रविवारची अनवट भटकंती :
पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड
रात्री दोनच्या सुमारास गाडी कळसुबाई -हरिश्चंद्र अभयारण्यातून मार्गस्थ होत होती. संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. कोतुळ - ब्राम्हणवाडा - कोथळे अशी गावे मागे पडत होती. रात्री दहाला निघालेली मंडळी झोपेची थकबाकी गोळा करत करत पाचनई गावात पोहोचली. आजचा बेत होता सह्याद्रीतील रौद्रभीषण असा कोकणकडा त्यासमोरील सीतेच्या डोंगरावरून मनसोक्त न्याहाळणाचा. त्याचे विलोभनीय असे रुपडे डोळ्यात साठवून घेण्याचा, आणि कलाडगडावरुन दिसणारे दुर्गवैभव अनुभवण्याचा.
जेव्हा जेव्हा कोकणकड्यावरून सूर्यास्त पाहायचो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला जाताना नाफ्ता -डोमा, कलाडगड या शिखरांच्या मागे केशरी झालर चढलेली असायची. नाफ्ता-डोमाचे गगनचुंबी शिखरे कायम साद घालायची. कोकणकड्यावरून खाली बघताना डोळे फिरायचे पण त्यावेळेस कोकणकड्याचे अद्भुत अंतर्वक्र रूप समोरून पाहता येत तर काय मजा येईल या विचारताच सूर्यास्त व्हायचा. आज ते वेळ आली आणि ट्रेकभिडुनी प्लॅन ठरवल्यावर लागलीच पाच भटकी मंडळी निघाली.
रात्री तीनला पाचनई गावात पोहोचून एक मंदिरात पथारी टाकली. तीन नंतर गाड्या भरून भरून पब्लिक यायला लागल्यावर थोडीफार तरी झोप होईल हि अपेक्षा सोडून दिली. साडे तीनच्या सुमारास रील बघून हरिश्चन्द्रगड "ट्रेकिंग" नव्हे तर "ट्रॅकिंग" करणारी मंडळींचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. हिंदी पब्लिक आणि उत्साही पोरींनी पहाटे तीन वाजता हासत -खिदळत गावातील शांततेचा बाजार उठवला. थंडी असल्याने पांघरून ओढून पडून राहिलो. सकाळी सर्व आवरून पुढे निघालो.
हरिश्चंद्र गडाच्या डोईवरून मनसोक्त विहार करणारे ढग
पूर्वेकडे झुंजूमुंजू होऊ लागलेले. आसमंतात जमलेले ढगांचे छोटे-छोटे पुंजके पश्चिमेच्या प्रवासास लागले होते. सकाळची कोवळी किरणे लेंडी जांभळाच्या सदाहरित हिरव्यागार पानांवर पडून आसमंतात परावर्तित होत होती. समोर कलाडगड निश्चल ऊन खात पहुडलेला तर त्यामागे घनचक्कर माथा आपल्या उंचीने ढगांशी गळाभेट घेत होता. सीतेचा डोंगर समोर बघून नाळेतून चढाई चालू केली. ओळीने येणाऱ्या मोठ्या मोठ्या गुहा पाहून पावसाळ्यात येथे काय कमाल वातावरण असेल या विचारात यथेच्छ फोटो काढत मंडळी दोन तासात डोंगरावर पोहोचली.
थोडी उंची गाठली तसे कलाडगड खुजा वाटू लागला तर पश्चिमेकडे नाफ्ता शिखराचे दर्शन होऊ लागले. समोर शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव , आजोबा पर्वत लक्ष वेधून घेत होते. जसे डोंगर चढून माथ्यावर पोहोचलो तसे वरून दिसणारे दुर्गवैभव पाहून डोळे तृप्त झाले. नाणेघाटापासून ते हटकेश्वर पर्यंतची सगळी जुन्नर दिशेची डोंगररांग आता एका दृष्टीक्षेपात आली. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच काय ते आपल्या हातात!. सहयाद्रीचे हे पुराणपुरुष आपल्या असंख्य डोंगरधारेरुपी बाहुतून आमचे जणू स्वागतच करत होत्या.
समोर आहे तो कलाडगड. त्यामागे घनचक्कर रांग.
खिंडीतून छोटीशी चढाई करून सीतेच्या डोंगराचा माथा गाठला. समोर आता कोकणकडा दिसत होता. तारामती, बालेकिल्ला उन्हाचा सोनेरी मुकुट धारण करून ध्यानस्थ बसलेले. माकडनाळ, रोहिदास शिखर आणि त्याला लागून एकमेवाद्वितीय असा अंतर्वक्र कोकणकडा. बरोबर रोहिदास शिखराच्या मागे देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर दिसला. केवळ अद्भुत अशी निसर्गचित्रे! येथून दिसणारे मायबाप सह्याद्रीचे रुपडे म्हणजे निव्वळ कमाल. सहयाद्रीच्या या सुंदरतेच्या व्याख्याच वेगळ्या. न मागता दिलेल्या या देणग्या सगळ्या बेहिशेबी! तो अखंड देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार ओंजळीत भरून घ्यायचं बस!
घड्याळात अकरा वाजलेले पाहून परतीचा रस्ता धरला. दिड तासात परतून कलाडगडाकडे कूच केले. एव्हाना आता उन्हाचा जोर वाढल्याने कलाडगडाची चढाई दम काढू लागली. वीस मिनिटात चढाई करून गेल्यावर कातळकोरीव पावट्यानी स्वागत केले. अश्या उंच ठिकाणी अशी कारागिरी करणाऱ्या त्या अनामिक हातांना सलाम! येथून पुढे चढून भैरव मंदिरात पोहोचलो. नमस्कार करून गड फेरीस निघालो तशी या माथ्यावरून मगाशी न दिसलेली नाफ्ता-डोमाच्या मागील दुर्गशृंखला उलगडत गेली.

कात्रा,करंडा,आजोबा ते मागे पाबरगड सगळी रेंज एका ओळीत दिसू लागली. पुन्हा एकदा हे अप्रतिम वैभव मनाच्या कप्प्यात साठवत कलाडगड उतरून खाली आलो. एक सुंदर मोठ्य्या झाडाशी जेवण करून अर्धा तास वामकुक्षी घेतली आणि मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
महत्वाचे असे काही :
- हरिश्चंद्रगडाचे आणि जुन्नर पर्वतरांगेचे रौद्र सौन्दर्य आणि पाहायचे असेल तर यासारखी जागा नाही.
- पावसाळ्यात मोठे धबधबे असल्याने चढाई अवघड होईल. उत्तम.
- हपट्याचा कडा हा सीतेचा डोंगर उतरून अर्धा पाऊण तास चाल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा