मारुतीचे जन्मस्थान: अंजनेरी पर्वत
"बरेच दिवस ट्रेक ला जायचे होते पण मुहूर्त लागत नव्हता.आणी मग तो कसा जुळून आला." अश्या आणी तत्सम वाक्यांनी टिपिकल सुरुवात न करता सरळ प्रवास अनुभव मांडायला चालू करतो. हल्ली लिहायचा घाट घालणे आणी मुळात त्यासाठी डोके चालवणे दुरापास्त झाले असल्याने याआधी काही ट्रेकचे फक्त फोटो डकवले होते. आताही काही वेगळी स्थिती नाही पण थोडेसे "समालोचन" लिहून नुसते फोटो बघणार्यांना हिरमोड होईल याची काळजी घेतो.
असो, तर यावेळचा प्लान होता त्रंबक रेंज मधील अंजनेरी पर्वत आणी हरीहर हर्षेगड किल्ला.
खरा प्लान फक्त हरीहरच होता फक्त पण जरा शोधल्यावर कळले कि अंजनेरी पण ऑन रोड आणी जवळच आहे आणि तेथे मारुतीचे जन्मस्थान असून रामायणकालीन सुमारे २००० वर्षे जुनी हेमांडपंथी मंदिरे आहेत.
म्हणून मग प्लान चेंज करून पहिला अंजनेरी किल्ला केला आणि मग हरीहर किल्ला.
तसेही मारुतीला जायचा उद्देश देवाचे दर्शनाखेरीज वेगळाच होता पण तो आत्ता सांगत नाही. :)
शिवाजीनगर स्टेशन वरून रात्री शेवटची सव्वा दहाची ( १०:१५ ) त्र्यंबक यष्टी पकडली आणी खिडकी मोकाट सोडून झोपून घेतले. डायवर काका जोरदार गाडी मारत होते. टकलूची सुट्टी जोडून आल्याने आणी नवरात्र उत्सव चालू असल्याने त्र्यंबकेश्वर जाणार्यांची बर्यापैकी गर्दी होती. पहाटे ३ ला गाडी नाशिक ला आली तर तर लोक लोंढ्याने घुसत होते. कमाल आहे लोकांची !!
पहाटे ५ ला गाडी त्र्यंबक पोहोचली लगेच दुसरी त्र्यंबक-नाशिक गाडी पकडून अंजनेरी फाटा उतरलो. अजून पुरेसे उजाडले नव्हते. अंधारात एक गावकरी दिसला त्याला झोपायची सोय विचारताच त्याने एका मंदिराकडे बोट दाखवले. लगेच मंदिरात पोहोचून कसले मंदीर आहे ते न पाहताच आमचा डेरा टाकला.
तासभर झोप झाली आणी पुरते उजाडले असल्याने उठून बसलो. बरोबर त्र्यंबक-नाशिक रस्त्याच्या मधोमध असलेल्या आणि आता स्तलांतरित होत असलेल्या मंदिरात आम्ही झोपलो होतो. बसल्या जागेवरूनच मागे वळून पाहतो तर आमचा ट्रेकी दोस्त नवीन लाल शर्ट घालून हिंडत चालला होता.
तसेही मारुतीला जायचा उद्देश देवाचे दर्शनाखेरीज वेगळाच होता पण तो आत्ता सांगत नाही. :)
शिवाजीनगर स्टेशन वरून रात्री शेवटची सव्वा दहाची ( १०:१५ ) त्र्यंबक यष्टी पकडली आणी खिडकी मोकाट सोडून झोपून घेतले. डायवर काका जोरदार गाडी मारत होते. टकलूची सुट्टी जोडून आल्याने आणी नवरात्र उत्सव चालू असल्याने त्र्यंबकेश्वर जाणार्यांची बर्यापैकी गर्दी होती. पहाटे ३ ला गाडी नाशिक ला आली तर तर लोक लोंढ्याने घुसत होते. कमाल आहे लोकांची !!
पहाटे ५ ला गाडी त्र्यंबक पोहोचली लगेच दुसरी त्र्यंबक-नाशिक गाडी पकडून अंजनेरी फाटा उतरलो. अजून पुरेसे उजाडले नव्हते. अंधारात एक गावकरी दिसला त्याला झोपायची सोय विचारताच त्याने एका मंदिराकडे बोट दाखवले. लगेच मंदिरात पोहोचून कसले मंदीर आहे ते न पाहताच आमचा डेरा टाकला.
तासभर झोप झाली आणी पुरते उजाडले असल्याने उठून बसलो. बरोबर त्र्यंबक-नाशिक रस्त्याच्या मधोमध असलेल्या आणि आता स्तलांतरित होत असलेल्या मंदिरात आम्ही झोपलो होतो. बसल्या जागेवरूनच मागे वळून पाहतो तर आमचा ट्रेकी दोस्त नवीन लाल शर्ट घालून हिंडत चालला होता.
याच मंदीरात आम्ही पसरलो होतो. हे कार्तिक स्वामींचे मंदीर होते. त्याच्या समोरच अजून एक प्रशस्त असे गणपती मंदीर होते.
कार्तिक स्वामीं मंदीर आणी पाठीमागे अंजनेरी डोंगराचे नवरा नवरी सुळके.
पांघरूण आवरते घेतले आणी फोटो चालू केले.
कार्तिक स्वामी मूर्ती
गणपती मंदिरात असलेले शेंदूर लावलेली विरगळ
काका यष्टीची वाट बघत होते. त्यांना बोलते करून सगळी माहिती काढून घेतली.
नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने काही भाविक लोक देवीची कावड वाजतगाजत घेऊन निघाले होते. एक टेम्पो, त्यात मोठे स्पीकर, देवाची वाटत नसलेली पण असलेली धतींग गाणी आणी त्यामागे चालणारे असंख्य भाविक. खांद्यावर कावड, पाय अनवाणी, भगवी वस्त्रे आणी जोडीला देवीचा जागर. कमाल वाटत होते बघताना !!
त्र्यंबकमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. त्यामुळे तेथून दोन तांब्यात गोदावरी उगमाचे पाणी भरून घेऊन ते त्र्यंबक ते वणीची देवी असे जवळ जवळ १०० किमी अंतर चालत आणी ते पण चप्पल न घालता जातात . आणी मग १-२ आठवड्याने तेथे पोहोचल्यावर त्या पाण्याने देवीला अभिषेक करूनच मग अंघोळ करतात.
१०० किमी चालत ???? आपल्याला गाडीने जाणे होत नाही.
गावात शिरलो. छोटेसे तळे आहे गावात, तेथे फ्रेश झालो आणी अंजनेरी गावातील बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सिद्ध हनुमान मंदिरात आलो. ही हनुमानाची मूर्ती १५ फुट उंच आहे. त्याची गदाच ६ फुट आहे. :)
आम्ही दर्शन घेऊन पाणी भरून घेतले. आणी पुजारीकाकाना परत कसे जायचे आणी इतर माहिती विचारून अंजनेरी किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.
सिद्ध हनुमान मंदिरापासून मागे वाट जाते ती पकडून गावात गेलो. काही ढाबे आहेत गावात ते नुकतेच उघडत होते म्हणून जरा वेळ घालवला आणी एका हॉटेलात पोह्यांची ऑर्डेर दिली. पोहे खाऊन पकलो असलो तरी आज हे पोहे मस्त लागत होते कारण भूक लागली होती.
समोरच अवाढव्य असा अंजनेरी पर्वत उभा होता. "पर्वत" हा शब्द ऐकला की मनात धडकीच भरते. पण हा त्यामानाने ज्युनीअर म्हणता येईल.
कड्यासारखा दिसतोय तो डोंगर चढून त्यावर अजून एक डोंगर आहे. बरोबर ८:३० ला चढाई चालू केली आणी मग रमत गमत फोटो काढत, मंदिरे शोधत मंडळी निघाली. त्यात एक बरे कि ३च लोक असल्याने वेळ जायचा प्रश्नच नव्हता. जे सुटलो ते डायरेक्ट पायथ्याशी असलेल्या अंजनीमातेच्या मंदिरातच.
अंजनीमातेच्या मंदिरामध्ये असलेल्या पुजाऱ्याने आम्हाला अजून डिटेल्स दिले. २००० वर्षापूर्वीची मंदिरे जी आम्हाला किल्ला उतरून शोधायची होती ती लोकेट करून दिली. वरती काय काय पाहण्यासारखे इथपासून ते हनुमानाचा जन्म कसा झाला आणी किल्ल्यावरील तळ्याचा आकार डाव्या पायाच्या पंजासारखा आहे तो कसा झाला इथपर्यंत माहिती पुरवली.
त्यांचा नमस्कार घेऊन किल्ल्याच्या मुख्य वाटेला लागलो. प्रशस्त वाट आहे. बेसपर्यंत गाडी येते. तेथे कॅमेरा साठी २५ रुपये चार्ज लिहिलेला होता म्हणून कॅमेरे ठेऊन दिले. पण "वसुली" करणारे कोणीही दिसले व आले नाही सो परत कॅमेरे परत बाहेर !
गावातील मोठे तळे. पाणी भरपूर आहे आणी मंदिरांची तर रेलचेल आहे. हनुमानाची ६-७ मंदिरे तर वाटेतच पाहिली. शंकराची पुरातन मंदिरे पण २-३ लागली. अजून वरती एक बुद्ध पुतळा होता. काही जैन मंदिरे होती. या गावात १०८ पुरातन हेमांडपंथी स्थापत्य शैलीने बांधलेली मंदिरांचा इतिहासात नोंद आहे. पण आता त्यातील काहीच अस्तित्वात आहेत.
नवरा नवरी सुळके डावीकडे सोडत धोपट वाट चालत राहिलो.
डोंगराच्या खाचेतून खिंडी सदृश्य वाट वरती किल्ल्यावर घेऊन जाते. सिमेंट च्या पायर्या बनवलेल्या आहेत. त्या सोडून हि हौशी लोक उगाच कडे चढत बसले होते. :)
सुरुवातीलाच एक जैन गुहा असून त्यात बरीच शिल्पे कोरलेली आहेत. हे जैन लेणी म्हणून परिचित असून १०८ जैन लेणी आहेत असा उल्लेख आढळतो.
नक्की काय आहे ते झेपले नाही पण अंधार असल्याने फ्लाश मारून काहीतरी व्यर्थ प्रयत्न केला गेला.
गुहेच्या तोंडाशीच वरती २ फुट व्यासाचे चक्र कोरलेले आहे.
या सिमेंटच्या पायर्यांनी १५-२० मिनिटात वर पोहोचलो. वर पोहोचताच गार वारा आणी लांबलचक पठार चालू झाले. अजून अर्धा तासाच्या पायपिटीनंतर अंजनी माता मंदिर आले. येथे आधीच बरेच लोक दम खात होते. सणांचे दिवस आणि जोडून सुट्टी असल्याने बरेच लोक कुटुंबासहित आले होते.
या मंदिरापासून पुढे अजून एक तास चालून गेलो तर एक अजून तळे होते. पायथ्याच्या अंजनी मातेच्या मंदिरातील पुजारी काकांनी सांगितले होते की "या तळ्याला सरळ न जाता प्रदक्षिणा मारून वरती जा. या तळ्याला प्रदक्षिणा मारली की ती अंजनेरी आणी त्र्यंबक मधील ब्रह्मगिरी ला प्रदक्षिणा मारल्यासारखे आहे. "
या तळ्याचा आकार हा डाव्या पायाच्या पंजा सारखा आहे. हनुमानाने सुर्य पकडायला येथून झेप घेतली तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा आकार उमटून त्याचे आज तळे आहे असे लोकांकडून कळले.
जरा फ्रेश झालो तळ्यात आणी प्रदक्षिणा मारून एका आश्रमात आलो.
येथे एक बर्यापैकी मोठा आश्रम असून मस्त परीसर आहे. पाणी वैगरे सोय आहे तसेच राहण्याची सोयची होऊ शकते. तेथे बसून थोडेसे जेवण पदरात पडून घेतले आणी पाठीवरची वजने पोटात शिफ्ट करून सीता गुंफा दिशेने चालू लागलो.
सीता गुंफा - या गुहेतही गणपती हनुमान यांच्या मुर्त्या आहेत.
तेथून वर चढून आलो आणी पायर्यांची चढण चालू केली.
वरून खाली बघितले तर खरच त्या तळ्याचा आकार हा डाव्या पायाच्या पंजासारखा आहे. मला फार कौतुक वाटल्याने आणी मस्त स्पॉट असल्याने येथे बरेच फोटू काढले गेले.
तळ्याच्या शेजारीच जमिनीत एक छोटेखानी भुयार खोदून या महाशयांनी आपली सोय केली होती. आमच्या आवाजाने "कोण शिंचे आलेत झोपमोड करायला?" असा लुक टाकत टेहळणी चालली होती.
या महाशयांनी आपली पूर्व-वस्त्रे तशीच टाकून नवरात्रीची नवीन वस्त्रे धारण केली असावीत. सापाची कात घरात ठेवली की संपत्ती वाढते असे ऐकले होते, पण ती कात मी घरी लावली असती तर मला आहे त्या वस्त्रानिशी दुसरे भुयार शोधावे लागले असते.
वाह ! कमाल! दुसरे शब्दच नाहीत. टाच आपटून टोपी काढून salute निसर्गाला !
थोडेसे चालून सुमारे १ तासात आम्ही अंजनेरी मंदिरात पोहोचलो.
सभोवताली कर्दळीचा फड जमला होता आणी पूर्ण ओसाड पठारावर एकच भगवा फडफडत होता.
अंजनी मातेची मूर्ती आणी शेजारी जो दगड आहेतो बाळ हनुमान .
मंदिरात थोडा वेळ टेकलो. मग उगाच हौस करत जप करत बसलो. काही काळासाठी तिन्ही ट्रेकर मंडळी ध्यानस्थ झाली. जोरदार वारा अंगाला झोंबत होता आणी "पवन पुत्राय धीमही" नाव सार्थ करत होता.
मंदिरापासून आजूबाजूला अशी अनेक दगडांची रचलेली रास दिसत होती. लोक नवस म्हणून अंजनीमातेला इच्छा बोलून एकावर एक दगड रचून ठेवतात. जोपर्यंत नैसर्गिकरित्या हे दगड पडत नाहीत तोपर्यंत घराचे सुख अबाधित ठेव. असा काहीतरी अर्थाचे ते आहे.
आजूबाजूचे मनोहारी दृश्ये डोळ्यात साठवत आता परतीची वाट पकडली. लवकर सूर्यास्त होण्यापूर्वी खाली उतरून जाऊन गावातील अतिप्राचीन हेमांडपंथी मंदिरे बघायची होती. किल्ला उतरतानाच काही मंदिरे लोकेट करून त्यादिशेने मोर्चा वळवला.
खाण्यापिण्याची सोय अंजनेरी गावात होऊ शकते. आणी झोपायची सोय गावात, पठारावरील अंजनी मातेच्या मंदिरात होऊ शकते.
उतरताना काही भन्नाट निसर्गचित्रे मिळाली. ती आणी रामायणकालीन मंदिराबद्दल दुसऱ्या भागात.
लोभ असू द्या.
सागर
-----------------------------------------------------------------------------------------------------
पुढचे लेख:
२. रामायणकालीन प्राचीन मंदिरे
३. हरीहर किल्ला
४. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
------------------------------------------------------------------------------------------------------
लोभ असू द्या.
सागर
-----------------------------------------------------------------------------------------------------
पुढचे लेख:
२. रामायणकालीन प्राचीन मंदिरे
३. हरीहर किल्ला
४. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पणी:
मस्त रे सागर भारी आहे प्रवास वर्णन
टिप्पणी पोस्ट करा