मुपी हौदोस
बऱ्याच दिवसात तुम्ही संयम राखून ठेवला असाल आणि कोणाला तरी बुकलून तुम्हाला सगळे फ्रस्टेशन काढायचे असेल तर खाली लिहिलेले वाचणे हे एक निमित्त होऊ शकते. अक्कल गहाण ठेऊन वाचावयाचे असे हे वाग्मय असून वाचून संपल्यावर (तेवढा पेशन्स असेल तर) शांतपणे ब्राऊजर बंद करावा.ह्या आधीच कुठेतरी खरडलेल्या प्रतिक्रिया असून (म्हणजे लेखकाचा म्हणजे इथे डकवणाऱ्या सदगृहस्थाचा तसा समज आहे.) यावर प्रतिक्रिया अपेक्षित नाहीत रादर उपेक्षित आहेत :)
---------------------------------------------------------------------------------------------------------
कमाल लेख. आम्ही कायम काळाच्या पुढेच असतो कायम. मी घरीच बसतो आणि बायको
बत्तासे विकते. आधी मी बत्तासे विकायचो पण कबाडे यांच्याबरोबर ७० ट्रेक
केल्याने गुडघे निकामी झाले. नाद खुला फेम काकांनी ढोल बडवून बडवून कान
निकामी झाले. तरीही एकदा रतनगडा चा नाद केला आणि तिथे black out झाल्याने
लोळत घरी आलो तेव्हापासून कंबर पार गेली आहे. एकदा पुल भेटले ट्रेन मध्ये
त्यांना कर्जत ला वडापाव घेताना खिडकीतून हात बाहेर काढले तर हातही निकामी
झाले. विमानाची घर घर ऐकून डोक आउट झालेय. पावसकर बाईंचा विद्यार्थी
असल्याने मनावर खोल परिणाम झालाय. आत्मविश्वासाचं बळ अन्
व्यक्तिमत्त्वविकासाची शिकवण घेऊन आता मात्र हाउस गाडी नाहीतर हौस गाडी
झालोय.
कमाल लेख. डोळ्याचे पारणे फिटले हा लेख वाचून. प्राप्त
प्रहरी या नितांत सुंदर साहित्याचे रसग्रहण करून सकल वाचकगण, शार्दुला
सारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या आणि तर्हेवाईक अश्या प्रांतीय विभाजनाची
उत्शृंखल तपस्या करणाऱ्याला विसरून फक्त आणि फक्त या अगम्य साहित्याचीच
अवीट अशी चव चाखत आहेत याची नोंद घ्यावी. फक्त वाचतच राहिलो हा लेख मनाची
भिजलेली कवाडे सताड उघडून. डोळ्यांच्या गवाक्षातून वाहत होता फक्त सुखाचा
सुवास.
कमाल लेख.एकापेक्षा एक शाश्वत सत्यांचा आज आपण उलगडा केलात.
अशी अगाध, शाश्वत आणि वैश्विक सत्ये आपण आमच्यासमोर आणलीत त्याबद्दल आभार.
आज आपण हा लेख लिहिला नसतात तर आम्हा बापड्यांचे काय झाले असते? किती वर्षे
आम्ही वाट पहायची, या कलियुगात, देवाला पै पैशाचा नैवेद्याचा आमिष दाखवून?
किती वर्षे लगाम घालावा या उन्मत्त मनाच्या अबलक घोड्यांना? कसे जपावे
मनाच्या पटलावरील आठवणींचे दवबिंदू? आता फक्त समोर आहे तो धूर, फक्त धूर.
प्रश्नांचा आणि निराशेचा धूर. बरेच प्रश्न, गूढ अशी सत्ये, माझ्याच
अनुदिनीवर रिकामी अशी पाने.शोधायची आहेत बरीच उत्तरे त्या प्रश्नांची जी
आजतागायत माझ्या लेखी प्रश्नच नव्हते. असो.आजही
एव्हरेस्टच्या शिखरावर सांज प्रहरी, प्राप्त परिस्थितीत एकटेच
उभं असणं या विचारानेही मनाचा थरकाप उडतो.
वा ! कमाल लेख! एकमेवाद्वितीय अमेरिका ! हृदय,बूट आणि केस अभिमानाने भरून
गेले. प्राप्त प्रहरी या नितांत सुंदर साहित्याचे रसग्रहण करून सकल वाचकगण,
शार्दुला सारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या आणि तर्हेवाईक अश्या प्रांतीय
विभाजनाची उत्शृंखल तपस्या करणाऱ्याला विसरून फक्त आणि फक्त या अगम्य
साहित्याचीच अवीट अशी चव चाखत राहतील. लोकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या
वाजवल्या. >> तुमचे हे अगाध ज्ञान पाहूनच लोकांनी टाळ्या बडवल्या
असणार. पदवीग्रहण समारंभ, टेकडी, सीता, ड्रायविंग,सत्यनारायण यांचा परस्पर
संबंध वेन डायग्राम काढून समजावून दिला असतात तर बरे झाले असते. पण आजही
एव्हरेस्टच्या शिखरावर सांज प्रहरी,प्राप्त परिस्थितीत एकटेच उभं असणं या
विचारानेही मनाचा थरकाप उडतो हेच खरे.असो.
धास्तावलेल्या स्त्रिया मुक्तपणे संचार करतील आणि निर्भयपणे पुढं पाऊस
टाकतील.?? पाऊस टाकतील ??? अहो आज्जी काय लिहिलेय ? पाऊस धास्तावून
मुक्त पडेल? का मुक्ता निर्भय पणे पावसात पडेल? पाऊस संचारून धास्तावेल का
'टाकलेले' संचार करतील? निर्भयपणे पाऊस पुढ जाईल? का मुक्त संचार पुढे
धास्तावतील सगळे? बरेच प्रश्न, गूढ अशी सत्ये, माझ्याच अनुदिनीवर रिकामी
अशी पाने.
कधी खरडून काढेन मी ती ?
कमाल लेख. उत्तम. पण आपण खारीचा वाटा उचलला तर खार काय करणार ? ती कोणाचा
वाटा उचलणार? आणि मग आपण तिचा वाटा उचलून मग आपला वाटा कोण उचलणार? का आपण
फक्त वाट लावणार? आणि खारीचा वाटा तिला न सांगता उचलल्यावर खारीने आपल्यावर
खार खाल्ली म्हणजे? ती आपली वाट लावणार नाही का? का खारच उचलून घ्यायचे
म्हणता? असो
कमाल लेख. किती महान काम केलेत काका तुम्ही, पेपर
चोरणाऱ्याला सुनावले. यापेक्षा महान आणि अलौकिक काहीच असू शकत नाही. hats
off. मी पण एकदा अश्याच चोराला पकडले होते( पण सुनावले नाही). मी manhatten
मध्ये बत्तासे विकत होतो. अडीच डॉलर ची भोवनी झाली तेवढ्यात blackout
झाला . आणि माझे बत्तासे काजव्यासारखे चमकू लागले. तेवढ्यात एक बाई लोळत
आल्या आणि बत्तासे घेऊन जाऊ लागल्या. त्यांना तो इमर्जन्सी लाम्प वाटला
असावा. पण मी मात्र बत्तास्या वर 'पुणे ३८' असे लिहिले होते. ते पाहूनच
त्या घाबरल्या आणि लोळतच पसार झाल्या. त्यामुळे मला त्यांना सुनावता आले
नाही. फारच भीतीदायक नाही पण गूढ प्रसंग होता तो असो.
कमाल लेख.एकदम विस्मयकारी! पण का लिहिलात हा लेख? उगाच
एनर्जी वाया नका घालवू ओ आज्जी. असो. पण अनुभव मात्र हृदय स्पर्शी. आमच्या
चाळीत राहणारा ह्यारी पॉटर च्या घरातही शेवटचा निर्णयाचा शब्द त्याच्या
बायकोचा असतो. आज कुठली जादू करायची? केरसुणी घेऊन उडायचे का आज चालत
जायचे? बायकोला घर झाडायला केरसुणी लागणार असेल तर बिचार्याला चालत जावे
लागते. आज कोणाकोणाला वाचवायचे? असे सगळे त्याची बायकोच ठरवते. एकदा एलियन
आला होता चाळीत तर याच्या बायकोच्या बडबडीने तबकडी तशीच ठेऊन पळून गेला
बिचारा. पण सीता मस्ट हिट रावण असे काहीतरी अगम्य लिहिले असल्याने त्या
तबकडीच्या वाटेला कोणी गेले नाही. खरच कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे
(केरसुणी घेऊन धावणारी) स्त्री असते. पण आजही एव्हरेस्टच्या शिखरावर सांज
प्रहरी,प्राप्त परिस्थितीत एकटेच उभं असणं या विचारानेही मनाचा थरकाप उडतो
हेच खरे.असो.
कमाल लेख. ह्यारी पॉटर केरसुणी घेऊन उडतो यापेक्षा विस्मयकारी लेख आहे हा.
मी पण एकदा माझ्याशी लपंडाव खेळणाऱ्या पॉटर काकांच्या हरी ला अद्दल घडवली
होती. झाले काय कि, मी manhatten मध्ये बत्तासे विकत होतो. अडीच डॉलर ची
भोवनी झाली तेवढ्यात blackout झाला . आणि माझे बत्तासे काजव्यासारखे चमकू
लागले. तेवढ्यात एक केरसुणी उडत आली आणि त्यावर बसलेला चष्मीश बत्तासे घेऊन
जाऊ लागला. त्याला ते बत्तासे म्हणजे 'लॉर्ड' काकांची 'रिंग' वाटली असावी.
पण मी पण काही कमी नव्हतो. ७० ट्रेक केलेल्या कबाडे सरांचे नामस्मरण करून
मी त्याला पकडायला निघालो तर तो एका गुहेत लपला. त्या गुहेत चालणारी आमसुले
होती त्यांनीच त्याचा फडशा पाडला. असो.
कमाल लेख. पण पोट नसते तर मज नसती आली काकू. बाकीचे सोडा पण
पोट नसते तर खरे काकुनी बाकरवड्या नेल्याच नसत्या चंदीगडला आणि मग
उन्दिरानी त्या कुरतडल्या नसत्या आणि मग ' एकूण दीड दिवसांचा प्रवास. त्यात
तीन जेवणं आली." ह्या एकमेव शाश्वत, अगाध आणि अलौकिक सत्याला समस्त मराठी
जन मुकले असते. असो.
बाई, का लिहिलात हा लेख? अवंतीचं नाक छान का आहे ? कोण चीन ला गेले? कोण
अमेरिकेला गेले? लग्न मंदिरात तर मेजवानी घरी का? नोव्हेंबरमध्ये तेथे कधीच
असा आणि इतका बर्फ का पडत नाही? चुलत दिरांचा मुलगा समीर सिऍटलमध्ये का
असतो? हिमवृष्टीनं भुसभुस भसाभसा या सर्व पायऱ्या ओलांडून रौद्ररूप का धारण
केलं होतं? आणि हिमवृष्टीनं पायरी ओलांडली म्हणून तुम्ही पायरी सोडून असा
लेख का लिहिलात? हिमवृष्टीचा तडाखा लग्नाच्या दिवशी, 26 तारखेला का
नाही बसला ? लग्नात black-out नाही झाला का? जामखिंडी कर तैना लग्नाला का
बोलावले नाही? अमेरिकन लोकानी तुम्हाला आणि कुटुंबियांना का विसा दिला?
इमिग्रेशन ऑफिसर कोण होता? नाव सांगता का? फोडला पाहिजे त्याला. त्यामुळे
हे असले लेख वाचायची नामुष्की आमच्यावर आली.
कमाल लेख. डोळ्यातून भसा-भसा पाणी आले. डोळे, केस,खिसा आणि
सिमकार्ड अभिमानाने भरून गेले हो बाई. असो. हिमवृष्टीनं पायरी ओलांडली
म्हणून तुम्ही पायरी सोडून असा लेख का लिहिलात? लग्नात black-out नाही झाला
का? जामखिंडी कर तैना लग्नाला का बोलावले नाही? मी पण एका लग्नासाठी
अमेरिकेला गेलो होतो. शेवटी स्वीट म्हणून बत्तासे ठेवले होते.ते घेऊन
जाताना इमिग्रेशन ऑफिसर ने मला अडवले.तेवढ्यात चाळीतला हरी पॉटर केरसुणी
वरून उडत आला. त्याने त्याचीही केरसुणी पकडून ठेवली. पण तेवढ्यात
विमानतळावर black-out झाला आणि आम्ही पळून गेलो. एवढ्या गडबडीत केरसुणीचे
दोन हिर मोडले. मग एक बाई लोळत आल्या आणिमोडलेले हिर घेऊन गेल्या
हत्ती वरून अमेरिकेला जाण्यास 'पुणे -पावस -होनुलुलु-पेरू-घुसळखांब-ब्रह्मे
नगर-अंबेजोगाई' याच रोड ने डावीकडे वळून ताडोबा वरून व्हिएतनाम कडे जावे.
तेथून अटलांटिक महासागरातून सरळ पिकॉक बे. तेथे एक कांगारू उभा असेल
त्याच्यापासून डावीकडे सरळ अमेरिका. ( हत्ती अटलांटिक पोहून जाईल याची
खात्री करावी. बबनला घेऊन गेलात तर उत्तम. जाताना त्याला ताडोबा मध्ये
सोडलात तर अति उत्तम होईल. परत आल्यावर पोतदार-पावसकर बाईंकडून आणी
अमेरिकेत जामखिंडीकर तैन कडून ओटी भरली जाईल. ) पण आजही एव्हरेस्टच्या
शिखरावर सांज प्रहरी,प्राप्त परिस्थितीत एकटेच उभं असणं या विचारानेही
मनाचा थरकाप उडतो हेच खरे.असो.
गाडीत बसल्या बसल्या पिशवीत पकडलेला वेडा राघू पक्षी त्यानं दाखवला.
>> काय अहो काका, पकडला तो सुध्दा वेडा पक्षी पकडला. अरेरे.
कमाल लेख. काही लोकांना सेन्स नसतो. लोकांना काय प्राण्यांना पण सेन्स
नसतो. एकदा मी सहली साठी 'मारियाना ट्रीन्चला' गेलो होतो. यावेळी कबाडे
नव्हते. पाणबुडी घेऊन मी जेव्हा तळाशी पोहोचलो तर सगळे मासे आणि कासवे
शिम्प्ल्यानी मारामारी करत खेळत होते. मी जॉईन केलेला हा पहिलाच ग्रुप
होता. पण खेळताना ते सगळे जामखिंडीकर तैंची चेष्टा उडवायचे म्हणून मी
त्यांना लेक्चर पण मारले. ते म्हणाले कि तू आता शांत राहा.'' मी म्हणाले
जाऊदे कशाला मास्यांचा नाद करायचा. समुद्रात blackout झाला कि कळेल. मग
भोगा नशिबाचे भोग.तरुण पिढीला प्रबोधनाची गरज आहे हेच खरे. असो.
poor muktapeeth readers म्हणले म्हणून ठीक आहे. poor muktapeeth writers
म्हणले असते तर ७०-८० च्या काळात तब्बल चार हजार रुपये खिशात बाळगणाऱ्या
आणि विसरून जाणार्या दानशूर महामानवाची कथा सांगावी लागली असती. त्या
मर्त्य मानवास जर तेव्हा कोलंबस भेटला असता तर (त्याने आत्महत्या केल्याने)
आज अमेरिकेचा टेंभा मिरवायला अमेरिकाच नसती.
कमाल लेख. इतका हसलो कि पायमोजे काढून ठेवले. फक्त वाचतच राहिलो हा लेख
मनाची कवाडे सताड उघडून. डोळ्यांच्या गवाक्षातून वाहत होता फक्त सुखाचा
सुवास. कमाल! मागे एकदा ग्रांड क्यानॉन मध्ये पण एक पोळे झाले होते. ते
काढायचे अमेरिका सरकारने खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. शेवटी तब्बल ७०
ट्रेक केलेल्या कबाडे काकांना पाचारण करण्यात आले. त्यांनी विसा वैगरे
भानगडी नको म्हणून चाळीतल्या हरी पॉटर कडून त्याची केरसुणी घेऊन त्यावर
बसून उडत तिथे गेले. तीच केरसुणी पोळे काढायला पण उपयोगात आली. पण त्या
केरसुणीला मधमाश्या चावल्याने त्याचे हिर मोडले आणि जादू संपली. मग गप
विमानाने यायला लागले. पण विसा नव्हता म्हणून त्यांना अडवले. पण नशिबाने
तिथे black -out झाल्याने ते वाचले. असो. पण आजही एव्हरेस्टच्या
शिखरावर…मनाचा थरकाप…. .असो.
कमाल लेख.मी एकदा किरकीटवाडी - अमेझोन ट्रेन ने चंडीगड ला चाललो होतो
बत्तासे विकायला. बघतो तर ट्रेन मध्ये 'सिम्पल डिपांडिया' नावाप्रमाणेच
त्या सिम्पल होत्या. त्यांनी मला होन्डुरासवरून आणलेल्या बाकरवड्या दिल्या
आणि मी त्यांना निपानीचे बत्तासे. कोणी नातू नावाच्या माणसाने त्यांना
मथुरेला कुल्फी आणून दिली त्यांनी ती ब्याग मध्ये ठेवली तर उंदरांनी
कुल्फीची आतली काडीच कुरतडली. न्यूयोर्क स्टेशनवर त्यांनी माझी साक्षात
'कालमोहन' यांच्याशी भेट घडवली. त्या वेळीही दोन तास न्यूयोर्क स्टेशनवर
बैठक मारून त्यांनी मुद्दाम केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. खूप गप्पाही
मारल्या. त्यांना ''पोचवे''पर्यंतचे दोन दिवस मी भारलेल्या अवस्थेतच होतो.
कमाल लेख. लवकर "बरे" व्हा काका. पण हा बेदरकार पणा फार काळापासून चालू
आहे. मी एकदा कबाडे बरोबर माउंट किलीमांजारो वर ट्रेक ला गेलो होतो.
शिखरावर पोहोचलो तर पूर्ण अहमदनगर,डाकोटा आणि काठमांडू चे दर्शन झाले. मस्त
वारा वाहत होता. तेवढ्यात एक माणूस आइस स्केटिंग करत आला. कबाडेना पाहून
तो इतका उल्हसित झाला कि सरळ घसरत येउन मला धडकला. बर्फ नसताना आइस
स्केटिंग करणे फार धोकादायक असते. माउंट किलीमांजारो वर बर्फ नसताना तो
आइस स्केटिंग करत होता तेव्हाच मला कळले कि हा माणूस साधासुधा नाही
एकमेवाद्वितीय आहे. पायथ्याशी लावलेली लुना पाहून माझी खात्रीच पटली. पण तो
माणूस धडकल्याने क्षणार्धात मी ज्वालामुखीत कोसळलो. गॉगल मधून वेदनांचा
काहूर माजला.पण डॉ. पेटलेले बरोबर असल्याने मला काही झाले नाही. माझं मरण
मी पाहिलं... आणि पुनर्जन्माचा अनुभवदेखील घेतला. असो.
कमाल लेख. एकदम आवडला. इतके गहिवरून आले कि दोन वेळा बुटाची
लेस बांधली. हे अमेरिकवले खूपच त्रास देतात. मी एकदा कुकडेश्वर ते डाकोटा
चाललो होतो. स्टेशनवर ओळखीचा खारीवाला भेटला म्हणून त्याच्याकडून नान कटाई
घेतली. इमिग्रेशन ऑफिसर ने अडवले तर त्याला पाव किलो दिली. तरी तो मला सोडत
नव्हता कारण त्याला पिशवीतले जीरा बटर पण पाहिजे होते. तेवढ्यात black out
झाल्याने मी लोळत पळून जायला लागलो. पण त्याची आधी एकदा बायपास झाली
असल्याने अंधारात लोळणारी माणसे ओळखण्याची दैवी शक्ती त्याला होती. पण
माझ्या विरुध्द बाजूने एक बाई पण लोळत जात होती. ती मुक्तपीठ ची सेलेब्रिटी
असल्याने त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि मी सुटलो. लाईट आल्यावर
त्याने मला परत पकडले. पण तेवढ्यात खरे काकूंच्या सामानातून चालणारी आमसुले
विमानतळावर चालत आली. आणि इमिग्रेशन ऑफिसची बोबडी वळली. पण आजही
एव्हरेस्टच्या शिखरावर…मनाचा थरकाप…. .असो
कमालीचा भिकार लेख आहे काका. कलियुगात स्वैराचार माजला आहे हेच खरे.
कमाल
लेख.माझ्या जुन्या ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या. मी लहान असताना
कळसुबाईच्या पर्वतावर आम्ही ट्रेक ला जाणार होतो. साक्षात ट्रेकिंग मास्टर
कबाडे यांचे आगमन झाले. नेमकी त्या दिवशी नागपंचमी होती. आणि त्यात बायपास
झालेल्या काकाने भूकंपाची शक्यता वर्तवली होती. नागपंचमी असल्याने
चाळीतल्या हरी पोटर च्या बायकोने त्याला सोडलेच नाही, त्याची केरसुणी हवी
होती तिला नागाला पुजायला. भूकंप होणारच आहे हे कळल्यावर शेवटचे श्रीखंड
खाऊन घेऊ म्हणून कबाडेंनी लुंगीत श्रीखंड आणले होते आणि टोपीत चमचा.किती ती
अंधश्रद्धा! आम्ही इतक्या वर चढून गेलो कि ज्युपिटर वरच्या लोकांनी चिरून
टाकलेल्या वांग्याचे देठ माझ्या डोळ्यात गेले. कबाडे म्हणाले 'तुमच्या
डोळ्यांत रेडिएशन (वांग्याचे देठ प्रकृतीला उष्ण असतात)गेलं, तर तुम्ही
आंधळे व्हाल!'' पायथ्याला उतरून येईपर्यंत जिवात जीव नव्हता! मी उतरलो
तेव्हा संचारबंदीसारखं वातावरण होतं. पण भूकंप होईल या भीतीने कबाडे चढून
ज्युपिटर वर गेलेच. त्याच्या (शिर)पेचात अजून एक तुरा खोवला गेला. पण आजही
एव्हरेस्टच्या शिखरावर…मनाचा थरकाप…. .असो
कमाल लेख. मी पण गाडीत चढून बसायचे म्हणून शिकागो ग्रामीण संस्था यांचा
रणगाडा लिलावात विकत घेतला होता.
तेव्हा मी तिसरीत शिकत असल्याने घरच्याने नको म्हंटले. तेव्हा मी होनोलुलु
मध्ये बत्तासे विकत असे. त्या रणगाड्याला आम्ही न्यानो ची चाके आणि सिक्स
सीटर चे इंजिन बसवले होते. त्यामुळे तो माणसापेक्षा जास्त विवेकी, कृतज्ञ
झाला होता. इतका कि चाके फिरूनही तो पुढे जायचा नाही. म्हणून आम्ही तो
पेशवे पार्क मध्ये पार्क केला. आणि तेथूनच पानशेतच्या पुरात तो वाहून गेला.
तो गेल्यावर आम्हाला कळले कि चाके फिरूनही खाली चेन असल्याने तो पुढे
जायचा नाही. जगात फक्त रक्ताचंच नातं खरं
आहे हेच खरे. पानशेत च्या पुराने त्या रणगाड्याला स्वातंत्र्य दिले. असो
पण आजही एव्हरेस्टच्या शिखरावर…मनाचा थरकाप…. .असो
-------------------------------------------------------------------------------------------------------
एखादा उत्साही "वाचक" असल्यास, कमेंट वरून मुपी लेख ओळखण्याची शिक्षा स्वताला करून घेता येईल. विजेत्याला एव्हरेस्टच्या शिखरावर, सांज प्रहरीचे आणी प्राप्त परिस्थितीतले २ दिवस गिफ्ट म्हणून कबाडे देतील.