सोमवार, ३ जून, २०१३

चाळीस मिनिटांचा किल्ला,सतरा तास प्रवास : अर्नाळा किल्ला

अर्नाळा किल्ला

हौसेला मोल नसते हेच खरे. या हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. आम्हीही मे महिनातल्या कडक उन्हामुळे संपावर गेलेल्या आमच्या ट्रेकर मंडळींना हौसेने या ट्रेक साठी निमंत्रण दिले. एकंदर ऊन आणि ठिकाण पाहता त्यांनी निमंत्रण आणि मी दोघांनाही धुडकावून लावले.
पण येथे आमची हौस उफाळून आली, आणि  भूषण चा पेटंट "जे येतील त्यांच्या बरोबर, नाही येतील त्यांच्या शिवाय, ट्रेकला जायचेच" असा डायलॉग मारून आम्ही निघालो.

जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणतात ना,अगदी तसेच झाले. चाळीस मिनिटाच्या किल्ल्यासाठी तब्बल सतरा तास प्रवास करून मी परत जेव्हा पुण्यात आलो, तेव्हाच ठरवले की, आता यापुढे जरी कदाचित पोर्तुगीजांची सत्ता आली, आणि त्यांनी हा किंवा विरारला दुसरा नवा किल्ला बांधून त्याच्यासाठी "महान(!!) ट्रेकर(!!)" म्हणून मला बोलावले, तरीही मी विरार ला परत पाऊल ठेवणार नाहीये. अगदी त्यांच्या देशाच्या ग्रीन कार्ड चे आमिष दाखवले तरीही नाही. नाही म्हणजे नाहीच :)

दोन महिन्यापूर्वी खांडस ते भीमाशंकर ट्रेक केल्यापासून पुढचे दोन महिने घरातून बाहेरच पडलेलो नव्हतो  भटकंतीसाठी. आता ऊन हि बेक्कार असल्याने जास्त दमवणूक करणारा ट्रेक नको म्हणून मग मोर्चा जलदुर्गांकडे वळवला. म्हणून मग एका दिवसात जाऊन येता येईल अश्या अर्नाळा किल्ला जायचे ठरवले.


ऐतिहासिक संदर्भ : 
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

भौगोलिक संदर्भ :
मुंबई च्या पश्चिम भागातील विरार या स्टेशन पासून जवळपास १० किमी वर अर्नाळा हे गाव आहे. त्याच्या पुढे अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे. वैतरणा नदी ह्या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या किल्ल्यावरून नजर ठेवता येत असे.


गूगल नकाशे वरून घेतलेल्या चित्रात चौकोनी किल्ला दिसत आहे. किल्ल्याच्या बाजूला सध्या बरीच वस्ती वाढली आहे.

किल्ल्याचा नकाशा :
आंतरजालावरून साभार 

बघण्याची ठिकाणे आणि सद्यस्थिती : 
 अर्नाळा गावापासून चालत १०  मिनिटे आपण समुद्र किनारी येतो. तेथून समोरच अर्नाळा बेटाचे  दर्शन होते. अर्नाळा किल्लाला दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी असून तटबंदीमध्ये असलेले ८ बुरूज किल्ल्याच्या अभेद्यतेची साक्ष देतात. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. तसेच हाजीअली आणि शहाअली यांची थडगीही आहेत.  किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. याशिवाय किल्ल्यात गोड्यापाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे.
पुण्यावरून जाऊन, सोळा सतरा तास प्रवास करून हा चाळीस मिनिटांचा किल्ला पाहण्यात वर्थ नाही असे मला वाटते 

आमचा ट्रेक अनुभव :
नेहमीप्रमाणे सकाळची सिंहगड पकडून कल्याण ला उतरलो. आजचा दिवस काही खास नव्हता बहुतेक. घरातून निघतानाच उशीर झाला, मग (गाडीच्या) जीवाच्या आकांताने धडपड ( घरघर) करीत शिवाजीनगरला पोहोचलो. तेथे पाऊल ठेवले तोच कानांना काही उच्च स्वरातील शब्द ऐकू आले. यानंतर तिकीट काढून कल्याण ला उतरेपर्यंत वेगवेगळी स्टार कास्ट असलेली बरीच भांडणरूपी चलचित्र मी पहिली. 
भूषण भेटला आणि निघालो कोपरला. तेथेही १ तास पुरतील एवढी माणसे तिकीट रांगेत आणि त्यात गाडी ४० मिनिटे लेट.
तेथून निघून उतरलो विरारला. रविवार असून हि एवढी लोक भर उन्हात कुठे भटकत आहेत हे काही उमजेना.कालच भूषण म्हणाला होता की विरार ला खूप गर्दी असते.स्टेशनमधून बाहेर जाऊन बस पकडली.
एव्हाना साडे बारा झाले होते आणि साडे बाराला शेवटची बोट असते असे ऐकले होते, म्हणून तेथून पळतच सुटलो. नशिबाने ती शेवटची बोट दिसली. ती पकडली आणि पुढच्या पंधरा मिनिटात किल्ल्यात पोहोचलो.

आता एक वाजलाच होता म्हणून किनारी उतरून लगेच कालिकामातेचे मंदिर गाठले. तेथे थोडी सावली होती आणि मस्त गार हवा होती. तेथेच जेवण करून घेतले आणि मग वामकुक्षी साठी टेकलो.
 तरतरीत झालो आणि फोटो चालू झाले. बसल्या जागेवरूनच हा पहिला फोटो काढला. पांढरा सिंह पाहून लहानपणीचे ( म्हणजे मी लहान असतानाचे) पेशवे पार्क आठवले. तेथेही पांढरा सिंह होता.( जगाच्या पाठीवर कुठेही जा, एकदातरी जुन्या पुण्याविषयी हळहळ व्यक्त झालीच पाहिजे. :) )


हेच ते कालिकामातेचे मंदिर. स्थानिक लोकांची या देवीवर खूप श्रद्धा आहे. अनेक वादळे व संकटे येतात, कधी बोटी बुडतात, पण हि देवी सगळी संकटे टाळते असे त्याचे विचार जाणवले.


येथे बोटीच्या प्रतिकृतीतच तुळस लावली होती.


 मंदिराच्या आवारातच किल्ल्यातील एक तोफ आणून सिमेंट मध्ये फिक्स केली आहे.

किल्ला म्हटले की तेथे हनुमानाची मूर्ती हि हवीच.


काही मुले तेथे उनाडक्या करीत होती, पण  दूरवर पसरलेली खाडी लक्ष वेधून घेत होती.


आता निघालो किल्ल्याच्या दिशेने.
तटबंदी ला लागून जाणाऱ्या रस्ताने पुढे निघालो. आणि दोन प्रचंड आणि भक्कम अश्या बुरुजांमध्ये कल्पकतेने लपविलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दृष्टीस पडले.


बाहेरूनच किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि समोर विस्तीर्ण खाडी दिसत होती.



थोडे जवळून बघितल्यास त्याच्या अभेद्यतेची जाणीव होते. असे मोठाले दगड येथे बेटावर कसे आणले असावेत?

या प्रवेशद्वारावरच हत्ती आणि सिंह यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.


बरोबर मध्यभागी हा शिलालेख कोरलेला होता. आंतरजालावर त्याचा असा अर्थ सापडला.
'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'
या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो.


या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आतून हा मस्त फोटो आला. येथून उजवीकडे अजून एक दरवाजा होता. येथील स्थापत्यकला वसई किल्ल्याशी बरीचशी मिळती जुळती होती.


आत आल्यावरही अनेक ठिकाणी कोरीवकाम आणि कारागिरी केलेली दिसली.

हे कोरीवकाम छतावर केलेले होते.
आता माझ्यासारखा कारागीर असता तर म्हणाला असता की "छतावर 'वर मान' करून कोण बघतंय ? आणि तसेही मान वर करून बघण्याचे असे किती प्रसंग सामान्याच्या आयुष्यात येतात ? काही नको छतावर कोरीवकाम"


याच दारातून आम्ही आत आलो होतो. तेथून डावीकडे वळून वरती तटबंदी वर चढलो.

येथे एक राजवाडा होता असे वाचनात आले. त्याचे भग्न अवशेष दिसत होते.

बघता बघता पहिल्या बुरुजावर आलो. येथे अनेक खंदक खोदलेले दिसत होते. बाहेरून एक दिसणारे खंदक आत बघितले असता तीन मध्ये विभागले होते. किती प्रमाणबद्ध आणि डिटेल काम केले होते बांधणाऱ्या कारागिराने.


येथून एका स्तूपासारखे  काहीतरी दिसले.


 तटबंदी वरून चालत सुटलो. सगळीकडे अख्खा किल्लाभर स्थानिकांनी मासळी सुकवण्यासाठी टाकली होती. त्यावर पाय देऊन जावे लागत होते. हेच घाणेरडे मासे लोक आवडीने खातात.  अरेरे ! मुळात स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसया सजीवाचा जीव घेणे हे मला पटत नाही. असो. पोटासाठी लोक काही(ही) करू शकतात.
 


आता दुसऱ्या बुरुजावर आलो. येथून किनारपट्टीचे नेत्रसुखद दृश्य पहिले.

  
येथून खाली अमृतेश्वर मंदिर आणि अष्टकोनी तलाव दिसले.


किल्ल्याबाहेरील शेती

 तिसरा बुरूज:

किल्ला चारही बाजूनं पाण्याने वेढला असल्याने सर्व बाजूंनी खाडीच दिसत होती.

येथून तटबंदी वरून खाली जाण्याचा मार्ग होता.

चौथा बुरूज :
 जरा वेळ निवांत टेकलो.

 किल्ला पाहून या बुरुजावरही जायचे होते.

दूरवर नारळ पोफळीची झाडे पसरली होती.



येथेही एक खंदक खोदलेला दिसला, भूषण तेथून आत गेला तर यातून चक्क खाली जाणारी भुयारी वाट होती. कॅमेराचा फ्ल्याश मारत तेथून खाली उतरलो.


या खंदकांमध्येही प्रकाशाची नैसर्गिक व्यवस्था केली होती.

तेथून उतरलो ते डायरेक्ट या दरवाज्यानेच बाहेर ( खाली ) आलो.


किल्ला आता पाहून झाला होता. दर्ग्यात काही गेलो नाही. थोडा वेळ झाडाखाली झोपलो आणि सरळ बाहेर निघालो.
थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. याची उंची ३६ फूट असून  जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. बुरजातून फुटलेले झाड पकडून हौशी माणसे जाऊ शकतात. त्याच्या पायथ्याशीही खंदक खोदलेले दिसले पण ते बुजलेले होते.

वसई किल्ल्यातून एका चर्च मधून निघणारा एक भुयारी मार्ग समुद्राखालून या बुरुजाशी येतो असे काही लोकांना त्याच्या पूर्वजांकडून कळले.



येथे एक गावकरी भेटला त्याच्याकडून काही माहिती मिळाली.
सध्या गावात तीन ग्रुप पडलेले असून एक धनिक, एक सरकारी आणि एक खालच्या जातीतील लोक. धनिक लोकांकडे पैसा असल्याने ते गावात राजकारणे करतात. आणि  त्यांच्या विरुद्ध गेले की त्याला गावातून हुसकावून लावतात.
आधी अंधार पडला की गाव शांत होत असे. आता लाइट आली आणि रात्रभर मुलांचे टीव्ही बघणे आणि गाणी लावणे चालू झाले. राम नाईक नावाच्या राजकारण्याने आश्वासन दिल्यावर येथे १ वर्षात येथे लाइट आणली, पण त्यालाही सध्या कोणी विचारत नाही म्हणे.
त्याच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ते जेव्हा येथे आले तेव्हा गोऱ्या लोकांची (पोर्तुगीजांची) सत्ता होती. गोरी लोक येथे रणगाडे घेऊन यायचे. ( तो रडगाणे घेऊन यायचे असे म्हणाला, आता पोर्तुगीज स्वतःचा देश सोडून इतके  मैल लांब नुसते रडायला का येतील हा प्रश्न मला पडला.पण नंतर कळले.)
आता या बेटावर रणगाडे इतक्या लांबून कसे आणले असतील आणि त्या काळातही ते किती प्रगत असावेत ह्या विचारात मी पडलो.
गावातील दैवत कालिकादेवी गावाला सगळ्या संकटातून वाचवते यावर त्याची श्रद्धा आहे.

आता निघायची वेळ झाली होती. परत बोटीपाशी येऊन थांबलो तर एक बोट आधीच निघून गेली होती. दुसरी  बोट आली आणि बूट न काढताच मी पाण्यातून चालत जाऊन बोटीत घुसलो.


किनारी दोन कावळे मस्त मासळी खाऊन पोट भरल्यामुळे गप्पा टाकत बसले होते.


कित्येक खेकडे आपला शेवटचा श्वास मोजत पडले होते.

हे बगळेबुवा मात्र मस्तपैकी बोटीच्या शिरोभागी बसून ऐटीत प्रवास करत होते. "उडण्याचा पक्ष्यांना पण कधीतरी कंटाळा येत असावा". लगेच पू.ल. आठवले.

काही कारण नसताना अश्या अनेक माशांची जीवनयात्रा संपली होती. याला मारून ( किंवा मरून) काय मिळाले असावे? न ह्याचा खायला उपयोग न कशाला. याचे जीवन माहीत नाही, पण मरण मात्र व्यर्थ गेले. बिचारा !

जाताना बोटीमध्ये जे  मच्छीमार लोक होते त्यांनी खेकडे पकडून आणले होते. त्यात एका बाईला हा मोठा दीड किलोचा असा खेकडा मिळाला होता. त्याच्या नांग्या बांधल्या होत्या. पण तो जिवंत होता. तो हातात घेऊन एक फोटो काढला. याची बाजारभावे किंमत चार हजार होती म्हणे, पण त्या बाईकडून ज्या व्यापाऱ्याने तो विकत घेतला त्याने तो फक्त सातशे रुपयांना घेतला. केवढी तफावत होती.


एक गोष्ट मनात आली, जीवन हे किती वर्सटाईल आहे. वरील सगळे प्राणी/पक्षीच. पण प्रत्येकाच्या जीवनाची वेगवेगळी फेज. सगळ्यात दुर्बल कावळे फक्कड जेवण झाल्यामुळे आनंदी, बगळा ऐटीत, खेकडे जीवनयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात, माशांनी (विनाकारण)तोडलेला श्वास, आणि सगळ्यात सबल मोठा खेकडा जिवंत असून त्याचे प्रभावी शस्त्र म्हणजे नांग्या बधून ठेवल्याने हतबल आणि पारतंत्र्यात.
दुसऱ्या किनारी पोहोचून किल्ल्याचे शेवटचे दर्शन घेतले. येथूनही तो ३६ फुटी बुरूज दिसत होता.


जाताना परत एक बोट चुकली, मग पुढे जाऊन बस चुकली, दुसरी मिळवून विरार ला गेलो. तेथे तब्बल एक  तास तिकीट रांगेत उभा !, वसई ची शेवटची ट्रेन गेली होती म्हणून पळत ट्रेन पकडली दादरची. तेथे पोहोचलो तर शेवटची सह्याद्री पण गेलेली. 
आठ वाजताची राजकोट-भुवनेश्वर पकडली आणि खऱ्या अर्थाने दिवस वाया गेला. ट्रेन मध्ये सगळी अशक्य माणसे भरली होती. कोण कुठेही बसलेय, कोणाचे पाय कोणालाही लागतायेत. कुठेही फडकी बांधून त्यात मुले झोपलेली. आणि पुण्याला येईपर्यंत ट्रेन मध्ये भांडणे चालूच होती. आजच्या दिवशी मी २०  पेक्षा जास्त  भांडणे पहिली. ओह, केवढा वेळ आहे लोकांना :) 
नंतर देहूरोडला काही तृतीयपंथी ट्रेन मध्ये येऊन लोकांकडून जबरदस्तीने पैसे घेत होते.मी मात्र काही पैसे दिले नाही.

ट्रेन मध्येच सनत जयसूर्याचा श्रीलंकेतील जत्रेत दुरावलेला त्याचा जुळा भाऊ मला दिसला. बिछडा भाई का काय म्हणतात ते. अगदीच सेम होता. त्याला मी म्हंटले की "९६ ला काय झ्याक खेळला रे सनत! कपच आणला त्याने एकट्याने!" तर तो "छुट्टा नाही है" असे बोलला. मग मी म्हणालो की "पण तो वकार युनुस तो बोल्या की, दादर से गाडी लेट हाय!" यावर तो खिडकीतून जो काही थुंकला त्याने तेथील फुलझाडांची पावसाळ्यापर्यंतची पाण्याची सोय झाली असावी. 

आता जवळपास अकरा वाजून गेले होते. कसाऱ्यापाशी ट्रेन ला आग लागल्याने घरचे काळजीने सतत फोन करत होते. साडे अकरा वाजता घरी पोहोचलो. 

किल्ल्याला जाताना बोटीने प्रवास करताना मी बूट काढलेच नव्हते. त्यामुळे पूर्ण बुटात पाणी गेले होते.  आणि तश्याच ओल्या बुटांनी दिवसभर फिरत होतो. घरी येऊन बूट काढले तर मोज्यांचा खतरनाक वास यायला लागला होता. मी तसेच ते खिडकीत ठेवले. आईने मात्र वेळीच प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते धुवायला टाकले आणि उभा ( म्हणजे विरारहून पायाचे टळवे टेकतील एवढ्याच जागेत उभा राहून आलेला ) महाराष्ट्र 'देशी अ‍ॅनेस्थेशिया' च्या नवीन शोधला मुकला. 

असो. बाकी, अनुभव बरा होता, पण सोळा तास प्रवास करून तेथे जे काही पहिले ते एवढे वर्थ नव्हते असे वाटले. 

सागर

सोमवार, २७ मे, २०१३

'त्या' बारा दिवसांमधली 'ती' !

 'त्या' बारा दिवसांमधली 'ती' ! 

आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. आयुष्यभर आपल्या मुलींच्या सहवासात राहिलेली ती, शेवटचा श्वासही मुलीच्या मांडीवर डोके ठेवूनच घेत होती. आज तिच्यासोबत सगळे होते. नित्यनेमाचे उद्योग धंदे सोडून प्रत्येकजण फक्त आणि फक्त तिच्यासाठीच आला होता, हॉस्पिटल मध्ये. हजारदा आमंत्रणे पाठवून विनवण्या करूनही असे सगळे कोणासाठी एकत्र जमले नसते.

रात्र जागून काढली तिने हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातनांनी.हार्ट अट्याक असेल असे तिलाही जाणवले नसावे. "थोडे दुखते आहे छातीत, कशाला ह्यांना उठवा झोपेतून." शेवटपर्यंत काही तिने दुसऱ्याचा विचार करणे सोडले नाही.
"तुम्ही लवकर घेऊन यायला पाहिजे होते ह्यांना"  हे वाक्य डॉक्टर बोलले ते ऐकायला ती होतीच कुठे? तिला ऐकू तरी काय येत असावे? आणि ऐकताना त्याचा किती बोध होत असावा?
बारा दिवस ती ICU मध्ये होती. आयुष्यातले हेच ते बारा दिवस, जेव्हा तिला सगळे न मागता हातात मिळत होते. यापूर्वी स्वतःसाठी म्हणून ती होतीच कुठे? चार मुलींची लग्ने लावून दिली तिने. त्याच्यातच झिजून गेली होती ती. आज त्याच चार मुली रात्रंदिवस तिच्या जवळच बसून होत्या.

कसे वाटत असावे सर्वांदेखत असे खोल खोल जाताना? काय वाटत असावे हळू हळू प्रत्येक अवयवाला कार्यमुक्त करताना? काय होत असावे मनात स्वतःचे मन सोडून जाताना?
आता, बाकीच्यासाठी ति तीच असावी , पण तिच्यासाठी सगळे जग  रात्रीत बदलले नव्हते काय?

आज तिला आपण किती दिवस येथे आहोत हे माहितीही नसेल.सकाळी चहा प्यायचा असतो आणि तो आपण वर्षानुवर्षे पीत आलोत हे हि माहीत नसेल कदाचित. पण "विजूला मात्र दुधाचाच चहा लागतो" हे कसे माहीत असावे? मी दिसलो की औषधाच्या हजार बाटल्यामागे ठेवलेले दही मला द्यावे हे तिला कोण सुचवत असेल?

बारा दिवस एवढी माणसे भोवती हजर असून आतून एकटीच असावी का ती? काय विचार करत असावी वा काही आठवत असावे तिला.
भोर मधील माहेर आणि  घरासमोर बसून सागरगोटे खेळायचा तो कट्टा?
पुण्याहून सायकलवरून भोरला येणारा तिचा चाहता आणि मैत्रिणीच्या घरी त्याची राहायची व्यवस्था करून दिलेले ते दोन दिवस?
ज्याकाळी प्रेम हा शब्द उघड उच्चारला जात नव्हता अश्या काळातील तिचा तो प्रेमविवाह?
लहान वयात लग्न होऊन दक्षिण भारतात गेल्यावर  फक्त भात खाऊन काढलेले ते सहा दिवस?
पानशेतच्या पुरात उभारता संसार वाहून गेल्यावर झालेली जीवाची तळमळ?
मुलांचा जन्म ते त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास ?
नातीच्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीचा तिच्या चेहऱ्यावरचा तणाव?
नातीच्या लग्नानंतर परत तिच्या सासरी आणि स्वतःच्या माहेरी भोर ला गेल्यावर जिवंत झालेले तिचे ते बालपण?
पणजी होऊन नातीच्या मुलीला तोंडभरून पापा देताना तिचे केलेले कोडकौतुक आणि तिच्या वाढदिवसाला दिलेला दोन पायांचा लाकडी घोडा?
लग्नानंतर सलग अठ्ठावीस वर्षे औसरीच्या देवीचे केलेले नवरात्र आणि गावजेवण देऊन लोकांचे तृप्त चेहरे?
का, भर दुपारी अनवाणी पायांनी जाताना भाजणारे पायाचे तळवे ?
का, गेले बारा दिवस वेगवेगळ्या नळ्या आणि मास्क लावून काळी पडलेली तिची नितळ अशी त्वचा?
का, कालची भयानक कळा देऊन गेलेली रात्र?

कशालाच उत्तर नव्हते, कोणाकडेच !

आज मात्र गेली त्रेशष्ठ वर्षे चाललेली तिची तपश्चर्या थांबली .पोटच्या गोळ्याच्या मांडीवर शांतपणे डोके ठेवून.  खरंच, आज खऱ्या अर्थाने तिचे जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल.

सोमवार, २० मे, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४   - मांगी- तुंगीजी 

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 

आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस  झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला होता बहुतेक.घरचीही ओढ लागली होती.
पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते.
ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. हे कळायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. आता साधे उभे राहण्याचेही पायात बळ नव्हते, अशात आम्ही सुमारे तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून, गड हिंडून परत तेवढ्याच पायऱ्या उतरणार होतो. चेहऱ्यावरच्या वाढलेल्या आठ्या काही आम्हाला मदत करणार नव्हत्या, म्हणून त्या पुसल्या, फ्रेश झालो, पाय बदलले ( म्हणजे जोडे बदलले) आणि सगळे सामान तेथील ऑफिस रूम मध्ये ठेवून फक्त पाण्याची बाटली आणि थोडे खाद्यपदार्थ घेऊन निघालो.
 
पौराणिक संदर्भ :
मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र आहे. सिद्ध-क्षेत्र याचा अर्थ असा की सिद्धी/ मोक्ष मिळवण्याचा मार्ग (gateway to the state of enlightenment.).
ह्या जैन समाजाच्या सिद्ध क्षेत्री, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि इतर रामायणातील ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला. 

ऐतिहासिक संदर्भ : 
इ. स. ६०० साली कोरलेल्या बुद्ध मूर्ती येथे असून त्या लेप देऊन जतन करून ठेवलेल्या आहेत. 

भौगोलिक संदर्भ : 
मांगी-तुंगी किल्ला ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी पर्वत रंगांमध्ये/ डोंगररांगेतील हा महाराष्ट्रातील उत्तर-दक्षिणेचा शेवटचा किल्ला आहे. येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान हि आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याच्या जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. 

नकाशात दाखवल्याप्रमाणे तीन गोल केलेले किल्ले साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा, आणि मांगी-तुंगी हे आहेत. पांढरी रेषा हि महाराष्ट्र सीमा दर्शवते.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की, या रेषेच्या अलीकडे म्हणजे महाराष्ट्रात मोठी पर्वतरांग दिसते, तर रेषेच्या पलीकडे गुजरात चालू होते, तेथे दूर दूरपर्यंत डोंगर दिसत नाहीत.

बघण्यासारखी ठिकाणे आणि सद्यस्थिती :
हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा , शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात.
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी  फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्ट च्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे. येथे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि तरीही यासाखी सेवा- सुविधा आणि स्वच्छता इतर कोणत्याही मंदिरात व तीर्थक्षेत्री नसेल. 

मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.
तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.
मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.
तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवाड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.

मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? ) 
( पण इतक्या सुंदर ठिकाणी चाललेली हि अशी डोंगरफोड आम्हाला काय पटली नाही बुवा !) 

आमचा ट्रेक अनुभव :

मुल्हेर मधून सकाळी सकाळी ६ वाजता स्थानकावर आलो. पाच पेक्षाही कमी तापमान असावे, फुल टू थंडी. त्यात गरम गरम चहा. लगेच बस आली. त्यात बसून सात वाजता ताहाराबाद.
आता येथे येऊन कळले की मांगी-तुंगी ला जाणारी पहिली बस हि १० वाजता आहे. आता ३ तास येथे थांबून काय करणार? म्हणून निघालो स्थानकाबाहेर.
एका रिक्षावाल्याशी वाटाघाटी करून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत  पोहोचलो. रिक्षावाला सकाळपासूनच फॉर्म मध्ये होता. ह्याला हाक मार. त्याला चिडव, थोड्या थोड्या टाइम इंटर्वलने थुंकणे,  मध्येच गाणी म्हण (आणि याच्या जोडीला रिक्षांतला अजय देवगण आणि कुमार सानू. ).  हे महाराज, भाडे येत नाही म्हणून अर्धा तास थांबले होते.  मी कंटाळून चालत जाऊ म्हणालो ( फक्त म्हणालो, तयारी अजिबात नव्हती) तेव्हा ५ रु जास्त देण्याच्या बोलीवर हे साह्येब निघाले.
मांगी-तुंगी फाट्यापासून जाणाऱ्या ट्रस्ट ची गाडीने आम्हाला मंदिरात आणून सोडले. ( त्याला "किती  द्यायचेय?" असे विचारल्यावर त्याने चक्क 'नाही' म्हणून तो परत निघून गेला. )

 मांगी-तुंगी फाटा 
येथूनच मांगी-तुंगी सुळक्यांचे प्रथम दर्शन झाले. 
आता मंदिरात जाऊन फ्रेश होऊन आदिनाथाचे मंदिर पाहायला लागलो. तेथे फोटो काढायला बंदी होती.
तसेही सगळ्या मुर्त्या मला सेमच वाटत होत्या म्हणून मी कॅमेरा ठेवून दिला. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर भटकून मग आमच्याकडचे सामान तेथील कचेरीमध्ये ठेवले. पाणी भरून घेतले आणि मग निघालो आमच्या बागलाण ट्रेकच्या शेवटच्या डेस्टिनेशन ला.

१५ रु. देऊन गाडी होती पायथ्यापर्यंत, पण आम्ही ती नाकारली आणि चालतच सुटलो. अंगात जीव नव्हता पण ३० तासांची चढाई केलेले पाय हळू हळू का होईना पण निघाले.

 हा मांगी-तुंगी डोंगराकडे जाणारा रस्ता, हा फोटो 'ग्रांड क्यानोन ची ट्रेल " म्हणूनही खपला असता.
आता गावापासून जर लांब आलो होतो. मागे वळून पहिले तर गाव मस्त धुक्यात हरवले होते. आणि फोटोत दिसणारा डोंगर ओलांडला की मागे लगेच मुल्हेर गाव. 


येथूनच समोर पाहिले तर अतिशय नयनरम्य असे मांगी-तुंगीचे जुळे किल्ले नजरेस पडले. डाव्या बाजूस मांगी आणि उजवीकडे तुंगी.


पायथ्याशी अजून एक विश्रामगृह होते. येथे पाणी, खाद्यपदार्थ आणि प्रसाद मिळतो. तेथून निघाले की मग अत्यंत सुबक आणि सुस्थितीतील पायऱ्या चालू झाल्या. कोणीतरी अमेरिका निवासी जैन बांधवाने त्या तीन हजाराहून अधिक पायऱ्या बांधल्या असा तेथे  बोर्ड होता. 'अमेरिका निवासी' असे आवर्जून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.

 
वृद्ध आणि अपंग माणसांना वरती नेण्यासाठी डोली ची हि व्यवस्था आहे. वरती लिंबू-सरबताचे थांबे असल्याने ती लोकही डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन आमच्या बरोबर होतीच.


मांगी कडे जाता जाता तुंगी चा हा नयनरम्य सुळका सारखे आमचे लक्ष वेधून घेत होता. या दोन डोंगर जोडणारी मधली वाटही अभेद्य वाटत होती.


मांगी गिरी हे आमचे प्रथम लक्ष्य होते. अजून बराच बाकी होता. ऊन जाणवू लागले होते. आणि पायही संपले होते.

 बरेच अंतर चालू आलो की आपण…. 

आवरा …. अजून एवढे जायचे आहे. :) 

काही अंतर चालून गेल्यावर पहिली गुहा लागली. त्या गुहेत काही मंदिरे होती. आणि अनेक कोरलेल्या जैन प्रतिमा होत्या.
पहिला थांबा 



जवळ जवळ दीड तासात आम्ही बरेच वर आलो होतो. आता येथून पश्चिमेकडे साल्हेर- सालोटा दिसत होते. दोन दिवसांपूर्वी आपण त्या सर्वोच्च शिखरावर होतो या जाणिवेनेही अंगावर काटे आले. साल्हेरच्या आठवणी मनातून कधी पुसल्या जाणेच शक्य नाही. भूषण ला म्हटले की अजून एक दिवस सुट्टी वाढवू, प्लान रीवाईज करू आणि परत साल्हेर ला जाऊ यार !


खाली बघितले तर आता या पायऱ्या चीनच्या भिंती सारख्या दिसू लागल्या. पायऱ्या मुळे आपल्याला जास्त दम लागतो तर पाय अजून दुखायला लागले. यापेक्षा पायऱ्या सोडून परत ट्रेकिंग करत जाऊया असे मनात आले.


येथून तुंगी चे बरेच फोटो काढले. मोह काही आवरत नव्हता.

अजून तासभर चालून शेवटी पहिल्या कमानी पाशी पोहोचलो.

येथे एक विश्रांती थांबा आणि लिंबू सरबताचे काही स्टॉल होते. येथे एक पायपोई पण होती, पण येथे पाणी ठेवले तर या लोकांचे लिंबू सरबत कोण पिल? म्हणून त्या चाप्टर लोकांनी त्यात पाणी ठेवले नव्हते.

 येथूनच डावीकडे मांगी गिरीकडे तर उजवीकडे तुंगी साठी मार्ग होता. सहलीसाठी आलेली लोक येथूनच परत जात होती. तर काही तुंगी कडे जात होती. म्हणून आम्ही गर्दी टाळण्यासाठी मांगी ला निघालो.

'वर' जाणारा रस्ता :)

एव्हाना दोन हजार पायऱ्या होऊन गेल्या असाव्यात. आता पुढे काही थांबे नव्हते. गर्दीही नव्हती.

मांगी गिरी वर पाण्याचे एक टाके दिसले. बाकी येथे पाण्याची काही सोय नाही.


त्यानंतर वरती पोहचल्यावर आम्ही जे काही पहिले ते केवळ अशक्य होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या थकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत.

काय वर्णन करू शकणार अश्या निसर्ग रूपाचे?

येथून उत्तरेकडे गुजरात सुरू होतो. प्रदूषण कमी असल्याने दूरपर्यंत नजर जात होती. महाराष्ट्रात एकाला एक लगटून अश्या पर्वत रांगा. आणि गुजरातेत मोदिकाकांकडे एकाही डोंगर पण नाही राव. अरेरे ! ( आणि म्हणूनच गुजरात मधले ( नाशिक गुजरात बॉर्डर) एकमेव हिल स्टेशन "सापुतारा" त्यांनी अप्रतिम असे वसवले आहे. )

मान्गीगिरी वरून तुंगी ला जाणारी वाटही आता स्पष्ट दिसत होती.

आता वेळही हाती होता त्यामुळे फोटोग्राफी किडे चालू झाले.

येथे असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या दिसल्या. दोन्ही ठिकाणी कोरीवकाम केलेल्या बऱ्याचं मुर्त्या आहेत. काही मुर्त्या पडझड झाल्या आहेत तर काही ट्रस्ट ने कोटिंग करून जपलेल्या आहेत. पण कोटिंग करून त्याची नैसर्गिक /ऐतिहासिक ओरिजीनालीटी राहिलेली नाही.


एवढ्या उंचावर पायऱ्या नसताना असे कोरीवकाम करायला कोणते कामगार व स्थापत्यअभियंते छिन्नी हातोडा घेऊन आले असतील देव जाणे.



आता मांगी उतरून आम्ही परत पहिल्या प्रवेशद्वाराशी आलो आणि तुन्गीकडे प्रयाण केले. पूर्ण वाटेत रेलिंग लावलेले होते. 


 मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडीतच एक संगमरवरी मंदिर होते. बहुतेक ते कृष्णाचे होते. 
मंदिर आणि मागे मांगी गिरी.

थोडे अंतर चालून खिंड पार केल्यावर पुढे तुंगीवर जायच्या पायऱ्या दिसल्या. कोणी आणि कश्या बधल्या असतील या पायऱ्या? या विचाराने आमचे डोके चक्रावले.
 
 
 आमच्या स्वागतासाठी पूर्वज आधीच उपस्थित होते. त्यांनी आमच्या पिशवीतला चिवडा खाण्यासाठी हल्ला चढवला.

येथेही काही मुर्त्या कोरलेल्या होत्या आणि ३ मंदिरे होती. मला तेच तेच बघून बोर झाले म्हणून कॅमेरा ठेवला आणि पुढे निघालो.

२ वाजेपर्यंत खाली उतरलो. पायथ्याशी प्रसादाची विनामूल्य सोय होती. तेथे खाऊन आणि पाणी भरून निघालो. आता पायथ्यापासून गाडी करावी म्हटले तर गाडी नव्हती. परत पायपीट. मग शेतातूनच शॉर्टकट काढत आलो. मंदिरातून जेवणाचा पास घेऊन जेवायला गेलो. जेवण बरे होते पण चाळीस रुपयांच्या मानाने चांगले होते.
भरपेट जेवण झाल्यावर लगेच घरी जायचे वेध लागले. पाणी एकच बाटली भरली आणि मंदिराच्या माहेर येऊन एका घराच्या सावलीत डेरा टाकला. बुधवारीच आमचा हा स्वप्नवत ट्रेक संपला असल्याने आणि पूर्ण आठवड्याची सुट्टी असल्याने आता कधीही रिक्षा येऊदे आणि पुढे केव्हाही बस मिळूदे अश्या मानसिकतेने आम्ही चक्क तेथेच झोपून घेतले.
 दहा मिनिटांनी असणारी रिक्षा सुमारे अडीच तासांनी आली. दुपारी रिक्षांची वारंवारता कमी असते असे कळले. जी एक आली ती पकडून ताहाराबाद गाठणे गरजेचे होते. रिक्शांत घुसलो आणि आणि अजून एक जीवघेणा प्रवास सुरू. सहा आसनी रिक्शांत,  कल्पना करू शकणार नाही पण तब्बल सोळा लोक. काही कोंबून बसलेली, तर काही बाजूच्या पाय ठेवायच्या जागेवर उभी राहून. तुफान प्रवास होता तो. 

टपावर टाकलेले सामान काढून ताहाराबाद बस स्थानकावर बराच वेळ काढला. तेथून एक गुजरात महामंडळाची बस पकडून निघालो नाशिकला. येथून नाशिक म्हणजे अजून ४ तास. पण तीन दिवस एकत्र असूनही आमच्या गप्पा आणि विषय संपले नव्हते. 

या ब्लॉग चा जन्म यावेळी गाडीत बसून मनात आलेल्या विचारातून झाला हे मला नमूद करायला आवडेल. ह्याच ट्रेक नंतर असे वाटले की ह्या सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी आपण शब्दबद्ध केल्या तर, लोकांनाही या सुरेल निसर्गकवीतेचा अनुभव घेता येईल. साल्हेर-मुल्हेर च्या ट्रेक ला जाऊन आल्यानंतर ब्लॉग चालू केलेला माझ्या पाहणीमधला मी तिसरा. ती जागाच अशी आहे, ते अनुभवच इतके उत्कट आहेत की मनातील विचारांना लेखरूपी कोंदण हे मिळणारच. ( तुमचाही बरेच दिवसांपासून काहीतरी नवे करायचा व लिहायचा मानस असेल आणि तो प्रत्यक्षात येत नसेल तर हा ट्रेक नक्की कराच. ) 

अजून एक असे की जेव्हा खूप नैराश्य येते आणि स्वतः साठी वेळ काढणे गरजेचे आहे असे वाटते. त्याला उपाय असा की, शनिवारचे सटाण्याचे तिकीट आरक्षित करून यावे. विंडो सीट. सकाळी सातची ST दुपारी ४ ला पोहोचते तेथे. (येथे राहून वा ५ ची पुण्याची ST परत रात्री २ वाजता पुण्यात. )
खच वेळ मिळतो आपल्याला स्वतःला न्याहाळायला. स्वतःचे अनालिसिस करायला. सोबतीला लोकांची ओढाताण आणि जगणे जाणवते. आपले झापड लावलेले जगणे म्हणजे जगणे का? असा प्रश्न पडतो. 
(मी जेव्हा लोकांना समुपदेशन करतो तेव्हा हा हि उपाय घुसडतो. )

एक मात्र जाणवत होते की कितीतरी दिवसांनी आपण एवढी माणसे पाहतोय. जरा माणसांमध्ये आल्याचा फील आला. मागील ३ दिवस फक्त मुक्त डोंगररांगा, किल्ले, निसर्ग, सूर्यास्त, पूर्व-इतिहास  आणि सगळे पाश ( निदान ३ दिवस तरी ) सोडून आल्यासारखे आम्ही दोघेच. सोबत रिकामे पोट, रापलेला चेहरा, तुटायला आलेले पाय, ओरखडलेले हात पण तृप्त असे मन आणि स्वप्नपूर्ती झालेले डोळे. सगळे केवळ स्वप्नातीत.

नाशिक ला पोहोचून मुंबईकर आणि पुणेकर म्हणजे भूषण आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या. संपूर्ण ट्रेक ला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास नाशिक वरून पुण्याला येताना झाला. अखेरीस पहाटे तीन वाजता शिवाजीनगर. बाबांना फोन करून घ्यायला बोलावले.ते जेव्हा आले तेव्हा मी पहाटे साडे तीन वाजता शिवाजीनगर च्या फुटपाथ वर मांडी घालून बसलेलो होतो. अवतार तर भिकाऱ्याच्याही वरताण असा झाला होता. 

पाच दिवस, अडतीस तासांपेक्षा जास्त चढाई करून शरीर खिळखिळे झाले होते. पण तेव्हा ट्रेकची धुंदी असल्याने जाणवले नाही. आता घरी पोहोचलो तर पेन किलर घेऊन झोपणे हा एकाच पर्याय.
 'एवढा त्रास होतोय तर जायचेच कशाला, सुखाचा जीव दुःखात घालून" इति आई. पण बाबांनी चेहऱ्यावरचे भाव तेथे फुटपाथ वर बसलो असतानाच ओळखले होते. 
" तेथे काय पहिले?" या प्रश्नाला निदान माझ्याकडे तरी उत्तर नव्हते. केवळ निःशब्द.
 बूट काढून बघितले तर पायाच्या तळव्यातील रक्त पेशी सुट्टीवर गेल्याचे दिसले. बोटांना छोटे फोड आले होते. स्याक मध्ये रॉकेल सांडले होते म्हणून त्याचा खतरनाक वास येत होता. त्याहूनही खतरनाक वास माझा मलाच येत होता. ( पाच दिवस विदाऊट अंघोळ :) ).  बुटाचा सोल शेवटचा श्वास मोजत होता. पण राजे ( म्हणजे आम्ही ) गडावर ( म्हणजे आमच्या घरी) पोहोचुपर्यंत त्याने बाजीप्रभूसारखा जीव राखून ठेवला होता. 
मस्त गरम गरम दूध न मागताच समोर आले. त्या परिस्थितीत, त्या वेळी ते गरम दूध जे काही लागले न…. अहाहा स्वर्ग ! 
पहाटे सहा पर्यंत गप्पांची मैफिल रमली. पुढचा पूर्ण दिवस विश्रांती घेऊन, शुक्रवारी सुट्टी असूनही हापिसात हजर. "साल्हेर-सालोटा- मुल्हेर ट्रेक पूर्ण करून पुढच्या दिवशी आजारी न पडता हापिसात येऊन दाखव" हि पैज जिंकण्यासाठी. 

सगळ्यात ब्रेकिंग न्यूज हि की, तब्बल साडे सहा किलो वजन कमी झाले होते. वर्षानुवर्षे कपाटात पडलेले हाफ शर्ट आता बाहेर यायला लागले. बारीक झाल्याने आता मी कुतूहलाचा विषय होतो हे हि मला कळले. ( आता परत "पहिले पाढे पंचावन्न" झाल्याने लोकांचे कुतूहल शमले आहे.) पण माझे या ट्रेकचे कुतूहल अजूनही शमलेले नाही. 

असो, या ट्रेकच्या आठवणी माझ्या मनात तर आयुष्यभरासाठी कोरल्या गेलेल्या आहेतच. आपणा सर्वांना हि या ट्रेकचा आनंद घरबसल्या मिळावा म्हणून चालवलेला हा चार भागांचा खटाटोप आता संपला आहे. 

---समाप्त---
सागर