मंगळवार, १४ मार्च, २०२३

महाशिवरात्री स्पेशल ट्रेक - चोरवणे मार्गे नागेश्वर व वासोटा

महाशिवरात्री स्पेशल ट्रेक - चोरवणे मार्गे नागेश्वर व वासोटा 
शिवजयंती स्पेशल - किल्ले प्रचितगड 




महाशिवरात्री आणि शिवजयंती एकापाठोपाठ आल्याचे औचित्य साधून मंडळी पोटापाण्याची कामे उरकून दोन दिवसांचा बाडबिस्तरा घेऊन कोकणाच्या दिशेने निघाली. महाशिवरात्रीच्या एकच दिवस नागेश्वर आणि वासोटा किल्ल्यावर जायला वनखात्याला दक्षिणा द्यावी लागत नाही आणि रात्रीची चढाई करून कोयनेच्या संथ पाण्यात नारायणाचे कोवळे रूप न्याहाळणाचा क्षण अनुभवता येतो. या विचाराने रात्रभर प्रवास करून मंडळी वरंधा घाट उतरून चिपळूण मार्गे चोरवणे गावात पोहोचली. गावात उत्सवाचे स्वरूप आलेले आणि पहाटे चार वाजताही विक्रेते मंडळी शेकोटीची ऊब पांघरून थंडीशी दोन हात करत होती. 

पाठपिशव्या चढवल्या आणि पहाटे चार वाजता विजेरीच्या प्रकाशात नागेश्वर गुहेच्या दिशेने चढाई चालू झाली. वाट मळलेली आणि पायऱ्यांची असल्याने त्याची चिंता नव्हती. बरीचशी जनता संध्याकाळी चढाई करून दर्शन घेऊन उतरत होती. दहा मिनिटांच्या चढाईने सर्वांगाला घामाचा अभिषेक झाला. वाटेत ठिकठिकाणी भगवा फडकत होता. वाटेत एक पाण्याचा ब्रेक घेऊन न थांबता चढाई करत साडे सहा वाजता नागेश्वर गुहेपाशी पोहोचलो. 


पूर्वेकडे आसमंतात झुंजूमुंजू झाले होते. नागेश्वर गुहेतील त्रिशूळ आणि त्याच्या पाठीमागे क्षितिजाशी उमटलेली केशरी किनार मन प्रसन्न करत होते. महादेवाच्या दर्शनासाठी नागेश्वर गुहेत प्रवेशते झालो. रांगेत सात-आठ लोक असल्याने पटकन दर्शन झाले. गुहेत आलेले गावातील नारळ विक्रेते थोडेच नारळ घेऊन आल्यामुळे भक्तांनी विकत घेतलेले नारळ त्यांनी न फोडता पिंडीवर वाहावे जेणेकरून ते परत फिरून विक्रेत्याकडे येतील यासाठी गावातील आयोजक मंडळी पहाटेपासून घसा ताणीत होती. त्याकडे दुर्लक्ष करून शुचिर्भूत मानाने महादेवाचा जयजयकार केला आणि सूर्योदय पाहायला एखादी छान जागेच्या शोधात निघालो. 



दर्शन घेऊन गुहेबाहेर आलो तोच समोर सूर्योदयाचा मंगलमय सोहोळा सुरु झाला. सोनसळी किरणांनी वासोट्याचे जंगल , कडे- कपारी जागे होऊ लागले. साताऱ्याकडून वासोट्याला येतो तेव्हा कितीही लवकर आलो तरी नऊच्या आत काही येत येत नाही. आज मात्र साडे आठ वाजता आम्ही मोजकीच मंडळी किल्ल्याच्या माथ्यावरील मारुती बाप्पापुढे नतमस्तक झालो. सकाळच्या सुंदर प्रकाशाने लांबपर्यंत डोंगररांगा दिसत होत्या. कोवळ्या प्रकाशात आता वासोट्यावरून नागेश्वर सुळका खुलून दिसत होता. येथे थोडीशी पेटपूजा करून गडभ्रमंती करून परत मार्गाने नागेश्वर गुहेच्या दिशेने चालू लागलो. 

वासोट्याच्या जंगलातून बाहेर आलो तसे कोवळे उन्हाची जागा रणरणत्या उन्हाने घेतली. एव्हाना मध्यान्ह होऊन गेली होती. पहाटे सहा वाजता आठ माणसांची रांग आता दिड-दोन किलोमीटर झाली होती. ब्राम्हमुहूर्तावर दर्शन होणे हि देवाचीच इच्छा असावी असे म्हणत नागेश्वर कडून चोरवण्याच्या दिशेने उतराई चालू झाली. तीन लिटर पाणी घेऊनही संपत आले होते. नागेश्वर गुहेच्या खाली पाण्याचे कुंड असल्याने चिंता नाही असे वाटलेले पण त्यातले पाणी जास्त उपस्याने पिण्यायोग्य नसल्याने पाण्याच्या शोध थांबवून परतीचा रस्ता धरला. 







अडीच-तीनच्या सुमारास जळता सूर्य डोक्यावर घेऊन उतराई जिकीरीची बनली. द्राक्षे, काकडी,संत्री आदी मंडळींनी थोडा वेळ खिंड लढवली पण पाण्यावाचून जीव कासावीस झालेला. पायथ्याशी वाटेत कुठेही पाणी नव्हते. पूर्ण उतरून पायथ्याशी आलो तर अहो आश्चर्यम! चोरवणे गावापासून थोड्या अंतरावरील साखर गावातील एक सदगृहस्थ सर्व भक्तांसाठी पाण्याची बाटली आणि उपवास असल्याने साबुदाण्याची खिचडी प्रसाद घेऊन उभे होते. त्या क्षणाला तो माणूस म्हणजे साक्षात देव उभा होता म्हणता येईल. येथून आता पुढे चार किलोमीटर्स ची पायपीट बाकी होती पण ट्रेक लिडर शरदभाऊ पुढे जाऊन गाडी घेऊन आलेले पाहिले आणि आज आपल्यावर नागेश्वर महादेवाचा वरदहस्त आहे याची खात्री पटली. त्याची लीला इथे थांबणे नव्हते. गावात गेल्यावर तेथे मंदिरात हरिनाम सप्ताहाचे पारायण असल्याने महाप्रसाद होता. तेथे उदरम भरणंम करून मंडळी नदीवर डुंबायला निघाली. 



चार वाजता आजचा ट्रेक संपवून गावातील दगडी बांधकामाचे पुरातन राम वरदायिनी मंदिर पाहायला निघालो. नागेश्वर दर्शन करून वरदायिनी मातेचे दर्शन करण्याची प्रथा आहे असे गुरुजींनी सांगितले. छान फोटोसेशन करून आता मंडळी निघाली संगमेश्वर मधील शृंगारपूर येथे. उद्याचा बेत होता किल्ले प्रचितगड. सरपंचाच्या घरी जेवणाची तयारी करून उद्यासाठी वाटाड्या शोधायला निघालो. ट्रेकभीडूनी भोजनाची जोरदार तयारी केली होती. चवदार भोजन झाल्यावर गावातील मारुती मंदिरात पथाऱ्या पसरल्या. आज जवळपास १८ किलोमीटरची भटकंती झाली होती. पाठ टेकताच मंडळी निद्रादेवीच्या स्वाधीन झाली. 









घाटवाट डोणी दार / त्रिगुणधार

१२ मार्च रविवारची भटकंती - घाटवाट डोणी दार / त्रिगुणधार  

नेहमीच्या ट्रेकिंग ग्रुपचा रविवारचा ट्रेक जाहीर झाला तसे या दुर्गम आणि घाम काढणाऱ्या वाटेवर जायची योजना आखली. आदल्या दिवशी मुलाचा सहावा वाढदिवस असल्याने जावे कि नाही या द्विधा मनःस्थितीत शेवटी एकदाचे जायचे ठरवले. दरवेळी रात्रीभर प्रवास असल्याने बेताने थोडेफार उदरम भरणम होते. आज मात्र तीन-चार प्लेट पावभाजी/ पुलाव चापून मंडळी भटकंतीस निघाली. सुमारे ११०० मीटरची खडी चढाई उद्या कोकणच्या भर उन्हात चढायची असल्याने हि पावभाजी उद्या खरे "रंग" दाखवेल असे वाटलेले पण डोंगरदेवांच्या आशीर्वादाने असले काही झाले नाही. 


पहाटे ठाणे जिल्ह्यातील रामपूर गावातून मारुतीबाप्पाचा आशीर्वाद घेऊन मंडळी डोंगरकड्याना भिडण्यास सज्ज झाली. आजचे लक्ष होते डोणी दार. रामपूर गावातून तीन घाटवाटा घाटमाथ्यावर जातात. पोशी नाळ, डोणी दार , माडीची नाळ. भर पावसात या तिन्ही नाळेतून पाणी वाहत  येऊन एक ठिकाणी मिळते म्हणून याचे नाव त्रिगुणधार. आम्हाला मधल्या नाळेतून अकराशे मीटर चढाई करून पुणे जिल्ह्यातील डोणी या घाटमाथ्याच्या गावात पोहोचायचे होते. सुरवातीला १५-२० मिनिटांचे गवतातुन सरळ चालणे असल्याने चांगला वॉर्मअप झाला. 'वाघाची वाडी' गावात सगळे भिडू एकत्र जमण्यासाठी थांबलो आणि मग सुरु झाली दगडांच्या राशीतून अंगावरची चढाई. 




वाटेतील मोठमोठाल्या धोंड्यातून बाजूने मार्ग काढत सुमारे अडीच तासात मध्यात आलो. येथे एक छोटीशी गुहा लागते तेथे विसावा घेऊन पुढे निघालो. नाळेच्या अखेरच्या टप्प्यात कारवीच्या जंगलात घुसलो तसे घसाऱ्याने पाकपुक होऊ लागली. अखंड वाहणारा घाम पुसत एकदाचे माथ्यावरच्या खिंडीत आलो तेव्हा कुठे सूर्यनारायणाचे प्रथम दर्शन झाले. पूर्ण चढाई नाळेतून असल्याने अकरा वाजेपर्यंत कुठेही उन्हाचा त्रास झाला नाही. भर उन्हात असे ट्रेक शोधून आयोजित करणाऱ्या आमच्या ट्रेक लीडरचे मनोमन आभार मानले आणि काकड्या, फळे, चिक्की या मंडळींना न्याय मिळवून दिला. 





माथ्यावरच्या खिंडीतून एक वाट पुढे चढून डोणी गावाकडे जाते तर डावीकडची दुर्गवाडीकडे. बाकीची मंडळी बरेच मागे असल्याने आम्ही तिघे खिंडीतून दुर्गवाडीकडे जाणारी पायवाट पकडून कोकणकडा पाहायला निघालो. दोन किलोमीटर पुढे गेल्यावर एक भन्नाट स्पॉट लागला. त्या जागेवरून रामपूर पासून आपण कशी नाळ चढत आलो ते पाहूनच डोळे विस्फारले. थोडी वाट वाकडी केली तर सुंदर नजारे पाहायला मिळाले. येथून आल्या वाटेने मागे जाऊन डोणी गावात जाणारी वाट पकडून रामराया जन्मला त्या कडकडीत बाराच्या उन्हात डोणी गावात पोहोचलो. 
जाताना माळीण येथील स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहून पालतर - आडिवरे - डिंभे प्रवास करत निघालो.  डिंभे धरणाच्या पाण्यात दोन डुबक्या मारून पुण्यनगरीची वाट धरली. 



महत्वाच्या नोंदी : 

कोकणातील गाव : रामपूर गाव, मुरबाड तालुका , ठाणे जिल्हा. 
देशावरचे गाव : डोणी गाव, आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा 
चढाई : मध्यम , अंदाजे ५ तास लागतात. 
वाटाड्या गरजेचा नाही असल्यास उत्तम. 
GPX फाईल URL : 

YouTube लिंक :