बुधवार, ८ मे, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३  - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी

कुतूहल हि खरंच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवायला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगांत माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अद्भुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.
आता आम्ही निघालो होतो आमच्या स्वप्नवत ट्रेक च्या दुसऱ्या टप्प्यात. मुल्हेर किल्ला.
सकाळी ६  वाजता  चहा घेऊन आम्ही पोहोचलो शुक्ल काकांकडे, दुपारचा डबा घ्यायला. रात्रीच सांगून ठेवला असल्याने डबा तयारच होता. तो घेऊन स्वारी निघाली मुल्हेरच्या किल्ल्याच्या दिशेने.
मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे. सकाळी सकाळी आल्हाददायक हवा आणि स्वच्छ वातावरण. सगळीकडे शांतता पसरलेली, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिंचांनी डवरलेली झाडे, पक्ष्यांचा मुक्त वावर, गावातल्या बायकांची पाण्यासाठीची पळापळ तर काही "अड्ड्यांवर" गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या गप्पा टप्पा, मुलांची शाळेत जायची लगबग, तर दुकानदारांचे दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून दिवसाची जय्यत तयारी. सगळे अनुभवत आम्ही गावाच्या बाहेर येऊन किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.
किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती काढलेलीच होती. किल्ल्यावर विविध प्रकारची झाडे सापडतात असे ऐकले होते. काटेरी , औषधी, खाज येणारी, विषारी, रक्त गोठवणारी झाडे.
किल्ल्याची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था हि चोख होती. ७ दरवाजे एका बाजूने चढताना लागणार होते. तर मोरागडावर ३ दरवाजे. पायथ्यापासून निघणाऱ्या वाटा मुल्हेर माचीकडून तर दुसरी थेट मोरागडावर जाणारी होती. या सगळ्या माहितीने आमची उत्सुकता वाढली तसे आमच्या पावलांचा वेगही वाढला.

ऐतिहासिक संदर्भ : 
मुल्हेर चा उल्लेख रत्नपूर म्हणून महाभारतात आढळतो.हि राजा मयुरध्वज याची राजधानी होती.त्यामुळे गावाला मयुरपूर आणि किल्ल्याला मयूरगड नाव पडले.फार काळापूर्वी येथे नाईक आणि भिल्ल  सत्ता होती. इ. स. १०२९ काळात यादव घराण्याची सत्ता आली. पुढे १३०८ मध्ये कनोज येथील राठोड बागुल यांनी येथील सत्ता काबीज करून या प्रांताला बागलाण असे नाव दिले. पुढे ३५० वर्षे त्यांची सत्ता चालली.  इ.स. १६३८ रोजी वैभवशाली हिंदूंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली.औरंगजेबाने येथील सत्ता घेतल्यावर किल्ल्याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेर ही बागलणची परंपरागत राजधानी होती म्हणून मुल्हेरजवळ 'ताहीर' नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद/ताहाराबाद असे नामकरण झाले. नंतर ४० वर्षांनी शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. हा किल्ला घेताना मुघल साम्राज्याचा पाडाव करून शिवाजींनी अमाप दौलत मिळवली . पुढे ब्रिटिशांनी हा प्रांत विभाजन करून सटाणा हे बागलाण चे मध्यवर्ती जिल्हा ठिकाण केले. 
प्राचीन काळातील सोमेश्वर मंदिर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असून त्याचा गाभारा हा पाताळात आहे.  त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. अशी अनेक मंदिरे आणि स्थापत्य कलेचे आविष्कार देशोधडीला लागले आहेत. 
 
भौगोलिक संदर्भ :
मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९०  फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. 
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५  किमी अंतर आहे. 
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी साधन आहेत. 
शेती मोठ्या प्रमाणावर चालत असून भात, ऊस आणि इतर हंगामी पिके घेतली जातात. 

नकाशा :
 आंतरजाला वरून साभार …

आमचा ट्रेक अनुभव :
किल्ल्याच्या पायथ्याशी शेत असलेली मंडळी आमच्याबरोबर होतीच. सकाळी न्याहारी करून आणि दुपारचा डबा डोक्यावर घेऊन, हातात सायकल, तर बाई माणसांच्या कडेवर लहान मुले. 
आता आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य झाला होता. सगळीकडे अतीव शांतता पसरलेली. सहज मागे वळून पहिले तर गाव खूपच लांब राहिले होते. आणि दिसत होत्या त्या फक्त दूरवरच्या डोंगर रांगा. 
उजवीकडून पाहिल्यास ओळीने मांगी-तुंगी, ताम्बोळया, न्हावी रतनगड अशी डोंगर रंग दिसते.
जरा थोडे उंच आल्यावर आजूबाजूच्या टेकड्या हि छोट्या वाटत होत्या. 
मजल दरमजल करत आम्ही अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. रस्त्यात एक कूपनलिका दिसली. तिथे थोडे पाणी भरून घेतले आणि पुढे निघालो.
रात्रीच थोडे खायचे समान घेऊन ठेवले होते. त्यात आवर्जून बोंबी घेतल्या होत्या. लहानपणीचे दिवस आठवले. मग लगेच प्रत्येक बोटात एक घालून "माझी बोटे किती मोठी" याचा डेमो झाला.

आता भूक हि लागली होती म्हणून तिथेच असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून न्याहारी चालू झाली. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बाहेर येऊ लागले. मी मात्र माझा सगळ्यात प्राणप्रिय पदार्थ "शंकरपाळ्या" खाण्यात गुंतलो होतो. चहा बरोबर शंकरपाळ्या म्हणजे खरेच स्वर्ग सुख आहे. अहाहा !!
 

न्याहारी आटोपून आता गडाची चढाई चालू झाली. पायथ्याशी एक मस्त घर होते. कितीतरी वर्षांनी मी बैलगाडी पहिली त्यामुळे ती कॅमेरात कैद करून ठेवली.
या घरापासून पुढे २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
सरळ वाट : सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.  


थोडे चालून जाताच किल्ल्याचे प्रथम दर्शन झाले. पश्चिमेकडून चढण असल्याने उन्हाचा त्रास व्हायचा प्रश्नच नव्हता. हिरव्या गार अश्या गर्द वनराईत वसलेला अजस्त्र असा किल्ला. सकाळचे कोवळे ऊन  अंगावर झेलत निश्चल असा उभा होता. किल्ल्याच्या खिंडी मधून सूर्याची कोवळी किरणे डोकावत होती. थंडगार अशी हवेची झुळूक. अशा वातावरणात आम्हाला हुरूप चढला. आणि मग चालू झाली स्वप्नवत अश्या किल्ल्याची चढाई.

मोबाईल मध्ये नकाशा ठेवलाच होता. तो बघत बघत पुढे निघालो. थोडे अंतर गेल्यावर पहिले प्रवेशद्वार लागले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली. या किल्ल्यावर गुरांच्या वाट बऱ्याचं असून त्या जास्त ठळक वाटतात त्यामुळे चुकायची शक्यता जास्त आहे. 


किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी नुसत्या प्रवेशद्वारावरून आणि तटबंदी वरून किल्ल्याच्या अभेद्यतेची प्रचीती येते.
पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेला ( रंगवलेला) दिसला. शेपूट डोक्यावरून गोल असा मारुती हा नाशिक मधल्याच किल्ल्यामध्ये दिसतो. असाच मारुती हातगड आणि तिकोना (पुणे) किल्ल्यावर  हि आहे.


रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली आणि आमची स्वारी जोषातच पुढे निघाली. अजून एक प्रवेशद्वार भेदून पुढे जर मोकळे पठार लागले. 
काही क्षणातच डोळ्याचे पारणे फिटेल असे गणेश मंदिर दृष्टीस पडले. खरेतर हे मंदिराचे फोटो बघूनच मुल्हेर चा ट्रेक फिक्स केला होता. 

गर्द अश्या झाडीतून पुढे आल्यावर पाण्यात पडलेले गणेश मंदिराचे प्रतिबिंब मनाला समाधान देऊन गेले. कुठे येऊन काय बघायला मिळेल आणि कशाने आपले मन आणि डोळे सुखावून जातील सांगणे अवघड आहे. मस्त असे वातावरण, छान हवा, योग्य प्रकाश … काय … अजून काय वर्णन करू शकणार होतो आम्ही.
पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. बराच वेळ हाताशी होता. आता निसर्ग आणि आम्ही यामध्ये दुसरा कोणताही अडथळा नव्हता.



गणेश मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब 

थोडा वेळ फोटो काढण्यात घालवून आम्ही रस्ता सोडून या मंदिराकडे निघालो. मंदिराच्या आत मध्ये अत्यंत सुरेख असे कोरीवकाम आणि रचना केली होती. मंदिराच्या दर्शनी भागात चक्र कोरलेले होते. ते अजूनही तेवढेच स्पष्ट आहे की त्याच्या प्रत्येक आर्र्या दिसू शकतात.


काही भाग ढासळून पाण्यात पडलेला आहे. समोरील तलावातील पाणीही प्रतिबिंब दिसेल एवढे स्वच्छ आहे.


 मोठे मोठे दगड एकमेकांमध्ये गुंफून या मंदिराची रचना केलेली वाटली. पूर्ण मंदिराच्या बाहेरील बाजूने कोरीवकाम केले होते. १४०० साली जेव्हा गाव किल्ल्यामध्येच वसलेले होते तेव्हा हे गावातील मंदिर होते.


 गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत मंदिराचे स्थापत्यकला बघायला लागलो. पूर्ण मंदिरात आवाज घुमत होता. जरासे ऊन आल्याने फोटो साठी उपयुक्त रंगसंगती जुळून आली.


हे मंदिराचे छत घुमटाकार आकाराचे होते. एकावर एक रचलेल्या दगडांनी ते जास्तच आकर्षक दिसत होते.
पूर्वीच्या काळी युद्धात मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंदिरे नष्ट केली जात असत. हा घुमट हा अश्या  पद्धतीने बांधला आहे की घुमटा मधील मधला दगड काढला की  आपोआप घुमट पडून जाईल.


आता मन आणि डोळे भरून मंदिराचे सौंदर्य पाहून परत बाहेर आलो. मंदिराच्या मागे हरगडा ने दर्शन दिले.


येथून आता किल्ला दृष्टिपथात आला होता. तरीही किल्ला एवढा अजस्त्र आहे की एकाच फोटोत पूर्ण येणे अवघड आहे.


तेथून लगेच उजवीकडचा रस्ता पकडून निघालो ते १४०० सालचे पाताळातील सोमेश्वर मंदिर बघायला. 
१४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो.


मंदिरामध्ये प्रवेश करताच मोठ्या कमानी च्या अगदी मधोमध असलेला पुरुषभर उंचीचा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. पूर्णतः दगडात कोरलेला हा नंदी असून त्याच्या पुढेच दगडात कोरलेले कासव दिसते. आज पर्यंत कोणत्याही मंदिरात मी नंदी आणि कासव एकत्र पाहिलेले आठवत नाही.
हे कासव जरा वेगळे होते.


मंदिराच्या बाहेरच पादुकांचे दर्शन झाले.  लाकडी पादुका होत्या. अश्या लाकडी पादुका घालून अश्या दुर्गम भागात कोण महाभाग आला असावा याने आमची उत्सुकता वाढली.


मंदिरातून सहज वर बघितले तर  डेस्टिनेशन आम्हाला खुणावत होते. अजून एवढे चढायचे आहे या विचाराने आताचं जीव मेटाकुटीला आला.


सोमेश्वर मंदिर हे पूर्णतः भुयारात आहे. याला पाताळी मंदिर पण म्हणतात. नंदीपासून सरळ जाऊन आम्ही साहजिकच हात जोडले तर पुढे देवच नाही. नुसती भिंत उभी. डावीकडे पहिले तर छोट्या पायऱ्या खाली भुयारात जात होत्या.


आता मोबाईल चे दिवे पेटवले आणि अंधारात चाचपडत जात राहिलो. मंदिराचा गाभा पाताळात असल्याचे ऐकले होते पण प्रथमच पाहत होतो. त्या काळी होणाऱ्या युद्धांमध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असे. म्हणून हि रचना होती असे कळले.
खालून वर बघितले तर वरच्या खिडकीतून नंदी दिसत होता. काय मस्त रचना केली होती बांधणाऱ्या कलाकाराने. 


आत हे पुजारी काका पिंडेची पूजा करण्यात मग्न होते. त्यांचा जप मंदिरामध्ये घुमत होता. आम्ही इतके सुदैवी होतो की, रोज सकाळी सात ला होणारी पूजा आज पुजारीकाका बदलून आल्याने साडे नऊ ला होत होती. आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि पूजा चालू झाली.
म्हटले हि देवाचीच इच्छा असावी.
त्यानंतर पुजारी काकांनी शंख हातात घेतला आणि ३ वेळा तो असाकाही वाजवला की, रामानंद सागर च्या सीरियल मध्ये देव आला की जसे सप्त वाद्यांचे संगीत चालू होते तसे वाटले.
हात आपोआप जोडले गेले.
पहिल्यांदा वाजवलेला शंख गाभाऱ्यात घुमू लागला तोच दुसरा त्यापेक्षा तीव्र असा ध्वनी त्याला भेदून जात होता. जे काही पाहिलं आणि ऐकले ते केवळ अद्भुत होते.


पूजा झाल्यावर बाहेर येऊन फोटोग्राफी चालू केली. मंदिराबाहेरच मोठी पिंड आणि शेंदूर लावलेली गणपती मूर्ती दृष्टीस पडले.


सोमेश्वर मंदिराच्या आजूबाजूला साफ सफाई चे काम चालू होते. मालेगाव चा एक ग्रुप ते डागडुजीचे काम करत होता. ते मंदिरामध्येच मुक्कामी होते. ( त्यामुळेच मंदिर अफाट गचाळ झाले होते. सगळी कडे अंथरूण, कपडे, खाण्याचे पदार्थ).
बराच वेळ घालवल्यानंतर घड्याळाकडे लक्ष गेले. पाहतो तर काय दहा वाजत आले होते आणि अजून आम्ही पायथ्याशीच होतो. आता आमची पळापळ चालू झाली. किल्ला चढायला ४-५ तास लागतील या हिशोबाने चढाई चालू झाली. 
सोमेश्वर सोडून उजवी वाट ठरली आणि मोती टाक्यांपाशी पोहोचलो. मोती टाक्यांवरून वरती उजवीकडे जायचे असे माहीत होते. पण येथून पुढे रस्ताच सापडेनासा झाला.

 

प्रत्येक ट्रेक ला जाताना आधी एकदा वाट चुकून अतिरिक्त पायपीट झालीच पाहिजे असे बहुतेक आमच्या कुंडलीत लिहूनच ठेवले असावे. 
येथून पुढे रस्ताच सापडला नाही. येथून अनेक वाट फुटत होत्या. त्या गुरांच्या वाटा होत्या हे त्या वाटेने जाऊन ती वाट मध्येच संपली की आम्हाला उमगायचे. बराच वेळ तेथेच घुटमळत राहिलो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळ असलेला मारुती (खालच्या फोटोत )आम्हाला दिसत होता. पण तेथपर्यंत जायचा रस्ता काही केल्या सापडत नव्हता. 
आता वाट फुटेल तिकडे आम्ही जात होतो. कॅमेरे ठेवून दिले आणि झाडे तोडत, घसरत  आम्ही जागा मिळेल  तेथे मुसंडी मारत होतो. आता किल्ल्यावरील झाडांची विविधता आमच्या लक्षात आलीच होती. त्या विविध प्रकारच्या झाडांना आपण भेटूनच आलोय असे शरीराचे हाल व्हायला लागले. काटेरी झाडांनी हात पायाचे चुंबन घेऊन रक्तवर्णीय नक्षी काढलीच होती. खाजरी झाडे त्या रक्तातूनच "खाज" करीत होती. काट्या कुट्यातून जाऊन दोन्ही हात, दंड ओरखडे उठून रक्ताने लाल झाले होते. चेहऱ्यावर टर्मिनेटर मधल्या अर्नोल्डसारख्या कापल्याच्या खरचटल्याच्या खुणा. :) 
शेवटी पाण्याचा मार्ग पकडला आणि बरेच वर चढून गेलो. पण तेथूनही मार्ग सापडेना म्हणून परत फिरलो. उतरताना मात्र घसरतच उतरावे लागले.  इतकी वाईट हालत झाली की चालताही येईना आणि सांगताही येईना :)
जाताना वाटेत आम्ही अजून दोन टाकी आणि एका गुहेचा शोध लावला असावा, कारण या टाक्यांबद्दल कुठेच वाचलेले नव्हते . तसेच  उल्लेख हि नव्हता. बळेच २ तास हिंडून आम्ही माहीत नसलेल्या वास्तू हि पाहून घेतल्या.  वाट चुकल्याचा निदान एवढा तरी उपयोग झाला :)


आता १२ वाजून गेले होते आणि आम्ही अजून पायथ्याशीच होतो. आता पेशन्स संपला होता. आता कधी किल्ला चढणार आणि उतरणार असे वाटू लागले होते. तरी बरे की मुल्हेर ची चढण हि साल्हेर, सालोटा प्रमाणे पश्चिमेकडूनच असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. 
सरळ परत उतरून सोमेश्वर मंदिर गाठले. तेथील पुजारीकाकाना विचारले पण त्यांना कमी ऐकू येत असल्याने आम्ही काय म्हणतोय हेच त्यांना कळत नव्हते.  शेवटी ते पण आमच्याबरोबर निघाले. मोती टाक्यांपर्यंत येऊन त्यांनी पुढे आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही वर जोपर्यंत ते तेथेच थांबले होते. 
 आता साडे बारा झाले होते. आता आम्ही पळतच सुटलो होतो. कॅमेरे ठेवूनच दिले होते. पोटात आग पडली होती, तरी वर पोहोचल्यावरच जेवायचे असा निर्धार करून पळू लागलो.
काही वेळातच मुख दरवाजा दिसला आणि जर हायसे वाटले.  सात दरवाजे तेही ओळीने, एका-आड-एक पाहून सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्त्वाचा असावा हे लक्षात आले.



यापुढे आम्ही जे काही पहिले ते शब्दात सांगणेच शक्य नाही. भक्कम तटबंदी, पाच दरवाजे ओळीने, कोरलेल्या गुहा, स्थापत्याशिल्पे, गर्द सावली, शांत वातावरण. 

दुसरे प्रवेशद्वार  :
तिसरे प्रवेशद्वार :
कोरलेल्या गुहा :
चौथे प्रवेशद्वार :

खालून दिसणारा कातळात कोरलेला मारुती आता जवळ आला होता. त्याची उंची पुरुषभर म्हणजे ५ ते ६ फूट होती.


अभेद्य अशी प्रवेशद्वारे ओलांडून आल्यावर भक्कम अशी तटबंदी चालू झाली.

आजूबाजूचे उंच डोंगर आता बुटके वाटू लागले.  जवळपास तीन हजार फूट एवढ्या उंचीवर आम्ही येऊन पोहोचलो होतो. 


पाचवे प्रवेशद्वार :

पाचवे प्रवेशद्वार :( आतून )

सहावे प्रवेशद्वार :

सातवे प्रवेशद्वार :


 दहाव्या शतकातल्या पूर्वजांचा इतिहास पाहायला गेलो होतो आणि येथे त्याहीपेक्षा पूर्वीचे असे पूर्वज आमच्या स्वागतास तयारच होते. प्रत्येकांनी निराळी पोझ दिली आणि कामगिरी फत्ते म्हणून धूम ठोकली. 



हे शेवटचे प्रवेशद्वार ओलांडून एकदाचे आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. विस्तीर्ण असे पठार लागले. आव्हान दोन वाजत आले होते. आता बऱ्यापैकी वेळ हातात होता. संपूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. मनसोक्त हिंडत होतो. थोडे चालत जाऊन सगळ्या दिशांचे नजारे डोळ्यात साठवून घेतले.


किल्ल्यावर ओळीने नऊ अशी पाण्याचे टाकी होती. भर उन्हाळ्यातही त्यातले  आटले नव्हते.


येथे पाण्याची टंचाई कधीच जाणवत नसावी. हे नऊ टाकी सोडून अजून तीन मोठे तलाव दिसले. त्यातले पाणी आटून गेले होते.


आता काय पाहू आणि किती पाहू असे झाले होते. एवढ्या उंचावरून आजूबाजूचे दृश्य भान हरपून टाकणारे होते. बऱ्याचं वेळ फोटो काढून शेवटी सरळ कॅमेरा ठेवून दिला आणि शांतपणे निसर्ग अनुभवत बसलो.


दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नव्हत्या. अश्या ठिकाणी कॅमेरा बापडा काय टिकाव धरणार ?




विस्तीर्ण अश्या पठारावर पुढे चालत सुटलो. येथे राजवाड्याचे भग्न अवशेष दिसले.


आता जोरदार वरही सुटला होता. आजूबाजूचे वाळलेले गावात वाऱ्यामुळे झु ssss झु ssss असा आवाज करत होते. गवताच्या मुळाशी घरटे असलेले पक्षी आमची चाहूल लागताच रॉकेट सारखे आकाशात झेप घेत होते.
येथून जाताना मात्र भीती वाटत होती, की गवतात साप वैगरे असला तर शेवटच ट्रेक ठरायला नको :)


आता कडाडून भूक लागली होती. सुदैवाने  मोठे डेरेदार झाड दिसले. त्याच्या खाली भडंग नाथाचे मंदिर होते. दर्शन घेऊन आम्ही जरा झोप काढली आणि जेवायला बसलो.



ट्रेक स्पेशल व पेटंट अशी बटाटा भाजी पोळी. आज जेवणात गोड काही नसल्याने भूक असूनही जेवण जात नव्हते .कसेबसे चार घास पोटात ढकलले.


आता जेवण झाल्यामुळे एनर्जी आली होती. जवळपास अर्धा किल्ला पाहून झाला होता. छोटीशी झोप काढली त्याच झाडाखाली आणि मग परत मोरा गडाकडे कूच केले. लांबून तो अजून एक डोंगर दिसत होता. म्हटले की अजून एक डोंगर …. अरे काय… बस आता…
असे म्हणता म्हणता समोर पहिले तर लांबूनच दगडात खोदलेले प्रवेशद्वार दिसले. खरेच, कुठे जाऊन काय बघायला मिळेल याची शाश्वती नाही. "अरे वाह sss" आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडले. पावलांचा वेग आपोआप वाढला. कॅमेरे सरसावून तयार झाले.


गर्द अश्या गवतातून शॉर्ट कट वाटला म्हणून घसरतच निघालो. ते एकदम मुल्हेर किल्ल्याच्या (नशिबाने) शेवटीच येऊन थांबलो. आता जवळून तो उभ्या कातळात खोदून केलेल्या पायऱ्या आणि प्रवेशद्वार भन्नाट दिसत होते. त्या काळाच्या लोकांची काय मानसिकता असावी नाही?? आपल्या राजासाठी हे काम करायचे आहे, ते उत्कृष्टच झाले पाहिजे असे ठरवून ते काम करीत असावेत.


मोरा गडाचा प्रवेशद्वार दिसले पण मुल्हेर वर तेथे जाण्यासाठी रस्ता शोधाशोध झाली. एक  जिना सदृश कातळ घसरून गेल्यावर मुल्हेर किल्ल्याच्या शेवटच्या दरवाज्याशी आम्ही पोहोचलो. दरवाज्यातच दरड ( land slide) कोसळली असल्याने खाली फोटोत दिसतोय तेवढीच जागा बाकी होती. आता एकंदर माझा आकार बघून येथून मागे फिरावे लागते की काय अशी शंका भूषण ला आली, पण मी मात्र शिफातीने तेथून निसटलो.


हाच वरचा दरवाजा बाहेर आल्यानंतर आपोआप मोठा दिसत होता. ते गणित काय मला उलगडले नाही.


आता मोरा आणखीनच डेंजर दिसायला लागला. कातळात खोदलेल्या पायऱ्या सुरवातीला फारच अरुंद आणि छोट्या होत्या. पहिल्या दोन पायऱ्या चढणे अवघड होते. शेवटी कॅमेरे एकमेकांकडे देऊन आम्ही वरती गेलो.


आता मोरा गडाचा पहिला दरवाजा भक्कमपणे आमच्यासमोर उभा होता. पूर्णतः एकाच कातळात कोरलेला हा दरवाजा बुरुजांनी अधिक अभेद्य बनला होता.


प्रवेश्वदाराशीच कोरलेला गणपती हा खाली सोमेश्वर मंदिरामधल्या गणपतीसारखा हुबेहूब होता. फरक ओळखा सांगितले असते तर त्याचा शेंदरी रंग यापलीकडे काहीच फरक नव्हता.


पहिले प्रवेशद्वार ओलांडून पुढे चालू लागलो. जसे जसे वर जाऊ तसा रस्ता निमुळता होत चालला होता. खालच्या फोटोवरूनच कल्पना येईल. हा एक मस्त स्पॉट होता. भर उन्हातही थंड वारा वाहत होता. आजूबाजूला मोठमोठ्या डोंगररांगा पसरलेल्या आणि आम्ही दोघे फक्त. काय मजा !


येथे एक माणूस जाऊ शकेल एवढीच पायवाट होती.


येथेही एक गुहा दिसली. आतून ती जास्त प्रशस्त होती. आत जाऊन उजवीकडे अजून एक खोली होती.


मोरागडावरून मागे आकाशाची निळाई पांघरून बसलेला हरगड तुफान दिसत होता.


आता पोहोचलो मोरा गडाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या प्रवेशद्वाराशी. आव्हान साडे चार वाजले होते, किल्ला बघून साडे पाच पर्यंत आम्ही परत येथे पोहोचलो. मग येताना बराच वेळ येथे बसून होतो. कुठून, कसे, काय ठाऊक, पिक्चर चा विषय निघाला. मग "Vantage Point" ची स्टोरी सांगणे झाले. नंतर जेव्हा भूषण ने तो मूव्ही बघितला तेव्हा त्याला हि याच दरवाज्याची आठवण झाली.


या दरवाज्यातूनच खाली पायथ्याचे सोमेश्वर मंदिर दिसत होते (फोटोत चौकोन केलेला भाग)


याच दरवाज्याचा आधी पायथ्यापासून सोमेश्वर मंदिरामधून काढलेला फोटो.  ओह ६ तासात आम्ही कुठल्या कुठे पोहोचलो होतो.


आता पुढे निघायची तयारी चालू झाली. मागे दिसणारा मुल्हेर आणि हरगड किल्ला.


मोरा गडावर या झेंड्या खेरीज पायाचे टाके आहे. बाकी काही खास बघण्यासारखे (म्हणजे आवर्जून बघण्यासारखे) वेगळे काही नाही.

पाण्याचे टाके :


किल्ल्यावर प्रचंड गवत/झाडी होती. आणि रुळलेल्या वाटाही दिसेनात. म्हणून मग अंदाजे कोठेही चालू लागलो. काही ठिकाणी छातीपर्यंत झाडी होती. त्यातही जाऊन फोटो काढून झाले.


आता पुढे जे काही दिसत होते, ते डोळ्याचे पारणे फेडणारे होते. फक्त डोळ्यात साठवून ठेवण्या पलीकडे आम्ही काहीही करू शकत नव्हतो.खरेच,  निसर्ग सुखाची अनुभूती हे ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.




आता तब्बल ९ तासांपेक्षा जास्त वेळ चढाई करून पाय अक्षरशः हातात आले होते. झाडी झुडपातून चालत असल्याने अंदाज घेण्यासाठी जी काठी हातात घेतली होती. ती काठीच आमचा आधार बनली.



आता परतीची वाट चालू झाली.मुल्हेर आणी मोरागड यांना जोडणाऱ्या "V" शेप खिंडी मधून दुसऱ्या वाटेने आम्ही उतरायला लागलो. एका बुरुजाच्या मागून जाण्यास एवढीच जागा होती.


मुल्हेर आणि मोरा यांना खिंडीत जोडणारी तटबंदी. खिंडीत तटबंदी यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही. जवळ जवळ दहा फूट उंचीची तटबंदी अत्यंत भक्कम आणि अभेद्य वाटत होती. इतक्या वर्षात अजून याचा एकाही दगडही हाललेला नाही.


दुसरी वाट माहीत नसल्याने खाली सोमेश्वर मंदिर लोकेट केले आणि त्यानुसार खाली उतरत राहिलो. उतरणीचा हा मार्ग तसा छोटा होता.


आता येथून संपूर्ण मुल्हेर किल्ला दृष्टिपथात आला होता.
दहा तासात आपण कोठून कोठेपर्यंत कसे गेलो याचा अंदाज घेतला. येथून किल्ला जास्तच रौद्र आणि अजस्त्र वाटत होता.
सुरवातीची पांढरी रेघ जेथे काटकोनात वळली तेथे सोमेश्वर मंदिर होते.



येथून उतरून परत सोमेश्वर मंदिरात गेलो. तेथील पुजारीकाकाना योग्य मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद देऊन पुढे देवीच्या मंदिराकडे निघालो. तेथून अजून एक अज्ञात रस्ता पकडून अंदाजे निघालो तर डायरेक्ट गणेश मंदिरात पोहोचलो.
मुल्हेर माचीवरून उतरून परत सर्व प्रवेशद्वारांना निरोप देऊन पायथ्याशी आलो.

आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती. सकाळी आमच्याबरोबर शेतापर्यंत आलेली मंडळी घरी जायच्या लगबगीत होती. तर काही येथे राहणारी मंडळी गावातून काम करून परत घरी निघाली होती. कामावरून घरी जाताना कडेवर मुले बाळे, हातात डबा, रोजंदारीची हत्यारे आणि चेहऱ्यावर सुखी हास्य. मला माझे हापिस सुटल्यानंतरचे माझे आविर्भाव आठवले. खरेच निसर्गाच्या कुशीत राहून ही माणसे किती सुखी होती.

काही गोळ्या, चॉकलेटे शिल्लक होती, ती रस्त्यात खेळणाऱ्या मुलांना दिली तर बराच डबा उरला होता, तो वाया जायला नको म्हणून तेथील गरिबांना दिला. 

भव्य, दिव्य, अभेद्य, अशक्य, तुफान, फाडू अश्या सगळ्या विशेषणांचा अनुभव आम्हाला या एकाच ट्रेक  मध्ये आला होता. तरीही मुल्हेर-मोरा बरोबर अजून एक दिवस असता तर हरगडही झाला असता असे राहून राहून वाटत होते. हरगडावर काही टन वजनाच्या ३ तोफा आहेत असे ऐकले होते. त्या बघायचा आज काही योग नव्हता. एका वेळी वाटले की मांगी-तुंगी रद्द करून उद्या हरगडालाच जाऊया, पण प्लान आधीच ठरला होता तसेच आता अंगातही त्राण उरले नव्हते.

आता आम्ही परत गावात शिरलो आणि थेट बाजारातच गेलो उद्याच्या मांगी-तुंगी ट्रेकची तयारी करण्यासाठी. उद्याची मांगी-तुंगीला जायची सोय बघून जर गावात टंगळ- मंगळ करीत निवांत वेळ  काढला. आज संध्याकाळी परत समाधीला न जाता गावातील ओळखीच्या माणसाकडे त्याच्या आग्रहास्तव जेवायला गेलो. "गोड काजू शिरा" अजूनही जिभेवर रेंगाळतोय.

आयुष्यात एकदा तरी ह्या किल्ल्यावर जाऊन यावे असे माझे मत आहे.याआधी जर मला कोणी "तुझा सर्वोत्तम ट्रेक कुठला?" असे विचारले असते तर 'हरिश्चंद्रगड' हेच उत्तर दिले असते. आता मात्र माझे मत बदलले होते.
निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत हे जाणवतानाच आपले पूर्वज माणसे कोणत्याही प्रकारचे तंत्र अस्तित्वात नसतानाही कित्येक मैल आपल्या पुढे होती असे  जाणवत राहते.

आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस  झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला  होता बहुतेक. :) . घरचीही ओढ लागली होती. 
पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते. 
( ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. त्याबद्दल पुढच्या भागात -
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४  - मांगी-तुंगी आणि परतीचा प्रवास )

सागर

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

वसईच्या घंटेचा शोध

 वसईचा किल्ला (Vasai Fort)

आजकाल जरा वेगळेच वेड  लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.
छोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला. ( का ते विचारू नका, उगाच हौस ) पण ते जास्तच लांब आणि सुट्टीची बोंब, म्हणून मग भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला.
ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला. तसेही आम्हाला निमित्तच हवे असते.
चिमाजी आप्पा यांचा शोध पहिला घ्यायला हवा  … अख्खं जग फेसबुकवर आहे म्हणून त्यांना शोधण्यासाठी तडक फेसबुकवर गेलो. निराश न होता म्हटले जाऊ स्वतःच आणि छडा लावू याचा.
तसे कशाचा कशाशीही संबंध नसतो, पण ठरवले तर सुतावरून स्वर्ग गाठता येतो . 

सकाळची सिंहगड पकडून गेलो कल्याणला, यावेळी भूषण काही आला नव्हता, म्हणून मग फोनाफोनी करून त्याला बोलावले. मुंबईत गेले की माझ्यासारख्या माणसाचे अवघड होऊन जाते. स्वतःला तर काही माहीत नाही आणि दुसऱ्यांना विचारायचे तर काय विचारायचे ते हि माहीत नाही.
मग भूषणचा फोन आला,
"कुठे आहेस ? मग या प्रश्नाला मी प्लाटफोर्म वर आहे असे उत्तर दिले. "
"प्लाटफोर्म वर कुठे?"
"अरे जिथे वडापाव वाला माणूस उभा आहे तिथे."
असे बरेच निरर्थक प्रश्न उत्तरे झाली मग तो म्हणाला आहेस तिथेच थांब, मी शोधतो तुला.

मग थोड्या वेळाने भेट झाल्यानंतर आम्ही लगेच लोकल पकडून 'कोपर' ला जाण्यासाठी निघालो. भूषण ने सगळी माहिती काढलीच होती, आणि लोकल कुठून कशी जाणार हे हि त्याला माहीत होते.
साडे नऊ वाजेपर्यंत कोपर स्थानकावर पोहोचलो. तिथले रेल्वे स्थानक जरा वेगळेच आहे. एका स्थानकावरून, वसई कडे जाणाऱ्या गाडीच्या फलाटावर आम्ही येऊन थांबलो.
सव्वा दहा वाजता ट्रेन होती, जशी वेळ जवळ आली तशी गर्दीही वाढू लागली होती.
आता हि ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो वसई रोड ला. तिथून मग महानगर पालिकेची बस पकडून निघालो वसई किल्ल्याला. बस मध्ये तरुण मंडळी जास्त होती. वाटले की तरुण पिढीला किल्ल्याविषयी वा इतिहासाविषयी अजूनही आस्था आहे. हे वाक्य भूषण ला सांगितले तर तो म्हणाला की,

"तसे नाहीये, "या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. नंतर मात्र मला ऐकवू नकोस की, कुठेही नेतोस मला तू म्हणून. "

ऐतिहासिक संदर्भ :
स.न. 1414 मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला. 1530 मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे 1534 मध्ये तो पोर्तुगीजाकडे आला. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला.12 डिसेंबर 1780 रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. ( नंतर परत आपल्या ताब्यात आला आणि ३०० वर्ष भक्कम अश्या किल्ल्याची दुर्लक्ष केल्यामुळे वाट लागली. )  

भौगोलिक संदर्भ :
 ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला,जलदुर्गभुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो.
किल्ला प्रचंड मोठा असून दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत.  एका बाजूस समुद्र व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत. 
किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. पोर्तुगीज काळात नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. (विकिपीडिया द्वारे)
वसई किल्ल्याचा पोर्तुगीजकालीन नकाशा: 
सौजन्य : विकिपीडिया 

येण्याजाण्याच्या वाटा:
पुण्याकडून जाताना कल्याण ला उतरून, पुढे कोपर पर्यंत दुसरी लोकल पकडून, अजून त्यापुढे कोपर पासून वासी रोड ला जाणारी ट्रेन पकडून नवघर स्थानकावर उतरावे. तिथून वसई किल्ल्याला जाणाऱ्या बऱ्याच बस मिळतात. त्या बस किल्ल्याच्या आत जाऊन सोडतात.

आमचा ट्रेक अनुभव :
 बस मध्ये एक आजोबा म्हणाले की "हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे". मग म्हटले जाऊयाच संस्कृती च्या मागे ( म्हणजे समाज संस्कृती च्या मागे). घंटेचे ही कारण होतेच जोडीला.
थेट बस असल्याने आम्ही किल्ल्याच्या समुद्राकडील प्रवेशद्वारापाशीच पोहोचलो. तेथे चौकशी करून सरळ किल्ल्याच्या वाटेने न जाता प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याच्या वाटेला लागलो. तिकडची एकंदर गचाळ स्थिती पाहून परत फिरलो.

आता किल्ल्याची एक बाजू पकडून नुसतेच चालत सुटलो. तेथे एक कामगार भेटला. तो नाशकातील बागलाण तालुक्यातील होता. "आम्ही नुकतेच साल्हेर,सालोटा, मुल्हेर करून आलो बागलाण मधले" हे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यातला आमचा आदर वाढला. त्याने लगेच "मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे" असे वाक्य टाकल्यावर मग आम्ही आमच्या बाता मारणे बंद केले. आम्हाला कळले की हा पण "कसलेला खिलाडी" आहे. तो २२ वर्षे बागलाण मध्ये वनविभागात कामाला होता. आणि त्याने महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व किल्ले आणि प्रदेश अक्षरशः पिंजून काढले होते.
त्याच्याकडून माहिती काढून पुढे गेलो. तटबंदी वर चढून त्या वाटेने हिंडायला लागलो. पहिलेच समुद्राचे आणि बंदराचे दर्शन घडले.


किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आणि पोफळीची, नारळाची झाडे दूरवर पसरली होती.  हा हिरवळ दिसणारा परिसर दलदलीने वेढलेला आहे . 

 
बिचारी एकाच बोट भर उन्हात काय करत होती देव जाणे, पण मस्त फोटो आला. 

 
भक्कम अश्या तटबंदी मधून तोफा मारण्याची सोय कशी असेल हे बघण्यासाठी आम्ही अजून आत आत जात राहिलो. 
कोपऱ्या-कोपऱ्यात लपून अनेक प्रेमवीर आपल्या "प्रेमलीला" करण्यात मग्न होते. सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना उरले नसावे. पोर्तुगीजांनी छोटे छोटे खंदक बांधून या प्रेमवीरांची चांगली सोय केली होती. 
या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल.  ह्या भूषण च्या वाक्याचा मला अर्थ कळला. 
मगाशी 'हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे" असे म्हणणाऱ्या आजोबा बऱ्याचं वर्षात येथे फिरकले नसावे . 

 
मस्त कैऱ्यांनी फुललेले भलेमोठे झाड बघून तेथेच जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर थोड्या कैऱ्या पडून घेतल्या. 


थोडे खाली उतरून मग आम्ही किल्ल्याचे अवशेष बघायला आलो. 
 

 जेवण करून आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचलो. भक्कम दगडी बुरुजांमध्ये लपवल्यासारखे बांधलेले ते अजस्त्र प्रवेशद्वार बघून त्या काळच्या राजांच्या कल्पकतेची प्रचीती आली. 


 जमिनीवरचा दरवाजा

 परत मागे फिरून वाट फुटेल तिकडे आम्ही हिंडत बसलो. कुठेही खोपदडात आम्ही जात होतो. आमच्या हातातील कॅमेरे बघून प्रेमवीरांची मात्र तपश्चर्या भंग पावत होती.  आम्ही मात्र संपूर्ण किल्ला पालथा घालायचाच अश्या निश्चयाने हिंडत होतो. 
 थोडं पुढे जाऊन नारळीची, सुपारीची असंख्य झाडे, कोंकणाची चाहूल देत होती.


जवळ जवळ पूर्ण किल्ला २ तासात पाहून होईल म्हणून आम्ही संध्याकाळी बोरिवली च्या राष्ट्रीय उद्यानात जायचे ठरवले होते. पण किल्ला इतका मोठा होता की संध्याकाळचे ५ वाजून गेले. 
तटबंदी वरून असेल फिरत एका पडक्या भागाशी आलो. बघतो तर काय, हे काका चक्क झाडावर चढून मस्तपैकी उभे राहून ताडी काढण्यासाठी मडके लावत होते. 

बाकी जीवनाची लढाई कोणाला चुकली नाहीये हेच खरे. 


तेवढ्यात, भूषण ने चतुर मोठ्या चतुरीने टिपून घेतला. 


आता बरेच अंतर फिरून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाशी आलो. तेथे भली मोठी वास्तू खरोखरच अचंबित करणारी होती. बरीच पडझड झाली असली तरी त्याचा साचा आणि आर्किटेक्चर बरेच शिल्लक आहे. 
येथे पूर्वी ख्रिस्त लोकांची दफनभूमी असावी असे वाटत होते. पूर्ण जागेत चौकोन करून त्यावर इंग्लिश सारख्या भाषेत काहीतरी लिहिले होते.  St. Anthony's यांचे चर्च म्हणून हे ओळखतात. 
येथे पुढील बाजूने पाहिल्यास फक्त एक सूर्यकिरण तटबंदीतून बाहेर पडलेला दिसतो . याला रे ऑफ होप ( Ray of Hope) म्हणतात. 


जरा विश्रांती घेऊन मग आम्ही परत हौसेने फोटोग्राफी चालू केली. फोटो काढण्यासाठी उपयुक्त असा प्रकाश पडल्याने प्रकाशाची रंगसंगती जुळून आली.


उगाच हौस करून एका भुयारातून जाऊन बघितले. नशिबाने हा रस्ता वरती जात होता, ( वरती म्हणजे वरच्या मजल्यावर, "वर" नाही हा :) )


वर जाऊन बघितले तर मागच्या चर्च ची वास्तू दिसत होती. 


मध्येच नारळाचे झाड दिसले.


तेव्हाच्या काळी या किल्ल्यामध्येच संपूर्ण नगर वसवले असावे. असे वाटत होते.
त्याकाळी किल्ल्यात ३ चर्च, दवाखाना. न्यायालय तसेच राजवाडा सदृश्य वस्तू होत्या. त्याकाळची स्थापत्य कला किती अवगत होती याची प्रचीती येते. 
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातला जो ऐतिहासिक वसई चा तह झाला तो येथे प्रमाणित झाला असे आंतरजालावरील माहितीवरून कळते. 




पूर्ण किल्ल्याभर अशीच स्थापत्य रचना दिसत होती. सगळीकडे दारे आणि त्यावर दारे असेच दिसले.


सगळ्यात शेवटी आम्ही येथे येऊन पोहोचलो. येथे चर्च होते असा उल्लेख आढळतो. बाकीच्या अवशेषांपैकी हेच जर बऱ्या स्थितीत होते.
दर्शनी भागातील कोरीवकाम खरंच लक्षणीय होते. इतके बारकावे आणि सुंदर नक्षीकाम करायला किती वेळ लागला असावा या विचारातच आम्ही पुढे निघालो. याच द्वारावर वरती सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमाही कोरलेल्या होत्या. एकंदर रचना हि पोर्तुगीज रचनेसारखी भासत होती. पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करून येथे ३ चर्च बांधली होती. हे त्यापैकीच एक होते.


या पायऱ्यांची घडण वेगळीच भासली. एकाच दगडात कोरून केलेल्या वाटत होत्या. किती अचूक मोजमाप त्या काळीही अवगत होते हा विचार करून आमचे डोके चक्रावले.


जवळपास संपूर्ण किल्ला पाहून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी पोहोचलो. आता परत दुसऱ्या बाजूला जायचे त्राण उरले नव्हते.लांबूनच तेथील तटबंदी चे फोटो काढून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी निघालो. 


चिमाजी आप्पांचा घोड्यावरचा ब्राँझ चा पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेत होता. 


चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.


काही काळ येथेच टेकून आता मात्र निघायची तयारी चालू झाली. आता या सगळ्या प्रकारात त्या घंटेचा विषय राहिला बाजूलाच. आमची मात्र मस्त चैन झाली.

किल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे राहण्यार्या काही लोकांना त्या घंटे विषयी विचारले पण कोणाला काहीच माहीत नव्हते. मग थोडा खटाटोप केल्यावर माहिती मिळाली.

 1534 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे जस्त आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.

बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.

आजही या तीन  घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून  ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास ( diameter ) हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल.  तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात असून याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
या तिन्ही घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो. 

भीमाशंकर मंदिरातील घंटा 

२२ ऑक्टोबर २००२  च्या times मध्ये या विषयी लेख आला होता.
http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/For-whom-the-bells-toll/articleshow/26593375.cms?

वसई किल्ल्याचे १७८०  मधले  रेखाटलेले चित्र. 

संदर्भ : ( ब्रिटिश लायब्ररी)
 http://www.webcitation.org/query?url=http://www.geocities.com/unitedit/vasai_hist.htm&date=2009-10-25+23:35:26 )


घंटे विषयी उत्सुकता असेल तर, 'स्थापत्यकलेचे अद्भुत आविष्कार' या ( अजून प्रकाशित न झालेल्या) लेखाचे ४ भाग येणार आहेत. त्याच्या शेवटच्या भागात लवकरच वाचायला मिळेल. 

सागर