बुधवार, ३ जानेवारी, २०२४

रविवारची छोटेखानी भटकंती : श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड

 

रविवारची छोटेखानी भटकंती : 

श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड  


पृथ्वीलोकात स्वर्गसुख निर्माण करून वरुणराजाला स्वर्गीलोकी परतायची चाहूल लागलीये. निळ्याशार आसमंतात विविध आकाराच्या पांढऱ्याशुभ्र ढगांची ढकला-ढकली चालू झालीये. झाडावर पक्षांची घरट्याची गडबड तर जमिनीवर मुंगळ्यांची वारुळाच्या दिशेने आवराआवर चालू आहे. हिरवीगार गवताची पाती सूर्याच्या प्रकाशाने चमचमू लागलीयेत तर सह्याद्रीचे उंचचउंच डोंगरकडे प्रातः प्रहरी जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांच्या चादरीत डोके खुपसून सूर्यदेवाची आराधना करतायेत. सोनकी, हळदी, कारवी आणि विविध फुलाच्या बहराचा सुवर्ण अलंकार अंगी लेवून सृष्टी हे अलौकिक वैभव अंगी मिरवणार. सह्याद्रीचे रुपडे आता अजून खुलत खुलत जाणार!


 

असा हा निसर्गसोहोळा अनुभवायचा म्हणजे आपण सह्याद्रीच्या डोंगर-कड्यांवर असले पाहिजे नाही का? म्हणून मग प्लॅन झाला तो वेळवंडी नदीच्या खोऱ्याशी सलगी करत वर्षानुवर्षे उभ्या मेहूड खोऱ्यातील सर्वोच्च महादेव तिर्थाला. श्री क्षेत्र घेवडेश्वर! सप्टेंबर महिन्यात गणरायाचे आगमन झाल्यामुळे महिन्याची विश्रांती झाली. पहाटे पाचला मंडळी निघाली आणि  भोरच्या दिशेने रवाना झाली. पायथ्याच्या गावामध्ये प्रशस्त असे भैरवनाथ मंदिराच्या आवारात गाडी लावल्या, पाठपिशव्या चढवल्या आणि चालायला सुरु केले. 


संपूर्ण डोंगर रंगेबेरंगी फुलांचा महोत्सव साजरा करीत होता. हिरवेकंच गालीचे आणि त्यावर नवथर जलबिंदू गात्राला तृप्तीची अनुभूती देत होते. पाऊण- एक तासाच्या चढाईने पोहोचलो धनगरवाडीमध्ये. तेथे पोहोचताच एकमेव अश्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात उदरम- भरणम करून पुढे निघालो. शाळेत आत डोकावून पाहताच आज विस्मृतीत गेलेले काही सुविचार दिसले. येथून पुढे जाताच कातळात कोरलेल्या सुंदर अश्या पायऱ्या लागल्या. अश्या दुर्गम ठिकाणी सहज कातळ कोरून वाटबनवणाऱ्या  मंडळींकडे  नक्कीच काहीतरी सुपर पॉवर असणार या विचारातच डोंगरमाथ्यावर पोहोचलो. 


समोर विचित्रगड आता खुजा वाटू लागलेला. मधूनच एखादी पावसाची सर यायची आणि ढगांच्या पसाऱ्याला बाजूला सारून सह्याद्रीचे अथांग दर्शन घडवायची. कारवीची जांभळी फुले आणि सोनकी, हळदीने ट्रेक भिडूंचे भान हरवलेले. सगळ्यांची जोरदार फोटोग्राफी सुरु झाली. दिड-दोन तासांच्या चढाईने पठारावर पोहोचलो तोच वर्षानुवर्षे भक्तांची पाठराखण करत असलेला मेहूड खोऱ्याचा अधिपती घेवडेश्वरचे दर्शन झाले. सुंदर रेखीव दगडी बांधकाम, शिखरावर फडकणारा भगवा, दगडी कोरीव पण काळाच्या ओघात जीर्ण झालेले दोन नंदी, थोडी मागे गतवैभव आठवत, शेवटचा घटका मोजत असलेली दिपमाळ बघून धन्य वाटले. अश्या उंच डोंगरांवर इतकी सुंदर शिल्पकृती साकारणाऱ्या त्या अनामिक हातांना मनोमन वंदन करून गाभाऱ्यात प्रवेशते झालो. 


"ओम नमः शिवाय" चा नाद मंदिरात दुमदुमला. गर्भगृहाच्या बाहेर दोन बाजूला दगडात कोरलेले गणपती बाप्पा बघून पेशवेकालीन रचना असावी असे वाटून गेले.  समोरच निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली फुलांची आरास बघून त्यातील एक गुच्छ देवाच्या चरणी अर्पण करून परतीची वाट धरली. 


लवकर ट्रेक संपल्याने स्वारी रोहिडा किल्ल्याला निघाली. बाजारवाडी गावातून चढाई चालू केली तेव्हा २००८ साली भोर एस्टी स्थानक ते बाजारवाडी पायपीट वाचावी म्हणून मधूनच डोंगरधारेने चढून चोर दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्याचे आठवले. आज ती वाट चालू नाही असे कळले. गडफेरी करून निघालो तसे पावसाने गाठले आणि पावसाळी ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.   


असो! फोटोंची मजा घ्या!












घेवडेश्वर डोंगराच्या माथ्यावर विराजमान महादेव 

घेवडेश्वर महादेवास पुष्पांजली 




अश्या कातळकोरीव पायऱ्या पाहिल्या कि जो कोणी अनामिक कलाकार आहे त्यास नमन करावेसे वाटते. 

निसर्गाची मुक्तहस्त उधळण!

किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड 


रिफ्रेशिंग रिल्स : 





वाचत राहा. 

सोमवार, १ जानेवारी, २०२४

बागलाण दुर्गभ्रमंती भाग 7- मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा

  



अपरिचीत बागलाण मोहीम ७


नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 

दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे 

===============================================================

दिवस १ : भाग २ - 

उद्धव महाराज समाधी मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणार नेत्रदीपक असा रासक्रीडा उत्सव:


मुल्हेर किल्ल्याचे मूळ नाव मयूरगड!  महाभारतकालीन राजा मयूरध्वज याची राजधानी! आख्यायिकेनुसार,  मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने रासक्रीडेचा उत्सव सुरू केला. मुल्हेरच्या उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० पासून उत्सवाला अधिक प्रोत्साहन दिले. श्री काशीराज महाराज यांना साक्षात श्रीकृष्णाने दिव्य चक्षूंनी रासक्रीडा दर्शन दिले. असे ऐकिवात आहे. रासक्रीडे दरम्यान रासचक्र म्हणजेच 'मंडळ' हे रासस्तंभावर चढवले जाते. सात फुटी लाकडी रासचक्राला बांबू जोडून त्याचा व्यास चौपट म्हणजे २८ फुटी केला जातो. चक्राच्या बाजूला गोलाकार जे खांब लावले जातात ते सात फूट जमिनीत आणि १४ फूट वरती असे सात फुटांच्या हिशेबात असते. रासचक्रावर केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजावट होते. श्रीकृष्ण आणि गोपिका वृंदावनात अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असे मानले जाते. आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना म्हणजेच सायंकाळच्या संपत वेळेप्रसंगी हे रासचक्र भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते. रात्रभर हे रासचक्र हाताने फिरवले जाते. त्याचाही खास मान विशिष्ट समाजाकडे असतो. 


या रासक्रीडादरम्यान अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ पदांचे गायन केले जाते. कोजागिरीच्या रात्री रासचक्र चढविल्यानंतर रात्री दहा पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत न थांबता हे भजन गायन केले जाते. मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, वाद्यांच्या गजरात देवघरापासून ते समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. 


या रासक्रीडेच्या कामांमध्ये प्रत्येक समाजाला सामावून घेतले जाते. पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा न्हावी,तेली कुंभार यांकडे कापसाच्या वाटी बनवणे, दिव्यांना तेल पुरवणे आणि मातीचे दिवे बनवणे अशी अनुक्रमे कामे दिलेली होती. आदिवासी बांधवांकडे जंगलातून केळीची पाने आणि फुले आणायचे काम. शिंपी लोकांकडे रासचक्र बांधण्याचे काम, मराठा समाजातील लोकांना रासचक्र सजावट,मंदिरावर झेंडा लावणे आणि परिसर देखरेखीचे काम, अशी सर्व समाज समावेशक उत्सव काशीराज महाराजांनी सुरु केला. जर कोणाला नवसाने मुलगा झाला असेल तर त्याला गोपिका बनवून त्यांना देव मानून त्यांची मुरवणूक काढली जाते. असा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे. 


हे सगळे डोळ्यात साठवून आजचा दुसरा दिवस संपवला. रात्रभर चालणारी भजने ऐकत केव्हा डोळा लागला आठवत नाही. सकाळी सहाला उठलो तेव्हाही त्याच उत्साहाने भजन गायन चालू होते. मंदिरातील गर्दी आता सरली होती. शांत चित्ताने उद्धव महाराज समाधीचे दर्शन घेऊन मुल्हेरचा निरोप घेतला. आज दुसरा दिवस आणि आजचे लक्ष होते बागलाणमधून खानदेशी भाटकायचा. धुळे जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला - किल्ले भामेर आणि स्थानिक लोकांनाही माहितीत नसलेला किल्ले रायकोट. मुल्हेर येथे कार्यक्रमासाठी जवळच्याच धनेर आमळी नावाच्या गावातून एक ग्रुप आला होता त्यांनी आमचा अवतार बघून विचारपूस केली आणि त्यांच्या गावातील लक्ष्मी नारायणाचे अप्रतिम मंदिर आहे आहे सांगितले. शेषशायी विष्णूच्या एका अखंड दगडातील कोरलेल्या मूर्तीच्या बेंबी मधून सदैव पाणी येते म्हणून लोक त्याला जिवंत विष्णू म्हणतात. अनायसे आज गाडी होतीच तर हे मंदिर बघायचे नक्की करून मंडळी भामेर किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 





रासनाहणाचे चक्र बांधताना 



केळीच्या पानांनी आणि फुलांनी सजावट करताना 


उद्धव महाराज समाधी 

 संपतकाली रस चक्र उचलण्यासाठी जमलेली भाविक मंडळी.  


वाचत राहा.. 

पुढच्या भागात - 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 


रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ६ : लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी

 


अपरिचीत बागलाण मोहीम ६ 


 

नवरात्री संपून जशी कोजागिरी पौर्णिमा जवळ जवळ येऊ लागते तसे वेध लागतात ते मुल्हेरला जायचे. निमित्त असते ते म्हणजे मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला साजरा होणारा रासक्रीडा उत्सव. संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हा सोहोळा साजरा होतो. वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर. ८०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाला  जायचे नक्की होतेच आणि त्यात कोजागिरी पौर्णिमेला आला रविवार! मग म्हंटले एवढे लांब जाणारच आहोत तर बागलाण डोंगररांगेतील बाकी असलेले अपरिचित किल्ल्यांची पण भटकंती होईल मग प्लॅन झाला तो असा - 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 

दिवस ३ : पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव - पुणे 

===============================================================

दिवस १ : पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर येथील रासनहाणाचा नेत्रदीपक सोहोळा - मुल्हेर मुक्काम 

गेल्या काही वर्षात बागलाण प्रदेश बऱ्यापैकी भटकून झाल्याने बागलाण रांगेतील न झालेला शेंदवड गड करूया आणि कोजागिरी च्या मुहूर्तावर शेंदवड गडावर शतकोशतके विराजमान  भवानी देवीचे दर्शन घेऊया, त्यापुढे खानदेशात प्रवेश करून धुळे जिल्हा पालथा घालावा या विचाराने मंडळी शुक्रवारी रात्री निघाली. 

शुक्रवारी रात्री पुण्यनगरीतून पिंपळनेर प्रस्थान केले. खूप दिवसांनी एसटीचा प्रवास घडणार होता. मधल्या दिड -दोन वर्षात ग्रुपचे आणि गाडीने ट्रेक व्हायला लागल्यापासून एसटी /टमटम/जीपड्याने  प्रवास करून किल्ल्याचा पायथा गाठावा, काटेकोर नियोजनात किल्ला करून , परतीची सोय बघत - कधी जीपला लटकत, टपावर बसून दुसऱ्या किल्ल्याला जाणे, तासनतास एसटीची वाट बघत, डोळ्यासमोर फसत चाललेले नियोजन सावरत भटकंती करणे यातली मजा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. यामध्ये वेळ जातो पण तेथील लोकांचे बोलणे-जगणे अनुभवता येते याविचारातच नाशिक आले. फोनाफोनी करून भूषणने नाशिक रोड स्टेशन वरून पण सेम बस पकडली आणि दोघे निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. 

इतकी वर्षे झाली पण खिडकीतून पिशव्या / बाटल्या टाकून जागा पकडण्याची प्रथा आणि सतत सर्वत्र पचापच थुकणारे गुटकावीर हे चित्र आजही तसेच असल्याचे बघून माझे साडे पाचशे रुपड्यांचे तिकीट धन्य जाहले. "पिंपळनेर! उतरून घ्या"  या कंडक्टरच्या हाळीने झोपेतून जाग आली. सामान उचलले आणि भर अंधारात घराच्या दिशेने चालू लागलो.थंडी आपले अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होती. अर्ध्या तासात भुषणच्या घरी फ्रेश होऊन गाडी घेऊन निघालो ते लाठीपाडा धरणाच्या दिशेने. 

बऱ्याच ठिकाणी विचारत विचारात एकदाचे ते पोहोचलो एका छोट्याश्या डोंगरावर अभेद्य अश्या उभ्या छोटेखानी गढीच्या जवळ. गढीच्या खाली असलेल्या एकमेव घराच्या समोर गाडी लावून गढी बघायला प्रस्थान केले. हि गढी खाली राहणाऱ्या काकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चार भक्कम बुरुज आणि मधोमध केलेले कोरीव दरवाजांचे बांधकाम लक्ष वेधून घेते.गढीच्या माथ्यावर उभे राहिल्यास लांबवर मांगी-तुंगी, न्हावीगड ते शेंदवड गड दर्शन देतात. बागलाण च्या दक्षिण दिशेचा भूभाग तेथून न्याहाळता येतो. गढी बांधली त्या छोटेखानी डोंगरावर महाराजांनी काही दिवस वास्तव्य केले होते आणि म्हणूनच महाराज जेव्हा सुरत लुटून आले तेव्हा जे धन साल्हेर आणि परिसरात लपवले गेले त्यातील काही धन येथे या गढीत लपवले होते. गावातली काही बहाद्दरांनी त्या धनाच्या लोभापायी गढीच्या बुरुजांमध्ये खोदकाम करून बुरुज फोडून टाकलेत. गढीच्या मालकांशी गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी त्याबद्दल निगडित काही पूर्व कथा सांगितल्या. एक एक कथा ऐकत घड्याळात अकरा वाजत आल्याचे लक्षात आले आज मोठा पल्ला तर होताच पण शेंदवड गडाची दोन अडीच तासाची चढाई भर उन्हात करायची होती. नमस्कार करून गाडीला टांग मारली आणि शेंदवडचा रस्ता धरला. 


लाठीपाडा गढी 



गढीच्या बुरुजावरून लांबवर मांगी-तुंगी , न्हावीगड , तांबोळ्या 


धनाच्या लोभापाई गढीमध्ये  खोदलेले खड्डे 


शेंदवडगडाचे भौगोलिक स्थान बघितले असता एकदम इंटरेस्टिंग आहे. गड महाराष्ट्र(धुळे) व गुजरात ( डांग सौन्दणे) यांच्या सीमेवर आहे. गडाच्या मागची बाजू गुजरात, समोरच्या डोंगरसोंडे च्या डावीकडची बाजू धुळे तर उजवीकडची बाजू नाशिक जिल्ह्यात येते. असा तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला असल्याने गडाचे स्थान मोक्याचे आहे. शेंदवडगडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा डोक्यावर तळपता सूर्य येथून ठेपला होता. 

शेंदवाड गड प्रवेशद्वार 

वेळ रामराया जन्मला ती भर बाराची. सामान खाली एक घरात ठेऊन किल्ल्याची चढाई चालू केली. घाम पुसत देवीचा जयघोष करत सुमारे दिड तासात गडमाथा गाठला. गार वारा स्वागताला तयार होताच पण डोळ्यांची पारणे फिटतील असे निसर्गदृश्य समोर रेखाटलेले दिसले. बागलाणचे मुख्य शिलेदार येथून दर्शन देतात. समोर मांगी-तुंगी, न्हावीगड, रतनगड , तांबोळ्या तर उजवीकडे मोरागड -मुल्हेर-हरगड-कपार भवानी - म्हातारीचे दात, साल्हेर-सालोटा , हरीणबारी धरण हे ज्ञात आणि कित्येक अज्ञात अशी शिखरे असे सगळे एकाच फ्रेम मध्ये पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुखद, निव्वळ नेत्रसुख!

बागलाणचे दुर्गवैभव 


घाम काढणारी चढाई आहे 


डोळे भरून हा निसर्ग सोहोळा पाहून देवीच्या दर्शनासाठी निघालो. गडावर देवीचे हे मंदिर आहे आणि पाण्याचे एक टाके दिसले. वरती सुळक्यावर अर्ध्यापर्यंत जाता येते पण ती रिस्क न घेता मंदिरात प्रवेशते झालो. पूर्ण दिड तासांच्या चढाईत आम्हाला कोणीही भेटले नव्हते पण वरती मंदिरात चांगली तीस चाळीस लोक उपस्थित होती. सगळी लोक खालच्या गावातील होती आणि त्यांच्या कुलदैवत असल्याने देवीला आलेली होती. प्रत्येकाने उदबत्ती आणि प्रसाद आणलेला होता. आम्ही आलो आणि त्यांची आरती सुरु झाली. शेंदवड गड हा गुजरात , महाराष्ट्र बॉर्डर वर असल्याने तेथील आदिवासी गुजराती मिश्रित अहिराणी भाषा बोलतात. त्यांनी देवीची आरती पण गुजरातीत केली. 


अर्ध्या चढाईनंतर दिसणारे देवीचे मंदिर 


कमाल लोकेशन आहे मंदिराचे 



मंदिरातून दिसणारा मुर्डी सुळका 




दर्शन घेऊन गडाची उतराई चालू केली. खाली गावात महाप्रसादाची सोय आहे कळल्यावर पोटातील कावळ्यांची शांती झाली. तीन दिवसांची मोहीम असल्याने खाऊ बरोबर होताच पण गावात भंडारा पाहून रस्त्यावर ठाण मांडून बसून उदरम भरणम करून घेतले. 

आताशा चार वाजत आले होते. मुल्हेर येथील रासनहणाच्या कार्यक्रमाला सहा च्या आत पोहोचणे गरजेचे होते. नशिबाने शॉर्टकट सापडला आणि शेंदवड वरून थोडे मागे येऊन चिवटी बारीने आम्ही धुळ्याहुन नाशिकमध्ये प्रवेश केला. मुल्हेर कडे जातानाच रस्त्यात जैतापूर नावाचे गाव लागते. येथील एकविरा देवीला आम्ही दोन वर्ष्यांपुर्वी येऊन गेलो होतो. येथूनही मुल्हेर ते साल्हेर सगळी रेंज दिसते म्हणून आज परत जाणे झाले. येथेही कोजागिरी निमित्त काही भक्तांनी चक्र पूजा बांधली होती. फर्मास पुरणपोळी कुरडई सकट साग्र संगीत जेवण होते मग काय, येथेही जेवायला बसलो!. 

देवीचे दर्शन आणि पुरणपोळीचे जेवण पदरात पडून घेऊन मुल्हेरला पोहोचलो. आज लवकर आल्याने मोक्याची जागा पकडता आली. आठशे वर्ष्यांची परंपरा लाभलेला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा उत्सव याची देही , याची डोळा पाहणे हा अविस्मरणीय असा अनुभव आहे.  यावेळची हि आमची चौथी वेळ होती यावरूनच वाचकांना समजले असेल. 




एकविरा देवीच्या मंदिरावरून दिसणारे बागलाणचे शिलेदार 

असो या उत्सवा विषयी वाचूया पुढच्या भागात ... तूर्तास फोटोंची मजा घ्या!


वाचत राहा.. 

पुढच्या भागात - 

दिवस २: मुल्हेर - शंकर महाराज समाधी, अंतापूर - साक्री - किल्ले भामेर - म्हसाई देवी मंदिर - पेशवेकालीन गणपती मंदिर, निजामपूर - धनाइ -उन्हाई माता मंदिर, धनेर अमळी येथील सुंदर लक्ष्मी नारायण मंदिर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर. 



महत्वाचे असे काही : 
  • पिंपळनेर पासून मॅप लावून जाणे. रस्ते थोडे छोटे आणि फसवे आहेत. स्थानिकांना विचारात जाणे केव्हाही उत्तम. 
  • नवरात्रीच्या सुमारास भक्तांची खूप गर्दी असते तेव्हा गेलात तर वाट चुकण्याचा प्रश्न नाही. 
  • चढाईस अंदाजे चार तास लागतात. पायथ्याशी एक मंदिर आहे तेथे गाडी लावू शकतो. 
  • येथून दिसणारे बागलाण रेंजचे दृश्य म्हणजे स्वर्गसुखच. 

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

केंजळगड आणि रायरेश्वर

केंजळगड आणि रायरेश्वर 

पुणे - भोर - आंबवडे येथील झुलता पूल - नागेश्वर मंदिर - केंजळगड - रायरेश्वर - धोम येथील नरसिंह मंदिर - मेणवली - वाई - पुणे 



धरतीवर स्वर्गसुख निर्माण करून वरुणराज आता परतीच्या प्रवासास निघालेत. अवघी सृष्टी हिरवाकंच शेला नेसून त्यावर सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांची रत्ने परीधान करून दिमाखात मिरवतीये. असंख्य फुलांच्या रंगबेरंगी अलंकारांनी सजलेले निसर्गाचे हे रुपडे डोळे भरून अनुभवायचे म्हणजे केंजळगडासारखी जागा नाही. रायरेश्वराच्या डोईवरून नाखिंदा टोकावरून पळत पळत येणारे काळेकुट्ट ढगांचे पुंजके, त्याआडून सुर्यदेवांचे डोकावणारे काही चुकार किरणे. स्वराज्याची शपथ घेतली ते महादेवाचे मंदिर, रायरेश्वरावरील सात रंगांची मृदा हे सगळे पाहायचे आणि दिवस सत्कारणी लावायचा. 


मुलाला नुकतीच लागलेली ट्रेकिंगची आवड अजून बहरावी या उद्देशाने या सुंदर ट्रेकचे आयोजन केले. सकाळी पहाटे पुण्यातून निघून भोर गाठले. नेकलेस पॉईंट म्हणजे थांबणे आलेच. येथून पुढे भोर पार करून आंबवडेच्या दिशेने निघालो.  


आंबवडेला पोहोचलो. रस्त्यावरच पंतसचिव वाडा आणी त्याला जोडणारा हा ३०० ते ४०० वर्ष्यांपुर्वी बांधलेला झुलता पूल ( सस्पेन्शन ब्रिज) दिसतो. त्याकाळी याच्या बांधणीस १०,०००/- रुपये खर्च झाले असल्याची नोंद आहे. यावरून चालत गेल्यास आपण पंतसचिव वाड्यात पोहोचतो. वाडा बंद असला तरी जाळीदार दारातून आत डोकावून पाहिल्यावर प्रशस्त असा वाडा, नैसर्गिक प्रकाशयोजना, आणी अर्धपुतळा आपले लक्ष वेधून घेतो.
हा झुलता पूल आणी पंतसचिव वाडा दोन्ही भोर विभागात संरक्षित वारसा मध्ये गणला जातात.

आंबवडे येथील झुलता पूल :



वाडा बंद होता . समोरच मोठाले पिंपळाचे झाड आणी त्याच्या खाली आजूबाजूला अनेक वीरगळ दिसल्या. येथूनच एक वाट खाली नागेश्वर मंदिराकडे जाते. आजूबाजूला निरव अशी शांतता, आंबे, फणसाची मोठमोठाली झाडे, मंदिरासमोर पडलेला आंब्यांचा सडा, पूर्ण दगडात कोरलेला नंदी, गाभाऱ्यात पुजारी काकांचा एक तालात चाललेला अखंड "ओम नमः शिवाय" चा जयघोष ऐकून हात आपोआप जोडले गेले.

दर्शन घेऊन प्रसन्न मनाने निघालो पुढच्या डेस्टिनेशनला.

नागेश्वर शिवमंदिर :





आंबवडेतून सुमारे अर्ध्या तासात पोहोचलो रायरेश्वर/खावली गावात. बसची वाट पाहत असलेल्या एक आज्जीना लिफ्ट दिली आणी थोडेसे पुण्य मिळवले. घाटरस्त्याने गाडी हाकत केंजळगडाचा फाटा दिसला आणी १० मिनिटात केंजळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.


पायथ्याला असलेला गावात सुमारे १०-१२ घरे आहेत. शंभर जवळपास लोकसंख्या आणि जिल्हा परिषदेची प्रार्थमिक शाळा सुद्धा आहे. आज रविवारी 'मास्तर' आल्याने आज शाळेचा पहिला दिवस होता. सगळा बालचमू नवीन कपडे घालून. सगळे आनंदाने शाळेत आले होते. मंदिरापाशी गाडी लावून पोटपूजा करून घेतली आणी निघालो.


केंजळगड चढाई सुरु :


२५-३० मिनिटात उभा कातळ तासून बनवलेल्या पायऱ्यांपाशी आलो. पाऊस नसला तरी वातावरण मस्त झाले होते. ढगांनी सूर्यदेवाना झाकोळले असल्याने सर्वत्र सावली पसरली होती.


उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या.


सुमारे एक तासात किल्ला भटकून झाला. आता परतीचा मार्ग पकडला. अजून रायरेश्वर आणी वाई भटकंती बाकी होती.


  



केंजळगडाच्या पायथ्याच्या गावाशी शाळेपाशी गाड्या लावल्या होत्या. आज रविवार असूनही मास्तर शाळेत आले असल्याने आजही शाळा भरली होती. गावातली मंडळी सर्व कामे उरकून भोजनाच्या तयारीत गुंतले होते. एका घरात आम्ही पाठ-पिशव्या ठेवल्या होत्या त्या उचलल्या, लहानग्यांना थोडा खाऊ दिला. घरातल्या एक सदस्याने मध घ्यायचा का विचारलं, मग कळले की, त्यांनी मे महिन्यात पोळ्यातून मध काढून ठेवलेला आहे. उन्हाळा संपताना शक्यतो वर्षाचा मध काढतात. चव बघितल्यावर २ किलोची खरेदी झाली. 


" तुमच्या पुण्यात कुठे मिळायचा नाही असला मध, तिथे मिळते ते फक्त साखरेचे पाणी!"  आता मात्र काका पेटायच्या आत निघाले पाहिजे. 

येथून निघून रायरेश्वराच्या कुशीत प्रयाण:


रायरेश्वर वरील सप्त मातृका 



हाच ढग किरणांचा खेळ पाहायला खास केंजळगडाच्या प्लॅन केला होता. 



उधळण व्हावी अविरत उन्मेषांची !



ऋतुपर्णाचा २७ व किल्ला 



येथून एक वाट वाई कडे उतरते. आता या वाटेने पुढे धोम तलाव,धोम येथील नरसिंहाचे (नृसिंह-लक्ष्मी)  मंदिर, पुढे मेणवली व वाई. सुमारे २० मिनिटात नृसिंह-लक्ष्मी मंदिरात पोहोचलो. पेशवेकालीन हे मंदीर अजूनही उत्तम स्थितीत असून पुष्करणीची रचना म्हणजे एकमेवाद्वितीय आहे. कमळाच्या आकाराच्या पुष्करणीत कासवाच्या चौथऱ्यावर नंदी आसनस्थ आहे. संपूर्ण पुष्करणीचे कोरीवकाम लाजवाब. पुष्करणी च्या मधोमध कासव शिल्प आजपर्यंत कधी पहिले नव्हते. 


नृसिंह-लक्ष्मी मंदिर:


कासवरूपी पुष्करणी :


येथून पुढचा प्रवास तो म्हणजे मेणवली. स्वदेश, गंगाजल आणी असंख्य हिंदी/मराठी चित्रपटात तुम्ही हि जागा पाहिली असेलच. फक्त अशी वेळ साधायची की येथे आपल्याखेरीज कोणीही नसेल. संथ वाहणारी कृष्णामाई, निरव शांतता, पक्ष्यांचे रुंजन, शिवमंदिरात अवचित वाजणाऱ्या घंटेचा निनाद, झाडांची वाऱ्यासोबत चाललेली चुळबुळ,रम्य घाट, घाटाच्या पायऱ्यांवर येणाऱ्या पाण्याच्या लाटेचा मंद आवाज आणी संध्याकाळी आकाशाला आलेली केशरी झळाळी प्रतिबिंबित करणारी किरणे असे सगळे जमून आले की काही विलक्षण आनंदाची अनुभूती होते. 


या जागेचा इतिहास आणी संपूर्ण माहिती तुम्हाला अन्यत्र मिळेलच. नाना फडणवीसांच्या आठव्या पिढीने या वाड्याचे केलेले जतन केवळ कौतुकास्पद आहे. नाना फडणवीसांचा पुरातन वाडा आजही बघण्यास उपलब्ध असून तेथले सुरक्षारक्षक वा सदस्य आपल्याला आपुलकीने संपूर्ण वाडा दाखवतात. 


आम्ही गेलो तेव्हा नुकत्याच शाळा चालू झाल्या असल्याने शाळेतील मुलांना शालेय साहित्यवाटप चालू होते. पुण्याहून जाऊन स्वतःच्या खर्चाने समाजोपयोगी कामे करणाऱ्या त्या लोकांना अनेक आशीर्वाद नक्कीच मिळत असतील. एक सद्गृहस्थाने आम्हाला संपूर्ण वाडा दाखवला. सागवानी लाकडावरचे शिल्पकाम, छताला केलेल्या वेलबुट्टीचे लाकडी काम, शेण+मातीने लिंपलेल्या भिंती, अंगणात केलेले दगडी कारंजे सगळं काही निव्वळ इतिहासात घेऊन जाणारे!


आज कालपरत्वे केलेले उपाय पाहता पूर्वीच्या काळी या वाड्याने काय गतवैभव पहिले असेल याची प्रचिती येते. एकदा अवश्य भेट द्यायला हवी येथे. नक्की आवडेल अशी जागा आहे. 


मेणवली घाट : 



चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर तेथून आणलेली एक भलीमोठी घंटा येथे पाहावयास मिळते. पंचधातूची हि घंटा असून त्यावर सेंट मेरीचे शिल्प कोरलेले असून १७०७ साल कोरलेले आहे. 1534 मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या म्हणजे १ मीटर व्यासाच्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.


बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.


आजही या तीन  घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून  ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास  हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल.  तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात आहे असे ऐकले आहे. त्याखेरीज अजून २ घंटा पहिला मिळतात त्या म्हणजे -  थेऊरच्या गणपतिमंदिरातील घंटा, आणि मेणवलीमधील नाना फडणिसांच्या वाड्यामागील घाटावरली घंटा ह्या दोन्ही वसईच्याच आहेत.


या घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो. 


मेणवली येथील घंटा :



पूर्वी वसईच्या घंटा या विषयावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक :
वसईच्या घंटेचा शोध

आता उन्हे कलत चालली होती. अजून वाईच्या महागणपतीचे दर्शन घ्यायचे होते. १० मिनिटात वाई गाठून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा करून पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवले. कोठे न थांबता पुणे गाठले आणी एका भटकंतीची कहाणी सुफळ संपूर्ण जाहली . एक सत्कारणी लावलेला दिवस पुढच्या अनेक पोटासाठीच्या धावपळीची ऊर्जा देऊन जातो आज पुन्हा अनुभवल. 
असाच एक उनाड दिवस शोधा, तो तुम्हाला जगायचे का हे शिकवेल आणि निसर्गातली मौजमजा, आनंद हे सगळं बोनस!

वाचत राहा.