मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते. 
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.
कुठेतरी माळरानात सहा सहा तास भटकत राहायचे, जळता सूर्य डोक्यावर घेऊन फिरून ग्लुकॉन डी चे पुडे च्या पुडे संपवायचे आणि तरी तरतरी येत नाही मग रस्त्यात मिळेल तिथे मांडी घालून बसून एकदाची ती गुळाची पोळी हाणली की मग मात्र गड सर झाल्याचेच सूतोवाच. अहाहा.
असेच एकदा सरसगडाला चढताना डी-हायड्रेशन झाले म्हणून एकटाच बसलो होतो पायथ्याशी पोळ्या खात!!

पण यावेळची गोष्ट जरा वेगळी होती. आठवडाभर उर फुटेस्तोवर काम करून पाठीची हाडे आणि मणके खिळखिळे व्हायला आले होते. अमाप वेदना झाल्यावर शुक्रवारी कौटुंबिक वैद्य बुवाकडे गेल्यावर त्यांनी चक्क मला ताकीद दिली. मणक्याचा आजार झाला असून, खांद्यामधले वंगण ( Body Oil ) कमी झाले आहे. २ आठवडे सक्त विश्रांती घ्यावी लागेल. बरीच औषधे  आणि मलम यांचा भडिमार करूनही खांदादुखी काही थांबेना. शेवटी क्ष- किरण चाचणी करायचा सल्ला दिला गेला. X -Ray काढल्यावरच नक्की निदान होणार होते. मग गप्पपणे क्ष- किरण चाचणी करायला दुसऱ्या डॉक्टर कडे…. तिथे जवळ पास ३ तास पुरतील एवढी लोक आणि समोर एक सूचना वजा फलक. "मराठी भाषेत एका वाक्यात जास्तीत जास्त किती चुका आपण करू शकतो?"  अश्या स्पर्धे मधूनच त्या फलकाची निर्मिती झाली असावी. सुमारे तब्बल तीन तास तोच फलक वाचून वाचून मी इतका पकलो की जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी का आलो आहे हेच आठवेना. मग एका
"खली" सदृश माणसाने मला त्या दिव्याच्या प्रकाशात जवळ जवळ ढकलूनच दिले. खिसा शे पाचशे रुपड्यांनी नी रिकामा झाल्यावर हातात एक फोटो निगेटिव घेऊन मी घरी आलो आणि झोपून गेलो. 
कालच्या औषधांच्या भडिमाराने सकाळी उठल्यावर जरा बरे वाटायला लागले.  सकाळी सकाळी जाऊन मी तो 'क्ष- किरण' अहवाल डॉक्टर बुवांना दाखवला.  ट्रेक तर रद्द झालाच होता, पण तो माझ्यामुळे रद्द झाल्याने सकाळी सकाळी शिव्या सदृश फोन येतच होते. यातच २ आठवडे विश्रांतीच्या विचाराने मी तर वेडाच झालो होतो. आता यात अजून काही निघाले तर वाटच लागेल म्हणून मी कुतूहलाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. 
काय बरं वाटतंय का ?
हो आता बरे आहे जरा …. 
अरे, काही नाही झालेय, फक्त 'Muscular Spasm' आहे. दोन दिवसात होईल बरा.

मी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. तडक घरी गेलो, म्हणालो काही झाले नाहीये आता मी बरा आहे.
हे ऐकून भाची ने तिची शाळेचा "घ. अ." म्हणून थर्माकोल चे कमळ बनवायचे आहे असे फर्मान सोडले. मग आमची स्वारी कमळाच्या मागे… ४ थर्माकोल चे ग्लास, आणि असंख्य रंगांच्या पेट्या तिने उपलब्ध करून दिल्यावर माझी कारागिरी चालू झाली. २-३ तासांच्या (अथक) प्रयत्नांनंतर ते कमळ तयार झाले.


तेवढ्या वेळात भाची चे अजून एक चित्र काढून पूर्ण झाले.


खूप चेष्टा उडवल्यानंतर, चित्र नीट पाहिले. लहान मुलांमध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. बालमनाने साकारलेले ते पक्षी आणि कुत्रा( का मांजर) पाहून विचार आला की, तिच्या मनात "पक्षी दिसतो कसा" याचा फक्त साचा होता त्याला पंख वैगरे काढावे असे तिला वाटले नसावे. पण, त्यातही त्याला खाण्यासाठी दाणे द्यायला हि ती विसरली नव्हती.

असो,हि कामगिरी झाल्यावर जरा वामकुक्षी साठी टेकलो.

आता मात्र बरे होऊन मी दुसऱ्या संकटात सापडलो ते म्हणजे "दाखवायचा"फोटो काढून यायच्या. बऱ्याचं दिवस मातोश्री मागे लागल्या होत्या की लग्नाचे बघायला चालू करू.  जरा (तरी) बरा फोटो काढून आण तुझा, पण मी मात्र दरवेळी टाळाटाळ करत होतो. यासाठीच का, पण शनिवार- रविवार दोन दिवस मी झोपूनच घालवतो. हा दाखवायचा फोटो म्हणजे एक करामतच असते. शक्य तेवढे बरे कपडे अंगावर चढवून, चेहऱ्यावर २-३  किलो पावडर थापून, ( काहींच्या बाबतीत हि लिस्ट अजुन वाढते, एक दीड किलो लिपस्टिक, अर्धा लीटर नेलपॉलिश, वाटी भरून काजळ … असो.  ),चेहऱ्यावर उसने सोज्वळ भाव आणून फोटो काढून घ्यायचा आणि त्यानंतरही विश्वाची आणि पर्यायाने आपली उत्पत्ती करणाऱ्याच्या आपल्यासाठीच्या "ब्लु प्रिंट" ची आणि त्या फोटोची तडजोड झाली नाही तर फोटोशॉप ची करामत सुरू … त्यात खाली परत ती करामत करणाऱ्या कारागिराचे नाव वळणदार अक्षरात …

जमेल तेवढी टाळाटाळ करून जरा निवांत बसलो तेवढ्यात आमच्या बहिणीचे आगमन झाले. एरवी माझ्याबरोबर कुठेही न येणाऱ्या आमच्या भगिनी, फोटो चा विषय निघाल्यावर " चल मी पण येते तुझ्याबरोबर, तो निळ्या चेक्स शर्ट घाल हा… आणि "अशी" पोझ दे" असे म्हणत त्या पोझ चे हि मार्गदर्शन झाले. आता मात्र गप्प जावे लागणार या विचारातच फोन वाजला.

"ए काय करतोयेस, बरेच दिवस गेलो नाही कुठे चल आपल्या तिकोना पॉइंट ला जाऊ" असे म्हणत मित्राचा फोन आला, मग म्हटले ट्रेक नाही तर नाही आपला आवडता "पॉइंट" तरी का सोडा?" पाठदुखी थांबून, आणि आपल्याला अजून काही झालेले नाही या आनंदाने निघालो आम्ही आमच्या पेटंट पॉइंट ला.
"हो" म्हणून फोन ठेवला. पुढच्या १०  मिनटात तो हजर. लगेच जर्किन,हेल्मेट वैगरे आभूषणे चढवून आमची यात्रा निघाली.

तिकोना पॉइंट म्हणजे एक अद्भुत जागा आहे. छोटा ब्रेक पाहिजे असेल तर यासारखी उत्तम जागा नाही. कोथरूड पासून ४५ - ४८  किमी अंतर असून एकदा पौड गाव सोडले की जास्त रहदारीही लागत नाही. खर्च तर जवळ जवळ नाहीच काही. फक्त पेट्रोल काय असेल ते.
कोथरूड पासून पौड गावाकडे जाताना, गावातूनच उजव्या हाताला "हाडशी" कडे जाणारा रस्ता पकडायचा. हाडशी येथे "श्री सत्य साईबाबा" यांचे अतिशय सुरेख असे मंदिर आहे.  त्यामुळे हि जागा बऱ्याचं लोकांना माहीत असते. ४ वाजायच्या सुमारास कोथरूड, पुणे वरून निघालो, की पुढचं दीड तासात हाडशी मंदिरा ला आपण पोहोचतो. तिथून वरती मंदिरात न जाता पुढे 'पवना नगर" च्या दिशेने जावे. हाडशी पासून पुढे ७ किमी जाताना छोटा घाट लागतो. आणि मग एकदा 'तिकोना' किल्ल्याचे दर्शन झाले की की पुढे जात राहायचे. दहा मिनटे गेल्यावर एक निसर्गरम्य असे ठिकाण येते. तोच हा तिकोना पॉइंट.

  तिकोना पॉइंट वरून दिसणारे तुंग किल्ल्याचे मनोहारी दृश्य. 

पश्चिमे कडे तोड करून आपण उभे असतो. समोर उत्तुंग असा 'तुंग" किल्ल्याचे शिखर दिसते. त्याच्या भोवताली पवना धरणाचे निळेशार पाणी… मागे पहिले तर अजस्त्र असा तिकोना उभा. कोणताही गजबजाट  नाही. शांत अश्या जागेत पक्ष्यांचे किलबिलाट…. बघता बघता पश्चिमे कडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो.  फक्त आपण, तुंग, तिकोना, आणि सूर्यास्त.  खरंच निसर्गाच्या महानतेची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.
हा अनुभव मी असंख्य वेळेस घेतला असेल, पण प्रत्येक वेळी या निसर्ग कवितेचा निराळाच अर्थ मला लागतो. मी इथे प्रत्येक ऋतूत आलो असेन. पण प्रत्येक वेळेसच इथले मनोहारी दृश्य मनाला आनंद देऊन जाते.

बघता बघता पश्चिमेकडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो.

  मग जरासे फोटोग्राफी किडे चालू झाले.

तुंग आणि पवना धरणाचे सूर्यास्ताचे चित्र. 

फोटो काढता काढता काहीतरी आवाज झाला म्हणून बघितले तर हे सरडे बुवा हि आमच्या जोडीला होते सूर्यास्त बघायला . 

तिकोना किल्ला आणि साक्षीला चंद्र. 

मित्राच्या याच गाडीवर आम्ही आलो होतो. नवीन गाडी घेतल्यापासून कुठेही लांब गेलो नसल्याने तो तुफान गाडी पिदडत होता . घरातून निघताना तो बहुतेक " भीमरूपी महारुद्रा" वाचूनच आला असावा. आणि त्यातले " गतीशी तुलना नसे" हेच वाक्य लक्षात ठेवून तो वायू वेगाने गाडी हाकत होता. मागे बसण्याची सवय नसल्याने माझी मात्र पुरती पळापळ झाली होती. रस्त्यातले ट्राफिक, मिरवणुका, गावठी पब्लिक कोणालाच त्याने दाद लागू दिली नाही. रस्त्यात सैरावैरा धावणाऱ्या कोंबड्या हि आमच्या धास्तीने खुराड्यात जाऊन विसावल्या. ८० - ९० किमी वेगाने गाडी हाकताना, मध्ये एक ताबूत मिरवणूक चालली होती. पूर्ण ट्राफिक जाम असताना हे साह्येब वाट काढत जोरातच चालले होते. ताबुताला "कट" मारून आम्ही पसार झालो.रस्त्यात एके ठिकाणी चाललेली भांडणे हि त्याने मन वळवू शकले नाही. 

आता सूर्यास्त झाल्यावर वेध लागले ते हाडशी मंदिरात जायचे. मग ७ वाजेपर्यंत आम्ही मंदिरात पोहोचलो. अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था असलेले हे मंदिर कुटुंबाला घेऊन येण्यासाठी एकदम योग्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारची लूटमार, धार्मिक उदो उदो, बाजार नाही. देवाचा बाजार मांडलेल्या ( की ज्याच्यातून तो स्वतः, साक्षात देव हि सुटू शकत नाही अश्या ) "सो कॉल्ड" धार्मिक स्थळा सारखे हे नाही. इथे अत्यंत स्वच्छता, पार्किंग पासून सगळ्या सोयी ह्या विनामूल्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ऊद वाहकाची ( लिफ्ट) ची सोय आहे. रात्री अंधार पडल्यावर रंगेबेरंगी कारंजे चालू होतात. मंद आवाजात देवाचे श्लोक चालू असतात. सर्वत्र नेमलेली माणसे मदत करण्यास तत्पर. मंदिराच्या मागे असलेल्या तळ्यात पांढरी शुभ्र अशी बदके. पवनचक्क्या, ग्रंथालय, हिरवळ, शुद्ध पाणपोई. एकदम झकास असे दृश्य.

हेच ते हाडशी चे साई मंदिर. ( हा फोटो मागच्या खेपेस पावसाळ्यातील आहे. )

गणपती मंदिर आणि कारंजे
उंदीर मामांच्या हातातील भलामोठा लाडू बघून आम्हालाही भूक लागली.

 तडक मोर्चा खानावळीकडे वळवला. चहा जर बरा होता पण भेळ पुरती 'नापास' झाली होती. 


आता मात्र निघायची तयारी चालू झाली. परत सगळी आभूषणे चढवून आम्ही परत निघालो. आता जाताना मित्राचा वारू ( गाडी) मी हिशोबानेच हाकत होतो. 

घरी आल्यावर उद्याच्या हापिसाची तयारी चालू केल्यावर लक्षात आले की विकेंडला करू म्हणून थकवलेली सगळी कामे तशीच "आ" वासून उभी आहेत. आता खांदा अजून जोरात ठणकायला लागलाय. 'दाखवायचा फोटो " कधी बघायला मिळेल याची अपेक्षा विरून गेलीय.
पण मन मात्र रिफ्रेश झालेय. 
आता हीच स्फूर्ती मला बळ देईल, पुढचा आठवडाभर काम करण्यासाठी. 

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा 
( Salher-Salota Forts)

ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. नाशिक मधला ऐतिहासिक बागलाण प्रदेश,पाठीवर १५ किलो वजन घेऊन जवळ जवळ ३८ तासांची चढाई,४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, सूर्यास्ताला पश्चिमेकडे आलेली केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य,  गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर चंद्राचे प्रतिबिंब आणी उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले, डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा,  उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत  येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा. स्वप्नवत अश्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो.
ओह, ह्या सुखाची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.
 -------------
शेवटी ती वेळ आली ज्याची मी बरेच दिवस आतुरतेने वाट बघत होतो. बऱ्याचं घासाघीसी नंतर हापिसातून ५ दिवसांची सुट्टी मिळाली. लगेच जाऊन सटाण्याचे तिकीट आरक्षण करून आलो आणि मग मोठ्या ट्रेक ची तयारी चालू ....

६  महिने आधीच नाशिक मधले धोडप, मार्केंडेय, रवळ्या, जावल्या, विखारा, हातगड असे मोठमोठे किल्ले पालथे घालून आल्यानंतर बागलाण दुर्गा भ्रमंतीस मुहूर्त लागणेच बाकी होते. तो एकदाचा लागला आणि निघालो आम्ही आमच्या पंढरीला.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगर रांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच... साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड,मांगी तुंगी, तांबोळया, न्हावी रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्स ची इथे पार चैन असते. एकापेक्षा एक अवघड आणि सरस असे किल्ले चढताना दमछाक तर होतेच पण त्यांचा इतिहास ऐकल्यावर मन वेडे होऊन जाते. 

पौराणिक संदर्भ :
भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदी त्यांचे स्थान प्रचीतगडा जवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा  नेम लागत नसावा. म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतः ला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.

 ऐतिहासिक संदर्भ : 
 साल्हेर-मुल्हेर हे किल्ले शिवाजी महाराजांच्या राज्याचा मुकुट होते. फेब्रुवारी १६७२ साली महाराजांनी साल्हेर येथे मुघलांचा पराभव करून हे किल्ले स्वराज्यास जोडले. या युद्धात ५० मुघल सरदार कैद केले गेले. उभयतांचे १०,००० सैन्य कमी आले. ३५० हत्ती , ३००० घोडे, ७०० उंट आणि अगणित संपत्ती महाराजांना मिळाली.
सद्य गुजरातमधील सुरत लूट केल्यानंतर बहुतेक संपत्ती हि या गडकोटांच्या मध्ये दडवली गेली होती. सालोटा हा साठवण करण्यासाठीच निर्मिला गेला असे स्थानिक लोकांकडून कळते. ( पण सुरत लूट हि हा किल्ला जिंकायच्या आधी झाली आहे असे इतिहासातील सनावळी वरून  जाणवते. सुरत लूट हि ५ जानेवारी १६६४ ला घडली तर किल्ला १६७२ ला महाराजांच्या ताब्यात आला.)
 
भौगोलिक संदर्भ :
साल्हेर हा  महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची ५१४१ फूट ( १५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून ४९८६ फूट आहे.
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
नकाशा :

"डांग" हे या किल्ल्याचे अजून एक पायथ्याचे गाव आहे पण ते गुजरात राज्यामध्ये येते. आश्चर्याची गोष्ट हि की या गावाकडे जाताना गुजरात बॉर्डर क्रॉस केली की तत्क्षणी चांगले रस्ते चालू होतात.


आमचा ट्रेक अनुभव :

पूर्ण अभ्यास करून केलेला ट्रेक निश्चितच सुखकारक होतो आणि मनाला आनंद देतो.
पूर्ण बागलाण भ्रमंती सुरू करण्याआधीच आम्ही सर्व किल्ल्यांचे नकाशे गोळा करून घेऊन आलो होतो. त्यामुळे कधी कुठल्या गडावर जायचे हे ठरले. कोणती वाट सोपी आहे? कुठे चुकायची जास्त शक्यता आहे ? दोघेच असल्याने काय करायचे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे काय नाही करायचे ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन आम्ही ट्रेक ची रूपरेषा आखली.
किल्ल्यावर जाणाऱ्या दोन्ही वाटांचा अभ्यास करून आम्ही साल्हेर गावातून न जाता वाघांबे गावातून जायचा निर्णय घेतला. यामुळे जाताना  आम्हाला सालोटा किल्ला पण करता येणार होता. याशिवाय या वाटेने पश्चिमेकडून चढण असल्याने उन्हाचा त्रास होणार नव्हता. तसेच साल्हेर गावातील वाट जास्त लांब असल्याने पाठीवरचे १५ किलो वजन घेऊन ते शक्य झाले नसते.

शनिवारी पूर्ण दिवस प्रवास करून संध्याकाळी ७ वाजता आम्ही 'वाघांबे ' या गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. ST  चा लाल डबा आम्हाला तिथे सोडून पुढे साल्हेर वाडी गावाकडे गेला. 'साल्हेर वाडी' हे गाव किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडे वसलेले आहे. गावामध्येच स्वामी नारायण मंदिरा मध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम ठोकला. गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आमची राहायची आणि पाण्याची व्यवस्था केली. रात्रीचे जेवणाचा डबा बरोबर घेऊन आलो असल्यामुळे ९ च्या सुमारास जेवण केले. मस्त थंडी पडली होती आणि त्यात गुळाच्या पोळ्या .. अहाहा .. 

हेच ते स्वामी नारायण मंदिर...
सकाळी लवकर उठून चढाईस सुरवात केली. जवळ जवळ १५ किलो वजन आता पाठीवर होते. रोजची AC मध्ये बसून राहायची सवय आता चांगलीच महागात पडत होती. थोड्या थोड्या अंतरावर दमछाक होईन आम्ही बसत होतो. मग ९ च्या सुमारास नाष्टा करायचे ठरले आणि वेगवेगळे चिवडे, चकल्या, शंकरपाळ्या बाहेर आल्या. आता पोटपूजा तर झालीच होती म्हणून जोरदार सुरवात करायची ठरली. पण परत आमचा वेग मंदावला कारण आता आमचे कॅमेरे बाहेर आले होते.
दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटूनच उभा ठाकलेला साल्हेरचा प्रचंड किल्ला बघून फोटो काढायचा मोह आम्हाला आवरला नाही.


 थोडे अंतर चढून गेल्यावर साल्हेर आणि सालोटा किल्ल्याचे सुखद दर्शन झाले. दोन्ही  किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडी मधून हि वाट जाते.इथे खरंतर वाटाड्या ( Guide) घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. सर्व वाट रुळलेल्या असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता कमी आहे. तरीही समान जास्त असेल तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना समान खिंडीमध्ये ठेवून जायचे असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो.


साल्हेर किल्ल्यावरील गुहेमध्ये त्या दिवशी रात्रीचा मुक्काम असल्याने पहिल्यांदी सालोटा ला जायचे ठरले. जवळ जवळ २ तासांच्या पायपिटी नंतर आम्ही खिंडी मध्ये आलो. आणि मग दर वेळेच्या प्रथेप्रमाणे रस्ता वैगरे चुकून एक दीड तास वाया घालवल्यानंतर एक गुराखी भेटला. तो महाधर नावाच्या खिंडीच्या पलीकडच्या गावात राहत होता. त्याने आम्हाला रस्ता दाखवला. मग आमचे पाठीवरचे सामान आम्ही त्याच्याकडे देऊन सालोटा किल्ल्यावर चढाई चालू केली.
उतरून आल्यानंतर आम्ही त्याला आमच्याबरोबर खिंडीमध्ये जेवायला बसवले. जाताना ६० रु देऊन आम्ही त्याचे आभार मानले.
( हाच अनुभव मी आधीच्या "काचेचा लोलक या लेखात मांडला आहे. लिंक : http://sagarshivade07.blogspot.in/2013/01/blog-post.html )


कातळात खोदलेल्या पायऱ्या चढताना पुरती दमछाक झाली होती.पण पायऱ्यांची उंची जास्त असल्याने एक तासाभरातच आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.
सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदुन केलेल्या वाटा आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात.

 सालोट्या वरचा दुसरा दरवाजा आणि चिंचोळ्या वाटा

दुसऱ्या दरवाजा नंतर खोदलेल्या गुहा दृष्टीस पडतात. प्राचीन काळात यांचा उपयोग साठवण करण्यासाठी होत असावा. ११:३० वाजता आम्ही सालोट्या च्या शिखरावर पोहोचलो. हा महाराष्ट्रातला ३ नंबर चा उंच किल्ला. येथे पाण्याची सोय नसल्याने पाणी घेऊन जाणे सोयीस्कर. पूर्ण किल्ला पाहून झाल्यावर उतरण्यास सुरवात केली. २ वाजता परत खिंडीत पोहोचल्यावर दुपारचे जेवण पदरात पडून घेतले. जरा वामकुक्षी झाल्यावर साल्हेर च्या दिशेने मार्गक्रमण चालू केले.


सालोट्या वरून दिसणारा Pyramid shaped साल्हेर किल्ला व जाण्याचा मार्ग

खिंडीत बसूनच आम्ही पुढच्या चढाई चा मार्ग आखला. पूर्ण किल्ल्याचे नकाशे आधी काढून घेतलेच होते. ते वाचून कुठे काय बघायचे आहे हे पक्के केले.
पाठीवर जवळ जवळ १५ किलो सामान, सुटलेले पोट, पाणी कमी असल्याने लागलेली तहान, आणि नुकतेच जेवण आणि झोप झालेली असल्यामुळे चढाई करताना फार जीवावर आले.



पण छायाचित्रात दर्शवलेल्या प्रमाणे दगड खोडून केलेल्या वाटांमुळे चढाईस जास्त वेळ लागला नाही. कातळात खोदलेली हि "S" अक्षराप्रमाणे असलेली वाट ट्रेकर्स च्या उत्सुकतेचा विषय असतो.

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार दिसले आणि आम्ही योग्य मार्गावर असल्याची खात्री झाली. किल्ल्यावर जाताना एकूण ६ दरवाजे लागतात. सर्व प्रवेशद्वार हि सुस्थितीत असून प्रत्येक प्रवेशद्वाराचे नक्षीकाम वेगवेगळे आहे.



एक मोठा कातळ चढून जेव्हा आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत आलो, तिथपासून पुढे पूर्ण वाटेमध्ये खोदलेल्या गुहा आणि अवशेष दृष्टीस पडले. तिथून मागे वळून पहिले असता सालोटा चे सुखद दर्शन झाले. मग आम्ही "आपण कुठून कुठून गेलो?" याचा अंदाज बांधत होतो.

 साल्हेर किल्ल्यावरून दिसणारा सालोटा. आणि दर्शवलेली चढण्याची वाट.

तिथून पुढे मात्र अत्यंत चढण असलेले मार्ग तुडवत आम्ही निघालो. या मार्गाने ६ दरवाजे लागतात. घळी सारख्या कोरलेल्या वाटा, पूर्णतः खडकांचा मार्ग आणि जास्त उंचीच्या पायऱ्या मुळे जास्त दमछाक झाली.




अंदाजे संध्याकाळी ४:३० ला आम्ही गुहे पर्यंत पोहोचलो.


 याच गुहेमध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम केला.


गुहेमध्ये थोड्या वेळ विश्रांती घेतल्यावर परत आमचे कॅमेरे क्लिकक्लीकाट  करायला लागले. समोरच्या डोंगर रांगेचे विहंगम दर्शन घडले. समोरच 'खरक मोरा' डौलात उभा होता. हि सगळी डोंगर रंग डोलबरी- सालबरी म्हणून ओळखली जाते. ह्याच्याच डावीकडे मांगी तुंगी याचेही दर्शन होते. साल्हेर आणि मांगी तुंगी मधली डोंगर रांग हि सह्याद्रीचा उगम समजला जातो.



दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा मन मोहून टाकत असतानाच समोरच गंगासागर तलावाचे दर्शन झाले. अल्लाहदायक वाऱ्याने तलावात मंद तरंग उमटले होते. जवळचे पाणी संपलेच होते म्हणून आम्ही लगेच तलावाच्या दिशेने धाव घेतली. तलावाचे पाणी हे मात्र पिण्या योग्य नसल्याने फक्त फ्रेश होऊन आम्ही परत गुहेत आलो. आता वेध लागले होते ते म्हणजे सूर्यास्ताचे आणि तेही महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्या परशुराम मंदिरातून ते बघण्याचे.


५ वाजले आणि आम्ही परशुराम मंदिराकडे चढण्यास सुरवात केली. जवळ पास ४५ मिनिटे चालून गेल्यावर छोटीसी टेकडी दृष्टीस पडली आणि त्याच्या टोकावर मंदिर.
भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदी त्यांचे स्थान प्रचीतगडा जवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा  नेम लागत नसावा. म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतः ला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.

 परशुराम मंदिर आणि भगवा 

साल्हेर च्या शिखरावरून सालोटा किल्ल्याचे होणारे दर्शन नि मनोहारी होते. ५-६ तासापूर्वी आपण याच शिखरावर होतो या विचाराने अंगावर शहारे उमटले. मग स्वतःचे फोटो काढून घ्यायचा मोह आम्हांस आवरला नाही.

 परशुराम मंदिरातून दिसणारा सालोटा 

या जागेवरून जवळपास च्या सर्व डोंगर रंगांचे दर्शन झाले. सालबरी - डोलबरी रांगेतील मांगी-तुंगी, तांबोळया, मुल्हेर, हरगड सर्व गडांचे दर्शन घेऊन मग चाहूल लागली ती सूर्यास्ताची.
 या उच्चतम अश्या मंदिरापासून सूर्यास्त पाहणे हा खरंच सुदैवी क्षण होता. क्षितिज म्हणजे काय असते आणि क्षितिजा मध्ये सूर्य लुप्त होताना पाहणे हे न विसरणारे क्षण होते. ते सुख ज्याचे त्याने अनुभवायचे असे असते. कॅमेरात कितीही छायाचित्र काढून वर्णन करून सांगितले तरी जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असते आणि मनाने अनुभवलेले असते ते कायम मनात घर करून राहते.

निसर्गाचा तो सुरेल आविष्कार डोळे भरून पाहिल्यावर मग जर फोटोग्राफीत किडे करायची हुक्की आली.
मग सूर्य खाताना काय, डोंगरात ढकलताना काय असे काहीही फोटो चालू झाले. त्याचाच एक नमुना.


सूर्यास्त झाल्यानंतर मात्र परतीची वाट पकडण्यासाठी आम्ही आतुर झालो. कारण आम्ही प्रकाशझोत बरोबर घेतले नव्हते. म्हणून अंधार पडण्याआधी गुहेत पोहोचणे अनिवार्य होते. आता सूर्याची जागा चंद्राने घेतली होती. "Replace" झालेला सोबती आमच्या सुखद क्षणांचा साक्षीदार होता.

चंद्र आहे साक्षीला ...
परत गुहेत परतलो तेव्हा सणकून भूक लागली होती. दिवसभराचे श्रम निसर्गाच्या कलाकृतीने झाकोळले होते पण तरीही पोटात मात्र कावळ्यांची काव काव चालू झाली होती. मग आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी चालू केली. सगळ्यात मोठे काम म्हणजे चूल पेटवणे आणि ती विझायच्या आत स्वयंपाक करून घेणे.
वाळलेली लाकडे काही आम्ही घेऊन आलो होतो, तर बरीच गुहेमध्येच पडलेली होती. रॉकेल पासून सगळी तयारी करून आलेलो असल्याने चूल लगेच पेटली. लगेच मग रेडी टू इट सूप आणि म्यागी तयार केले.


खिचडी करण्यासाठी आणलेले समान काढून मित्राने खिचडी तयार केली.  पोटभरूनं जेवण झाल्यानंतर शेवटचे सूप हातात घेऊन आम्ही गुहेबाहेर पडलो.

ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. ४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा,  उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत  येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा.
ओह, सुख यालाच तर म्हणत नसावेत???
बरीच रात्र होईपर्यंत आम्ही टेहळणी करीत बसलो होतो. मग मात्र झोपायला गेलो. स्वेटर, जर्किन पायमोजे आणि वर पांघरून लपेटून झोपी गेलो. गुहेमध्ये उपस्थित असलेल्या आणि आम्हाला नको असलेल्या साथीदाराने रात्रभर खुडाखूड करून आम्हाला शांत झोप लागू दिली नाही.
दिवसभर चालून आल्यामुळे पाय म्हणजे शरीराला जडलेली व्याधी आहे असे वाटायला लागले होते. थोडी विश्रांती घेतल्यावर पाय ठणकायचे  थांबले.
सकाळ मात्र मोहक सुगंधाने झाली. लगेच उठून बाहेरचे सूर्योदयापूर्वीचे दृश्य टिपण्यासाठी कॅमेरे सरसावले. कालची चूल आतापर्यंत शमली होती म्हणून पुन्हा पेटवण्याची शर्थ चालू झाली. त्यात उंदीर मामांनी सगळे रॉकेल पालथे केल्यामुळे अजून चीड चीड झाली सरते शेवटी ती पुन्हा पेटवून गरम चहा पदरात पडून घेतला.



परत गंगासागर तलावात जाऊन पिण्याचे पाणी भरून, ताजेतवाने होऊन परतीची वाट धरली. थोडे पुढे जाताच आम्हांस यज्ञकुंड दृष्टीस पडले. इथे येऊन असे काही बघायला मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती.


उतरताना आता अजून नवे काही दिसणार होते म्हणून आम्ही जोषातच निघालो. नयनरम्य अश्या दृश्यांनी मन भरून गेले.

Fullfill Moments

या किल्ल्याच्या दोन्ही वाटांनी जाताना प्रत्येकी ६ दरवाजे लागतात. वाटेत प्रवेशद्वाराजवळ कोरलेले शिलालेख, दगडात कोरलेले गणपती, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बुलंदी असे बुरूज अन तटबंदी.


पहिल्याच दरवाज्यातून उतरताना अश्या पायऱ्या चा सहारा घ्यायला लागतो. दुसऱ्या बाजूस दरी आणि चिंचोळ्या वाटा ....


किल्ल्यावरील पुरातन बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे. वाटेतले एकूण १२ दरवाजे हे त्याच्या भक्कमपणाची आणि बुलंदतेची  साक्ष देतात. एक गोष्ट नवल वाटण्यासारखी ती म्हणजे प्रत्येक द्वाराची रचना हि भिन्न आहे. त्याच्यावर कोरलेल्या मुर्त्या, नक्षी प्रत्येकाची वेगवेगळी आहे.


या शिलालेखाचा अर्थ मला अजून नाही कळला. पण जाणकारांच्या मते, राजाची आणि किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची माहिती देणारा शिलालेख असावा.
थोडे अंतर चालून गेल्यावर लगेच एक भग्न हनुमानाची मूर्ती आणि भगवान परशुराम यांच्या पादुका दिसल्या. पादुकांच्या शेजारच्या गोल दगडावर निरखून बघितल्यास परशुराम हातात धनुष्य घेतल्याच्या कोरलेला दिसेल.


जवळपास असलेल्या पाण्याच्या टाक्यांवर वेगळीच अशी गुलाबी रंगांची फुले फुलली होती. पूर्ण तलाव या फुलामुळे गुलाबी गुलाबी दिसत होता.


आता आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या दरवाज्यापाशी आलो. चढताना साल्हेर गावातून लागणारा हा पहिला दरवाजा. सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम बांधणी आणि उच्च प्रतीचे कोरीवकाम. तोफेपासून ते छोट्या शस्त्रापर्यंत सर्व काही व्यवस्था केलेली आढळली.



आता भूक लागली असल्याने आम्ही शंकरपाळ्या, चिवडा, फरसाण काढले.इथे बसून थोडीशी पेटपूजा केल्यानंतर गावात एकदाच येणारी ST पकडायची असल्याने मात्र  आम्ही आमचा वेग वाढवला. स्वराज्यातल्या एकूण दुर्गांपैकी मनाचे स्थान आणि मोठा इतिहास असलेल्या साल्हेरच्या आठवणी मनात घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला.
जवळपास १ तासाचा रस्ता बाकी असतानाच एकमेव अशी ST आमच्या समोर टाटा करत निघून जात होती.


खरंच, अश्या दुर्गम भागातही न चुकता येणारी हि बस जगातील दहावे आश्चर्य असावयास हवे असे वाटले.
आता चढणी चा भाग संपून सरळसोट असा पायवाटा लागल्या होत्या. वरूनच पायथ्याशी असलेले एक मंदिर दृष्टीस पडत होते. जवळपास पायथ्याशी आल्यावर आम्ही परत मागे वळून शेवटची नजर टाकून अजस्त्र असा किल्ला डोळ्यात साठवला.
पूर्ण किल्ल्याचा फोटो एकत्र येणं शक्यच नव्हत. म्हणून पायथ्याशी आल्यावर आम्ही पूर्ण किल्ला येईल असा फोटो टिपला. हरिश्चंद्रा प्रमाणे याचाही अतिभव्य कडा हा कोकणकडा सारखा भासत होता.

 साल्हेरचा कोकणकडा 

पायथ्याच्या मंदिरात हनुमानाचे दर्शन घेऊन मग आम्ही अतीव उत्साहाने जंगलामध्ये गेलो. तेथील पुजाऱ्याने आम्हाला सांगितले की गुहा आणि कोरीव शिल्प आहेत तिथे. मग जवळ जवळ २ तास जंगलात मनसोक्त भटकून साल्हेर गावाच्या दिशेने कूच केले.


 आता सूर्य डोक्यावर आला होता तसे पोटात भुकेचा डोंब उसळला होता.पाठीवरचे वजन जर कमी झाले असले तरी खाई खाई करून पोटाचे वजन वाढले होते. बस तर गेलीच होती म्हणून जिपडे ( जीप किंवा टमटम , गावकरी त्यास जिपडे म्हणतात) पकडण्याशिवाय पर्याय नव्हता.नशिबाने एक गाडी उभीच होती म्हणून जेवायचा बेत रद्द करून मुल्हेर गावाकडे कूच केले.

खर्च :
पैशाचे म्हणाल तर, सार्वजनिक वाहतुकीने अतिशय कमी पैशात ट्रेक होतो.
पुणे ते सटाणा : २८५ रु
सटाणा ते वाघाम्बे : २५ रु  ( किल्ला पायथा)
साल्हेर ते मुल्हेर गाव  : २० रु.

वन्य जीवन  :
येथे एकही वन्य प्राणी औषधालाही उपस्थित नाही. सकाळी मोरांचा आवाज कधीतरी येतो. तर उन्हाळ्यामध्ये जवळच्या धरणापाशी बिबट्या येतो असे गावकरी सांगतात.

स्थानिक भाषा :
स्थानिक भाषा हि "अहिराणी" / "ऐरणी" आहे. ती मराठी मिश्रित भाषा असून पूर्ण वाक्यातील काही शब्द ऐकतानाच स्किप होतात.

दळणवळण :
संध्याकाळी ७ ते ७:३० पर्यंत ST वाघाम्बे गावात येते. तेथून पुढे ती साल्हेर गावात जाते आणि रात्री तिथेच मुक्काम करते. तीच बस परत सकाळी निघून वाघाम्बे गावात ८:३० ला येते.
चिंचोली गावावरून साल्हेर ला येणारी बस सकाळी ११ वाजता आणि ५:३० ला साल्हेर गावातून निघते. पूर्ण दिवसात येथे २ वेळाच बस येते.
बाकी खाजगी जीप गाड्या चालू असतात.

ट्रेक प्लान : ( प्लान प्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या तर ते नवलच ....)


22 December
7:10 AM : Travelling to Satana
4: 30PM: @ Satana Bus Stand
5:15 PM: Get bus to Vaghambe vllage
7:30 PM: Reached to Vaghambe village

23 December
7:00 AM : Get up and get prepaid with baggage.
7:30 AM: Start climbing towards Col between Salher and Salota.
9:45 AM: Reached to Col between salher-salota.
10:00 AM: Start climbing towards Salota
11:30 AM: At the top of salota
1:00 PM : Back to Col between salher and salota, Lunch
2:30 PM: Start climbing towards Salher
4:30 PM: Reached at the Cave on Salher and rest.
5:30 PM: Start climbing towards Parshuram temple.
7 to 7:30 PM: Sunset, start downwards back to caves.
8:30 PM: Reached to the caves and started preparation of dinner.

24 December
8:00 AM : Get up and get fresh.
10:00 AM: Start downwards from salher via route to Salherwadi.
1:30 PM:  At the base of Salher, salherwadi village.
Took local transport for Mulher village.



ट्रेकिंग चालू केल्यापासूनचे साल्हेर-सालोटा करण्याचे स्वप्न पूर्ण करून आम्ही मुल्हेर-मोरा करण्यासाठी मुल्हेर गावाकडे निघालो. जीप मध्ये १५ लोक कोंबून आणि त्यात आमचे सामान छतावर टाकून जीप रवाना झाली. त्या भाऊ गर्दीतही आम्ही गप्पा टाकत, फोटो काढत होतो. चालकाने "अच्छा सीला दिया तुने मेरे प्यारं का " हे गाणे लावताच डोळे पुसून, कानामध्ये हेडफोन टाकून आम्ही झोपून घेतले.

गाडी मात्र मुल्हेरच्या दिशेने धावतच होती......

क्रमशः 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर-मोरागड- उद्धव महाराज समाधी

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

लाल पेरु

लाल पेरू

"अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे. तुम्हाला ते जाणवणार नाही पण नुसते त्या दोन शब्दांच्या उच्चारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते. "मोठेपणी तू कोण होणार बाळा?" अश्या बाळबोध प्रश्नांना मी 'डॉक्टर, इंजिनिअर अशी टिपीकल उत्तरे न देत "पेरूवाला" होणार असे उत्तर देऊन सर्वांना चकित करायचो. ( आई वडिलांना लाज आणायचो असेही म्हणता येईल). पण खरंच, लहानपणापासून माझे स्वप्न होते ते पेरूवाला बनण्याचे. "किती मनसोक्त पेरू खायला मिळत असतील न या पेरूवाल्या काकांना? आणि त्यामुळेच हे एवढे चांगले असावेत का? पेरूवाल्या काकांचे गाव कोणते असावे?  नंतर भूगोल शिकल्यानंतर,  अमेरिकेमधील "पेरू" हा देश त्यांच्यामुळेच उदयास आले असावे का ?' असे असंख्य प्रश्न मला पडत असत.
२ रुपयांना मिळणारे पेरू हे जसे अमृताचा गोळा वाटायचे तसे, त्याचे ४ काप करून त्यात तिखट मीठ घालून हिरवागार पेरू देणारे काका हेच मला ईश्वराचे रूप भासायचे.

हिरवेगार तर कधी लाल पेरू खायची इच्छा झाली की मग आम्ही गावात घराच्या मागील पेरूच्या बागेत धूम ठोकायचो. मनसोक्त पेरू खाऊन  झाले की मग त्यातल्या बिया दाताने कडकड चावून कोणाचे दात जास्त चांगले याची स्पर्धा लागायची. गावातील जत्रेमध्ये व बाजारामध्ये पेरूवाले दिसले की प्रत्येकाला भाव विचारायचा आणि घ्यायचा मात्र  एखादाच. पण तो हि घ्यायला पराकोटीची हुज्जत, जिकीर.
एकदा एका झाडाला मोठा पाऊण किलोचा पेरू आल्याची बातमी कळली. ती म्हणजे आताच्या onsite पेक्षा मोठी बातमी होती. विकणाऱ्या व्यक्ती कडून त्याची इथम्भूत माहिती मिळवल्यावर तो आपल्याला परवडणार नाही असे वाटून झालेला हिरमोड, आई कडे त्याच्यासाठी धरलेला हट्ट, त्या काकांनी "आवडल्याय न पोराहो, मग जा की घेऊन " असे म्हणत फुकट देऊ केलेला तो मोठा पेरू, तत्क्षणी "You made my day" असे चेहऱ्यावर उमटलेले भाव, त्यानंतर तो घरी आणल्यानंतर लगेच खाऊन  संपायला नको म्हणून लपवून ठेवलेले ते दोन दिवस, आणि दोन दिवसांनी कापल्यानंतर घरातील सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेले आस्वाद. कधीही विसरू शकत नाही असे ते क्षण.

नंतर परत इथे शिक्षण चालू झाले की सगळे चोचले बंद व्हायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या पेरूवाल्या काकांकडे धाव घ्यायचो. पण खिशात पैसे नसल्याने अधाशी नजरेने ते बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. पेरू कापताना त्याच्या देठाचा भाग जर जास्त कापला गेला की तो खाऊन त्या पेरूची चव "predict" करण्याचा प्रयत्न करायचो. यातच मग " कोणाचे दात जास्त चांगले?" या स्पर्धेचे "कोण लवकर झडप घालून देठाचे काप जास्त खातो" यामध्ये रूपांतर व्हायचे.

त्यानंतर बरेच वर्षे गेली. आयुष्य सावरण्याच्या गडबडीत हि माझी आवड कुठे लुप्त झाली कुणास ठाऊक? त्यानंतर परत माझा पेरू शी संबंध आला तो विमानतळावर. तेथील सामान तपासणी करणाऱ्या माणसाने " You can't take this with you" असे म्हणत माझ्या सामानातील पेरू बाहेर काढून चक्क फेकून दिले. आईने मला खूप आवडतात म्हणून आवर्जून आणून दिले होते. क्षणात माझ्या मस्तकात रागाची भावना उमटली. अनेक विनवण्या करूनही यश आले नाही. शेवटी माझ्या या जिवलगाशिवायच मी देश सोडून गेलो.

असाच एके दिवशी  मित्राची वाट बघत कार रस्त्याच्या बाजूला उभी केली होती, अगदी फुटपाथ ला चिकटून. तेवढ्यात एक पेरू गाडीच्या डाव्या खिडकीतून आत गाडीत पडला."न्यूटन" ला सफरचंद पडल्यावर आणि त्यानंतर शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कैक पटींनी आनंद मला झाला. वाकून बघितले तर एक पेरू विकणारी मुलगी टोपलीत पेरू घेऊन फुटपाथवरून जात होती. अन जागा नसल्याने खेटून जाताना तो पेरू गाडीत पडला असावा.

 " साह्येब घ्या ना  एक पेरू,  छान हिरवेगार आहेत."
  " नाही नको "
" अहो साह्येब घ्या, लाल पेरू बी आहे. तुम्ही कधी खाल्ला नसेल असा, थोडेच उरलेत ५-६, घ्या एखादा "

पटकन सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यातून झरझर सरला. मी काही रुपडे देऊन सगळे टोपलीतले पेरू खरेदी केले . लगेच खायला सुरवात केली. वेदनेने विव्हळ  झाल्यावर आठवले की बहुतेक दातांचे "रूट क्यानोल" झाले आहे. जेव्हा पेरूसाठी मी व्याकूळ व्हायचो अन दात चांगले होते , तेव्हा ते कधीच मिळाले नाहीत. आता टोपलीभरून पेरू समोर असूनही खाण्यासाठी चांगले दात नाहीत. अरेरे !!

अजूनही ते पेरू फ्रीज मध्येच आहेत. त्या लाल पेरूची चव मी अजूनही चाखली नाहीये.
कारण, आता स्पर्धा लागते ती दातांमध्ये, कोणी पहिला तुकडा तोडायचा याची.

बुधवार, २३ जानेवारी, २०१३

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची  लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य 


( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )

हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा  ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा  थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच  मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत.  हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून  देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो.  माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा  पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी  लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही. 
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला  जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है  ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया  करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू  खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले  बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा  क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.

अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??

 कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

रविवार, २० जानेवारी, २०१३

काचेचा लोलक

काचेचा लोलक


कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा ....
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा .....
कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ...........
अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक. 
मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार ! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले. लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये. जवळ जवळ दर रविवार आपण दुर्गभ्रमंतीसाठी बाहेरच आहोत. मग म्हंटले चला  त्याचेच अनुभव शब्दांकित करूया. म्हणून बसलो ब्लॉग लिहायला.

असे का?

खरेतर मलाही नाही माहित असे का... हे म्हणून ते   की  ते म्हणून हे .....पण ..."If there is a cause, there is an effect".... असे बरेच "असे का" मला भेडसावत असतात .. मी जेव्हा जेव्हा नाव्ह्याकडे केस कापायला जातो तेव्हा दर वेळेस न चुकता 'आपके प्यार मी हम गुजरने का सवरने लगे " असे काहीतरी टुकार गाणे का लागलेले असते? दरवेळी सांगूनही  न्हावी परत "साह्येब तुमचे कुच्या गावचे ?" असे का विचारतो ..आणि पुण्याचाच म्हंटल्यावर पुढचे काहीच न बोलता (स्वताच्या मनानीच) केस कापायला लागतो...( पु.ल. चे पुणेकर त्याने ऐकलेले  असावे बहुतेक...त्यात मी दुकानदार आहे हे हि त्यास ठाऊक असावे ....त्यामुळे पुणेरी बोली भाषे प्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान करण्याची "कला " मला अवगत असावी असे त्यास वाटत असणार बहुतेक....)

परवाच बाबांबरोबर जाताना काहीतरी विषय चालू होता मदत करण्याचा ...."आपण कोणासाठी काहीही करायची गरज नाहीये ..आपल्यासाठी कोण काय करते ??? कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे ..." हे वाक्य बोलतानाच मी समोर पहिले कि एक मध्यमवयीन कामगार श्रेणीतला  माणूस आपली सायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून दुकानात  गेला..आणि एक बिस्कीट पुडा घेऊन आला. कामावरून घरी जाताना दमला असेल बहुतेक..लगेच  त्याच्याजवळ तीन चार कुत्री जमली आणि तो त्यांना ती बिस्किटे खाऊ घालू लागला....बऱ्याच  दिवसांची मैत्री असावी त्यांची बहुतेक..बिस्किटे संपल्यावर शांतपणे सायकल काढून तो गाणी म्हणत निघून गेला .."कोणाला कोणाची पडलेली  नसते इथे" असे बोलेलेले वाक्य तोंडातच अडकून पडले ..हे मी कसे बोललो हे माझे मलाच आठवेना .... मी हे करू शकतो का ?? मी रस्त्यात थांबून त्या कुत्र्यांना खायचा घालेन का ? पैशाच्या मागे धावून आपण नक्की काय गमावतोय हाच प्रश्नाचा विचार करतो झोपले ...त्याचे उत्तर मला अजून कसे सापडले नाही... असे का ????

मध्यंतरी मोठ्या दुर्गा भ्रमंतीस  गेलो होतो .. नाशकातल्या बागलाण जिल्ह्यातले उत्तुंग असे मोठे किल्ले माझ्या एका मित्राबरोबर धुंडाळून  काढले...तिथे जाताना 'वाघाम्बे' नावाच्या गावात आम्ही मुक्काम ठोकला .. गावात राहण्याची सोय विचारताच  २-३ माणसे पुढे आली आणि त्यांनी एका मंदिराचा आश्रय दिला .. कोणत्याही मोबदल्याशिवाय त्यांनी आमची  राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था करून दिली..कोणाच्याही चेहऱ्यावर अपेक्षेचा लवलेश हि नव्हता .. गावात अजून माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला. आम्ही मात्र प्रत्येक गोष्ट  पैशात तोलण्याचा स्वभावाचे बळी .. किती घेणार? हा प्रश्न आम्हास सुटेना... किल्ला चढून गेल्यावर दरवेळी प्रमाणे वाट चुकल्यानंतर ( इथे पु.ल.चा एक विनोद आठवला ...कि आमचे रिझर्वेशन खुद्द इंजिनात झाले असले तरी चुकून आम्ही पहिल्यांदी गार्डच्या डब्यातच शिरणार ..) आम्हास एक गुराखी भेटला ..पूर्णतः निर्मनुष्य अश्या डोंगर रांगा  मध्ये तो आम्हाला देवासारखा भेटला...त्याने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला आणि परत आंम्ही जाऊन येइपर्यत आमच्या सामानाची  राखण केली...आम्ही त्याला आमच्याबरोबर जेवायला बसवले ..बरेच प्रश्न विचारले तरी तो मोजकीच उत्तरे देत होता ..त्याला संकोच वाटत असावा असे वाटले म्हणून मी त्याला "अरे खा रे पोटभर" असे म्हणत गुळाची पोळी दिली...गुळाची पोळी तो प्रथमच खात होता असे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवले.. थोड्या वेळाने तो बोलता झाल्यावर म्हणाला कि तो 'महाधर' नावाच्या गावात राहतो आणि शेळ्या घेऊन डोंगरावर येतो .पोटापाण्यासाठी रोजंदारी करायला तालुक्याच्या गावास जातो काधीकाही..पण जायचे पैसे नसले कि उपाशीच बसून राहतो..."सकाळी भाकरी खाऊन आलों होतो रानात आणि संध्याकाळी ५ वाजता घरी परत गेल्यावर खाईन आता" .... आणि पाण्याचे काय ???? "गावामध्येच पिण्यासाठी पाणी नाही आमच्या . इथे कसे घेऊन येऊ ???गावात साधे किरणा  दुकानही नाही तर रोजचा काय शिधा आणणार? आणि कामही काय करणार ? आकाश पांघरून बसतो आणि आणि एखाद्या ओढ्याने तहान भागवतो ... तुमचे बरे  असते कि तुम्हाला नोकरी असते"..हे  त्याचे वाक्य ऐकून  मी खरेच विचारात पडलो. रोजच्या टेन्शन मधून बाहेर पडायचे म्हणून असे फिरण्याचे उपाय अवलंबतो रे आम्ही...खरेच आमचे बरे आहे??? निसर्गाच्या सहवासाचा मागमूसही नाही रे आम्हाला??? चिवचिवणारी चिमणी मी कधी शेवटची बघितली बरे ??? आकाशात चंद्र आणि लुकलुकणारे तारे असतात याची आठवण होते आम्हाला घराच्या भिंतीवरचे रेडियम चे तारे बघून रे.... कपडे आणि बूट भिजतील म्हणून पावसाला किती वेळा डावलले आम्ही???  बहिणाबाई च्या कवितेची आजीची गोधडी अजून कशी ठीगळे  लावलेली ??? टायर खेळतानाची मजा आता फक्त कॅमेरात बंदिस्त करतो आम्ही ...
व्ह्यर्र्र्र्र्र्र्र्र्र ....... अरे हा कुठला आवाज ?????  तो शेळ्या च्या मागे धावत केव्हाच गेला होता .....आमच्या करून कहाण्या ऐकण्यात  त्यालाही रस नसवा बहुतेक...जाताना म्हणाला कि माझे तेवढे मोबाईल चे रिचार्जे करता का तालुक्याच्या गावाला  गेल्यावर ?? नाहीतर मला तेवढ्यासाठी जावे लागेल तिथे ..आम्ही त्याचा क्रमांक घेतला आणि जातो म्हणालो पुढे किल्ल्यावर ... उतरताना दुसरया  गावातून उतरीन म्हणतो किल्ला ... असे म्हणत खिशाकडे हात टाकला .... नको  म्हणत तो जाऊ लागला ..तरीही ६० रुपये देऊ केले आम्ही .. तालुक्याच्या गावास गेल्यावर त्याचे २० रूपयांचे रिचार्जे केले तोच त्याचा फोन आला..धन्यवाद म्हणून....किल्ला उतरताना आमच्या गावाहून.. आमच्या घरी या  ...हे त्याचे वाक्य मनात मात्र घर करून गेले .. ज्याला रोज या दोन वेळच्या जेवणा साठीची मारामार.. तरीही त्याचे मन मोठे होते ... नंतर मात्र भटकंती झाल्यावर जाताना प्रवास हिशोब करताना आम्ही  दोघांनी ते ६० रुपये अर्धे अर्धे खर्च म्हणून वाटून घेतले ....
असे का ????

कित्येक दिवस बाहेरचे खायला न मिळाल्यामुळे मोर्चा Macdi कडे वळवला ...शे पाचशे रुपडे असे उडले. येताना मात्र एक प्रसंग आठवला ..मुंबई ला गेलो असतानाचा.. आमचे खास मित्र आणि भ्रमंतीचे फोटोग्राफर कोतकर साहेब हे दिमतीला हजर होते. गेटवे ऑफ इंडिया ला जायचा प्लान करून आम्ही तिथे पोहोचलो .. खरेच हौशे आणी  गौशे दोघांसाठीची हे स्थान .. एक माणूस काकडी विकत उभा होता.. विकण्यासाठी त्याने काढलेल्या काकड्या च्या साली हि त्याने तिखट मीठ लाऊन विकण्याचा घाट  घातला होता.. १ रु च्या ५ साली ...आणि खाणारी मंडळीही १ रु देऊन त्या ५ साली खात होती ... मी वेडाच झालो हे बघून .. रोजचा संघर्ष म्हणजे काय असतो .. प्रत्येकाच्या पाजवी ला हा पुजलेला कसा ?
असे का ???

सर, आज मी शाळेतून लवकर घरी जाऊ  का?
आजीबात नाही का ???
सर माझे  पाय खूप दुखत आहेत हो सर.. मला उभे पण राहवत नाहीये ..तुम्ही प्लीज माझ्या घरी फोन करा सर ....
आता काही नाही मधल्या सुट्टीत बघू...गपचूप बस जागेवर ....
सर मला काहीच सुचत नाहीये ...खूप पाय दुखातायेत हो सर ..पायातली शक्ती गेलीय ...त्याचे डोळे पाणावले ..
आजीबात फालतूपणा नकोय....शाळा सुटेपर्यंत  थांब आणि जा मग .. आणि माझ्याकडे फोन साठी पैसे नाहीयेत मोबाईल मध्ये ....
अखेरीस शाळा सुटेपर्यंत त्याला मी थांबवलेच ... मुलांना शिस्त नाहीये...
४-५ दिवसांनी .... अहो सर तुमच्या वर्गातला तो "..." नावाचा मुलगा येत नाही का हो???
नाही .. तो सध्या येत नाही..आणि आता येऊ शकेल असे वाटत नाही.....
का ????
पोलिओ झालाय त्याला .. ट्रीटमेंट  चालू आहे ...
ओह्ह ... जर मी त्याला लवकर सोडले असते त्या दिवशी तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवला असता ??
शिस्त म्हणून त्याला आयुष्यभराचा नको असलेला सोबती मिळाला ...
असे का ???

आपल्यातील चंचलता वाढली आहे .. घरी गरम वरण भात तूप लिंबू असताना आपण नाक्यावर जाऊन वडापाव खातो ...वडापाव रोज खावा लागणाऱ्याची चेष्टा यात नाही ..पण कुठेतरी "चांगल्याला" सुरवात करण्याची गरज आहे असे जाणवले...
असे का ?

परवाच एका कार्यक्रमात सलील कुलकर्णी म्हणाला कि.. शांता शेळ्के यांच्या कवितेतला तो देवळातील झुंबरातील काचेचा लोलक (Prism) आपण आपल्या आयुष्यातून हरवत चाललोय...
देवळातील  झुंबरातुन सापडलेला काचेचा लोलक हरवला माझ्याकडून ....
आणि मग दिसू लागली माणसे पुन्हा माणसासारखी ...गवत पुन्हा हिरवे आणि आकाश पुन्हा निळे ..
बऱ्याच वर्षांनी एक लहान मुलगी धावत आली आणि म्हणाली , आजी , गवत नसते नुसतेच  हिरवे आणि आकाश नसते नुसतेच निळेशार . आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनलेली ...
अरेच्चा माझा हरवलेला लोलक हिला कुठे सापडला बरे ??
त्या देवळातील झुंबराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक ?



उत्तराच्या शोधार्थ मी आहेच ....आपणास काही सुचते का याचे उत्तर ????