शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

ब्रह्मगिरी, दुर्गभांडार,हत्ती मेटाची वाट आणि अंजनेरी

ब्रह्मगिरी, दुर्गभांडार,हत्ती मेटाची वाट आणि अंजनेरी 



दिवाळीच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करावा या उद्देशाने त्रंबकेश्वर जायचा प्लॅन केला. कुटुंबासोबत असल्याने देवदर्शना सोबत सोपे पण कमी गर्दीचे किल्ले करावे म्हणून ब्रह्मगिरी, दुर्गभांडार आणि अंजनेरी यांकडे रोख वळवला. ब्रह्मगिरीची या वर्षातील दुसरी भेट तर अंजनेरीची एकंदर पाचवी. दार वर्षाआड अंजनेरी जायची इच्छा यामुळे पूर्ण झाली. रात्रभर एसटीने प्रवास करून पाच वर्षाचा मुलगा किल्ले करेल वाटले नव्हते पण मारुतीचे जन्मस्थान बघायचे म्हणून मंडळी आनंदात भटकत होती.


नव्याने माहितीत आलेले प्रति केदारनाथ मंदिर सुद्धा यावेळी पाहता आले. गाडी नसल्याने पाच किलोमीटरची पायपीट करणार होतो पण वाटेत भेटलेल्या एका पोलीस दादाने स्वतःहून गाडी दिली त्यामुळे हे मंदिरही पाहणे झाले.
अंजनेरी गावात रामायणकालीन हेमांडपंथी मंदिरे आवर्जून बघावी अशी आहेत. रामायणकाळात राम वनवास भोगायला दंडकारण्यात होता तेव्हा त्याने या देवालायांची निर्मिती केली. दंडकारण्य परीसर म्हणजे आजचा अंजनेरी- त्रिंबक परिसर. तेव्हा १०८ मंदिरांची स्थापना केली होती. आजमितीला जेमतेम चार-पाच पडझड झालेल्या स्वरूपात उभी आहेत. पण तरीही त्यांची सुंदरता कालातीत आहे.



बाकी ब्रह्मगिरी, दुर्गभांडार आणि अंजनेरी यावर पूर्वी खच माहिती लिहिली आहे म्हणून आज शाब्दिक भोगातून तुमची सुटका. असो फोटोंचा आनंद घ्या.


पूर्वीचे लेख : मारुतीचे जन्मस्थान: अंजनेरी पर्वत :-
http://sagarshivade07.blogspot.com/2014/12/blog-post.html


अंजनेरी येथील रामायणकालीन प्राचीन देवालये : -
http://sagarshivade07.blogspot.com/2014/12/blog-post_30.html


ब्रह्मगिरी येथील हत्ती मेटाची वाट :
https://youtu.be/_cJEnYELz0M











रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कोळेश्वर ते श्री क्षेत्र महाबळेश्वर

Trek Route: 
कुरुंडे - कोळेश्वर पठार - कोळेश्वर महादेव - जोर गावं - श्री क्षेत्र महाबळेश्वर [ २० किलोमीटर्स ]
 


फेब्रुवारी महिन्यात कोळेश्वर ते कमळगड असा ट्रेक केलेला तेव्हा जोर गावातून चढून अजस्त्र असे कोळेश्वर पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे पादाक्रांत केले होते. आज उत्तरेकडून दक्षिणेकडे भटकण्याचा योग आला. सकाळी सकाळी वाईच्या ढोल्या गणपती मंदिरात नतमस्तक होऊन धोम च्या दिशेने निघालो. धोम येथील लक्ष्मी-नृसिंहाचे मंदिर आणि येथील कमळाच्या आकाराची दगडात कोरलेली पुष्करणी आवर्जून बघावी अशी. गणपती आणि नृसिंहाचे शुभ दर्शन घेऊन भटकंतीला सुरुवात झाली. कोळेश्वर पठाराच्या उत्तरेकडे कुरुंडे गावातून सुरुवात करून खड्या चढाईने पठारावर चढून आलो. हाशहुश करत उत्तर टोकाच्या झेंड्याखाली दोनचार फोटो काढून पठारावर पोहोचलो. कोळेश्वर पठारावर दोन घर सोडली तर ना माणसांचा मागमूस ना कोणती वस्ती. संपूर्ण जंगलाचेच साम्राज्य आणि चक्रव्युहा प्रमाणे एकमेकांत गोवत जाणाऱ्या जनावरांच्या असंख्य वाटा! इथे कोणी हुशारी करून हरवला तर भेट पुढच्या जन्मीच! 


कोळेश्वर पठारावर स्वयंभू कोळेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आहे. महादेवाचे दर्शन घेऊन जंगलातून डोक्यावरची टोपी वाचवत, मानेचे पाठीचे असंख्य व्यायाम करत घनदाट अश्या जंगलातून मार्गक्रमण चालू केले. सुमारे तीन तासात कोळेश्वराच्या दक्षिणेकडे टोकावर पोहोचलो. समोर कोळेश्वराचा मोठा भाऊ महाबळेश्वर दिसू लागला. येथून आता पूर्ण खाली गावात उतरून गणपती घाटाने महाबळेश्वरची चढाई करायची होती. जोर गावात ताक पिऊन क्षुधाशांती करून गणपती घाटाच्या अंगावरच्या चढाईला भिडलो. घामाने सर्वांगाला अंघोळ झालेली. तासाभराच्या चढाईने गणपती घाटाच्या माथ्यावर पोहोचलो. अश्या दुर्गम चढाईस मानसिक बळ देणाऱ्या गणपतीच्या सुरेख मूर्तीला आपोआप हात जोडले गेले. येथून मंहाबळेश्वर, अतिबळेश्वर पंचगंगा मंदिरात जाऊन केट्स पॉईंट च्या दिशेने निघालो. येथून चार किलोमीटरवर पायपीट करून ट्रेकची समाप्ती झाली. 

दृश्यमानता कमी असल्याने खूप काही सुंदर निसर्गचित्रे पाहायला मिळाली नाहीत. पण जंगल अनुभवत, २० किलोमीटर्सची कसदार भटकंती मात्र झाली.