शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

माहुली , भंडारगड, पळसगड

 माहुली , भंडारगड, पळसगड 

शहापूर तालुक्यातील या दुर्ग त्रिकुटाला दिलेली चौथी भेट.   ट्रेक प्लॅन ठरला तेव्हा आधी तीन वेळा झाला असल्याने जायचा विचार नव्हता पण घरी पडून रहाण्यापेक्षा कुठेतरी भटकून येऊ आणि तिन्ही वेळेस पळसगड झाला नसल्याने यावेळी तो पाहून येऊ या विचाराने मंडळी निघाली. इथे पुण्यनगरीत रानावनात गच्च भरलेल्या थंडीने इथे कोकणपट्ट्यात आपला मागमूसही लागू दिला नाही. झुंजूमुंजू झाल्यावर पूर्वेच्या केशरी कागदावर क्षणात बदलणाऱ्या रंगछटा पाहून मात्र आल्याचे सार्थक झाले. कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वेळी जा, सह्याद्री आपल्या रूपाने कायमच मंत्रमुग्ध करतो. 

असो, तर सकाळी सहा वाजता चढाई सुरुवात करून अर्ध्यापेक्षा जास्त चढून आलो तेव्हा आसमंतात उमटलेल्या विस्मयकारी रंगछटांनी डोळ्याचे पारणे फेडले. यथेच्च फोटो काढून महादरवाज्यापाशी पोहोचलो. महादेवाचे दर्शन घेऊन गडफेरीस सुरुवात केली. महादरवाज्यापुढे भालदार चोपदार टाईप पोजचे फोटो आधी तिन्ही वेळा काढले असल्याने याही वेळी तो कार्यक्रम झाला. भंडारगड भ्रमंती करून कल्याण दरवाज्याच्या माथ्यावर पोहोचलो. तेथे बांधलेल्या रोपने खाली उतरून जीवधन किल्ल्यासारखी नाळेत खोदलेली पायऱ्यांची वाट पाहून थक्क झालो. पुढे वजीर सुळका आणि कोकणकड्याची डोळ्यात न मावणारी अद्भुत निसर्गचित्रे डोळ्यात साठवून आल्या पावली महादरवाज्यापाशी पोहोचलो. 

येथून आता काही मंडळी खाली निघून गेल्याने धावतच पळसगडाचा रस्ता धरला. खास पळसगडासाठी वाटाड्या घेतला होता पण त्याने भंडारगडालाच पळसगड आहे असे म्हणत गंडवायचा थोडा प्रयत्न केला. त्याला फाट्यावर मारून शिवपिंडीपासून पळतच पळसगड मार्गे निघालो. एका पॉईंट नंतर जिथे एक भलामोठा दगड आहे तेथून तीन वाट फुटतात. सगळ्यात उजवीकडची पळसगड माथ्यावर जाते तर डावी 'खोर' गावात उतरते. मधली वाट नव्याने उजेडात आलेल्या गणेश दरवाज्यापाशी जाते. थोडेसे भरकटून गणेश दरवाजा शोधला आणि दरवाज्याच्या बरोब्बर वर कातळावर कोरलेल्या गजाननाचा आशीर्वाद घेऊन परतीचा मार्ग धरला. 

असो फोटोंचा आनंद घ्या! 
फोटो सौजन्य : ट्रेकभिडु ऑफबीट ट्रेकर्स 
























शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव २०२४

दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव २०२४


।। आई भवानी शक्ती दे , चंदन -वंदनला मुक्ती दे ।।
।। आई भवानी शक्ती दे , चंदन -वंदनला मुक्ती दे ।।


'हर हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अश्या जयघोषांनी दुर्ग चंदन - वंदन वरील अवघा आसमंत व्यापला होता. आज मार्गशीर्ष  शुद्ध अष्टमीचा पवित्र दिवस. साडे तीनशे वर्षांपूर्वी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभून हा प्रदेश स्वराज्यात सामील झाला होता. गुलाल, भंडाऱ्याने जयघोषांच्या तालावर स्वार होऊन चंदन-वंदन  या जोडगोळीच्या  किल्ल्यांना जोडणाऱ्या पठारावरचे सारे वातावरण शुचिर्भूत केले होते. भगवे ध्वज निळ्याशार आसमंतात उंचच उंच भिडू लागलेले. मध्येच एखादा प्राणप्रणाने फुंकलेला शंख या सर्व जल्लोषाच्या सीमा भेदून उपस्थित मावळ्यांना स्फुरण चढवत होता. तुतारीच्या ललकारी आणि टाळांचा गजराने वातावरण भारलेले होते. स्वराज्याचा कर्ता मूर्तरूपात मानाच्या पालखीत बसून हा सर्व सोहोळा बघत होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पालखी भेटीचे औचित्य साधून अवघे भगवे फेटेधारी धारकरी आज चंदन-वंदन किल्ल्यावर जमले होते. निमित्त होते ते म्हणजे दुर्ग श्री चंदन-वंदन विजयोत्सव. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पालखीची चंदन-वंदन गडाच्या पठारावर भेट झाली आणि अवघा मुलुख पिवळ्या भंडाऱ्याने पावन झाला. 


छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी 

चंदन वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी अफजुल्ल्याचा कोथळा बाहेर काढतानाची रांगोळी 

               

तीनशे चौसष्ठ वर्षांपूर्वी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध करून जावळीचा मुलुख स्वराज्यात सामील करून घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्ग जोडी चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून आपल्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात केली. याच घटनेचे स्मरण म्हणून दुर्ग चंदन-वंदन गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाई तालुक्यातून अमृतवाडी - पाचवड-किकली-बेलमाची गावातून वंदन गडाच्या पठारावर चढते तर धर्मवीर संभाजी महाराजांची पालखी कोरेगाव तालुक्यातून पळशी फाटा - आंबवडे मार्गाने गणेशखिंडीतुन पुढे चंदन गडावरून वंदन गडावर येते. दोन्ही पालख्यांची दोन्ही गडांना जोडणाऱ्या पठारावर भेट होऊन त्यांची आरती होते आणि त्यानंतर वंदन गडावरील प्रवेशद्वार, माची, आणि श्री वंदनेश्वर शिवालयाच्या पुढे अशी प्रत्येक ठिकाणी आजूबाजूच्या गावातून जमलेल्या मावळ्यांच्या हस्ते आरती होते. पाहुण्यांचे उद्बोधक विचार ऐकून लाठीकाठीचे प्रात्यक्षिकाने आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. 


पालखी खिंडीत येताना 


श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी हा सगळा सोहोळा घडवून आणण्यात अपार मेहनत घेतली आहे. अगदी जनरेटर पासून मांडवाचे साहित्य, प्रसादापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सगळ्या  वस्तू या मावळ्यांनी खांद्यावर उचलून आणल्या होत्या.वंदनगडाचे पूर्णपणे मातीत गाडले गेलेले दुसरे प्रवेशद्वार श्रमदान करून मोकळे केले आहे. श्री वंदनेश्वर शिवालयाच्या शिवपिंडीवर वाहायला बेलाची पाने हवीत म्हणून मंदिरासमोर बेलाचे झाड लावून किल्ल्यांच्या पायथ्यापासून हंड्यात पाणी उचलून आणून झाडाला घातलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहे. गेली आठ वर्षे या मावळ्यांनी वंदनगड संवर्धनासाठी कष्ट घेतले असून  प्रसंगी स्वतःच्या खिशाला कात्री लावून वंदनगडाचे अस्तित्व जपले आहे. गडावर झालेल्या हिरव्या चादरींचे अतिक्रमण आणि वनखाते / तत्कालीन सरकारचे दुर्लक्ष्य या सगळ्याशी लढत आजवर संस्थेने वंदनगड विकासासाठी सर्वोतोपरी कार्य केले आहे. 

शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील आज अजून एक किल्ला हिरव्या अतिक्रमणामुळे आपल्यापासून दूर जातोय कि काय अशी स्थिती आहे सध्या मित्रांनो. चंदनगड हा पूर्ण हिरव्या चादरींनी वेढलेला आहे आणि वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेला आहे. वंदनगडावर काही दिवसांपूर्वी दर्ग्याखाली शिवपिंडी सापडल्याने प्रशासनाने वंदनगड पर्यटन बंद केले आहे. आज अजून एक किल्ला आपल्यासाठी बंद झाला आहे. अश्या स्थितीत महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्यात मिळवलेल्या या गडकोटांची जपणूक हि आपले कर्तव्य आणि जबाबदारी दोन्हीही आहे. पुढील वर्षी आठ डिसेंबर रोजी हा नेत्रदीपक सोहोळा पुन्हा अनुभवाची संधी आहे तेव्हा आपण मोठ्या संख्येने जमुयात आणि भगवा उंचच उंच जात राहील यासाठी प्रयत्न करूयात. 

तळटीप : कोणाला जर या दुर्गसंवर्धन कार्यास कोणत्याही स्वरूपात हातभार लावायची ईच्छा असल्यास माझ्याशी अथवा श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान यांच्याशी संपर्क साधावा. 



किल्ले वंदनगड प्रवेशद्वार 

पालखीचे आगमन 

धर्मवीर संभाजी महाराज पालखी 

पालखी नाचवताना 

वंदनेश्वर महादेव 




जल्लोष 








बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

रोहिदास घळने चढाई - रोहिदास शिखर - माकडनाळेने उतराई


वाघ्याची वाडी - रोहिदास घळ - रोहिदास शिखरावरून  सूर्योदय - माकडनाळ - वल्हीवरे - बाजारपेठेची वाट -  दिवाणपाडा - वाघ्याची वाडी 


रात्रीच्या गर्द अंधारात गाडी वाघ्याच्या वाडीकडे मार्गक्रमण करीत होती. आजपर्यंत विचारही न केलेली भटकंती आज घडणार असल्याने थंडीशी दोन हात करीत मंडळी आनंदात होती. माळशेज घाटातून उतरू लागल्यावर दोन्ही बाजूला काळ्या काळोखातही उंचच उंच गगनाशी भिडलेल्या डोंगरांच्या रांगा दिसू लागल्या . सावर्णे फाटा शोधात जेव्हा आम्ही तेथे पोहाचलो तेव्हा एक बाजूस महाकाय देवदौन्डया तर समोर हरिश्चंद्रगडाचा भलामोठा पसारा आणि त्यावर अवकाशात चढलेली चांदण्यांची झालर म्हणजे "क्या बाssssत है" असा नजारा होता. मूंबई वरून एक टीम येणार होती म्हणून थोडा वेळ तिथल्याच एका धाब्यावर थांबलो. तेवढ्या वेळात त्या ढाबेमालकाने कर्कश गाण्यांनी आम्हाला जेरीस आणले. ट्रेकभिडु जमले आणि वाघ्याची वाडी गावाच्या दिशेने आम्ही निघालो. 

प्रत्येक वेळी हरिश्चंद्रगड मुक्कामी जातो तेव्हा तारामती शिखरावरून सूर्योदय पाहत आलो. कोकणकडा गेल्यावर "ते बघ! तो समोर डावीकडे सुळका दिसतोय तो रोहिदास यापलीकडे "रोहिदास" शी ओळख नव्हती. रोहिदास शिखरावरून कोकणकडा कसा अंतर्वक्र दिसत असेल याची उत्सुकता वाटायची. आज या शिखरावरून अरुणोदय बघावा आणि सकाळच्या शुचिर्भूत कोवळ्या किरणांनी न्हाऊन निघालेले अजस्त्र अश्या कोकणकड्याचे ते रूप डोळ्यात साठवावे यासाठी सर्व ट्रेकभिडु रात्रीच्या चढाईस एकमताने तयार झाले आणि बरोबर रात्रीच्या दहा वाजता आम्ही रोहिदास घळ चढाईस सुरुवात केली.


                      

घोणस 


चढाई चालू केल्यावर पहिल्या दहा मिनिटातच आमचा रस्ता क्रॉस करणारे घोणस पिल्लू दिसले.  चला! ट्रेकची सुरुवात तर मस्त झाली. आता अजून काय काय दिसतंय बघत , एका हातात टॉर्च आणि दुसऱ्यात काठी असे स्वतःला सावरत नाळेची चढाई चालू होती. भर थंडीतही घाम पुसत, मध्ये पाण्याचे ब्रेक घेत आरामात जात होतो तेच एका दगडावर जणू आमचीच वाट बघत बसलाय असा चापड्या / बांबू पिट व्हायपर साप दिसला. याला बघताच आम्ही आमची वाट बदलून पुढे निघलो. मोठमोठाले बोल्डर्स , दगडे चढत सुमारे सहा तासांच्या सलग चढाईने आम्ही माकडनाळेच्या मुखाशी असणाऱ्या लिंगी सुळक्याला पोहोचलो. तेथून रोहिदासच्या पायथ्याशी एक मोठासा कातळ बघून थोडा वेळ विश्रांती घेतली. 


रात्री रोहिदास शिखरावर जमलेले नक्षत्र 


आसमंतात नक्षत्रे जुळून आली होती आणि रोहिदास शिखर या ताऱ्यांच्या वर्षावात उठून दिसू लागलेला. बोचऱ्या थंडीने बर्फासारखे थंड पडलेले हात शेकण्यासाठी मग शेकोटी लावली आणि तासभर त्याची ऊब घेत निवांत बसून राहिलो. सहा वाजता शिखराकडे प्रयाण केले. शिखराची चढाई पूर्ण घसाऱ्याची आहे आणि अंगावर आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात आता पूर्वेकडे केशरी झालर उमटू लागलेली. पन्नास मिनिटात शिखरावर पोहोचलो आणि लागलीच सूर्यनारायण प्रकट झाले. थोड्याच वेळात समोर सह्याद्रीचे मनमोहक रूप झळाळू लागले. रोहिदास शिखरावर असणाऱ्या भैरोबाच्या ठाण्याचे वंदन करून फोटोग्राफी सुरु झाली. समोर नाफ्ता, डोमा , कलाडगड , सीतेचा डोंगर, कोकणकडा , तारामती डोळ्यात मावत नव्हते तर मागे सिंदोळ्यापासून किरडा, भोजगिरी, देवदौन्डया ते अगदी वऱ्हाडी सुळक्यांपर्यंत दुर्गदर्शन झाले. फोटो आवरून सुमारे नऊच्या सुमारास उतराई चालू केली आणि माचीवर पोटोबा करून सुळक्याचे दर्शन घेऊन माकडनाळेच्या नाळेत घुसलो. 

रोहिदास शिखर 


रोहिदास उतराई 

रोहिदास माथ्यवरून नजारा 

                  

रोहिदास कडून माकडनाळ / शेंडी सुळक्याकडे जाताना 


दोन वर्ष्यांपुर्वी माकडनाळेने चढाई करून बारा पायरी वाटेने आडराई उतरलो होतो तर आज माकडनाळेची उतराई करायची होती. मध्ये टेक्निकल पॅच लागतो तेथे गावातीलच एक वाट्याड्या घेतला होता त्याची मदत घेतली होती. असंख्य दगडांच्या राशीतून न हलणारे दगड वेचत त्यावर पाय ठेऊन नाळ उतरायची कसरत चालू झाली.  अरुंद अश्या  नाळेतून उतराई करताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. माकडनाळ तुम्हाला मान वरती करण्याची संधीच देत नाही. अश्या वाटांनी भटकलो कि सहयाद्रीच्या राकट देशा . कणखर देशा , दगडांच्या देशा हे शब्द अगदी समर्पक वाटू लागतात.  दोन असेच मोठे पॅच उतरून खाली आलो तेव्हा मागे वक्राकार कोकणकडा रौद्र भासत होता. दोन तासांच्या चालीने बेलपाडा पोहोचून वाटाड्याचा निरोप घेतला. येथून आता अजून तासाभराची चाल बाकी होती. बेलपाड्यातून पुढे निघून बाजारपेठेच्या वाटेने डोंगरात खिंडीत पोहोचलो आणि तिथें पुढे वाघ्याच्या वाडीला उतरलो आणि २० किंलोमीटर्सचा हा तगडा ट्रेक संपवला. 


माकडनाळ 




माकडनाळ 



अश्या वाटांवर भटकताना दिसणारे सह्याद्रीचे रांगडे रूप हि केवळ डोळ्यात साठवण्याची गोष्ट. रोहिदास वरून दिसणारा अंतर्वक्र कोकणकडा, लिंगी सुळक्यापासून समोर दिसणारा सीतेचा डोंगर आणि नळीची वाट. अगदी बेलपाडा  गावातून मागे नाफ्त्याचा उठवलेला कडा , माकडनाळेतून खोलवर दिसणारी नाळ अशी खासम खास खास निसर्गचित्रे.  किती फोटो काढू आणि किती नको अश्या सगळ्या फ्रेम्स होत्या. असो ! तूर्तास फोटोंची मजा घ्या!


सागर 

पोस्ट मधले काही फोटो ग्रुप मधील लोकांकडून साभार 


कोकणकडा 












गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार

रविवारची भटकंती : 

भटकंती सह्याद्रीच्या कुशीतील अवघड पण अत्यंत्य देखण्या अश्या घाटवाटांची -

 घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार. 



सहयाद्रीतील काही जागाच अश्या आहेत ना कि बघताक्षणी प्रेम! त्या यादीतील बहुप्रतीक्षित अशी हि भटकंती होती. मागच्या वर्षी काही ट्रेकभिडु जाऊन आलेले तेव्हा फोटो बघूनच जायचे नक्की केलेले तर तो योग आज जुळून आला. 


आता घोडेपाण्याची नाळ चढताना दिसणारे सहयाद्रीचे अद्वितीय रूप पाहायचे असेल तर पहिले "सिंगापूर" ला जाणे आले. मग काय सकाळी ब्राम्हमुहूर्तावर पुण्यनगरी सोडून सिंगापूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. रथाचे सारथी अत्यंत कुशल असल्याने तेवढ्या वेळात निद्रादेवीला प्रसन्न करून घेतले. ग्रुपमधले ट्रेकभिडु शरदभाऊंनी हा ट्रेक आधी दोन वेळेस केला असल्याने जायचा रस्ता, चढाईची वाट, वाटाड्या, gpx फाईल या कशाच्याही फंदात न पडता त्यांच्या पाठीमागे चालत सुटणे आणि निसर्गाच्या अदभूत सौन्दर्याने मंत्रमुग्ध होत जाणे एवढेच काय ते ध्येय होते. 


नाणेघाट आणि दाऱ्या घाट या कोकण प्रदेश आणि देश यांना जोडणाऱ्या फार पूर्वीपासून प्रचलित अश्या वाटा होत्या. आजही स्थानिक लोक याच वाटांचा वापर करतात. या वाटांवर असलेल्या राबत्यामुळे त्या जिवंत राहिल्या तश्या या दोन वाटांच्या उदरात वसलेल्या घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार या वाटा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपणच या वाटा जागत्या ठेवल्या तरच  इथली दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील. 


असो! तर सकाळी आठ वाजता घोडेपाण्याची नाळेची चढाई चालू झाली. पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा पत्ताच नव्हता. समोर जीवधन किल्ल्यावर आणि वनरलिंगीवर चढलेला सोनेरी रंग बघून नाळेच्या माथ्यावरून झकासपैकी दृश्य दिसणार याची खात्री झाली. वाटेने वाहणारे बारीकसे पाण्याचे प्रवाह ओलांडत पाण्याच्या वाटेने म्हणजे नळीतून मंडळी मार्गक्रमण करीत होती. रमतगमत आणि नियमित फोटो ब्रेक घेत चार तासात माथ्यावर पोहोचलो. येथून दिसणारा सह्याद्रीचा रौद्र राकट नजारा म्हणजे काय वर्णावा? शब्द आणि प्रतिभा दोन्ही तोकडं पडेल निव्वळ असा!


चढाई करताना अजस्त्र वाटणारे बाहुला-बाहुली सुळके आता थिटे वाटू लागले होते. या दोन सुळक्यांच्या मागून जीवधन किल्ला आणि वानरलिंगी उंच आभाळात झेपावलेले ! त्याच्या डावीकडून नानाचा अंगठा हळूच डोकं वर काढत होता. माथ्यावर संपूर्ण कारवीचेच साम्राज्य! एवढ्या दुर्गम जागेवर बिबट्याचची विष्ठा पाहून साहेब या प्रदेशात कुठेतरी असणार याची खात्री पटली. माथ्यावरून  दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅव्हर्स मारून रिठ्याच्या दाराच्या तोंडाशी पोहोचलो. गर्द कारवीचे रान बघून हातापायांना "लालेलाल" साज चढणार या तयारीनेच नाळ उतरायला घेतले. कोणत्याही सजीवांचा मागमूस नसलेल्या वाटेने दोन-तीन मोठ्ठाले रॉकपॅच वळसा घालून उतरलो तेवढा संध्याकाळ होऊ लागली होती. अश्या प्रकारे एका अनवट, देखण्या आणि तितक्याच लोभस अश्या घाटवाटांची आठ तासांची, बारा किलोमीटर्सची भटकंती पार पडली. 


असो! माथ्यावरून दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतील असे नजारे होते. त्यामुळे तूर्तास फोटोंची मजा घ्या .


घोडेपाण्याच्या नाळेतून दिसणारे ददृश्य 

नाळेची चढाई 


माथ्यावरून व्ह्यू 



रिठ्याचे दार उतराई 

रिठ्याचं दार उतराई, खाली सिंगापूर