रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

कोकणदिवा

कोकणदिवा

एखादा रविवार पकडून बाईक पिदडवत कुठेतरी भटकून यायचे म्हणून यावेळी कोकणदिवा जायचा प्लान केला. याधीच्या रविवार भर दिवाळीत सारसबागेतील हिरवळ डावलून लिंगाणा आणि रायलिंग पठारावरची हिरवळ बघायला एकटाच गेल्याने जरा सोलो ट्रेकिंग करायचा कॉन्फिडन्स वाढला होता. 

यावेळीही सकाळी जास्त लवकर उठण्याचे कष्ट न घेता निवांत ८ वाजता उठून निघालो. थोडेसे पाणी आणि खायला घेऊन बाईक मारत खडकवासला-> शिवणे-> कोंढवे धावडे ->कुडजे -> निलकंठेश्वर-> पानशेत-> घोल ->गारजाई पर्यंत पोहोचलो.

पानशेत पर्यंत जाताना, निलकंठेश्वर फाटा फुटतो तेथे एक पांडवकालीन शिवमंदिर आहे. मंदिर खूप काही खास नसले तरी शिवलिंग आणी मंदिराबाहेरील विरगळ मात्र बघण्यासारखी आहे.


येथून पानशेत जवळपास ६ किमी असून मध्ये एक छोटा तलाव लागला. बरेच बगळे व तत्सम पक्षी जमले होते. आजूबाजूला डोंगररांगा, निर्मनुष्य रस्ता एकदम निरव शांतता.

मी गाडी लावताच अर्धे पक्षी उडून गेले. मोठी लेन्स नसल्याने फोटोसाठी जास्त प्रयत्न न करता काही बळच क्लिक मारले.

सुमारे ४ तासात मी "घोल" या कोकणदिवा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोहोचलो. पानशेत पासून रस्ता बरा असला तरी आजूबाजूला मस्त हिरवागार डोंगररांगांच्या कुशीतून वळणे घेत जाताना बाईक दामटवायला मजा येते.

'घोल" पासून "गारजाई" गाव जवळपास ७-८ किमी असून घोळ पासून आधी पायवाटेने चालत जावे लागे. आता नुकताच कच्चा रस्ता झाल्याने बाईक जाऊ शकतात.
बाईक पंक्चर वैगरे झाली कि मात्र मजा आहे. ८ किमी ढकलून घोल गावात आणून मग दुसर्या दिवसाच्या ST ची वाट बघून त्यात गाडी टाकून पानशेत लाच पंक्चर काढून मिळते. सो टायर चांगले असतील तरच हुशारी करण्यात अर्थ आहे .

गारजाई गावातून रस्ता विचारून निघालो खरा, पण ३-४ तास शोधूनही काही सापडले नाही. GPS चालू केला पण कुठे आहोत आणि कुठे जायचे काहीहिऊ पत्ता लागेना. शेवटी ३ वाजले आणि आहे तेथून परतीची वाट पकडली.

उत्तुंग डोंगररांगा आणी पूर्णतः निर्मनुष्य प्रदेश. कुत्रे सुध्दा नाही कुठे. बराच भटकलो. एका खिंडीत जेवण करून परत वाट शोधायला निघालो पण २-३ तास भटकत कुठेतरी तिसरीकडेच चाललो होतो. शेवटी एकट्याला भीती वाटायला लागली सो गप निघालो परत. येऊ परत पावसाळ्यात आता.

कोकणदिव्यावर न जायचा/जाणारा एक रस्ता मला माहित झाला. आता किल्ल्यावर जायचा पुढच्या वेळी शोधू.

घोल गावातील काही बायका काहीतरी चाळत होत्या. काय चाळत होत्या ते मात्र कळले नाही. जाताना मात्र मला थांबवून त्यांनी विचारले कि या कच्या रस्त्यांनी का गाडी घेऊन गेलास? गाडी खराब झाली तर काय करशील अश्या ठिकाणी?
मी नुसताच हसलो पण जाताना आणि येताना मनात प्रचंड धाकधूक होती.


कर्दळीचा फड जमला होता.

पानशेत धरणाचे काही फोटो काढायला थांबलो. मस्त निळेशार पाणी होते. वाळलेले गवत पायाने मोडत पुढे चाललो होतो. एका ठिकाणी थांबून खालचा फोटो काढला अन तोच मागे काहीतरी सळसळ आवाज झाला. मागे बघतो तर भलामोठा घोणस ऊन खात पडलेला होता आणि माझ्यामुळे त्याची वामकुक्षी खंडित झाली होती.

"सळसळ" या आवाजाची मी प्रथम अशी अनुभूती घेतली. अजूनही तो आवाज कानात बसलाय. तो इतक्या झपकन निघून गेला पण मी मात्र असा टरकलो की जी काय बाईक काढली तेथून ते डायरेक्ट कोथरूड.

हा ब्रिज मस्त आहे. कुद्जे गावाहून पुढे आहे थोडा.

सुर्यनारायण आपली ड्युटी संपवून आपला अल्टरनेटीव ला handover देऊन चालले होतो. पण एक मस्त फोटो आला.

बाकी खूप खास लिहिण्यासारखे नाही. चेहेरा काळा पडायला या ट्रेक ने अजून थोडी मदत झाली आणी पुढच्या आठवड्यासाठी औताला जुंपून घ्यायला फ्रेश होऊन नव्या दमाने आम्ही सज्ज झालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: