्र म्हणजे खालच्या पाण्याच्या टाकीचे तोंड होते. त्या छोट्या छिद्रातून बाटली आत टाकली तर स्वच्छ आणि गारेगार पाणी प्यायला मिळाले. स्थानिकांना लोक बरोबर असतील तर अश्याही काही गोष्टी बघायला मिळतात. 
एव्हाना तीन वाजत आलेले. आता गवळदेव उतरून कात्राबाई खिंडीतून कुमशेत गाठायचे होते. कुमशेत येथे आजचा मुक्काम होता. बाकी सगळी मंडळी कात्राबाई खिंडीतून पुढे निघाली तसे कात्राबाई माथ्यावर पण जाऊन येऊ अशी हुक्की आली. साडे तीन वाजत आलेले. वाटाड्याच्या म्हणण्यानुसार खिंडीतून माथ्यावर जाऊन येऊन दोन अडीच तास लागणार होते म्हणजे कात्राबाई खिंड ते कुमशेत दोन तासांची चाल अंधारात होणार होती. ट्रेक लीडरला विचारले तर त्यांची संमती होती. मग काय गणपतीचे नाव घेऊन, कात्राबाईचे दर्शन घेऊन पळत पंचवीस मिनिटात माथा गाठला. माथ्यावर फक्त आम्ही दोघेच! कात्राबाई शिखरावरून दिसणारे दृश्य तेच पण पूर्वेकडे पाहता भैरवगड - घनचक्कर शिखर - गवळदेव शिखर - मुडा डोंगर अश्या आपण चालून आलेल्या रांगा बघता ऊर भरून आला होता. एकाच दिवसात घनचक्कर रांग पूर्णत्वास आली होती. थोडा वेळ शांत बसून डोळे भरून चौफेर निसर्ग न्याहाळला. रतनगडावरील बुरुज येथून स्पष्ट दिसत होता. रतनगड, खुट्ट्याच्या बरोब्बर मागे AMK आणि कळसुबाई हि फ्रेम फक्त येथेच!
शिदोरीतले शेवटचे पदार्थ पोटात ढकलले आणि सूर्यनारायण अस्ताला जायची चाहूल लागताच खाली उतरायला सुरुवात केली. वीस मिनिटात खिंडीत पळत आलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. सगळं ग्रुप पुढे निघून गेलेला पण उजेड असल्याने वाटेची चिंता नव्हती. एका दिवसात चार डोंगर भटकून मनात समाधानाची भावना होती.  सुमारे दोन तासात देवाची वाडी येथे आलो. गावात पारंब्यांवर झोका खेळणाऱ्या मुलांना फराळाचा खाऊ वाटला आणि कुमशेतच्या दिशेने मंडळी निघाली. अर्ध्या रस्त्यात गाडी आलेली पाहून आणि त्यानंतर कुमशेत पोहोचल्यावर भाकरी, अख्खा मसूर उसळ, खर्डा , सूप असे साग्रसंगीत जेवणाचा बेत बघून आयोजकांचे (STF ग्रुप) आणि ग्रुपमधल्या ट्रेकर दोस्तांचे आभार मानले. "अन्नदाता सुखी भव:" असे आशीर्वाद देऊन तंबूत शिरलो. 

झोप येईना म्हणून रात्री अकरा पर्यंत मोकळ्या जागेत बसून राहिलो. पूर्ण आसमंत आता टीमटीमत्या ताऱ्यांनी व्यापलेला. आपल्याला दुर्लभ असे दृश्य! तारे तुटताना पाहून मनोमन इच्छा करण्याचे खेळही झाले. थंडी आता आपले अस्तित्व दाखवू लागलेली. उद्या "आजोबांची" भेट होणार या खुशीत मंडळी निद्रादेवीच्या स्वाधीन झाली.दिवस दुसरा - कुमशेत - आजोबा पर्वत शिखर - कुमशेत [ आज्या पर्वताची खतरनाक चढाई आणि शिखरावरून ३६० अंशात दिसणारे दिलखेचक दृश्य.]   पहाटे पाच वाजता जाग आली तेव्हा अंधाराचे साम्राज्य होते. ग्रुप मधील काही मंडळी पोहे आणि चहाच्या तयारीला जुंपली होती. सकाळचे कार्यक्रम उरकून बूट घालून गावात फेरीला निघालो. काल गावात पोहोचायला अंधार पडल्याने गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहता आला नव्हता. जसा निघालो तसा पूर्वेच्या आसमंतात केशरी झालर उमटू लागलेली. तांबडफुटीची सुवेळ आणि जोडीला हलकीशी थंडी! चारही बाजूला बघतो तर डोंगरच डोंगर. दक्षिणेला अजूनही हरिश्चंद्र पर्वतरांग संगतीला होतीच. गरमागरम चहा, पोहे यांना न्याय दिल्यानंतर पाणी भरून आजोबांच्या भेटीस मंडळी सज्ज जाहली. 


कुमशेत पासून आजोबा पर्वत पायथा अंतर ४-५ किलोमीटर असेल, पण तो वेळ वाचवण्यासाठी आयोजकांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत जायची सोय केली. आता नाकासमोर आजोबा पर्वत बघत वाटचाल चालू झाली. सोनसळी गवतांवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडल्याने वातावरण भारीत झालेले. "आज्या पर्वताचे" सरळसोट कडे पाहून कुठून वाट असेल असे मनोमन ताडीत ट्रेकर मंडळी पायथ्याशी पोहोचली. येथून वाहणारा प्रवाह हा शेवटचा पाण्याचा स्रोत म्हणून पाणी भरून घेतले. आजोबा पर्वतावर पाणी मिळेल याबाबत शाश्वती नव्हती. पाणी भरले आणि प्रवाहाच्या काठाशी असलेल्या मंदिरातील देवतेला मोहीम सुखरूप फत्ते होउदे म्हणून साकडे घातले. 

इथून आता खरी मजा चालू झाली.  सरळसोट घसाऱ्याचा चढाई मार्ग! जसे या घसाऱ्याच्या मार्गाने, पायात चाळीस रुपयांची प्लॅस्टिकची चप्पल असलेला वाट्याडा झरझर चढू लागला तसे अद्ययावत जोडे आणि अख्खे डी-कॅथलॉन अंगावर लेऊन चढाई करणाऱ्या ट्रेकर लोकांची पाकपुक होऊ लागली. मागील दोन वर्षात सगळ्या वाटा मोडून गेल्याचे वाटाड्या वारंवार सांगत होता म्हणजे थोडक्यात पुढे जायचंय का म्हणून इशारा देत होता. बरेचसे लोक कोकणातून म्हणजे डेहेणे गावातून वाल्मिक आश्रम आणि सीतेच्या पाळण्यापर्यंत येतात पण तेथून पर्वताच्या माथ्यावर जाता येत नाही. माथ्यावर जायचे तर हीच एक वाट! मग काय, गणरायाचे नाव घेऊन मंदिरापासून पर्वताकडे सरळ चढाई चालू झाली. प्रत्येक पाऊल टाकताना घसरायची शक्यता तपासून टाकले जात होते. कोणत्या दगडावर पाय ठेवल्यावर तो कधी असहकार पुकारेल याची शाश्वती नव्हती.  काही थोडा भाग तर असा होता कि आजूबाजूला पकडायला ना कुठले झाड ना पाय ठेवायला दगड फक्त भूसभुशीत माती. अश्यात पहिली मावळ्यांची फळी सुमारे पाऊण पर्वत चढून गेली. येथून एका घसाऱ्याच्या पॅचला झाडाला दोरी बांधून चढाई थोडी सोयीस्कर झाली. 

एवढे दिव्य करून चढाई तर करत होतो पण मनात येथून उतरायची भीती होती. येथून उतरायला यापेक्षा दुप्पट मजा येणार होती. ग्रुप मधील एकूण मंडळी या मार्गाने चढून -उतरून नक्कीच संध्याकाळ उजाडेल अशी चिन्हे होती मग ट्रेक लीडरने योग्य निर्णय घेऊन वरती आलेल्या लोकांना पुढे जायची मुभा देऊन बाकीच्या मंडळींना उतरायला सांगितले. सुमारे पाऊण तासाच्या खतरनाक चढाईनंतर कारवीच्या जंगलात घुसलो. येथून वाट गडाला फेरी मारून उत्तरेकडून वर चढत होती. आता मोजकेच लोक असल्याने चढाई गतिमान झाली. येथून आता पुढे काही आश्चर्य आमची वाटच बघत होते. 

डोंगराला ट्रॅव्हर्स मारून पुढे गेलो तसे एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी जागा आणि पुढ्यात खोल दरी. एवढी जागा काळजीपूर्वक पार करून समोर बघतो तर समोर छोट्याश्या तलावांची श्रुंखला! त्यातील निळेशार पाणी आणि पाण्यात पडलेली आजूबाजूच्या अद्भुत निसर्गचित्रांची प्रतिबिंबे. घनदाट कारवीतून वाटचाल करीत पठारावर आलो आणि डोळेच विस्फारले. येथून दिसणारे मायबाप सह्याद्रीचे रुपडे म्हणजे निव्वळ कमाल. सहयाद्रीच्या या सौन्दर्याच्या व्याख्याच वेगळ्या. न मागता दिलेल्या या देणग्या सगळ्या बेहिशेबी! तो अखंड देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार ओंजळीत भरून घ्यायचं बस! 

भीमाशंकर रांगेपासून ते कळसुबाई रांगेपर्यंत एकाच ठिकाणाहून दर्शन देणारी आजोबा पर्वत ही सह्याद्रीतील एकमेव जागा असावी. येथून दिसणारे दुर्गवैभव काय वर्णावे? अश्या जागी एखादा माहितगार माणूस बरोबर असेल तर क्या बात! लांबच लांब पसरलेला सहयाद्री अनुभवणे म्हणजे काय याचा अर्थ आता उलगडू लागला. आजोबाच्या दक्षिणेपासून सुरुवात करून  पूर्वेकडे येताना पहिले दर्शन दिले ते लांबवर सिद्धगडाने. भीमाशंकर रांगेतून थोडासा सुटावलेला सिद्धगड! त्यापुढे लांबवर ढाकोबाचे टेकाड उंच उठलेले. ढाकोबाच्या कॅनवास वर पुढे उभे जीवधन, नानाचा अंगठा, वऱ्हाडी डोंगर. मग दौन्डया, उधळ्या डोंगर. यापुढे नाफ्ता, सीतेचा डोंगर, हरिश्चंद्रगड, तारामती, बालेकिल्लाच काय तर कोकणकडा सुद्धा स्पष्ट दिसत होता. मग टोलारखिंड, कोथळ्याच्या भैरवगड कलाडगड पुढे ओळीने. जरा जवळ खाली बघतो तर कुमशेतचा कोकणकडा, कोंबडा डोंगर. पूर्वेकडे बघतो तर समोर काल चढून आलेली घनचक्कर रांग! नाकासमोर दिसणारा करंडा, त्यामागे कात्राबाई, गवळदेव आणि त्याला जोडून बारीक दिसणारा घनचक्कर. पूर्वेकडून उत्तरेकडे बघता, रतनगड, रतनगडाचा खुट्टा, कळसुबाई, धाकटी कळसुबाई, अलंग, मदन कुलंग दे दुर्गत्रिकुट, आणि छोटा कुलंग! त्याखाली साम्रद गाव आणि निसर्गनवल अशी सांदण दरीची सुरुवात डोळ्यांनी स्पष्ट दिसत होती. भंडारदरा आणि घाटघर जलाशय त्या कॅनवास मध्ये निळे रंग भरत होते. येथून माथ्यावर चढाई करून पश्चिमेकडे आलो तर कोकणपट्टा दृष्टीक्षेपात आला. ट्रेक लीडरने हि सगळी ठिकाणे हेरून हेरून दाखवली तर वाटाड्या छोट्यातला छोट्या डोंगरचे पण नाव सांगून माहितीत भर टाकत होता. एका अनामिक ओढीने निसर्गात भटकणाऱ्या डोंगरयात्रींची आनंदयात्रा सुफळ संपन्न होताना भासत होती. येथेच्छ फोटो काढून उतरायला सुरुवात केले. आता खरी हौस फिटणार होती. अनेकांचा चार-पाच वेळा घसरत प्रसाद घेऊन झाला. भगवंताचे स्मरण करत तासाभरात हळू हळू का होईना पण सगळे सुखरूप उतरलो. उतरताना झालेल्या अवस्थेचे वर्णन न केलेलेच चांगले ! वाटाड्या मात्र बहाद्दर होता, अश्या खतरनाक चढाई उतराईत तो साधा घसरला पण नव्हता. यथावकाश डोंगर उतरून पायथ्याशी आलो आणि ओढ्यात काचेसारखे स्वच्छ पाणी बघून डुबक्या मारल्या. अंगातला क्षीण तर निघून गेलाच पण अश्या रोमहर्षक आणि लक्षात राहील अश्या दोन दिवसीय मोहिमेची अशी खास सांगता झाली. येथून कुमशेतला येऊन ट्रेक मधल्या भिडूंनी बनवलेले स्वादिष्ट जेवण उदरम! भरणम! करून मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

वाचत रहा ! अभिप्राय कळवत रहा!

सागर शिवदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: