पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. दुधासारख्या जलप्रपातांचा साज अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२
ऐतिहासिक मढे घाट आणि सातसडा, लक्ष्मी , नाणेमाची तीन नेत्रसुखद धबधब्यांची मेजवानी.
मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२
रविवारची भटकंती - प्लस व्हॅली

सुमारे आठच्या दरम्यान व्हॅलीच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोर दिसणारा निसर्ग पाहून हरकून गेलो. डोळ्यांच्या नजरेत न मावणारे निसर्गचित्र. दोन डोंगरांच्या दरीचा संपूर्ण भाग ढगांनी व्यापलेला. कुठे क्षितिज संपते आणि आकाश सुरु होते याचा थांगपत्ताही लागणार नाही असे दृश्य. नारायणाच्या साक्षीने निसर्गात चाललेला मंगलमय सोहोळाच जणू. आणि हा असा निसर्गसोहोळा चालू असताना आपण तिथे उपस्थित असणे म्हणजे डोंगरदेवांचे आशीर्वादच ते.
"य" फोटो काढून दरीत उतरायला प्रारंभ केला. संपूर्ण ढगांनी व्यापलेली दरी सूर्यनारायणाच्या आगमनाने तळ दाखवू लागली. सुरुवातीला "आज काही दिसणार नाही" असे वाटत होते पण दरीच्या तळाशी उतरताच सूर्यकिरणे साथीला येऊ लागली. असंख्य धबधबे खळखळत त्या निरव शांततेत एक नाद निर्माण करत होते. तेथेच एक मोठाल्या दगडावर पथारी पसरून एका भिडूने आणलेल्या न्याहारीच्या आस्वाद घेतला आणि पुढची वाटचाल चालू केली.
घळीत पुढे जाताना सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. पाण्याचे मोठे प्रवाह लागतील याची कल्पना होतीच पण शेवाळे आणि चिखल याची युती होऊन ठिकठिकाणी प्रसाद मिळत होता. गणपतीचे नाव घेत मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या मारत, मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल चालू होती. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. दोन पुराणपुरुष भासावेत अश्या दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीमधून वाटचाल सुरु होती. सूर्यकिरण पडताच झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा आणि तळ दाखवणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. माथ्यावरून अलगद कोसळणारे धबधबे त्या सुंदरतेत भर घालत होते.
आता दरीच्या शेवटच्या टप्य्यात पोहोचलो. समोर दिसणारा निसर्ग काय वर्णावा? येथूनच खाली देवकुंडचा धबधबा आहे. समोर सावळ घाटाने कोकणात उतरणारी घाटवाट, गर्द जंगल, आणि शेवटचे दोन मोठ्ठाले पाण्याचे डोह. डोहात मनसोक्त डुंबून खच फोटोग्राफी झाली. शेवाळ साठलेल्या प्रवाहातून घसरगुंडीचा कार्यक्रमही झाला. एव्हाना बारा वाजत आले होते. चार-पाच वेळा डोहात अंघोळ झाल्यावर दरी चढून परत येताना घामाने अंघोळ झाली. मग त्या श्रमपरिहारासाठी ताम्हिणी घाटातल्या अजून एक धबधब्यात जाणे आले.
असो. अश्या प्रकारे एक नितांतसुंदर भटकंती पदरात पडली आणि यावर्षीचा पावसाळा सुफळ संपूर्ण झाला.
वाचत राहा.
शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२
आंबी-काळ नदीचे खोरे : घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल
आंबी-काळ नदीचे खोरे : घोल - सतीदेवी मंदिर - आंब्याचा दांड - गारजाईवाडी - घोल [ १५ किमी. ]
सोमवार, १ ऑगस्ट, २०२२
पुरंदर ते कात्रज [ P2K]
कालचा वर्षाविहार - P2K [ पुरंदर, नारायणपूर ते कात्रज ]
सध्या पावसाने दडी मारली असली तरी पावसाळी बेडकं मोठया प्रमाणावर बाहेर पडलीयेत. वर्षाविहाराचा आनंद घ्यायचा म्हणजे कुठेतरी आडवाटेवर तुफान तंगडतोड करायला हवी या विचाराने दहा भिडू लोक्स घेऊन पुरंदर ते कात्रज चा प्लॅन ठरला. पहाटे पाचला नारायणपूर पोहोचून पावसाची आभूषणे चढवली आणि गणेशाचे नाव घेऊन पायपीट चालू केली. रस्ता काही माहित नव्हता आणि त्यात अंधार. त्यात अजून भर म्हणजे ढगांनी व्यापलेला आसमंत. कुठून कुठे जायचे माहित नाही आणि आजूबाजूला माणसाचा मागमूसही नाही. मग अश्या वेळेस gpx फाईल कामाला आली. आमच्या काही ट्रेकर दोस्तांनी मागच्या वर्षी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी दिलेल्या gpx फाईल मुळे पुढचे मार्गक्रमण करता आले.
सुरवातीलाच पावसाने स्वागत केले म्हणून रेनकोट चढवला होता. आता जशी चढाई चालू झाली तशी निवडुंगाच्या आणि काटेरी झाडांच्या मधून वाट काढताना त्यांनी आणि रेनकोटची गळाभेट व्हायची. "मी फ़ाटेन पण अडकणार नाही" अश्या रेनकोटच्या भूमिकेमुळे संघर्ष टिपेला पोहोचण्याआधी बॅगेत घालून ठेऊन दिला. सुमारे एक दिड तासात अंगावरचा चढ चढत, चिखलातून सटकून प्रसाद घेत घेत कानिफनाथ मंदिरात पोहोचलो. जोरदार वारा आणि दृश्यमानता शून्य. येथून पुढे चिखलातून घसरा-घसरी करत पुढे खंडोबाच्या मंदिरात पोहोचलो. येथून पुढे उतराई चालू झाली आणि दूरकर वाडी गावाच्या दिशेने मंडळी निघाली.
दूरकर वाडीत उतरलो तेव्हा आता कुठे वातावरण स्वच्छ व्हायला लागले. पाच तास पाऊस आणि ढगांमधून वाट काढत आलो आणि पुढे पावसाचा मागमूस नव्हता. दूरवर चतुर्मुख मंदिर दिसू लागले तसे चालण्याचा उत्साह अजून वाढला. वाटेत एका आंब्याचा झाडाचा शेवटचा स्टॉक रिकामा करून हापेवाडीत पोहोचलो. पाणी भरून घेऊन दरे गावाच्या दिशेने प्रस्थान केले.
आताशा १६ किमी चालणे झाले होते. डोक्यावर सूर्यदेव तळपू लागले होते. भर उन्हात दरे गाव ते चतुर्मुख मंदिराची चढाई घाम काढत होती. चतुर्मुख मंदिरात पोहोचलो तसं सात आठ कुत्र्यांनी जोरदार गलका केला. त्यांना गाडीतून येणाऱ्या टापटीप सेल्फी लोकांची सवय असल्याने चिखलाने हातपाय माखलेली मंडळी आली तरी कुठून हा प्रश्न पडला असावा. येथे मस्त पेटपूजा करून अर्धा तास निद्रादेवीची आराधना केली. दुपारी दिड वाजता जड झालेले पाय उचलत गोगलवाडी गावाच्या दिशेने उतरायला लागलो. म्हशी वळायला आलेल्या ग्रामस्थांनी पुढची वाट समजावून सांगितली आणि आम्ही कात्रज खिंडीच्या दिशेने निघालो.
मी महिन्यात रेहेकुरी अभयारण्यात गेलेलो तेव्हा दिसले नाही तेवढे प्राणी कालच्या ट्रेकमध्ये दिसले. बिबट्याच्या पायाचे ठसे/ विष्ठा , हरीण, घोरपड, मुंगूस , घोणस, आणि ट्रेकच्या शेवटी अगदी कात्रजच्या मागच्या डोंगरवर झुपकेदार शेपटीची कोल्ह्याची जोडी. कात्रज पोहोचलो तेव्हा चार वाजत आले होते. दिवसभरात पहाटे पाच ते दुपारी चार अशी अकरा तासांची आणि २६ किलोमीटर्सची छान भटकंती झाली.
असो! फोटोंचा आनंद घ्या!
सोमवार, ४ जुलै, २०२२
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा - लिंग्या घाट - कुर्डूगड - निसणीची वाट
धामणओहोळ - लिंग्या घाट - कुर्डूगड - निसणीची वाट - धामणओहोळ
मागील आठवड्यात फेसबुकने मागच्या वर्षीच्या केलेल्या "कुर्डूगडाच्या" या अविस्मरणीय ट्रेकची आठवण केली आणि लगेच डोळ्यासमोर तो अनुभवलेला रौद्ररूपी जलप्रपात आला. येथील "धबाबा तोय आदळे" या वाक्याची अनुभूती देणारे धबधबे पहिले की अजून छोटे मोठे धबधब्यांचं काय ते कौतुक? योगायोगाने मित्रायादीतील एक भिडू त्याच ट्रेकला जात असल्याचे कळले आणि मग काय .. निघाली मंडळी धुवांधार पावसातल्या डोंगरयात्रेला.
































































