सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.


जीर्णनगरी मुशाफिरी :  चावंड किल्ला
बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. 
सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती. 

या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्री च्या बौद्ध लेणी, मानमोडी डोंगरातील जैन गुंफा , ५ धरणे आणि वाघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे. 

यावेळी प्लान ठरला तो माणिकडोह धरणाचा परिसर. दोन दिवसात 'चावंड-कुकडेश्वर-जीवधन-नाणेघाट' आरामात करून दुसऱ्या दिवशी सातच्या आत घरात.

जायचे कसे?
पुण्यापासून : पुणे ते जुन्नर  ST ने नवीन जुन्नर स्थानकावर उतरावे. जवळपास अडीच तास लागतात. तिकीट ९८रु. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. नवीन जुन्नर ST स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर  ST पकडून चावंड फाट्यावर उतरावे.
चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. 

बघायचे काय ?
किल्ल्यावर जाताना लागणारा दगडात खोदलेल्या वाटा, पुष्करणी तलाव, २१ पाण्याची टाकी, सप्ततलाव, प्राचीन असे महादेव मंदिर, चावंडा देवी मंदिर, महादेव मंदिरावरील शिल्पे.,किल्ल्यावरून दिसणारे माणिकडोह धरण व आजूबाजूचा प्रदेश, वऱ्हाडी डोंगर, हडसर किल्ला. 
किल्ला चढून पूर्ण फिरायला ४-५ तास पुरतात. 


आम्ही दोनच टाळकी ट्रेक ला असल्याने काही ठरवावे लागले नाही. शनिवारी मी पुण्याहून सकाळच्या निवांत गाडीने साडे दहाला जुन्नर पोहोचलो. आणि मित्र कल्याणवरून साडे आठ च्या गाडीने जुन्नरला आला. तिथून लगेच अंजानावळ गाडी पकडून उतरलो चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी.




पायथ्या पासून किल्ला फारच साधा वाटत होता. कॅमेरे बाहेर काढले, सामान तिथल्या एका घरात ठेवले आणी पायपीट चालू झाली.
रस्ता फारच सोपा असल्याने चुकणे झाले नाही. जाताना एक ग्रुप भेटला तो नुकताच वर जाऊन आला होता. त्यांच्याकडून टिप्स घेऊन आम्ही पुढे निघालो.
पायथ्यापासूनच काही उंचीपर्यंत सिमेंट च्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वैगरे चुकत नाही आणी सरळ जाऊन आपण एका मोठ्या रॉक पॅचला लागतो. पण खरेतर या पायऱ्यांनीच अर्धा जीव जातो.

जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. 

सुमारे अर्धा-पाऊण तासात आपण या रेलिंग पर्यंत येतो. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.

एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही.


उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांना आधार म्हणून मध्येच ही तोफ रोवलेली आहे.
दूरवर पसरलेला माणिकडोह धरणामुळे आजूबाजूचा परिसर अजूनही हिरवा होता. तसेच भर उन्हात हलकी थंडीही वाजत होती.

अवघड असा टप्पा ओलांडून गेलो आणि लगेच प्रशस्त अश्या मोठ्या पायऱ्या लागल्या. अत्यंत विचारपूर्वक खोदलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थेट प्रवेशद्वाराशीच नेऊन ठेवतात.
पहिले प्रवेशद्वार त्या पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. त्यामुळे खालून वा अगदी पायऱ्या चढून आले तरीही प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही. हा बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण करतो.

प्रवेशद्वारावर दगडी कमानीतच गणपती कोरलेला आहे. ह्या किल्ल्याच्या सर्वच द्वारांवर कोरलेले गणपती  अजूनही तसेच सुबक आहेत. हे काम पेशव्यांचे असावे असे वाटते. 


इथे मस्त जागा पाहून जरा वेळ निवांत बसलो. मग येथेच समान ठेवून फक्त कॅमेरे घेतले आणी पुढे निघालो.
थोडे पुढे येताच घोड्यांसाठी पाण्याची सोय दिसली. याचा अर्थ एखादे तरी पाण्याचे तळे जवळपास असणार असा अंदाज लावताच समोर पुष्करणी तलाव नजरेस पडला. 
येथून गडाला प्रदक्षिणा मारत आम्ही निघालो. तलावाच्या मागून बाजूने जाताना अजून दोन मोठी टाकी दिसली. या किल्ल्यावर तब्बल २१ पाण्याची टाकी असल्याने पाण्याचा नो प्रॉब्लेम.
आता इथूनच वरती दिसणाऱ्या छोट्याश्या टेकडीवर आम्ही निघालो. याच टेकडीवर चावंडादेवीचे मंदिर आहे. 
सुमारे पंधरा मिनिटात आम्ही वरती पोहोचलो.

देवीचे दर्शन घेऊन जरा वेळ टेकलो. मस्त सावली पडली होती आणि गार वारा वाहत होता. मंदिरासमोरील दगडावर हे महाशय निवांत पडले होते. 
गडाच्या सर्वोच्च असलेल्या चावंडा देवीच्या मंदिरापासून समोरच हडसर किल्ला दिसत होता. किल्ल्यावरच खाली बघितले तर सप्ततलाव दृष्टीस पडले.

याबाजुला हे बिचारे झाड एकटेच उभे होते. वन ट्री पॉइंट म्हणूनही हा खपला असता.

 आजूबाजूला बघितले तर भटोबा, नवरा-नवरी सुळक्यांची रांग दिसत होती.
ऊन सावलीचा खेळ चालूच होता. 

आता इथून उतरून खाली आलो. थोडेसे पुढे जाऊन लगेचच महादेव मंदिर लागले. याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते. हे मंदिर हि खूप जुने असले पाहिजे. जुन्या काळचे कोरीवकाम आणि दगडांची रचना केवळ अद्भुत.

 हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत. दोन्ही मंदिरे ही एकाच 'शिलाहार' राजघराण्याच्या झांजराजाच्या कारकीर्दीत बांधली गेली असल्याने त्यांची सप्त-देवतांची रचना सारखी असावी. खाली फोटोत असल्याप्रमाणेच सप्तदेवता असलेले दगडात आत खोदून केलेली छोटी मंदिरे जुन्नर मधील बऱ्याच किल्ल्यावर आढळतात.

साधारण इस. ७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे  मंदिर बांधले असावे. महादेव मंदिरात ही एकाच दगडात कोरून तयार केलेली पिंड दिसते. 

मंदिरासमोरच एक डोकं नसलेला नंदी आहे त्यावरून हे महादेव मंदिर ओळखता येते.

मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहत राहावे असे आहे. ते पाहून मनात प्रश्न पडतो की त्या वेळचे कारागीर सुद्धा किती लॉयल, प्रामाणिक असतील राजाशी. एवढ्या उंचावर चढत येऊन असे काही कोरीवकाम करायचे यावरून त्यांची राजावर किती निष्ठा असावी हे कळते. 

आणखी खोलात जाऊन त्या नक्षीकामाची महानता लक्षात येते. एवढे डिटेल काम करायला किती वेळ लागत असेल? पण "आपल्या राजाचे काम करायचेय" अश्या भावनेनेच अशी कामे होत असावीत. केवळ अद्भुत !

येथे जोडूनच जवळपास १० तळी आहेत. बहुतांश तळ्यात पाणी शेवाळामुळे हिरवट झाले आहे. ( दामले मास्तरांची आठवण झाली. :) ) 

येथून म्हणजे महादेव मंदिरापासून खाली गेले की सप्ततलाव दिसतात. किल्ल्यावर जाऊन हे तलाव अजिबात चुकवू नये असे आहेत. एकाला एक जोडून असे सात तलाव असून पहिल्याच्या सुरवातीस प्रवेशद्वार आहे. त्यावरही मस्त असा गणपती कोरलेला आहे.
थोडे वरून पाहिल्यास केवळ २ टाकी आहेत असे वाटते. 
पडक्या कोठाराच्या अवशेष पाहून थोडे पुढे गेल्यास हे एकाला एक जोडलेले सप्ततलाव दिसतात. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी. यातले पाणी बरेच चांगले आहे. पिण्यासाठी वापरण्याजोगे आहे.
सप्ततलाव: 

या सप्त-तलावाच्या सुरवातीला पहिल्या तलावास प्रवेशद्वार खोदलेले असून त्यावरही एकदम सुबक असा गणपती कोरला आहे. प्रवेशद्वाराला हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारा सारखीच नक्षीकाम केले आहे. एक मात्र जाणवले की, जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची ठेवण आणि स्थापत्यकला सारखीच आहे. 



'स्वतःच प्रतिबिंबात माणूस एवढा का रमतो हे काही अजून उलगडले नाहीये. 
 

दीड वाजता चढायला सुरुवात करूनही ५ वाजेपर्यंत संपूर्ण किल्ला पाहून झाला. मग किल्ला उतरून कुकडेश्वर मंदिराकडे प्रयाण केले. रस्त्यात ST वा जीप मिळावी म्हणजे पायपीट वाचेल असा विचार आला तेवढ्यात 'जगातील दहावे आश्चर्य' अवतरले. पण आमचा हा खास मित्र नेमकी उलट्या दिशेने चालला होता. त्याने हॉर्न वाजवूनच आम्हाला पुढच्या ट्रेक ला शुभेच्छा दिल्या. 

मग अजून कोणाची वाट न बघता सरळ कूकडेश्वर मंदिराचा रस्ता धरला आणि चालत सुटलो. 

बसच्या वेळा :
चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट जाण्यासाठी : 
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर  सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

अजून काही : 
१. चावंड आणि हडसर किल्ला पण एका दिवसात होतो. चावंड गावातून बोटीने माणिकडोह धरणातून पलीकडे जाता येते.
२. हडसर किल्ल्याच्या बाजूस, राजूर पासून थोड्या अंतरावर वाघ्र प्रकल्प आहे. माणिकडोह परिसरात सापडलेले वाघ, बिबटे पकडून येथे ठेवले जातात. सध्या तेथे तब्बल २८ वाघ आहेत.
३. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबा ला हि जाऊ शकतो.
४. ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोह ला प्रदक्षिणा मारता येते.
 जुन्नर ->चावंड -> कुकडेश्वर -> जीवधन -> नानाचा अंगठा -> नाणेघाट -> निमगिरी -> हडसर -> माणिकडोह  वाघ्र प्रकल्प-> शिवनेरी ->जुन्नर 

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीर्णनगरी मुशाफिरी : हडसर
जीर्णनगरी मुशाफिरी : निमगिरी
जीर्णनगरी मुशाफिरी : दुर्ग ढाकोबा
जीर्णनगरी मुशाफिरी : हरिश्चंद्रगड 

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

घनन-घन, घनन-घन घनगड

कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड

पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला.
भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर. कोथरूड वरून मग आमची वरात निघाली ताम्हिणी घाटात.

"ह्या किल्ल्याला मुळशी रस्त्याने बाइकवर जाऊ नका" असे मिळालेले अनाहूत सल्ले आम्ही न मानता आमचेच 'घोडे' दामटले, आणि मग तेच 'घोडे' पंक्चर झाल्यावर ६ किमी ढकलत नेताना आमचे मालकाचे म्हणणे न ऐकणारे 'गाढव' झाले.

ऐतिहासिक संदर्भ :

भौगोलिक संदर्भ :
मुळशी परिसर हा पावसाळ्यात खरंच जन्नत असते. याच मुळशी मावळच्या पश्चिमेकडे पुण्यातून जवळपास ८० किमी अंतरावर घनगड आहे. लोणावळ्यापासून जवळपास ५० किमी असून येथून रस्ता जर बरा आहे.
घनगडाच्याजवळच तैलबैला, कैलासगड (वद्रे), सुधागड, सरसगड, कोरीगड आहेत.

येण्याजाण्याच्या वाटा : 
घनगडावर जाण्यासाठी 'एकोले' गावातूनच वाट आहे. हे एकदम छोटे असे गाव असून जवळपास १०० लोकांची वस्ती असावी. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मातीचा रस्ता केलेला आहे. गावात गाडी पार्क करूनही किल्ल्यावर जाता येते.
पुण्याहून :
एकोलेगावात पोहोचण्यासाठी पुण्यातून ताम्हीणीमार्गे जाता येते. चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले
 रस्ता फार खराब असून दुचाकीवर जाणे अवघड आहे. टायर चांगले असतील तर ठीक. गाडी पंक्चर झाल्यावर निवे आणि भांबुर्डे गावाशिवाय कोठेही सोय नाही.
स्वारगेट येथून सकाळी नऊला भांबुर्डे बस असून तीच बस दुपारी दोनला परत जाते. एक दुपारची बस येथे मुक्कामी येते.
लोणावळ्याहून : 
लोणावळ्याहून भांबुर्डेगावात येणारी ST बस आहे. ती बस दिवसातून दोन वेळच आहे.सकाळी दहा आणि दुपारी चार. आंतरजालावर मुबलक बस असल्याची नोंद आहे पण तसे नाही.
भांबुर्डे  ते एकोले अंतर २० मिनिटे,३ किमी आहे. रिक्षा व इतर कुठल्याही गाड्यांची सोय नाही.

आमचा ट्रेक अनुभव:
सकाळी नऊ ला आम्ही गाडीला टांग मारली. एक गाडी दोघे जण. बरेच पुढे गेल्यावर अत्यंत गावंढळ पब्लिक कसेही रस्त्यावर हिंडत होते. त्यावरून आम्ही पौड आले हे ओळखले.
ताम्हिणीला लागलो आणि मस्त प्रवासाची सुरवात झाली. सकाळची वेळ असल्याने जास्त गर्दी नव्हती. बरेच अंतर कापून गेल्यावर लोणावळ्याचा फाटा आला. तेथून उजवीकडे वळून घनगडाच्या मार्गास लागलो.

मध्येच येणारे तीव्र चढण आणि खराब रस्ते याने गाडीचा जीव जायची सुरवात झालीच होती. गप्पा टप्पा मारत वेळ कसा गेला ते कळले नाही पण वद्रे गावापर्यंत यायला जवळपास अकरा वाजले होते.
वद्रे गावानजीकच कैलासगड आहे. कैलासगड हा फक्त डोंगर असून त्यावर विशेष पाहण्यासारखे काही नाही. किल्ला चढून उतरायला एक तास पुरेसा आहे. आमचे मुख्य लक्ष घनगड आणि तैलबैला असल्याने थोडा वेळ चढून आम्ही परत खाली आलो.


पूर्णतः निर्मनुष्य रस्त्यावर निवांत गाडी मारत आमची स्वारी चालली होती. 


मध्येच एक भारी स्पॉट लागला. पावसाळ्यात हा स्पॉट जन्नत असेल. चारही बाजूने रखरखते डोंगर कडे आणि मध्ये दरीतून पाण्याला काढून दिलेली वाट. 



एवढ्या रखरखत्या उन्हात मृगजळ दिसावे तसे हि गाडी पार्क केलेली दिसली. काय थाट होता तिचा वा !
 

निवे गावापर्यंत आलो. आता भूक लागली होती पण वेळ घालवायचा नव्हता. मग गाडी चालवतानाच प्याटीस खाऊन घेतले. निवे गावापासून ५-६ किमी आलो आणि फारच खराब रस्ता लागला म्हणून गाडीवरून उतरून ढकलत नेऊन पुढे जायचो. गाडी चालवताना मनात धाकधूक होती ती म्हणजे गाडी पंक्चर होण्याची. आणि थोड्या वेळातच ती धाकधूक संपली कारण गाडी खरंच पंक्चर झाली होती.


हा फोटो काढला आणि गप्प गाडीवरून उतरून गाडी ढकलायला लागलो. बघतो तर टायर शेवटचा श्वास मोजत होता. 


येथे आजूबाजूला सर्वत्र डोंगर रांगा आणि निर्मनुष्य रस्ता. एका माणसाकडून कळले की येथून ५ किमी मागे निवे गावात पंक्चरची सोय होईल अथवा पुढे १२ किमी भांबुर्डे गावात. हे ऐकूनच पोटात गोळा आला. नाईलाजाने ६ किमी गाडी ढकलत नेऊन अक्षरशः छाती भरून आली. एके क्षणी वाटले की "इथेच स्मारक होतेय की काय आपले."
६ किमी गाडी ढकलून 'आडगाव पाझरे' गावात पोहोचलो. तिथे एक आज्जी ना विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील मुलांना आवाज दिला. ती मुले बाहेर आली आणि म्हणाली की " पंक्चर काढणारा बाहेर गेला आहे, आमच्याकडे सगळी हत्यारे आहेत. आम्ही ट्राय करू"
तसेही माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. म्हटले ठीक आहे.
आता 'पंक्चर काढणे' सोहळा सुरू झाला. तीन मुले हत्यारे घेऊन आली, त्यांचे वडील मोठी परात घेऊन आले. आज्जी लगबगीने जाऊन त्यात पाणी घेऊन आल्या. तिघांनी चर्चा करून टायर काढायला चालू केले. 'अरे हे असे कर', ते तसे कर अश्या सूचना पालन करत काम चालले होते. सहा लोक मिळून पंक्चर काढत होते. शेवटी दीड तासाने हा सोहळा संपन्न झाला. आजींनी 'प्रसाद' म्हणून काही कैऱ्या दिल्या आणि थोडे पाणीही दिले. आता त्या पाण्याची चवही आम्हाला अधिक तजेलदार वाटली.

एव्हाना बारा वाजले होते. परत गाडी दामटवायला चालू केले. जाताना हा डोंगर अगदी माहुली सारखा दिसत होता. 'पुण्याचा माहुली' म्हणूनही तो खपला असता. 


भांबुर्डे नावाच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिथून सरळ घनगडाच्या पायथ्याशी. गावात गाडी लावून पुढे चालत जाऊ शकतो पण आम्ही मात्र अर्ध्या वाटेपर्यंत गाडी वर नेली. आता जे काही होईल ते बघून घेऊ असे म्हणत.
पायथ्याकडून दिसणारा घनगड.

गाडी पायथ्याशी लावली आणी थोडे १५ मिनिटे चालत वरती आलो तर लगेच 'गारजाई देवीचे' मंदिर दिसले. थोडा वेळ परत विश्रांती झाली. 

आता येथूनच किल्ल्याचा एक बुरूज दिसत होता. त्याचा माग काढत सरळसोट अश्या रस्त्याने चढाई सुरू झाली.




 येथून थोडे वर आल्यावर घनगड आणि त्या शेजारचा डोंगर यांच्यामधील खिंडीत एक वाट जाते. तेथे एकावर एक दगडांची रास केल्यासारखा एक एक कमाल स्पॉट आहे.


तेथून परत फिरून किल्ल्याची वाट धरली. मग वाटेतच थोडी हौस करून घेतली. 

एवढा सोपा किल्ला असून नेहमीप्रमाणे आम्ही येथून वाट चुकून दरीच्या मार्गाला लागलो. वेळीच पाय आखडता घेतला आणि जीव सांभाळत परत मागे आलो. 

मंदिरापासून अर्धा ते पाऊण तासातच आपण किल्ल्याच्या महादरवाज्याशी पोहोचतो. दोन भक्कम आणि बुलंदी बुरुजांनी झाकले गेलेले प्रवेशद्वार दृष्टीस पडले. 

प्रवेशद्वाराशीच असलेल्या बुरुजाने गडाची सुरक्षितता आणखीनच अभेद्य झाली होती. 





मूळ किल्ल्यात प्रवेश केल्यावर लगेचच पाण्याची टाकी नजरेस पडली.


येथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी येथे एक शिडी लावलेली आहे. आधी या उभ्या कातळात केलेल्या खोबणीतून चढाई करावी लागे. आता ह्या शिडीमुळे फारच सोपे झाले आहे. 


येथून खाली बघितल्यास बुरूज आणि प्रवेशद्वार दिसत होते. 
 आता शिडी चढून वर आलो. थोडा डोंगर बाजूला झाला आणि बालेकिल्ल्यात पोहोचताच दोन बुरूज आणि समोर तैल-बैल कातळकड्यानी लक्ष वेधून घेतले.




 तैल-बैल कातळ कड्यांचे अप्रतिम असे दर्शन झाले. 

दिवसभर उन्हाने तापलेल्या वातावरणात जरा गारवा आला. क्षणात निसर्ग कूस बदलून घेतो याची प्रचीती आली.

थोडे फोटोसेशन झाल्यावर जेवण पदरात पडून घेतले. थोडेसे ढगाळ वातावरण, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच.  गोड शिरा, छोले उसळ. कमाल बेत झाला होता.


थोडी कारागिरी झाली आणि मग परतीची वाट धरली.


 आम्ही किल्ला उतरताच किल्ल्यावर ढग दाटून आले. क्षणात वातावरण बदलले.

पायथ्याशी लावलेली गाडी काढली आणी लोणावळ्याच्या दिशेने निघालो. 




Aamby Vally च्या जवळपास आलो आणि येथून एकदम चांगले रस्ते सुरू झाले. 

कोरीगड आधीच झाला होता त्यामुळे लांबूनच कोरीगडला टाटा केला आणि लायन्स पॉइंट ला निघालो. 



जरा वेळ इथे टिपी केला आणी लोणावळा स्टेशन मार्गे निघालो. भूषण लोणावळ्यावरून मुंबईला गेला आणि मग आम्ही हाय-वे पकडून दोन तासात घरी. 
"कोथरूड ->चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले->भांबुर्डे -> लोणावळा-> चांदणी चौक-> कोथरूड "
एकंदर फारच मोठा राउंड झाला होता पण बरीच ठिकाणे पाहता आली. या प्रदेशात स्वतःची गाडी असेल तर बरीच भटकंती करता येते.  एका दिवसात आरामात "चांदणी चौक-> ताम्हिणी -> कैलासगड -> घनगड -> तैल-बैला -> कोरीगड-> लायन्स पॉइंट-> लोणावळा - चांदणी चौक" अशी ट्रीप /ट्रेक होऊ शकतो.

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

अदभुत अविष्कार (२): इंद्रवज्र

अद्भुत आविष्कार
अदभुत अविष्कार (१): कपारीतील चुनकळीची गाय

अदभुत अविष्कार (२): इंद्रवज्र

सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.


साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.


इंद्रधनुष्य हे मी आजपर्यंत अमाप वेळा पहिले असेल. पण कधीच त्याच्या खोलात गेलो नाही. आज अत्यंत दुर्मिळ असा निसर्ग अविष्कार पहिला  आणि मन वेडे होऊन गेले. इंद्रवज्राची महत्वाची बाब म्हणजे जो हा निसर्ग सोहळा अनुभवत असतो त्याचीच सावली / प्रतिबिंब त्या सातरंगी  गोलाकृती आकृतीत उमटते.

दुसर्यांदा केलेली साल्हेर वारी आज फळाला आली.  जणू इंद्रदेव आमच्यावर तुडुंब खुश असावा. जे पाहण्यासाठी लोक तीन- तीन दिवस हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावर जातात, ते दृश्य अनपेक्षितपणे समोर अवतरले होते. आज माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह टॉप पोजिशन ला असावेत.


इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )


खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल. 



अंतर्जालावर काही मजकूर सापडला. (http://thinkmaharashtra.com/node/1812)
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

आजपर्यंत इंद्रधनुष्य पाहून त्यावर डोक लढवायची गरजच नव्हती पडली. आज मात्र याची देही याची डोळा जे काही पहिले त्याने विचार करायला प्रवृत्त केले. पावसात वा धुके असताना इंद्रधनुष्य दिसते असे ग्राह्य ठरवले तर पाऊस नसताना आणी मुख्यत्वे विमानातून दिसणारी सप्तरंगी किनार कशी निर्माण होत असावी हे ही मला अजून न उलगडलेले गूढच आहे.


असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील लेख :
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्याची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज.  

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय?
काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. !
नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा.  देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर!

सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच !
असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी. पण च्यायला, एका रात्रीत जाऊन तो सिंहगडचा गाडीरस्ता खोदून यायला पाहिजे. 

पाऊस चालू झाला की, लोकांमध्ये विशेतः अमराठी लोकांमध्ये काय खाज सुटते कळत नाही. सगळे निघाले उंडारायला सिंहगडावर वा भूशी तलाव. तेही एक बरेच आहे म्हणा, सगळे तिकडे गेल्याने बाकीची ठिकाणे चांगली राहतात. 
हे हि असो, आपले काय त्यांच्याशीही वैर नाहीये. जाऊदे बापड्यांना, घेऊदे आनंद त्यांनाही, एका छोट्या डबक्यात १०-१५ जणांचा घोळका करून आणि डोक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अर्ध्या क्षेत्रफळा एवढे मोठाले गॉगल घालून एवरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात फोटो काढण्याचा.

आता आपण मूळ भजी वर येऊयात म्हणजे मूळ मुद्द्यावर येऊयात. 

आमचा एक मुंबई चा मित्र बरेच दिवस मागे लागलाय की सिंहगडावर जाऊयात म्हणून. 
"तुझ्या घरापासून किती जवळ आहे रे ! चल जाऊन येऊ !"
त्याची ही  मागणी आजपर्यंत मी नानाविध कारणे देऊन थोपवून धरली आहे. 
कारण असे की, जेव्हा मी पहिल्यांदी मुंबई फिरायला गेलो तेव्हा याने मला पहिल्यांदाच 'हाजी आली' ला नेले होते. म्हणजे तो नेतच नव्हता. म्हणत होता की, "आता येशील तिथे पण "कुठे पण नेतो' म्हणून हेच आयुष्यभर ऐकवशील मला". तरीही मीच हौसेने गेलो होतो. पण ते जे काही होते ते कहर होते. त्याचे वर्णन मी आता इथे लिहितं नाही ( त्यासाठी दुसरा लेखच लिहीन, विनोद आणि अपमान एकाच लेखात नको म्हणून !) 
त्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत त्याला आम्ही ज्या अमाप शिव्या दिल्या आहेत, त्याची साभार परतफेड तो एकाच ट्रेक मध्ये करू शकतो. तो म्हणजे सिंहगड !

त्याने बरेच कौतुक करून म्हणजे प्लस पॉइंट सांगून मला तयार केले किल्ल्यावर जायला की मी त्याला तेवढीच स्ट्रॉंग कारणे देतो. पण जेव्हा जेव्हा कोण सिंहगडावरील भजी पिठलं आणि दही याबद्दल बोलते तेव्हा मग आमची फ़ेमस रेसिपी चालू होते. ती म्हणजे "मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी "!

कोणी पिठलं भाकरी, भजी च्या नावाने मिटक्या मारल्या तर आम्ही "ती भजी कशी बनते?" हे रसग्रहण त्याला इतके आक्रमकपणे, पूर्वग्रहदूषितपणे, विरोधात्मक पटवून देतो की तो माणूस सिंहगड जाणे रद्द करतो. त्यातही तो अजून चिकट असेल तर गडावर जातो पण भजी मात्र खात नाही. 
अजून कोणी कहरच असेल तर भजीही खातो, पण मग आम्हाला त्याचा सुगावा लागू देत नाही. उदा. म्हणजे तेवढे भजीचेच फोटो वैगरे कॉम्पुटर वरून हाईंड वैगरे करणे वैगरे. 
काय म्हणता, "भजीचे फोटोज"?? 
अहो हो, पहिल्यांदाच जो तिथे गेलेला असतो तो नुसते भजीचेच काय तर वरून प्रदूषणाने अंधुक दिसणाऱ्या खडकवासला धरणापासून ते देव टाक्यांतले अंधारातील पाणी आणि दूरदर्शन च्या टॉवर पासून ते 'या चटई वर आम्ही बसलो होतो' इथपर्यंत फोटो काढतो.
( तरीही एकदा एकाने घेतलेल्या भजी चे फोटो दाखवले होते तेव्हा त्याला मी " हि भजी जर जास्त पिवळी वाटतीये नाही? " अशी कमेंट दिली होती. त्यानंतर बरेच दिवस आमचे संभाषण बंद होते. कारण कळेल लेखाच्या शेवटी!) 

असो तर ती समजुतीची वाक्ये ( भजीची रेसिपी) अशी काहीतरी असतात. 

"अरे नको जायला सिंहगडावर! तो काय गड आहे का ? दुकान आहे ते शिवकालीन इतिहासाचे!
"नाही रे चल मला जायचे आहे रे खूप दिवसापासून. "
"अरे मग दुसरीकडे जाऊ ना , राजगड चल बेस्ट आहे. "
"नको रे तो हेक्टिक होईल हा निवांत आहे. प्लस जेवणाचीही सोय होईल. "
"अ पळ हा, तिथे एकतर जायचेच नाहीये आणि वरती जेवायचे बिवायचे तर अजिबातच नाहीये. "
"मला भजी आणि पिठले भाकरी खायचीये तिकडची"
"अरे गंडला आहे का तू, किल्ल्यावर जाऊन कसली भजी वैगरे खातोस? घरी कधी भाकरी खात नाहीस!"
"अरे तिकडची 'भारी ssssssss' असते म्हणे. "

( आता आमची गाडी मेन गियर वर येते. पण जरा वेगळ्या वळणाने जाते. )
"कसली भारी असते? काही भारी बिरी नसते.
पण एक खरे आहे. ती विकणारी लोक हि तिथेच गावात राहणारी लोक आहेत. गरीब बिचारी! खूप कष्ट करतात रे ती ! रोज सकाळी लागणारा शिधा गोळा करायचा. तो गावातून वाण्याकडून घरी आणून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तब्बल तीन तास गड चढून वर जायचे ते पण सामान घेऊन. अरेरे किती कष्ट !
नुसते एकटे नाही तर कुटुंबासहित वरती यायचे. बाया योग्य जागी 'चूल' आणि अयोग्य जागी 'मूल' मांडून ठेवतात.  तर बापडे गडाच्या प्रवेशद्वाराशीच सावज टिपत असतात. तू त्यांच्याकडे नुसते बघून भूतदयेने हसलास जरी, तरी तू त्यांचा(च) 'गिऱ्हाईक'(च) होऊन(च) जातोस(च). मग तुला नो ऑप्शन. तुला त्यांच्याकडे नसले खायची भजी तरी गप्प गुमाने खायला लागणारच."

"असू दे की मी नाही म्हणेन त्यांना !"

"नाही,  मग तू ज्यांच्याकडे भजी खाशील त्यांच्या 'भज्या' म्हणजे त्यांनी बनवलेल्या 'भज्या' तुझ्या तोंडात असतानाच त्यांच्याशी ती पहिली बाई आणि बापडा इतकी सुमधुर भांडणे करतील की ज्याने तुझी मराठी भाषा अजून प्रगल्भ तर होईलच. पण भजी तोंडात असल्याने तू एक अवाक्षर बोलू शकणार नाहीस.आणि हे प्रकरण इथे न संपता तुला त्या पहिल्या बाई कडे 'सर्दी झाली असली तरी' वा 'पाऊस असला तरी' कमीत कमी 'दही' नामक पाणी तरी प्यायलाच लागेल."

"असू दे रे, चालायचेच!. कोणाकडे तरी खायचीच आहे भजी. कोणाला तरी द्यायचेच आहेत न पैसे मग पहिलीलाच देऊ. काय फरक पडतोय. "

एवढा चिकट माणूस असला तरी त्या समोर पराभूत झालो तर पुणेकर कसले?  मग पराभवाचे सूतोवाच होऊ लागले की हुकमी अस्त्र बाहेर काढतो. 

"नाही रे चांगली नसते तिच्याकडची भजी म्हणूनच ती गिऱ्हाईक भांडून मिळवते ना. हे बघ ती सकाळी उठून किल्ला चढून येते. माहीत पण नाही अंघोळ वैगरे केलीये का नाही. घाईने येते म्हणून स्वयंपाक करताना आवरते केस वैगरे ! ते जाऊदे !
खालून येताना फक्त शिधाच आणते म्हणजे भांडी इथेच असतात पर्मनंट, कधी धूत असेल ती काय माहीत?
तिच्याकडे फक्त १ पातेले, १ जग आणि ४-५ प्लेट्स आणि पेले असतात. ज्या पातेल्यात ती तुझे  पिठले करते त्यातच ती दुसऱ्यांचे पिठले करते. भाकरी सांगितलीस तर पीठही त्यातच मळते. हात धुतले असतीलच याची खात्री नाही. हे पण जाऊदे !
कोणी नॉन व्हेज सांगितले तर अंडीही त्या पातेलीतच फोडते. याउप्पर कोंबडी हि त्यातच कापते. ज्याने कोंबडी कापते त्यानेच कांदे, बटाटे कापते. म्हणूनच भजी थोडीशी लालसर असते. हे ही असो.
ज्या 'जगात' तुला पाणी देते त्यातच सरबत करते, ताक करते. तोच काहीजण तोंड लावून पितात. एकानी तर त्या 'जगा'मध्ये बेडूक पकडून आणला होता एकदा. तर काही तंबाखू खाल्लेली माणसे तोच 'जग' घेऊन गुळण्या करतात. काही तर त्यानेच तोंड धुतात.
यातच कहर म्हणजे जर 'जगा'च्या मालकांना निसर्गाची हाक आली तर तोच जग घेऊन .............. !"

"हरामखोरा, गप्प बस आता ! नाही न्यायचेय तर नको नेऊस ! पण तोंड बंद कर !"

या त्याच्या उत्स्फूर्त दादेने सिंहगडावर जायचा विषय त्याच्यापुरता तरी कायमचा संपतो!  

सागर

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

हा खडक काही केल्या पाझरत नाही.

 हा खडक काही केल्या पाझरत नाही.

साल्हेर किल्ल्याच्या त्याच पायऱ्या वेगवेगळ्या ऋतूत कश्या वेगवेगळे पेहराव करून बसतात.
तेच तेच जीवन म्हणून त्या कधीच कंटाळत नसतील का? 
काय तर रोज आपल्या अंगावरून कोणाला तरी वर किल्ल्यावर जाऊन द्यायचे.  
लाईफ स्याच्युरेट झालेय असे त्यांनाही वाटेल असेल का ? 
रोज तेच तेच, काहीच टेम्प्टिंग नाही म्हणून त्याही बोर होत असतील का ?
का ऋतूंशी स्पर्धा करत निसर्ग साज लेऊन नटत असाव्यात उगाचच? 
आपसातही हितगुज चालत असतील का त्यांची ? 
कधी त्यांच्यावर उगवणाऱ्या हिरव्या झाडांशी आनंदाने गप्पा टाकत असतील तर कधी उन्हाळ्याने सुकून चाललेल्या पालवीला धीर देत असाव्यात. 
असो,पण तरीही हा खडक पाझरत नाही तेच बरे आहे. खरच खडक झाल्यासारखे वाटत आहे. 






हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.

उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.

आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्‍या गुराखी मित्रांबरोबर न रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्‍यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.

मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणी "मी" भेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.

हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना...
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

---

संदीप खरे.

संदीपचा मी फुल स्पीड पंखा आहे.  पण कधी त्याच्या कविता अश्या कॉपी करून टाकल्या नाहीत कधीच. ही कविता मात्र अगदीच भारी आहे. 
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
आमच्या आयुष्यात कोडीच कोडी आहेत त्यातच सार्थक मानतो सध्या आम्ही. ना कशाचे सुख न कशाचे दुख, दिवाळीही पूर्वीसारखी राहिली नाही आमची.  खरच खडक झाल्यासारखे वाटत आहे.