मंगळवार, १४ मार्च, २०२३

महाशिवरात्री स्पेशल ट्रेक - चोरवणे मार्गे नागेश्वर व वासोटा

महाशिवरात्री स्पेशल ट्रेक - चोरवणे मार्गे नागेश्वर व वासोटा 
शिवजयंती स्पेशल - किल्ले प्रचितगड 




महाशिवरात्री आणि शिवजयंती एकापाठोपाठ आल्याचे औचित्य साधून मंडळी पोटापाण्याची कामे उरकून दोन दिवसांचा बाडबिस्तरा घेऊन कोकणाच्या दिशेने निघाली. महाशिवरात्रीच्या एकच दिवस नागेश्वर आणि वासोटा किल्ल्यावर जायला वनखात्याला दक्षिणा द्यावी लागत नाही आणि रात्रीची चढाई करून कोयनेच्या संथ पाण्यात नारायणाचे कोवळे रूप न्याहाळणाचा क्षण अनुभवता येतो. या विचाराने रात्रभर प्रवास करून मंडळी वरंधा घाट उतरून चिपळूण मार्गे चोरवणे गावात पोहोचली. गावात उत्सवाचे स्वरूप आलेले आणि पहाटे चार वाजताही विक्रेते मंडळी शेकोटीची ऊब पांघरून थंडीशी दोन हात करत होती. 

पाठपिशव्या चढवल्या आणि पहाटे चार वाजता विजेरीच्या प्रकाशात नागेश्वर गुहेच्या दिशेने चढाई चालू झाली. वाट मळलेली आणि पायऱ्यांची असल्याने त्याची चिंता नव्हती. बरीचशी जनता संध्याकाळी चढाई करून दर्शन घेऊन उतरत होती. दहा मिनिटांच्या चढाईने सर्वांगाला घामाचा अभिषेक झाला. वाटेत ठिकठिकाणी भगवा फडकत होता. वाटेत एक पाण्याचा ब्रेक घेऊन न थांबता चढाई करत साडे सहा वाजता नागेश्वर गुहेपाशी पोहोचलो. 


पूर्वेकडे आसमंतात झुंजूमुंजू झाले होते. नागेश्वर गुहेतील त्रिशूळ आणि त्याच्या पाठीमागे क्षितिजाशी उमटलेली केशरी किनार मन प्रसन्न करत होते. महादेवाच्या दर्शनासाठी नागेश्वर गुहेत प्रवेशते झालो. रांगेत सात-आठ लोक असल्याने पटकन दर्शन झाले. गुहेत आलेले गावातील नारळ विक्रेते थोडेच नारळ घेऊन आल्यामुळे भक्तांनी विकत घेतलेले नारळ त्यांनी न फोडता पिंडीवर वाहावे जेणेकरून ते परत फिरून विक्रेत्याकडे येतील यासाठी गावातील आयोजक मंडळी पहाटेपासून घसा ताणीत होती. त्याकडे दुर्लक्ष करून शुचिर्भूत मानाने महादेवाचा जयजयकार केला आणि सूर्योदय पाहायला एखादी छान जागेच्या शोधात निघालो. 



दर्शन घेऊन गुहेबाहेर आलो तोच समोर सूर्योदयाचा मंगलमय सोहोळा सुरु झाला. सोनसळी किरणांनी वासोट्याचे जंगल , कडे- कपारी जागे होऊ लागले. साताऱ्याकडून वासोट्याला येतो तेव्हा कितीही लवकर आलो तरी नऊच्या आत काही येत येत नाही. आज मात्र साडे आठ वाजता आम्ही मोजकीच मंडळी किल्ल्याच्या माथ्यावरील मारुती बाप्पापुढे नतमस्तक झालो. सकाळच्या सुंदर प्रकाशाने लांबपर्यंत डोंगररांगा दिसत होत्या. कोवळ्या प्रकाशात आता वासोट्यावरून नागेश्वर सुळका खुलून दिसत होता. येथे थोडीशी पेटपूजा करून गडभ्रमंती करून परत मार्गाने नागेश्वर गुहेच्या दिशेने चालू लागलो. 

वासोट्याच्या जंगलातून बाहेर आलो तसे कोवळे उन्हाची जागा रणरणत्या उन्हाने घेतली. एव्हाना मध्यान्ह होऊन गेली होती. पहाटे सहा वाजता आठ माणसांची रांग आता दिड-दोन किलोमीटर झाली होती. ब्राम्हमुहूर्तावर दर्शन होणे हि देवाचीच इच्छा असावी असे म्हणत नागेश्वर कडून चोरवण्याच्या दिशेने उतराई चालू झाली. तीन लिटर पाणी घेऊनही संपत आले होते. नागेश्वर गुहेच्या खाली पाण्याचे कुंड असल्याने चिंता नाही असे वाटलेले पण त्यातले पाणी जास्त उपस्याने पिण्यायोग्य नसल्याने पाण्याच्या शोध थांबवून परतीचा रस्ता धरला. 







अडीच-तीनच्या सुमारास जळता सूर्य डोक्यावर घेऊन उतराई जिकीरीची बनली. द्राक्षे, काकडी,संत्री आदी मंडळींनी थोडा वेळ खिंड लढवली पण पाण्यावाचून जीव कासावीस झालेला. पायथ्याशी वाटेत कुठेही पाणी नव्हते. पूर्ण उतरून पायथ्याशी आलो तर अहो आश्चर्यम! चोरवणे गावापासून थोड्या अंतरावरील साखर गावातील एक सदगृहस्थ सर्व भक्तांसाठी पाण्याची बाटली आणि उपवास असल्याने साबुदाण्याची खिचडी प्रसाद घेऊन उभे होते. त्या क्षणाला तो माणूस म्हणजे साक्षात देव उभा होता म्हणता येईल. येथून आता पुढे चार किलोमीटर्स ची पायपीट बाकी होती पण ट्रेक लिडर शरदभाऊ पुढे जाऊन गाडी घेऊन आलेले पाहिले आणि आज आपल्यावर नागेश्वर महादेवाचा वरदहस्त आहे याची खात्री पटली. त्याची लीला इथे थांबणे नव्हते. गावात गेल्यावर तेथे मंदिरात हरिनाम सप्ताहाचे पारायण असल्याने महाप्रसाद होता. तेथे उदरम भरणंम करून मंडळी नदीवर डुंबायला निघाली. 



चार वाजता आजचा ट्रेक संपवून गावातील दगडी बांधकामाचे पुरातन राम वरदायिनी मंदिर पाहायला निघालो. नागेश्वर दर्शन करून वरदायिनी मातेचे दर्शन करण्याची प्रथा आहे असे गुरुजींनी सांगितले. छान फोटोसेशन करून आता मंडळी निघाली संगमेश्वर मधील शृंगारपूर येथे. उद्याचा बेत होता किल्ले प्रचितगड. सरपंचाच्या घरी जेवणाची तयारी करून उद्यासाठी वाटाड्या शोधायला निघालो. ट्रेकभीडूनी भोजनाची जोरदार तयारी केली होती. चवदार भोजन झाल्यावर गावातील मारुती मंदिरात पथाऱ्या पसरल्या. आज जवळपास १८ किलोमीटरची भटकंती झाली होती. पाठ टेकताच मंडळी निद्रादेवीच्या स्वाधीन झाली. 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: