मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली

  

रविवारची भटकंती - प्लस व्हॅली 




ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस गणपती बाप्पा पेण वरून घरी आले तेव्हापासून महिनाभर भटकंतीला विराम मिळाला होता. जसे बाप्पा कैलासी परतले तसे मग आमच्या पण दिंड्या सह्याद्रीकडे परतायला सुरुवात झाली. पाऊस पण अजून मस्त लागून राहिलाय तर मग एका छोटेखानी पिकनिक ट्रेकला जायचे ठरले. सकाळी सहाला मंडळी ताम्हिणी घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि पौड सोडताच ढगांच्या दुलईत अलगद पहुडलेल्या डोंगररांगा स्वागतास सज्ज जाहल्या. प्लस व्हॅली मध्ये उतरून मजा करून पुढे सावळ घाटाने अर्ध्यात उतरून ताम्हिणी परिसराचा निसर्ग न्याहाळणे एवढाच आजचा बेत असल्याने मंडळी निवांत होती. 


   


सुमारे आठच्या दरम्यान व्हॅलीच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारा निसर्ग पाहून हरकून गेलो. डोळ्यांच्या नजरेत न मावणारे निसर्गचित्र. दोन डोंगरांच्या दरीचा संपूर्ण भाग ढगांनी व्यापलेला. कुठे क्षितिज संपते आणि आकाश सुरु होते याचा थांगपत्ताही लागणार नाही असे दृश्य. नारायणाच्या साक्षीने निसर्गात चाललेला मंगलमय सोहोळाच जणू. आणि हा असा निसर्गसोहोळा चालू असताना आपण तिथे उपस्थित असणे म्हणजे डोंगरदेवांचे आशीर्वादच ते. 





 "य" फोटो काढून दरीत उतरायला प्रारंभ केला. संपूर्ण ढगांनी व्यापलेली दरी सूर्यनारायणाच्या आगमनाने तळ दाखवू लागली. सुरुवातीला "आज काही दिसणार नाही" असे वाटत होते पण दरीच्या तळाशी उतरताच सूर्यकिरणे साथीला येऊ लागली. असंख्य धबधबे खळखळत त्या निरव शांततेत एक नाद निर्माण करत होते. तेथेच एक मोठाल्या दगडावर पथारी पसरून एका भिडूने आणलेल्या न्याहारीच्या आस्वाद घेतला आणि पुढची वाटचाल चालू केली. 


घळीत पुढे जाताना सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. पाण्याचे मोठे प्रवाह लागतील याची कल्पना होतीच पण शेवाळे आणि चिखल याची युती होऊन ठिकठिकाणी प्रसाद मिळत होता. गणपतीचे नाव घेत मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या मारत, मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत  वाटचाल चालू होती. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. दोन पुराणपुरुष भासावेत अश्या दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीमधून वाटचाल सुरु होती.  सूर्यकिरण पडताच झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा आणि तळ दाखवणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. माथ्यावरून अलगद कोसळणारे धबधबे त्या सुंदरतेत भर घालत होते.  



आता दरीच्या शेवटच्या टप्य्यात पोहोचलो. समोर दिसणारा निसर्ग काय वर्णावा? येथूनच खाली देवकुंडचा धबधबा आहे. समोर सावळ घाटाने कोकणात उतरणारी घाटवाट, गर्द जंगल, आणि शेवटचे दोन मोठ्ठाले पाण्याचे डोह. डोहात मनसोक्त डुंबून खच फोटोग्राफी झाली. शेवाळ साठलेल्या प्रवाहातून घसरगुंडीचा कार्यक्रमही झाला. एव्हाना बारा वाजत आले होते. चार-पाच वेळा डोहात अंघोळ झाल्यावर दरी चढून परत येताना घामाने अंघोळ झाली. मग त्या श्रमपरिहारासाठी ताम्हिणी घाटातल्या अजून एक धबधब्यात जाणे आले.  


असो. अश्या प्रकारे एक नितांतसुंदर भटकंती पदरात पडली आणि यावर्षीचा पावसाळा सुफळ संपूर्ण झाला. 
वाचत राहा. 













शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

आंबी-काळ नदीचे खोरे : घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल

आंबी-काळ नदीचे खोरे :   घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल [ १५ किमी. ]




पहाटे पहाटे भर पावसात मंडळी घोल गावाच्या दिशेने रवाना झाली. वेल्हे तालुक्यातले शेवटचे गाव घोल. टायरचे मेदुवडे होतील अश्या रस्त्याने पोहोचायला चार तास लागले. गावात पोहोचताच सात वर्ष्यापूर्वी दापसरे ते घोळ मातीचा रस्ता असताना कोकणदिवा जाण्यासाठी एकटा बाईक वर आलेलो त्याची आठवण आली. नशिबाने येथील निसर्ग आजही तसाच आहे. गावातून वाट्याड्या घेऊन सुरु झाली अजून एक वेगळ्या वाटेवरची भटकंती.

घोल गाव चहुबाजूनी उंचच उंच डोंगरांनी वेढले आहे. दोन दिवसात एकदा मुक्कामी एसटी येते. पण पानशेतचा रस्ता खचल्याने सहा दिवस गाडी आलेली नव्हती. पावसाळी शस्त्रे अंगावर चढवून, चहा घेऊन खिंडीची वाट धरली. खिंडीतून उजवीकडे चढत सुमारे तासाभराच्या चढाईने माथ्यावर येऊन पोहोचलो. येथून डोंगरांनी वेढलेला आजूबाजूचा नजारा आणि कोकणपट्टा बघणे म्हणजे नेत्रसूखच पण आज पावसाच्या कृपेने हे होणे नव्हते.




माथ्यावर एके ठिकाणी सतीमंदिर लागते ते सोडले तर पूर्ण घनदाट जंगल. इथे हरवला तर आठवडाभर भेट होणे नाही असा भाग. त्यात जोरदार पावसाने चिखलमय झालेल्या वाटा तुडवत, घसरगुंडी करत जायची मजाच वेगळी. सती मंदिरापाशी नमन करून उजवीकडच्या धारेने आंबे धनगरवाडीची वाट धरली. स्थानिक आंब्याचा दांड म्हणतात. येथे वाटाड्या नसेल तर अवघड आहे. सगळ्या वाटा पावसाने मोडून गेलेल्या आहेत. वाट काढत आणि असंख्य प्रवाहांमधून प्रवास करत अंदाजे तीन चार तासांनी धनगरवाड्यात पोहोचलो.



येताना घरून लहान मुलांचे दोन पोती कपडे आणले होते. घोल आणि गारजाईवाडी गावात एकही लहान मुलं नाहीये. लहान काय तरुण लोकही सगळी बाहेर. म्हणून मग ग्रुपमधील सवंगड्यांच्या मदतीने ती दोन पोती इथपर्यंत आणली होती. भर पावसात- सोसाट्याच्या वाऱ्यात बिनधास्त बागडणाऱ्या छोट्या मित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून आजची पायपीट वसूल झाली म्हणता येईल.

आंब्याचा दांड येथे पोटोबा करून धारेवरून खाली उतरायला चालू केले. दिवसभर पाऊस येत-जात होता पण जशी उतराई चालू झाली तशी आमची मजा बघायला तो पुन्हा जोरात आला. डोक्यावर अखंड पाऊस सोसत, लाल मातीच्या चिखलातून सटकत, प्रसाद घेत मंडळी एकदाची गारजाईवाडीत पोहोचली. गावात जाऊन दोन फणस डोईवर घेऊन यात्रा पुढे निघाली. आता येथून मोठाल्या धबधब्याची रांग लागलेली. कुठे भिजू कोठे नाही असे झालेले. शेवटचा जलप्रपात तर केवळ कमाल. अर्धा तास तेथे डुंबत राहिलो. गावात पोहोचलो, येथील इंद्रायणी तांदूळ म्हणजे अहाहा! मग इंद्रायणी,नाचणी, वरई खरेदी झाली. चहा पिऊन सात तासांची १५ किमीची भटकंती संपवली आणि पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

घोळ खिंडीत पासून पश्चिमेकडे पडणारा पाऊस कोकणातून सुमारे हजारभर किलोमीटर चा प्रवास करून अरबी समुद्रात विलीन होतो तर खिंडीच्या पूर्वेकडील पाऊस पानशेत वरून देशावरील जवळपास पंधराशे किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात जातो. हाये की नाय आपल्या सह्याद्रीची गम्मत !








सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

पुरंदर ते कात्रज [ P2K]

 कालचा वर्षाविहार - P2K [ पुरंदर, नारायणपूर ते कात्रज ]



सध्या पावसाने दडी मारली असली तरी पावसाळी बेडकं मोठया प्रमाणावर बाहेर पडलीयेत. वर्षाविहाराचा आनंद घ्यायचा म्हणजे कुठेतरी आडवाटेवर तुफान तंगडतोड करायला हवी या विचाराने दहा भिडू लोक्स घेऊन पुरंदर ते कात्रज चा प्लॅन ठरला. पहाटे पाचला नारायणपूर पोहोचून पावसाची आभूषणे चढवली आणि गणेशाचे नाव घेऊन पायपीट चालू केली. रस्ता काही माहित नव्हता आणि त्यात अंधार. त्यात अजून भर म्हणजे  ढगांनी व्यापलेला आसमंत. कुठून कुठे जायचे माहित नाही आणि आजूबाजूला माणसाचा मागमूसही नाही. मग अश्या वेळेस gpx फाईल कामाला आली. आमच्या काही ट्रेकर दोस्तांनी मागच्या वर्षी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी दिलेल्या gpx फाईल मुळे पुढचे मार्गक्रमण करता आले. 



सुरवातीलाच पावसाने स्वागत केले म्हणून रेनकोट चढवला होता. आता जशी चढाई चालू झाली तशी निवडुंगाच्या आणि काटेरी झाडांच्या मधून वाट काढताना त्यांनी आणि रेनकोटची गळाभेट व्हायची. "मी फ़ाटेन पण अडकणार नाही"  अश्या रेनकोटच्या भूमिकेमुळे संघर्ष टिपेला पोहोचण्याआधी बॅगेत घालून ठेऊन दिला. सुमारे एक दिड तासात अंगावरचा चढ चढत, चिखलातून सटकून प्रसाद घेत घेत कानिफनाथ मंदिरात पोहोचलो. जोरदार वारा आणि दृश्यमानता शून्य. येथून पुढे चिखलातून घसरा-घसरी करत पुढे खंडोबाच्या मंदिरात पोहोचलो. येथून पुढे उतराई चालू झाली आणि दूरकर वाडी गावाच्या दिशेने मंडळी निघाली. 



दूरकर वाडीत उतरलो तेव्हा आता कुठे वातावरण स्वच्छ व्हायला लागले. पाच तास पाऊस आणि ढगांमधून वाट काढत आलो आणि पुढे पावसाचा मागमूस नव्हता. दूरवर चतुर्मुख मंदिर दिसू लागले तसे चालण्याचा उत्साह अजून वाढला. वाटेत एका आंब्याचा झाडाचा शेवटचा स्टॉक रिकामा करून हापेवाडीत पोहोचलो. पाणी भरून घेऊन दरे गावाच्या दिशेने प्रस्थान केले. 



आताशा १६ किमी चालणे झाले होते. डोक्यावर सूर्यदेव तळपू लागले होते. भर उन्हात दरे गाव ते चतुर्मुख मंदिराची चढाई घाम काढत होती. चतुर्मुख  मंदिरात पोहोचलो तसं सात आठ कुत्र्यांनी जोरदार गलका केला. त्यांना गाडीतून येणाऱ्या टापटीप सेल्फी लोकांची सवय असल्याने चिखलाने हातपाय माखलेली मंडळी आली तरी कुठून हा प्रश्न पडला असावा. येथे मस्त पेटपूजा करून अर्धा तास निद्रादेवीची आराधना केली. दुपारी दिड वाजता जड झालेले पाय उचलत गोगलवाडी गावाच्या दिशेने उतरायला लागलो. म्हशी वळायला आलेल्या ग्रामस्थांनी पुढची वाट समजावून सांगितली आणि आम्ही कात्रज खिंडीच्या दिशेने निघालो. 




मी महिन्यात रेहेकुरी अभयारण्यात गेलेलो तेव्हा दिसले नाही तेवढे प्राणी कालच्या ट्रेकमध्ये दिसले. बिबट्याच्या पायाचे ठसे/ विष्ठा , हरीण, घोरपड, मुंगूस , घोणस, आणि ट्रेकच्या शेवटी अगदी कात्रजच्या मागच्या डोंगरवर झुपकेदार शेपटीची कोल्ह्याची जोडी. कात्रज पोहोचलो तेव्हा चार वाजत आले होते. दिवसभरात पहाटे पाच ते दुपारी चार अशी अकरा तासांची आणि २६ किलोमीटर्सची छान भटकंती झाली. 


असो! फोटोंचा आनंद घ्या!

सोमवार, ४ जुलै, २०२२

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा - लिंग्या घाट - कुर्डूगड - निसणीची वाट

धामणओहोळ - लिंग्या घाट - कुर्डूगड - निसणीची वाट - धामणओहोळ 


मागील आठवड्यात फेसबुकने मागच्या वर्षीच्या केलेल्या "कुर्डूगडाच्या" या अविस्मरणीय ट्रेकची आठवण केली आणि लगेच डोळ्यासमोर तो अनुभवलेला रौद्ररूपी जलप्रपात आला. येथील "धबाबा तोय आदळे" या वाक्याची अनुभूती देणारे धबधबे पहिले की अजून छोटे मोठे धबधब्यांचं काय ते कौतुक?   योगायोगाने मित्रायादीतील एक भिडू त्याच ट्रेकला जात असल्याचे कळले आणि मग काय .. निघाली मंडळी धुवांधार पावसातल्या डोंगरयात्रेला.


अविरत कोसळणाऱ्या पावसात धामणओहोळ ची वाट धरली. डोक्यावर कोसळणाऱ्या भर पावसातही गावातील मंडळी पाणी भरण्याच्या लगबगीत होते. वाफाळता चहा घेऊन वाटाड्या शोधायची मोहीम निघाली. गौरी पूजनाचा दिवस असल्याने गावातले सगळी मंडळी गौराई आणायला रानात गेलेले. योगायोगाने एक गृहस्थ तयार झाले आणि लिंग्या घाटाने उतरून निसणीने वर यायचा प्लॅन झाला. 

हिरवेकंच निसर्ग, भरभरून वाहत असलेले प्रवाह, डोईवर होणारा अखंड पावसाचा अभिषेक, ढगांनी व्यापून टाकलेला लिंग्या घाटाचा नजारा, रौद्रभीषण या शब्दाचा पुरेपूर अनुभव करून देणारा लिंग्या घाटातला जलप्रपात, शेवाळलेल्या दगडांनी दोन तीन वेळा दिलेला प्रसाद...शेवटच्या टप्प्यात पावसाने झोडून काढल्यानंतर काही वेळात झालेले निरभ्र आकाश आणि कुठे पुथ्वी संपते आणि कुठे स्वर्ग चालू होतो याचा पत्ता लागू न देणारे अफलातून असे नजारे .... सगळे काही शब्दातीत.... 

सह्याद्रीच कसं देवासारखा असतं ...तो भरभरून देत राहतो ..आपण आपल्या कुवतीप्रमाणे आयुष्याच्या ओंजळीत भरत राहायचं ... 



















गुरुवार, २६ मे, २०२२

सिंहगड - राजगड - तोरणा - रायगड पदभ्रमंती मोहीम [ SRTR Trek ]

 शिवजयंती २०२२ विशेष


सिंहगड - राजगड - तोरणा - रायगड अशी ९२ किलोमीटर्सची पदभ्रमंती मोहीम  [ SRTR Range Trek ]


दिवस १ : आतकरवाडी - सिंहगड किल्ला - कल्याण दरवाज्याने विंझर - साखर - गुंजवणे - राजगड किल्ला - भुतोंडे खिंड [ ३०.४  किलोमीटर्स ] 

दिवस २ : भुतोंडे खिंड - तोरणा किल्ला - वाळंजाई दरवाज्याने भट्टी - गेळगाणी - हरपुड -  ब्राम्हणवाडा - मोहरी  - रायलिंग पठार - मोहरी   [ ३५ किलोमीटर्स ]

दिवस ३ : मोहरी - बोराट्याची नाळ - लिंगाणा पायथा - लिंगणमाची - पाने - वारंगी - टकमकवाडी - रायगडवाडी - नाणे दरवाज्याने रायगड - चित्त दरवाज्याला मोहीम समाप्त. [ २७ किलोमीटर्स ]




।। हर हर महादेव ।।

आपल्या आयुष्यरुपी अत्तराच्या कुपीत कधीही न विसरता येणाऱ्या अनुभवांचे अत्तर नियमित टाकायला हवं. त्याचा दरवळणारा सुगंध म्हणजेच आठवणी आपल्याला आयुष्यभर जगायला ऊर्जा देतात. आजची आमची ही शिवजयंती विशेष मोहीम अगदी तशीच अत्तरासमान आहे. जेव्हा जेव्हा शिवजयंती येईल तेव्हा ह्या मोहिमेची आठवण आल्याशिवाय काही राहायची नाही. महाराजांच्या पराक्रमाचे मूक साक्षीदार आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातील या वाटांनी शिवजयंती दिनी श्री दुर्गदुर्गेश्वराला जाता येणे यापेक्षा मोठे भाग्य ते कुठले? 

सिंहगड - राजगड - तोरणा - रायगड हे किल्ले वेगवेगळे केले होते पण एकसलग डोंगरधारेवरून तीन दिवसाची मोहीम आजपर्यंत झाली नव्हती. रायगड प्रभावळीतील वाटा आणि प्रदक्षिणेच्या निमित्ताने सलग तीन रविवार रायगड जाणे झाले होते पण तीन दिवसात नव्वद किलोमीटर्सचा पल्ला ऐकून आजपर्यंत त्याचे कधी धाडस केले नव्हते. आज तो योग आला आणि दैवी रचना म्हणतात तसे सगळे काही जुळून आले. ते म्हणतात ना .. "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है ... कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है !!"

मोहिमेत कुठेही वाटाड्या घेतला नव्हता पण काही मार्ग आधी केले असल्याने माहित होते. विंझर ते गुंजवणे गाडीरस्ता टाळून शेतातून जाणारा मार्ग, तोरण्याचा वाळंजाई दरवाज्याने भट्टी गावात उतरणारा ते पुढे मोहरी पर्यंत हे रस्ते माहित नव्हते त्यामुळे तेथे वाटा शोधण्यात काही वेळ जाईल या हिशेबाने नियोजन आखले होते. आदल्या रविवारी घाटमाथ्यावरील माणगाव /चांदर पासून निसणी वाटेने पाने गावात जाऊन आलो तेव्हा बोराट्याच्या नाळेचा भूभाग थोडा लक्षात आला. पाने गावातून रायगड किती वेळ लागू शकतो याचा थोडा अंदाज घेतला. तिन्ही दिवस सुमारे १५ किलो वजन पाठीवर घेऊन रोजची ३० किमी चढाई-उतराई होती आणि त्यात शेवटच्या दिवशीचे वेळेचे नियोजन महत्वाचे होते कारण रायगडाचे द्वार संध्याकाळी पाच वाजता बंद होतात. अश्या तयारीने मोहिमेस सुरुवात झाली. .gpx फाईल्स बरोबर होत्या पण त्याची फार काही गरज पडली नाही. स्थानिक लोकांशी बोलून पुढची वाटचाल ठरायची. भटकताना जिथे जिथे वाट चुकलो तेथे सुदैवाने कोणीतरी स्थानिक व्यक्ती देवासारखी धावून यायची. मोहीम यशस्वी होण्यात त्या "अनामिक" व्यक्तींचा खूप मोठा वाटा आहे. 

असो. तर तीन दिवसाची भर उन्हातली खडतर मोहीम पार पडली ती अशी - 


दिवस १ : आतकरवाडी - सिंहगड किल्ला - कल्याण दरवाज्याने विंझर - साखर - गुंजवणे - राजगड किल्ला - भुतोंडे खिंड [ ३०.४  किलोमीटर्स ] 

पहाटे चार वाजता गजाननाला नमस्कार करून मंडळी सिंहगडाच्या दिशेने निघाली. पाठीवर १४-१५ किलोची बोचकी घेऊन बरोबर सव्वा-पाचला सिंहगडाचा चढाई चालू झाली. पुणे दरवाजा पोहोचलो तेव्हा तांबडफुटीला सुरुवात झालेली. नियमिय सिंहगडावरआलेली  मंडळी आमच्या पाठीवरील बिऱ्हाडं पाहून आमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन गेली. तडक कल्याण दरवाजा गाठून खालच्या डोंगरधारेने विंझर गावाची वाट धरली तोपर्यंत झुंजार बुरुज सकाळच्या सोनसळी किरणांनी न्हाऊन निघालेला. नारायणाला वंदन करून पुढे निघालो तसे पुढचे लक्ष्य दृष्टीक्षेपात आलेले ते म्हणजे गडांचा राजा... राजांचा गड..  "राजगड"!

पहिले लक्ष काबीज! किल्ले सिंहगड!

कल्याण दरवाज्याने विंझर कडे उतरताना. समोर दिसणारा राजगड. 

सिंहगड कल्याण दरवाज्याने 

दोन अडीच तासात विंझर गावात पोहोचलो तेव्हा उन्हे चांगलीच तापू लागलेली. एका शाळेत पाणी भरून क्षुधाशांती झाली. येथून आता राजगडाचे पायथ्याचे गाव गुंजवणे गाठायचे होते. गाडीरस्ता लांब पडेल म्हणून शेतातून साखर गावाची वाट धरली. नदीमार्ग ओलांडून साखर गावात पोहोचलो तेव्हा मध्यान्ह उलटून गेलेली. पुराणपुरुष भासावं असं एक मोठ्ठालं आंब्याचं झाड एक बांधाच्या कडेला ऊन्ह थोपवून उभं होतं. त्याखाली पथाऱ्या पसरल्या. तीन गुळाच्या पोळ्या साजूक तुपाशी चोपून चांगली तासभर झोप पदरात पाडून घेतली. 

वामकुक्षी 

दुसऱ्या दिवशी शिवजयंती असल्याने आजूबाजूच्या गावात खास माहौल होता. प्रत्येक गावातून मोठाले लाऊडस्पिकर लावलेले. त्यातली "रमणीय?" गाणी ऐकत आता आमची गुंजवण्याच्या दिशेने वाटचाल चालू झाली.

"कोरोनाने जाशील मरून! .... घे रे प्रेम करून!"
हे अद्वितीय गाणे जेव्हा ऐकले तेव्हा मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा का मिळालेला नाही याचा बोध झाला. जेवण झाल्याने जड पावले उचलत गुंजवणे पोहोचलो आणि भर दुपारी साडे-तीन वाजता राजगड चढाई चालू केली. ऊसाचा रसाने दमलेल्या शरीरात थोडेफार प्राण फुंकले तर् इलेक्ट्रॉल, काकड्या, चिक्की इत्यादी मंडळींनी पाठपिशवीतून पोटात बदल्या करून घेतल्या तेव्हा कुठे ऊर धपापत का हॊइना पण पद्मावती माची गाठता आली. 

राजगड चोर दरवाजा 

राजगड बालेकिल्ला 

पद्मावती देवीचे दर्शन घेऊन पुढील वाटचाल यशस्वी होऊदे म्हणून मनोमन साकडे घातले. टाक्यातले थंडगार पाण्याने जरा जिवात जीव आला. किल्ल्यावर खूप गर्दी होती. ठिकठिकाणी भगवे झेंडे फडकत होते. सदरेवरून संजीवनी माचीचा मार्ग पकडला तेव्हा जनता शून्य झाली होती. आजचा टप्पा हा सगळ्यात मोठा आणि अवघड होता. तो वेळेत पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. ग्रुपमधील काही मंडळी मागे पडल्याने त्यांची वाट बघत संजीवनी माचीवर बसलो तेव्हा संजीवनीवरून सूर्यास्त पाहायची खूप वर्षांपासूनची मनीषा आज पूर्ण होत होती. 

संजीवनी माचीवरून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा काय वर्णावा? अहाहा ! मंगलमय सोहोळाच जणू! संजीवनी माचीचे आजही अभेद्य असे ते रूप, त्यापुढे अलगद पसरलेले सह्याद्रीचे असंख्य पदर, पश्चिमेला आभाळी आलेली केशरी झालर, मिनिटागणिक लालबुंद होत जाणारे सूर्यदेवाचे बिंब, घामाने डबडबलेल्या अंगावर येणारा पश्चिमेचा थंड वारा, दरीत कोसळणाऱ्या कड्यांमधून घुमणारा छत्रपतींचा जयघोष! केवळ शब्दातीत! छंदातून स्वप्नाकडे नेणारा आनंद!

संजीवनी माचीवरून दिसणारा सूर्यास्त 

मागे राहिलेले भिडू जमले तेव्हा सूर्यास्त झालेला. सिंहगडावर सूर्योदय ते संजीवनीवर सूर्यास्त. आता भुतोंडे खिंडीपर्यंत वाटचाल अंधारात करावी लागणार होती. वाट मळलेली असल्याने विजेरी घेऊन निघालो भुतोंडे खिंडीत कचरेवस्तीत आलो तेव्हा रात्री नऊ झाले. आजचा मुक्काम खिंडीत एका घरात होता. गरमागरम पिठलं -भाकरी समोर आली तेव्हा जेवायचेही भान उरले नव्हते. पण दिवसभराच्या पायपिटीने बेक्कार भूक लागलेली. छान जेवण झाले. आज दिवसभरात ३२ किमी भटकंती झाली होती. त्यात दोन किल्ले चढाई -उतराईने शारीरिक क्षमतेचा खरा कस लागला.  पहिला टप्पा तर यशस्वी ठरला होता. भिडूंची संख्या १३ वरून अर्ध्यावर आलेली. उद्याचे लक्ष होते रायलिंग पठार. पुढचे सगळे जगदीश्वराच्या मनात असेल ते होईल या विचाराने निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.

उद्याचे लक्ष : किल्ले तोरणा 

दिवस २ : भुतोंडे खिंड - तोरणा किल्ला - वाळंजाई दरवाज्याने भट्टी - गेळगाणी - हरपुड -  ब्राम्हणवाडा - मोहरी  - रायलिंग पठार - मोहरी

घरात झोपल्याने खूप छान झोप लागली. पहाटे चारला थंडीशी दोन हात करत उठलो तेव्हा पायाचा घोटा दुखत होता. काही प्रॉब्लेम आला तर येथून पुढे परतायला संधी नव्हती. गजाननाचे स्मरण करून आणि चालायला चालू केले कि थांबेल या विचाराने पहाटे पाचला तोरण्याच्या दिशेने चढाई चालू केली.

भुतोंडे खिंडीतून चढताना दहा मिनिटातच घामाने अंघोळ झाली. वातावरण थंड होते. दरीखोरे हळूहळू जागी होत होती. पक्षांचे आवाज आणि डोईवर पूर्णचंद्र अनुभवत रडतोंडी बुरुजाच्या खालच्या धारेवर पोहोचलो. आता सूर्योदयाची वेळ झाली होती. राजगडाच्या अवकाशात त्याचे पडघम उमटू लागलेले. पहिल्या सूर्याच्या किरणांनी आळसावलेल्या प्रचंडगडाच्या खोऱ्यात नवी तरतरी आणली. रडतोंडी बुरुजाचा काळाकभिन्न कातळ अजूनच चमकू लागला. तो मंगलमय सोहोळा अनुभवून शेवटच्या टप्प्यातील शिडी चढून कोकण दरवाज्याने तोरणा किल्ल्यात प्रवेश झाला. मेंगाई देवीला बुधला माचीवरूनच मनोमन नमस्कार केला. बुधला माचीला महाराजांची शिवगर्जना देऊन वाळंजाई दरवाजा शोध चालू झाला. या वाटेने आपण वेल्हे-केळद मार्गावरील भट्टी गावात पोहोचतो. मळलेल्या पाऊलवाटेने वाळंजाई दरवाजा शोधायला फार कष्ट पडले नाहीत. येथून जोरदार घसाऱ्याने घसरत खाली उतरायला चालू केले. खाली भट्टी गाव जवळ दिसत होते पण रस्ता काही सापडेना. gpx फाईल उघडून त्याआधारे रस्ता शोधायचा प्रयत्न केला. अखेरीस दीड-दोन तासांच्या चालीने भट्टी गावात पोहोचलो तेव्हा दहा वाजत आलेले. 

राजगडावरून होणारा सूर्योदय . 


सकाळचा नाश्ता 

पॅनोरामाची कमाल. 

वाळंजाई दरवाजा, किल्ले तोरणा 

भट्टी गावात विश्रांती झाली, पाणी भरून घेतले. गावात रामाचे फार सुंदर मंदिर आहे. कधी जाणे झाले तर आवर्जून बघायला हवे असे. रामरायाच्या आशीर्वादाने समोरची डोंगरधार पकडून गेळगाणी गावाच्या दिशेने प्रयाण केले. भर बाराच्या टळटळीत उन्हात गेळगाणीत पोहोचलो. शांत टुमदार असे गाव पण कुत्र्यांनी अवघे गाव दणाणून सोडले. एक घरात तांदूळ पाखडणी चालू होती. त्या मामांना फोटो काढू का विचारले तसे मामा घरात जाऊन शर्ट घालून हातात तांब्याभर पाणी घेऊन आले. जेवणाचं काय? येता का जेवायला? इति मामा! त्यांचे आभार मानून पुढे निघालो. गावापुढे जाऊन एका मोठ्या झाडाखाली जेवणं झाली आणि तासभर ताणून दिली. गावात विचारले तेव्हा येथून "मोहरी" गाव दोन तास आहे असे समजले म्हणून अडीच वाजेपर्यंत विश्रांती झाली. इतकी दमणूक झालेली कि पाठ टेकताच काही मंडळींनी घोरण्याचा वरचा "सा" धरला. 

मोहरीकडे जाताना दुपारची वामकुक्षी 

अडीचच्या सुमारास पुढची वाटचाल चालू झाली. गाव सोडून विहिरीवर पाणी भरले. तेथे एक मावशी कपडे धुवत होत्या. त्यांना मोहरीचा रस्ता विचारून पुढे निघालो. जसे एका डोंगरावर आलो तेथून पुढे वाट मिळेना. कुठल्या दिशेला जायचंय हेही नक्की माहित नव्हतं. अर्धा तास प्रयत्न केला पण वाट काही सापडली नाही. परत विहिरीपाशी आलो तेव्हा त्या मावशी धुतलेले कपडे भरून निघालेल्या. त्यांनी परत वाट समजावली आणि आम्ही योग्य वाटेला लागलो. 

त्या मावशी म्हणजे देवच उभा होता असे म्हटले तरी समर्पक. अर्ध्या-एक तासाने चुकून आम्ही परत आलो तेव्हा त्यांची निसटती भेट होणे केवळ कृपा. त्या जर तेव्हा तिथे परत भेटल्या नसत्या तर आज तुम्हाला हा ब्लॉग फक्त गेळगाणी गावापर्यंतच वाचायला मिळाला असता. आणि संध्याकाळची त्या निर्मनुष्य जंगलात आमची जी काय दिशाहीन अवस्था झाली असती ते निराळं. 

दोन तास चालल्यावर अपेक्षेप्रमाणे गाव आले पण ते "मोहरी" नव्हते तर "हरपुड" होते. येथून मोहरी अजून दिड तास. पायातले अवसान गळून गेलेले पण पर्याय नसल्याने देह ढकलत पाऊले निघाली. आता माती रस्ता चालू झाला. अडीच ते सहा चालून शेवटी मोहरी गाव आले. येथे एक घरात आधीच सांगून जेवायची व्यवस्था केली होती. घडाळ्यात बघतो तर सहा वाजलेले. येथून रायलिंग पठारावर सूर्यास्त पाहायला जावे ह्या इच्छेने घरात बॅग ठेवली आणि पळत रायलिंगकडे सुटलो. ३० किलोमीटर्स चालणं झाले होते त्यापुढे पळत अडीच किलोमीटर जाणे दिव्य होते पण एवढी मजल मारल्यावर रायलिंगवरचा सूर्यास्त सोडायचा नव्हता. 

मोहरीतून दिसणारा लिंगाणा, रायगड, कोकणदिवा परिसर 

साडेसहाला रायलिंग पठारावर पोहोचलो तेव्हा सूर्यनारायण मेघातून आपली किरणे सोडवण्यात मग्न होते. लिंगाणाच्या माथ्यावरील भगवा केशरी आसमंतात डौलाने फडकत होता. लिंगाणाच्या माथ्यावर पोहोचलेल्या लोकांचा महाराजांचा जयजयकार कडेकपारीत घुमत होता. रायगडाच्या भाळी टिळा लावल्यासारखे सूर्याचे लालबुंद बिंब मनमोहक भासत होते. सूर्यनारायण हळू हळू रायगडाच्या पाठीशी अस्ताला गेले. काळ नदीचे खोरे आता अंधाराच्या स्वाधीन होऊ लागेलेले. एक नेत्रदीपक सोहोळा संपन्न होत होता. 

लिंगाणा 

रग्गड फोटो काढून परत मोहोरीला आलो. एव्हाना आजचे ३५ आणि एकूण ६७ किलोमीटर्स झालेले. पाय उचलायचीही ताकद नव्हती. सरपंचांकडे जेवण झाले आणि त्याशेजारी घरात पथाऱ्या पसरल्या. सगळे झोपले पण मला काही शेजारचाच्या घोरण्याने झोप लागेना. मग मी घराच्या आत ओसरीवर पहुडलो. समोर बघतो तर सगळी गुरं मस्त रवंथ करत माझ्याकडे बघत होती. घरातून ताक घुसळण्याचा आवाज येत होता. त्या मावशींना विचारल तस एक ग्लास ताज ताज ताक समोर आलं. मग जे काही झोप लागली ते कशाचेही भान उरले नाही. 

आजचा दुसरा दिवसही यशस्वी ठरल्याचे मनोमन समाधान होते. आता हत्ती गेला अन शेपूट राहिले अशी भावना होती. उद्या रायगडखेरीज कुठेही चढाई नाही ह्या विचाराने मनोमन आनंद होता. आता महाराजांच्या पद्स्पर्शाची आणि जगदीश्वराच्या आशीर्वादाची ओढ लागलेली. 


दिवस ३ : मोहरी - बोराट्याची नाळ - लिंगाणा पायथा - लिंगणमाची - पाने - वारंगी - टकमकवाडी - रायगडवाडी - नाणे दरवाज्याने रायगड - चित्त दरवाज्याला मोहीम समाप्त. [ २७ किलोमीटर्स ]

तिसरा दिवस खास होता. बोराट्याची नाळ लिंगाणा पायथ्यापर्यंत माहित होती आणि तेथून पाने गावापर्यंत समजून घेतली होती. पाने गावापासून पुढे अनेक गावं लागणार होती जिथे वाट विचारायला माणसे आजूबाजूला दिसतील. शेवटचा पर्याय गाडीरस्त्याचा होताच. सगळ्या गोष्टी अनुकूल वाटत होत्या. एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे वेळेचा. पाचच्या आत रायगडाच्या महादरवाजांशी पोहोचणे गरजेचे होते. मध्ये कोठे वाट चुकलो किंवा काही कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर वेळेशी स्पर्धा अजून तीव्र होणार होती. या सगळ्याचा विचार करून उजाडू पर्यंत न थांबता पहाटे चारला बोराट्याची नाळ उतराई चालू केली. लिंगाणा आरोहण करणाऱ्या दोन संस्था आल्याने रस्त्यावर मार्किंग केलेले होते त्यामुळे त्याची चिंता नव्हती. 

रोज रात्री पायाला आणि गुडघ्याला तेल लावू या विचाराने विंझर गावातून एक रुपयांचे नवरत्न तेल खरेदी केलेले. रात्री पायाला ते तेल लावून त्यावर मोजे घालून झोपलो. सकाळी दोन दिवसांच्या मोज्यांचा आणि नवरत्न तेलाचा मिळून जो काही वास तयार झाला तो म्हणजे "देशी ऍनेस्थेशिया" म्हणून खपला असता. ते मोजे तसेच पॅक करून ठेवले ना जाणो बोराट्याची नाळ उतरताना अंधारात कुठला प्राणी समोर उभा ठाकलाच तर त्याला कमी कष्टात बेशुद्ध पाडता येईल. जगात काही निरूपयोगी नाही हेच खरं. 😁😁

पहाटे साडे-तीन ला उठून आवराआवर करायला चार वाजले. सरपंचांकडे चहा पिऊन रायलिंग पठाराच्या दिशेने चालायला चालू केले. सुमारे अर्धा तासात बोराट्याच्या नाळेच्या तोंडाशी पोहोचलो. येथून आता अवघड उतरण असल्याने विजेरीच्या प्रकाशात हळू हळू उतरायला लागलो. जिथे अवघड टप्पा होता तेथे जाड लोखंडी साखळी लावलेली असल्याने फार काही कसरत करावी लागली नाही. सगळे जंगल निद्रिस्त होते. नाळेच्या शेवटी खाली दापोली गावातील काही दिवे दिसत होते बाकी संपूर्ण काळोख. दोन टप्पे ओलांडून आता तिसऱ्या अवघड टप्प्यावर पोहोचलो. येथून उजवीकडे लिंगाणा किल्ल्यांच्या पायथ्याशी जाता येते. येथूनच आपण पुढे जाणार होतो. उजव्या हाताने कातळाला बांधलेली दोरी पकडून एकमेकांच्या साथीने हाही टप्पा पार झाला. येथून दहा मिनिटात लिंगाणा आणि रायलिंग पठाराच्या मधल्या खिंडीत आलो. 

बोराट्याची नाळ उतरताना पहाटे. 

खिंडीतल्या सुळके देवतेला वंदन करून पुढे नाळेनेच पुढची वाटचाल चालू झाली. अंधारात काही लोक लिंगाणा चढाई करत होते त्यांचे काही दिवे दिसत होते. एकूणच मान ९० अंशात करावी लागेल अशी चढाई आमच्यातल्या एका सदस्याने कोणत्याही साधनांशिवाय केली होती, त्याचे सर्व सदस्यांनी मनभरून कौतुक केले. लिंगाण्याच्या डोईवर पूर्णचंद्र आमच्या वाटचालीवर लक्ष ठेऊन होता. तांबडफुटीची वेळ झाली तशी घाटमाथ्यावरील शिखरांना सोनेरी साज चढू लागला. नाळेतून समोर निसणीची वाट, गायदरा, बोचेघोळ, कोकणदिवा आसमंतात उंच उंच जाताना दिसत होते. मागच्या रविवारी या वाटांवरील जंगलं भटकत होतो आज त्याच्या समोरच्या. एक छोटेखानी वर्तुळ पूर्ण होत होते. 

निसणीची वाट, गायदरा, बोचेघोळ, कोकणदिवा

एक दीड तासांच्या नाळेच्या उतराईने लिंगणमाचीच्या पठारावर पोहोचलो. टुमदार घरे आता रिकामी दिसत होती. येथील घरे सरकारने खाली पाने गावात विस्थापित केली. आजही ते लोक देवीला आणि होळीला पाच दिवस लिंगणमाचीला येऊन साजरी करतात. सगळीकडे करवंदांच्या फुलांचा मोहक वास सुटला होता. चालताना पायाखाली चिरडला जाणारा दगडी पाला त्यात आपल्या सुवासाने अधिकची भर घालत होता. असे शुचिर्भूत वातावरण आणि समोर आवाक्यात दिसू लागलेले आमचे लक्ष. किल्ले रायगड! 

इथे मोहरीतून बनवून घेतलेला भाकरी-भाजीचा नाष्टा झाला. उरलेला पुढे गावात कोणालातरी देता येईल या विचाराने पॅक करून घेऊन पुढे निघालो. येथून खाली उतरताना रस्ता चुकला आणि आम्ही थोडे भरकटलो. पाने गाव खाली दिसत असल्याने कुठे जायचंय हे माहित होत. "काळ" नदीच्या पात्रात कुठूनही उतरलो तरी पाने गाव गाठता येईल या विचाराने सरळसोट पाण्याच्या वाटेने नदी पात्रात उतरायला सुरुवात केली. अर्धी वाट तर घसरगुंडी करूनच उतरलो आणि जवळपास तासभराच्या खड्या उतराईने आमचे घोडे "काळ" नदीच्या सुकलेल्या पात्रात नाहले.  

लिंगणमाचीत नाश्ता 

दहा वाजता पाने गावात पोहोचलो तसे शाळेच्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून घेतले. आज शेवटचा दिवस होता त्यामुळे बॅगेतले सगळे खायचे पदार्थ एक एक करून पोटात बदली करून घेऊ लागले. पाने गावात रामाचे फार सुंदर मंदिर आहे. रामरायाच्या दर्शनाने वारंगी गावाची पायवाट धरली. येथून वाघेरी गाव जाऊन तेथून जंगलातून रायगडाच्या परिक्रमा मार्गात जात येते असे ऐकलेले पण कोणी जाणकार बरोबर नसल्याने तो मोह टाळला. पाने गावात लोकांनी वाघेरी न जाता वारंगीला जाऊन धरणाच्या पुलावरून जाण्याचा बहुमोल सल्ला दिला. त्यांचा शब्द प्रमाण मानून तासाच्या चालीने वारंगीत पोहोचलो. इथे गावातून रस्ता विचारून धरणाच्या कॉलनीच्या दिशेने निघालो. रस्त्यातून जाताना आमच्या पाठीवरची बोचकी आणि चित्रविचित्र रूप पाहून दोन जाणं थांबली. त्यांना आम्ही सिंहगड पासून चालत इथपर्यंत आलोय हे सांगितल्यावर गाडीवर मागे बसलेला माणूस खाली उतरला आणि त्याने प्रत्येकाचे नाव विचारत हात हातात घेत आमचे अभिनंदन केले. "वारंगीत आमच्या गावात तुमचे स्वागत आहे. तुमच्यासारखी लोक आमच्या गावात येतात याचा अभिमान वाटतो!" आजच्या दिवसाचा हा खास क्षण होता. 


                                                            पाने गावातून दिसणारा सहयाद्री 

धरणाच्या कॉलनी पासून एक पुलाने आम्ही रायगडाच्या प्रभावळीत आलो. एका सुरक्षारक्षक केबिनमध्ये एक वयस्कर व्यक्ती बसलेली त्यांना सकाळी नाष्टासाठी घेतलेले भाजी-भाकरी दिले तसे त्यांनी जवळ बोलावून चेहेऱ्यावरून हात फिरवला. जपून जा रे पोरांनो, टकमक टोकांवरून वाकू नका! लहानपणीची आज्जीची अशी माया हि अशी डोळ्यासमोर तरळली. त्यांचे आशीर्वाद घेऊन आता पोहोचलो टकमकवाडी.येथून पुढे अर्धा तास रायगडवाडी. एक घरात पाणी भरून घेतले आणि नाणे दरवाज्याने रायगड चढाई चालू झाली. 

नाणे दरवाजा , रायगड 

उन्हे डोक्यावर आलेली. वेळ रामराया जन्मला ती टळटळीत बाराची! नाणे दरवाज्याच्या पायऱ्यांशी आमची इंच-इंच लढाई चालू झाली. पावलागणिक देह ढकलणे हा एकच विचार मनात! एव्हाना ८५ किलोमीटर्स चालणे झाले होते. दोन दिवसात एवढे थकलो नव्हतो पण आता कोकणातल्या दमट हवेने प्राण कंठाशी आणलेले. छान आवरून आलेली लोक आमच्याकडे चित्रविचित्र नजरेने पहात होती. आता केव्हा महाराजांचे दर्शन घेतोय आणि जगदीश्वराच्या पायाशी डोकं टेकतोय असं झालेलं. 

दर थोड्या वेळाने थांबत एकदाची आमची पालखी महादरवाजा पोहोचली. भगवे झेंडे घेऊन फोटो झाले. तीन दिवसांचा प्रवास संपायचे सूतोवाच होऊ लागले. महादरवाजा, होळीचा माळबघून महाराजांच्या समोर नतमस्तक झालो. अमाप गर्दी उसळली होती पण त्याची आता पर्वा नव्हती. समोर फक्त मेघडंबरीत विराजमान महाराजांची मूर्ती दिसत होती. मी आजपर्यँत रायगड गेलो नव्हतो तो या सोनेरी क्षणांसाठीच कि काय? स्वराज्याच्या दोन राजधान्या चालून येथे येण्याचे भाग्य आज लाभले. आज आम्ही आलो त्या राजगड ते रायगड या मार्गाने स्वतः महाराज किती वेळा गेले असतील. आज आम्हाला वाटा शोधण्यास कष्ट पडले त्या स्वराज्याच्या वाटांवर त्याकाळी बहिर्जी नाईकांची तुकडी वाटा पिंजून काढत रात्रंदिवस लक्ष ठेऊन असतील.अश्या अनेक विचारांचा गलबला मनात घेऊन जगदीश्वर मंदिराकडे गेलो. गाभाऱ्यात जाऊन शिवपिंडीवर डोकं टेकले. या क्षणाला आमच्या "सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड" संकल्पाची पूर्ती झाली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर "हिरोजी इंदलकर" यांच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख पाहून परतीची वाट धरली. 


महाराज ! मुजरा!

महाराजांची समाधी 

 

मागील ३ दिवस फक्त मुक्त डोंगररांगा, किल्ले, निसर्ग, सूर्योदय, सूर्यास्त, इतिहास, सह्यादीच्या अंगाखांद्यांवरून भटकणे बस इतकेच सोबत होते. आत्ता कुठे पोहोचलो आणि अजून किती चालायचंय याखेरीज मनात कोणतेही विचार नव्हते. सोबत रिकामे पोट, रापलेला चेहरा,संधी मिळताच वेदनांची जाणीव करून देणारे पाय, तृप्त असे मन आणि स्वप्नपूर्ती झालेले डोळे. सगळे केवळ शब्दातीत. 
पावनखिंड पिक्चर मध्ये बाजी म्हणतात- " या दमलेल्या शरीराकडून, तारवठलेल्या डोळ्यांकडून, ऊर धपापणाऱ्या छातीकडून बक्षिसी वसूल करा! " आम्हाला तीन दिवसात अनेक बक्षिसी न मागता मिळाल्या होत्या. संजीवनी माचीवरचा सूर्यास्त, रडतोंडी बुरुजावरून राजगडाच्या डोईवरून होणारा सूर्योदय. गेळगाणीत वाट दाखवणाऱ्या त्या मावशी, २० मिनिटात पळत गाठलेले रायलिंग आणि तेथून दिसणारे सायंकाळचे दृश्य, तोरण्याच्या कडेकपारीत घुमणारा शिवगर्जनेचा निनाद आणि बरच काही! 

असो! तर ९२ किलोमीटर्सचा, तीन दिवसाच्या प्रवासाचा वृत्तांत आता संपतो आहे. काही भाग मोठे झालेत पण पुन्हा कधीतरी हे वाचले जाईल तेव्हा हे तीन दिवस डोळ्यासमोर तरळून जातील हे नक्की!

 

याच साठी केला होता अट्टाहास! 


महत्वाच्या नोंदी : 

१. आमचा तीन दिवसाच्या ट्रेकचा एकूण खर्च - १३०० रु.  झाला. 

( यामध्ये पहिल्या दिवशी सिंहगड पायथ्यापर्यंत येण्याचे टेम्पोभाडे, भुतोंडे खिंडीतील रात्रीचे जेवण [ १५०], मोहरीतील रात्रीचे जेवण, रायगड ते पुणे टेम्पो ट्रॅव्हलर प्रवास आणि मध्ये जेवण ) 

२. पूर्ण वाट मळलेली असल्याने वाट्याड्याची गरज नाही. गेळगाणी ते मोहरी आणि बोराट्याची नाळ उतरून पाने गावात जाणारी वाट आधीच स्थानिकांकडून समजावून घ्यावी. 

३. "Rambler" अँप वर SRTR .gpx फाईल मिळतील त्या डाउनलोड करून नेव्हिगेशन आप्लिकेशन मध्ये ठेवा . वेळेला उपयोगी येतात. 

४. पहिला दिवस जास्त दमणूक होते. दुसरा, तिसरा दिवस त्यामानाने कमी दमणूकीचे आहेत. 

५. टकमकवाडी वरून नाणे दरवाज्याने रायगड जाणे सोपे आहे. चित्त दरवाजा जाऊन वर यायला अजून जास्त वेळ लागू शकतो. 

६. पाने गावात उतरल्यावर डांबरी रस्त्याने न जाता स्थानिकांना विचारून पाने ते वारंगी किंवा पाने ते वाघेरी या वाटांनी जावे. पाने ते वाघेरी रस्ता माहित नसल्यास वाटाड्या घेणे उत्तम. 


विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।

कथा निरूपाने चर्चा । सार्थके काळ जातसे ।।

 

इति लेखनसीमा! 

सागर शिवदे 

साखर गावातील नदी. 
झुंजार बुरुजावरील सूर्योदय 

वाळंजाई दरवाज्याने भट्टी गावात उतरणारी वाट 
भट्टी गावातले राम मंदिर 
बोराट्याची नाळ उतराई 

फक्त नतमस्तक!

निरोप.