बुधवार, १० जानेवारी, २०२४
उत्तर कर्नाटक किल्ले आणि मंदिरे
बुधवार, ३ जानेवारी, २०२४
रविवारची छोटेखानी भटकंती : श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड
रविवारची छोटेखानी भटकंती :
श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड
पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. सोनकी, हळदी, कारवी आणि विविध फुलाच्या बहराचा सुवर्ण अलंकार अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!

असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला तो वेळवंडी नदीच्या खोऱ्याशी सलगी करत वर्षानुवर्षे उभ्या मेहूड खोऱ्यातील सर्वोच्च महादेव तिर्थाला. श्री क्षेत्र घेवडेश्वर! सप्टेंबर महिन्यात गणरायाचे आगमन झाल्यामुळे महिन्याची विश्रांती झाली. पहाटे पाचला मंडळी निघाली आणि भोरच्या दिशेने रवाना झाली. पायथ्याच्या गावामध्ये प्रशस्त असे भैरवनाथ मंदिराच्या आवारात गाडी लावल्या, पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले.
संपूर्ण डोंगर रंगेबेरंगी फुलांचा महोत्सव साजरा करीत होता. हिरवेकंच गालीचे आणि त्यावर नवथर जलबिंदू गात्राला तृप्तीची अनुभूती देत होते. पाऊण- एक तासाच्या चढाईने पोहोचलो धनगरवाडीमध्ये. तेथे पोहोचताच एकमेव अश्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात उदरम- भरणम करून पुढे निघालो. शाळेत आत डोकावून पाहताच आज विस्मृतीत गेलेले काही सुविचार दिसले. येथून पुढे जाताच कातळात कोरलेल्या सुंदर अश्या पायऱ्या लागल्या. अश्या दुर्गम ठिकाणी सहज कातळ कोरून वाटबनवणाऱ्या मंडळींकडे नक्कीच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारातच डोंगरमाथ्यावर पोहोचलो.
समोर विचित्रगड आता खुजा वाटू लागलेला. मधूनच एखादी पावसाची सर यायची आणि ढगांच्या पसाऱ्याला बाजूला सारून सह्याद्रीचे अथांग दर्शन घडवायची. कारवीची जांभळी फुले आणि सोनकी, हळदीने ट्रेक भिडूंचे भान हरवलेले. सगळ्यांची जोरदार फोटोग्राफी सुरु झाली. दिड-दोन तासांच्या चढाईने पठारावर पोहोचलो तोच वर्षानुवर्षे भक्तांची पाठराखण करत असलेला मेहूड खोऱ्याचा अधिपती घेवडेश्वरचे दर्शन झाले. सुंदर रेखीव दगडी बांधकाम, शिखरावर फडकणारा भगवा, दगडी कोरीव पण काळाच्या ओघात जीर्ण झालेले दोन नंदी, थोडी मागे गतवैभव आठवत, शेवटचा घटका मोजत असलेली दिपमाळ बघून धन्य वाटले. अश्या उंच डोंगरांवर इतकी सुंदर शिल्पकृती साकारणाऱ्या त्या अनामिक हातांना मनोमन वंदन करून गाभाऱ्यात प्रवेशते झालो.
"ओम नमः शिवाय" चा नाद मंदिरात दुमदुमला. गर्भगृहाच्या बाहेर दोन बाजूला दगडात कोरलेले गणपती बाप्पा बघून पेशवेकालीन रचना असावी असे वाटून गेले. समोरच निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली फुलांची आरास बघून त्यातील एक गुच्छ देवाच्या चरणी अर्पण करून परतीची वाट धरली.
लवकर ट्रेक संपल्याने स्वारी रोहिडा किल्ल्याला निघाली. बाजारवाडी गावातून चढाई चालू केली तेव्हा २००८ साली भोर एस्टी स्थानक ते बाजारवाडी पायपीट वाचावी म्हणून मधूनच डोंगरधारेने चढून चोर दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्याचे आठवले. आज ती वाट चालू नाही असे कळले. गडफेरी करून निघालो तसे पावसाने गाठले आणि पावसाळी ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.
असो! फोटोंची मजा घ्या!
सोमवार, १ जानेवारी, २०२४
बागलाण दुर्गभ्रमंती भाग 7- मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ५ - किल्ले कांडाळा / पिंपळा , किल्ले भिलई , किल्ले अजमेरा, किल्ले दूंधा , किल्ले मुल्हेर, किल्ले न्हावीगड /रतनगड
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ६ : लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी
अपरिचीत बागलाण मोहीम ७
नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा -
===============================================================
दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम
दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर.
दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे
===============================================================
दिवस १ : भाग २ -
उद्धव महाराज समाधी मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणार नेत्रदीपक असा रासक्रीडा उत्सव:
मुल्हेर किल्ल्याचे मूळ नाव मयूरगड! महाभारतकालीन राजा मयूरध्वज याची राजधानी! आख्यायिकेनुसार, मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने रासक्रीडेचा उत्सव सुरू केला. मुल्हेरच्या उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० पासून उत्सवाला अधिक प्रोत्साहन दिले. श्री काशीराज महाराज यांना साक्षात श्रीकृष्णाने दिव्य चक्षूंनी रासक्रीडा दर्शन दिले. असे ऐकिवात आहे. रासक्रीडे दरम्यान रासचक्र म्हणजेच 'मंडळ' हे रासस्तंभावर चढवले जाते. सात फुटी लाकडी रासचक्राला बांबू जोडून त्याचा व्यास चौपट म्हणजे २८ फुटी केला जातो. चक्राच्या बाजूला गोलाकार जे खांब लावले जातात ते सात फूट जमिनीत आणि १४ फूट वरती असे सात फुटांच्या हिशेबात असते. रासचक्रावर केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजावट होते. श्रीकृष्ण आणि गोपिका वृंदावनात अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असे मानले जाते. आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना म्हणजेच सायंकाळच्या संपत वेळेप्रसंगी हे रासचक्र भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते. रात्रभर हे रासचक्र हाताने फिरवले जाते. त्याचाही खास मान विशिष्ट समाजाकडे असतो.
या रासक्रीडादरम्यान अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ पदांचे गायन केले जाते. कोजागिरीच्या रात्री रासचक्र चढविल्यानंतर रात्री दहा पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत न थांबता हे भजन गायन केले जाते. मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, वाद्यांच्या गजरात देवघरापासून ते समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते.
या रासक्रीडेच्या कामांमध्ये प्रत्येक समाजाला सामावून घेतले जाते. पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा न्हावी,तेली कुंभार यांकडे कापसाच्या वाटी बनवणे, दिव्यांना तेल पुरवणे आणि मातीचे दिवे बनवणे अशी अनुक्रमे कामे दिलेली होती. आदिवासी बांधवांकडे जंगलातून केळीची पाने आणि फुले आणायचे काम. शिंपी लोकांकडे रासचक्र बांधण्याचे काम, मराठा समाजातील लोकांना रासचक्र सजावट,मंदिरावर झेंडा लावणे आणि परिसर देखरेखीचे काम, अशी सर्व समाज समावेशक उत्सव काशीराज महाराजांनी सुरु केला. जर कोणाला नवसाने मुलगा झाला असेल तर त्याला गोपिका बनवून त्यांना देव मानून त्यांची मुरवणूक काढली जाते. असा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे.
हे सगळे डोळ्यात साठवून आजचा दुसरा दिवस संपवला. रात्रभर चालणारी भजने ऐकत केव्हा डोळा लागला आठवत नाही. सकाळी सहाला उठलो तेव्हाही त्याच उत्साहाने भजन गायन चालू होते. मंदिरातील गर्दी आता सरली होती. शांत चित्ताने उद्धव महाराज समाधीचे दर्शन घेऊन मुल्हेरचा निरोप घेतला. आज दुसरा दिवस आणि आजचे लक्ष होते बागलाणमधून खानदेशी भाटकायचा. धुळे जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला - किल्ले भामेर आणि स्थानिक लोकांनाही माहितीत नसलेला किल्ले रायकोट. मुल्हेर येथे कार्यक्रमासाठी जवळच्याच धनेर आमळी नावाच्या गावातून एक ग्रुप आला होता त्यांनी आमचा अवतार बघून विचारपूस केली आणि त्यांच्या गावातील लक्ष्मी नारायणाचे अप्रतिम मंदिर आहे आहे सांगितले. शेषशायी विष्णूच्या एका अखंड दगडातील कोरलेल्या मूर्तीच्या बेंबी मधून सदैव पाणी येते म्हणून लोक त्याला जिवंत विष्णू म्हणतात. अनायसे आज गाडी होतीच तर हे मंदिर बघायचे नक्की करून मंडळी भामेर किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.

वाचत राहा..
पुढच्या भागात -
दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर.
रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ६ : लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
- बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ५ - किल्ले कांडाळा / पिंपळा , किल्ले भिलई , किल्ले अजमेरा, किल्ले दूंधा , किल्ले मुल्हेर, किल्ले न्हावीगड /रतनगड
अपरिचीत बागलाण मोहीम ६
नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा -
===============================================================
दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम
दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर.
दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे
===============================================================
दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम
गेल्या काही वर्षात बागलाण प्रदेश बऱ्यापैकी भटकून झाल्याने बागलाण रांगेतील न झालेला शेंदवड गड करूया आणि कोजागिरी च्या मुहूर्तावर शेंदवड गडावर शतकोशतके विराजमान भवानी देवीचे दर्शन घेऊया, त्यापुढे खानदेशात प्रवेश करून धुळे जिल्हा पालथा घालावा या विचाराने मंडळी शुक्रवारी रात्री निघाली.
शुक्रवारी रात्री पुण्यनगरीतून पिंपळनेर प्रस्थान केले. खूप दिवसांनी एसटीचा प्रवास घडणार होता. मधल्या दिड -दोन वर्षात ग्रुपचे आणि गाडीने ट्रेक व्हायला लागल्यापासून एसटी /टमटम/जीपड्याने प्रवास करून किल्ल्याचा पायथा गाठावा, काटेकोर नियोजनात किल्ला करून , परतीची सोय बघत - कधी जीपला लटकत, टपावर बसून दुसऱ्या किल्ल्याला जाणे, तासनतास एसटीची वाट बघत, डोळ्यासमोर फसत चाललेले नियोजन सावरत भटकंती करणे यातली मजा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. यामध्ये वेळ जातो पण तेथील लोकांचे बोलणे-जगणे अनुभवता येते याविचारातच नाशिक आले. फोनाफोनी करून भूषणने नाशिक रोड स्टेशन वरून पण सेम बस पकडली आणि दोघे निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
इतकी वर्षे झाली पण खिडकीतून पिशव्या / बाटल्या टाकून जागा पकडण्याची प्रथा आणि सतत सर्वत्र पचापच थुकणारे गुटकावीर हे चित्र आजही तसेच असल्याचे बघून माझे साडे पाचशे रुपड्यांचे तिकीट धन्य जाहले. "पिंपळनेर! उतरून घ्या" या कंडक्टरच्या हाळीने झोपेतून जाग आली. सामान उचलले आणि भर अंधारात घराच्या दिशेने चालू लागलो.थंडी आपले अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होती. अर्ध्या तासात भुषणच्या घरी फ्रेश होऊन गाडी घेऊन निघालो ते लाठीपाडा धरणाच्या दिशेने.
बऱ्याच ठिकाणी विचारत विचारात एकदाचे ते पोहोचलो एका छोट्याश्या डोंगरावर अभेद्य अश्या उभ्या छोटेखानी गढीच्या जवळ. गढीच्या खाली असलेल्या एकमेव घराच्या समोर गाडी लावून गढी बघायला प्रस्थान केले. हि गढी खाली राहणाऱ्या काकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चार भक्कम बुरुज आणि मधोमध केलेले कोरीव दरवाजांचे बांधकाम लक्ष वेधून घेते.गढीच्या माथ्यावर उभे राहिल्यास लांबवर मांगी-तुंगी, न्हावीगड ते शेंदवड गड दर्शन देतात. बागलाण च्या दक्षिण दिशेचा भूभाग तेथून न्याहाळता येतो. गढी बांधली त्या छोटेखानी डोंगरावर महाराजांनी काही दिवस वास्तव्य केले होते आणि म्हणूनच महाराज जेव्हा सुरत लुटून आले तेव्हा जे धन साल्हेर आणि परिसरात लपवले गेले त्यातील काही धन येथे या गढीत लपवले होते. गावातली काही बहाद्दरांनी त्या धनाच्या लोभापायी गढीच्या बुरुजांमध्ये खोदकाम करून बुरुज फोडून टाकलेत. गढीच्या मालकांशी गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी त्याबद्दल निगडित काही पूर्व कथा सांगितल्या. एक एक कथा ऐकत घड्याळात अकरा वाजत आल्याचे लक्षात आले आज मोठा पल्ला तर होताच पण शेंदवड गडाची दोन अडीच तासाची चढाई भर उन्हात करायची होती. नमस्कार करून गाडीला टांग मारली आणि शेंदवडचा रस्ता धरला.
शेंदवडगडाचे भौगोलिक स्थान बघितले असता एकदम इंटरेस्टिंग आहे. गड महाराष्ट्र(धुळे) व गुजरात ( डांग सौन्दणे) यांच्या सीमेवर आहे. गडाच्या मागची बाजू गुजरात, समोरच्या डोंगरसोंडे च्या डावीकडची बाजू धुळे तर उजवीकडची बाजू नाशिक जिल्ह्यात येते. असा तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला असल्याने गडाचे स्थान मोक्याचे आहे. शेंदवडगडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा डोक्यावर तळपता सूर्य येथून ठेपला होता.
वेळ रामराया जन्मला ती भर बाराची. सामान खाली एक घरात ठेऊन किल्ल्याची चढाई चालू केली. घाम पुसत देवीचा जयघोष करत सुमारे दिड तासात गडमाथा गाठला. गार वारा स्वागताला तयार होताच पण डोळ्यांची पारणे फिटतील असे निसर्गदृश्य समोर रेखाटलेले दिसले. बागलाणचे मुख्य शिलेदार येथून दर्शन देतात. समोर मांगी-तुंगी, न्हावीगड, रतनगड , तांबोळ्या तर उजवीकडे मोरागड -मुल्हेर-हरगड-कपार भवानी - म्हातारीचे दात, साल्हेर-सालोटा , हरीणबारी धरण हे ज्ञात आणि कित्येक अज्ञात अशी शिखरे असे सगळे एकाच फ्रेम मध्ये पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुखद, निव्वळ नेत्रसुख!
बागलाणचे दुर्गवैभव
डोळे भरून हा निसर्ग सोहोळा पाहून देवीच्या दर्शनासाठी निघालो. गडावर देवीचे हे मंदिर आहे आणि पाण्याचे एक टाके दिसले. वरती सुळक्यावर अर्ध्यापर्यंत जाता येते पण ती रिस्क न घेता मंदिरात प्रवेशते झालो. पूर्ण दिड तासांच्या चढाईत आम्हाला कोणीही भेटले नव्हते पण वरती मंदिरात चांगली तीस चाळीस लोक उपस्थित होती. सगळी लोक खालच्या गावातील होती आणि त्यांच्या कुलदैवत असल्याने देवीला आलेली होती. प्रत्येकाने उदबत्ती आणि प्रसाद आणलेला होता. आम्ही आलो आणि त्यांची आरती सुरु झाली. शेंदवड गड हा गुजरात , महाराष्ट्र बॉर्डर वर असल्याने तेथील आदिवासी गुजराती मिश्रित अहिराणी भाषा बोलतात. त्यांनी देवीची आरती पण गुजरातीत केली.
दर्शन घेऊन गडाची उतराई चालू केली. खाली गावात महाप्रसादाची सोय आहे कळल्यावर पोटातील कावळ्यांची शांती झाली. तीन दिवसांची मोहीम असल्याने खाऊ बरोबर होताच पण गावात भंडारा पाहून रस्त्यावर ठाण मांडून बसून उदरम भरणम करून घेतले.
आताशा चार वाजत आले होते. मुल्हेर येथील रासनहणाच्या कार्यक्रमाला सहा च्या आत पोहोचणे गरजेचे होते. नशिबाने शॉर्टकट सापडला आणि शेंदवड वरून थोडे मागे येऊन चिवटी बारीने आम्ही धुळ्याहुन नाशिकमध्ये प्रवेश केला. मुल्हेर कडे जातानाच रस्त्यात जैतापूर नावाचे गाव लागते. येथील एकविरा देवीला आम्ही दोन वर्ष्यांपुर्वी येऊन गेलो होतो. येथूनही मुल्हेर ते साल्हेर सगळी रेंज दिसते म्हणून आज परत जाणे झाले. येथेही कोजागिरी निमित्त काही भक्तांनी चक्र पूजा बांधली होती. फर्मास पुरणपोळी कुरडई सकट साग्र संगीत जेवण होते मग काय, येथेही जेवायला बसलो!.
देवीचे दर्शन आणि पुरणपोळीचे जेवण पदरात पडून घेऊन मुल्हेरला पोहोचलो. आज लवकर आल्याने मोक्याची जागा पकडता आली. आठशे वर्ष्यांची परंपरा लाभलेला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे. यावेळची हि आमची चौथी वेळ होती यावरूनच वाचकांना समजले असेल.
असो या उत्सवा विषयी वाचूया पुढच्या भागात ... तूर्तास फोटोंची मजा घ्या!
वाचत राहा..
पुढच्या भागात -
दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर.
महत्वाचे असे काही :
- पिंपळनेर पासून मॅप लावून जाणे. रस्ते थोडे छोटे आणि फसवे आहेत. स्थानिकांना विचारात जाणे केव्हाही उत्तम.
- नवरात्रीच्या सुमारास भक्तांची खूप गर्दी असते तेव्हा गेलात तर वाट चुकण्याचा प्रश्न नाही.
- चढाईस अंदाजे चार तास लागतात. पायथ्याशी एक मंदिर आहे तेथे गाडी लावू शकतो.
- येथून दिसणारे बागलाण रेंजचे दृश्य म्हणजे स्वर्गसुखच.