रविवार, २२ जानेवारी, २०१७

सुधागड

सुधागड उर्फ भोरपगड


बल्लाळेश्वराचे बोलावणे आले आणी रोज हापिस ते घर एवढाच प्रवास करणारी पावले "पाली"कडे निघाली. पाली या गावी तसे दोन तीन वेळा जाणे झाले होते पण तेव्हा बाप्पांचा आशिर्वाद लाभूनही डोंगरदेवांचा आशिर्वाद काही लाभला नव्हता त्यामुळे सुधागड हे नाव फक्त यादीतच मागे मागे पडत होते. एकदा तर खास सुधागडासाठी निघालेले आम्ही उन्हाने पोहोचेपर्यंतच वाट लावली म्हणून आल्या पावली सरसगडावर भटकून आलो होतो पण सुधागड मात्र एकलकोंड्या शिलेदारासारखा दुरूनच पाहावा लागला होता.
असो, आज बल्लाळेश्वराच्याच मनात होते म्हणायचे. एक फोनवर प्लॅन फिक्स झाला आणी एक जण पुण्याहून न एक कल्याण वरून असे दोघे वीर आपली सुटलेली पोट घेऊन तयार जाहले.

आजचा दिवस काय उजाडला होता कोणास ठाऊक पण जाताना सगळ्या  गोष्टी लेट होत गेल्या .PMT ने कोथरूड ते पुणे स्टेशन या प्रवासास तब्बल दिड तास घेऊन याचे सूतोवाच केलेच होते. मजल दरमजल करत तेथून कर्जत-> खोपोली -> पाली असा प्रवास करून बल्लारेश्वराच्या शयन दर्शनास आम्ही हजर. रात्रीचे सडे नऊ वाजल्याने मंदिर आणी आसपास कोणीही नव्हते. आम्ही दोघे, पुजारी आणि कर्ता करविता तो गजानन. मस्त दर्शन करून भक्त निवासामध्ये गेलो. तेथे २० रुपयात हॉल मिळाला झोपायला. आमची स्वारी फुल खुश. खूप छान सोय झाली होती. फ्रेश वैगरे होऊन सोपस्कार आटोपले आणी डबे उघडून पोटोबा करून घेतला. आताशा थंडी मी-मी म्हणून लागलीच होती. त्या भर थंडीत मग एक आईस्क्रीमचा राउंड झाला आणी मग झोपेची आराधना करायला भक्तगण मोकळा झाला.

रात्री एक महाभिकार मुलांचा ग्रुप आला. स्वतःला शिवभक्त म्हंणवणारे ते महान मावळे रात्री २ च्या सुमारास येऊन जयघोष करत होते. उद्या रायगडावर जाणार होते म्हणून कि काय त्यांच्या अंगातच राजे भिनले होते. खाली अंथरायला एक सतरंजी मिळाली होती पण पांघरायला काही नसल्याने त्या सो कॉल्ड शिव-वाघांनी हॉलचे पडदे ओढून काढून तोडले आणि पांघरायला घेतले. असो पण "या" ब्रँडची व्हॅल्यू सध्या जास्त असल्याने त्याबद्दल न बोललेच बरे.

उन्हे यायच्या आताच अंघोळ-पांगोळ करून, अमृततुल्य प्राशन करून परत बाप्पांच्या दर्शनाला.
आता स्टेशनपासून ७ वाजता सुटणारी ठाकूरवाडीची पहिली बस लागलीच होती. कंडक्टर शेजारीच एका पन्नाशी पार आजोबांनी आपली आठवणीची शिदोरी उघडली होती. गारठलेल्या सकाळी सकाळी आजोबा यौवनात येऊन पोहोचले होते. आम्ही यष्टीत चढलो आणी "माझा बाप लय चांगला होता" या वाक्याने आजोबांनी आमच्या नजरा काबीज केल्या. सकाळी सकाळी प्रकरण बापावर आलेले बघून रिकाम्या यष्टीत आम्ही शेवटच्या सीट्स पकडल्या. अन त्या प्रकरणात दुसरी बाजूपण दिसत नव्हती म्हणजे दुसरा शिलेदार कोणीही नव्हता सगळे श्रोतेच.
पण त्यांच्या लीला ऐकत ऐकत ठाकूरवाडी कधी आली याचाच पत्ता नाही लागला. पिकल्या केसाचे, सुरकत्या पडलेल्या गळ्याचे, आयुष्यभर डोंगरदऱ्या तुडवीत पायी पडलेल्या भेगांचे ते अनुभवसमृद्ध खुशाल अन आनंदी जीवन "बल्लाळेश्वराच्या आशिर्वादाशिवाय सगळं अशक्यच." म्हणत उतरूनही गेले.

आता उन्हे वर चढू लागली होती. ठाकूरवाडीतल्या घरांमधून माग काढत सुधागडाच्या वाटेला लागलो. सूर्यनारायणाने हजेरी लावली असली तरी थंडीनेही नेटाने ठाण मांडले होते. आता यामध्ये शेकोटी करून कोण बसले असेल तर शेअरिंग तर होणारच.


पठारावर चालून येताच सुधागडचे पूर्ण रुपडे न्याहाळले आणी दोन तासात वरती पोहोचायच्या बोलीवर झपझप निघालो. सुरवातीला झाडांमधून जाणारी वाट परत एक पठारावर येऊन ठेपली. इथे आम्ही सुटलेल्या पोटाला न्याय द्यायचा निर्णय घेऊन ठाण मांडले.


पाठीवरची वजने पोटात ढकलली आणी शिडीच्या मुख दर्शनासाठी पुढचा मार्ग धरला.
अंदाजे पाऊण तास चढून येताच पहिली शिडी लागली. खरे पाहता त्या शिडीची काही एक गरज नव्हती पण दुर्ग संवर्धन नावाखाली काहीतरी नफेखोरी केलीच पाहिजे नाही का?


 येथून पुढे गेल्यावर अजून एक मोठी शिडी लावलेली दिसली. तो स्पॉट बघता येस, ती गरजेची होती म्हणता येईल. अर्धी शिडी चढल्यावर ती गदा-गदा हलायला लागली. आता येथून पुढे न थांबता चढाई चालू झाली. एक कोणी महापुरुषाने चढाई वाटेत आपल्या बायकोच्या स्मरणार्थ "क्षणभर विश्रांती' अस लिहून बसायची व्यवस्था केलीय. त्या महान माणसाला मान देऊन आम्ही आमची पथारी अगदी अर्धा तासभर मांडली.



आता हवेत तजेला आला होता. सकाळची मरगळ दुर व्हायला लागली होती. आता आम्हाला अजून एका माणसाची साथ लाभली. काटक शरीर, हाफ पॅन्ट आणी मागे अडकवलेली गलोल. या गलोलीने काय मारता विचारल्यावर फक्त एक स्माईल आली आणी पुढचा प्रवास सुरु झाला. अजून एक विश्रांती थांब्यानंतर दोन बुरुजात बेमालूम पाने लपवलेला पाच्छापुर दरवाजा लागतो. या दरवाज्यातून वर जाऊन बुरुजाकडे जायला एक छोटेखानी दरवाजा आहे तेथे उतरून थोडे पुढे गेलो तर महाकाय पालींनी आमचे स्वागत केले. तेथून टरकून आल्या पावली मागे फिरलो आणी सुमारे अडीच तासात माथ्यावर पोहोचलो. माथ्याचा विस्तार भलामोठा असल्याने परत उन्हात पायपीट. येथेच तळ्यापासून काही अंतरावर दगडी नंदी बघून येथे मंदीर असावे असा साक्षात्कार होतो. 



माथ्यावर आल्यावर लगेच डाव्या हाताला एक तळे लागते. त्यात अजून पाणी असल्याने म्हंशींची मस्त चैन चालली होती. तेथून पुढे निघालो ते पंत सचिव वाडा, भोराई देवी मंदिर, हत्तीच्या पागा, टकमक टोक, धोंडसे गावात उतरणारी चोर वाट आणी धोंडसे गावातून चढताना लागणारा बुलंदी महादरवाजा बघायला.

आता लांबलचक पठारावरून आगेकूच चालू होती. समोर तैलबैलाचे उभे कातळकडे लक्ष वेधून घेत होते. मग जोरदार क्लिकक्लिकाट. 


तैलबैला/घनगड वरून परत एकदा कधीतरी सुधागड येऊ म्हणत जंगलात शिरलो. झाडांच्या गर्दीत पंत-सचिव वाडा गार वारा खात पहुडला होता . येथूनच भोराईदेवीच्या मंदिरातले पुजारी आमच्याबरोबर ( न विचारता) आले. मग त्यांनी खास गाईड स्टाईल मध्ये चोरवाट कुठे आहे? पहिले ती बघू मग हे बघू मग ते बघू चालू केले.

ऐसपैस असा पंत सचिव वाडा. २०-२५ लोकांची लोकांची राहायची सोय होऊ शकते. 

चोरवाट बघून त्यातून खाली उतरण्याची हिम्मत मात्र झाली नाही कारण भुंग्याच्या साईजच्या माश्यांची अख्खी आकाशगंगा तेथे घोंगावत होती. वरूनच फोटो काढून मग पळालो टकमक टोक. इथे थोडी भंकस करून मग हत्तीच्या पागा वाटेने भोराईदेवी मंदिर.
काकांनी मंदिर उघडले, घंटा वाजवल्या, अंगारे आमच्या कपाळी चोपले, आधीच फोडलेल्या नारळातील खोबऱ्यांचे २ तुकडे आमच्या हाती टेकवले आणी २ लाईन देवीचे स्तोत्र म्हणले. असा सगळं सेटप झाल्यावर आमचेही हात जोडले गेले. नमस्कार चमत्कार झाले आणी वळलो तर "दक्षिणा" इति काका. यासाठी सगळं अट्टाहास चाललाय तर. असो. देवाच्या चरणी २१ रु ठेवले आणी मंदिरात बसूनच पोटोबा केला.

बाहेर आता जोरदार उन्ह वाढत होते त्यात या गारव्यात बसून उदरम भरणम झाल्यावर पाय नको नको म्हणायला लागले. पण येतंय ठाकूरवाडी कडून आल्याने जाताना धोंडसे घावातून उतरायचे ठरवले होते. पण धोंडसे गावातून परत जोरदार पायपीट आणी तेथल्या यष्टीची नाय खात्री सो महादरवाजा बघून बॅक टू ठाकूरवाडी.

महादरवाजा जोरदार बांधला आहे. अश्या दुर्गम ठिकाणी अश्या प्रकारे बांधलेल्या कमाल वास्तू बघितल्या की मन चक्रावून जाते. राजधानीसाठी शिवरायांनी रायगडाआधी सुधागड ठरवलं होता याची प्रचिती महादरवाजा बघून येतेच. सुधागडावर हत्ती/घोड्यांच्या पागा, धान्यकोठार, पंत सचिव वाडा, मंदिरे, पाण्याचे स्रोत सगळं काही बांधून झालं होत पण रायगडाचे मोक्याचे स्थान विचारात घेता राजधानी तिकडे नेली म्हणे.



महादरवाजा बघून परतीचा रस्ता धरला. तेथून येऊन पंत सचिव वाडा बघून तेथेच असलेल्या पुजारीकाकांच्या घरासमोर बसलो. त्यांच्याकडून पाणी घेतले. वाटले की, यांनी मंदिर आणी परिसर एवढा स्वच्छ ठेवलाय, न विचारता स्थलदर्शन केले प्लस पाणी दिले तर पैसे देणे योग्यच आहे. त्यांना तरी कमाईचा मार्ग काय वैगरे वैगरे विचार करत त्यांना धन्यवाद द्यायला गेलो तर कळले कि एक ग्रुप साठी कोंबडी पकडून त्यांच्या दिमतीला सगळॆ व्यस्त होते. असो. पोटासाठी कोणाला काय करावे लागेल नेम नाही.

२ वाजताची पाली बस पकडायची म्हणून नॉनस्टॉप आपला खाली आलो. २ वाजताची बस साडे-तीनला आली तोपर्यंत घराच्या अंगणात एक झोप झाली. पालीला पोहोचून परत गणपती जाऊ म्हंटले पण मग विचार केला गणपती सुद्धा कंटाळेल कितीदा येतायेत हि लोक म्हणून. सो तेथून खोपोली मग लोणावळा अन मग पुण्यनगरी.
दुसऱ्या दिवशी परत औताला जुंपायला तयार.

पाहण्याची ठिकाणे : पाच्छापूर दरवाजा,धोंडसे गावातून चढणाऱ्या वाटेवरचा महादरवाजा, चोरदरवाजा,हत्ती /घोडे पागा, टकमक टोक, धान्यकोठार, पंत-सचिव वाडा,तैलबैलाचे विहंगम दृश्य, भोराई देवी मंदिर अन त्यासमोरच दीपस्तंभ.

पाली ते ठाकूरवाडी बस : पहिली सकाळी ७ वाजता /  ९.०० / १०.४५
ठाकूरवाडी ते पाली : ८.००  (७ ची बस) /  १०.०० / १४.०० / १६.००



रविवार, ८ जानेवारी, २०१७

२०१६! जुना गडी , राज्य नवे !



आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही.मागच्या वर्षी थोडासा बारीक आणी त्या आधीच्या वर्षी थोडा गोरा झालो होतो पण ती पुण्याई फार काळ टिकू शकली नाही. असो.

नवीन संसार आणी नवीन सुरवात. आपली भटकंतीची आवड जोपासणारा जोडीदार मिळाला तर मग काय आपल्याला सगळं रानच मोकळं. आयुष्यातल्या या गुलाबी क्षणांनाही मुकायचे नाही आणी स्वस्थही बसायचे नाही अश्या द्वंदात "पुराव्यांनी शाबित ... " या चालीवर वर्षभरात कुठे कुठे भटकंती झाली याची हि चित्ररुपी झलक .


जानेवारी :  मांगी-तुंगी 

२६ तारखेची सुट्टी जोडून आली आणी जोडीने ट्रेक करायचा योग आला. पहाटेच्या लुकलुकत्या चांदण्यात, गुलाबी थंडीत चढून जाऊन, किल्ल्याच्या माथ्यावरून सूर्योदय पाहायची मजाच वेगळी. 



मांगी-तुंगी वर चढाईचे पूर्व लेख येथे वाचायला मिळतील. 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

फेब्रुवारी : देवगिरी 

मित्राच्या साखरपुड्याचे निमित्त काय झाले आणी औरंगाबादची वर्दी आली. कार्यक्रम आटोपला आणी स्वारी निघाली देवगिरी किल्ल्यावर. किल्ल्याचे स्थापत्यशास्त्र फारच कमाल आहे. 

मार्च : राजापूर, धोपेश्वर 

याही वर्षी राजापूरच्या गंगेत आमचे घोडे नाहले आणी तेही जोडीने! 
रात्नांगीची ती आंबा पोफळीची वने, कौलारू घरे, जलदुर्गांची रेलचेल, चिरंतन निसर्ग सौंदर्य, आगळा वेगळा शिमगोत्सव आणी आजूबाजूला अनेक "अंतू बर्वा" सदृश्य मंडळी. कमाल !



यावर बरेच लेख लिहायचे आहेत. सुरवात तर झाली आहे येथून राजापुरी वर्दी देऊन या !
पहिले प्रेम
राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 

 

एप्रिल : सफर-ए-जलदुर्ग : आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग  

जिथे दर महिन्याला एक ट्रेक जमवायची मारामार त्यात एकाच ट्रिप मध्ये २ दिवसात ४ किल्ले म्हणजे मेजवानीच.
यावेळी गाडी घेऊन गेलो असल्याने राजापूर-आंबोळगड- यशवंतगड- रत्नदुर्ग- रत्नागिरी- पावस-पूर्णगड- गणपतीपुळे असा साग्र संगीत भटकंती झाली.


मे : गोवा 

जरा कुठे स्वस्थ बसतो न बसतो तोच फर्मान आले .... गोवा... 



जुन : हंपी, बदामी 

जून म्हणजे आला लग्नाचा वाढदिवस. आणी त्यातही पहिलाच. हंपी आणी बदामी जायचे ठरवले तर लोकांनी वेड्यात काढले. लोक अश्या वेळेस बीच साईड वा परदेशात जातात आणी आम्ही दगड धोंडे बघायला जाणार होतो. पण खर सांगतो, हि ट्रिप खरोखर अनिव्हर्सरी गिफ्ट होऊ शकते. ३ दिवसांचा मूळ प्लॅन बदलून आम्ही तेथे ५ दिवस राहिलो होतो. फोटो बघून कल्पना येईलच पण हे ठिकाण त्याही पेक्षा भारी आहे. दोघांना एकमेकांसाठी निसर्गात वेळ काढायचा असेल अन कॉल्ड टूरिस्ट प्लेसेस नको असतील तर हंपी बेस्ट ! 


जुलै :  निळकंठेश्वर

आता घरच्यांनी बंड पुकारण्याचा आत आपले भटकणं बंद करू म्हणत गपचूप २-३ आठवडे काढले. आता जुलै म्हणजे पावसाळा आणी त्यात आपण घरी.. अरेरे.. शेवटी जवळच्या जवळ जाऊ म्हणून निळकंठेश्वर प्रदक्षिणा झाली.



ऑगस्ट:अंजनेरी 

आता या सगळ्यात सह्याद्री मी-मी म्हणत होता. त्यालाही न्याय दिलाच पाहिजे नाही का? वाढलेल्या वजनाला आणी सुटलेल्या पोटाला तर त्याही आधी न्याय दिला पाहिजे म्हणून सरळ एक दिवशी रात्री त्रंबक बस पकडून अंजनेरी.

आता यावरही एक लेख खरडला गेलाय. येथे टिचकी द्या बरे. ढगातील डोंगरदेव

सप्टेंबर :रामशेज , चामरलेणी

नाशिक जाणे झालेच होते तर आल्या पावली पासष्ठ वर्ष झुंजणाऱ्या रामशेजला इतिहास विचारून येऊ म्हणत चामरलेणी पण पादाक्रांत करण्यात आल्या.


ऑक्टोबर :
या महिन्यात कोठेही जाणे झाले नाही. काही प्लॅन नसले भटकायला तर एक फेरी तिकोना पॉईंट व्हायलाच पाहिजे नाही का? व्हॅलेन्टाइन डे इथे साजरा करणारी आम्ही लोक आहोत यावर अजून काही सांगत नाही. :) 




नोव्हेंबर :सुधागड 

बल्लाळेश्वराचे बोलावणे आले आणी आल्या पावली सुधागड पण काबीज झाला.

डिसेंबर: दिल्ली, आग्रा, मथुरा 

वर्षाच्या शेवटी आमचे 'नवा गडी नवे राज्य' जाहले. खुप दिवस टुरिझम बिजनेसमध्ये यायची इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाली. ११ लोकांची पहिली टीम "'दिल्ली मथुरा वृंदावन आग्रा या सहलीला घेऊन गेलो होतो. आल्यानंतर लोकांचे अभिप्राय ऐकुन ऍटलिस्ट आपण हे करु शकतो इतपत विश्वास आला आहे.



वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच लिहिता येईल असे नाही कारण डोळ्यात साठवलेले क्षण, जोडीने केलेली भटकंती, भल्या पहाटेची चांदण्यातली चढाई आणि ११ लोकांना घेऊन जाताना आलेले प्रवास अनुभव हे केवळ शब्दातीत.

कोकणात धोपेश्वरच्या जंगलात डॉक्युमेंट्रीचा निष्फळ प्रयत्न केला गेला होता. जाता जाता त्यावरही नजर टाकू शकता. 




चला, आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.


भेटत राहू …… वाचत राहा ….अभिप्राय कळवत राहा !