रविवार, ८ जानेवारी, २०१७

२०१६! जुना गडी , राज्य नवे !



आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. रोजच्या पळापळीत काय मिळवले याचा खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसे पहिले तर मागील वर्षी याच दिवशी मी जसा होतो अगदी तसाच आहे आजही.मागच्या वर्षी थोडासा बारीक आणी त्या आधीच्या वर्षी थोडा गोरा झालो होतो पण ती पुण्याई फार काळ टिकू शकली नाही. असो.

नवीन संसार आणी नवीन सुरवात. आपली भटकंतीची आवड जोपासणारा जोडीदार मिळाला तर मग काय आपल्याला सगळं रानच मोकळं. आयुष्यातल्या या गुलाबी क्षणांनाही मुकायचे नाही आणी स्वस्थही बसायचे नाही अश्या द्वंदात "पुराव्यांनी शाबित ... " या चालीवर वर्षभरात कुठे कुठे भटकंती झाली याची हि चित्ररुपी झलक .


जानेवारी :  मांगी-तुंगी 

२६ तारखेची सुट्टी जोडून आली आणी जोडीने ट्रेक करायचा योग आला. पहाटेच्या लुकलुकत्या चांदण्यात, गुलाबी थंडीत चढून जाऊन, किल्ल्याच्या माथ्यावरून सूर्योदय पाहायची मजाच वेगळी. 



मांगी-तुंगी वर चढाईचे पूर्व लेख येथे वाचायला मिळतील. 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी

फेब्रुवारी : देवगिरी 

मित्राच्या साखरपुड्याचे निमित्त काय झाले आणी औरंगाबादची वर्दी आली. कार्यक्रम आटोपला आणी स्वारी निघाली देवगिरी किल्ल्यावर. किल्ल्याचे स्थापत्यशास्त्र फारच कमाल आहे. 

मार्च : राजापूर, धोपेश्वर 

याही वर्षी राजापूरच्या गंगेत आमचे घोडे नाहले आणी तेही जोडीने! 
रात्नांगीची ती आंबा पोफळीची वने, कौलारू घरे, जलदुर्गांची रेलचेल, चिरंतन निसर्ग सौंदर्य, आगळा वेगळा शिमगोत्सव आणी आजूबाजूला अनेक "अंतू बर्वा" सदृश्य मंडळी. कमाल !



यावर बरेच लेख लिहायचे आहेत. सुरवात तर झाली आहे येथून राजापुरी वर्दी देऊन या !
पहिले प्रेम
राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 

 

एप्रिल : सफर-ए-जलदुर्ग : आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग  

जिथे दर महिन्याला एक ट्रेक जमवायची मारामार त्यात एकाच ट्रिप मध्ये २ दिवसात ४ किल्ले म्हणजे मेजवानीच.
यावेळी गाडी घेऊन गेलो असल्याने राजापूर-आंबोळगड- यशवंतगड- रत्नदुर्ग- रत्नागिरी- पावस-पूर्णगड- गणपतीपुळे असा साग्र संगीत भटकंती झाली.


मे : गोवा 

जरा कुठे स्वस्थ बसतो न बसतो तोच फर्मान आले .... गोवा... 



जुन : हंपी, बदामी 

जून म्हणजे आला लग्नाचा वाढदिवस. आणी त्यातही पहिलाच. हंपी आणी बदामी जायचे ठरवले तर लोकांनी वेड्यात काढले. लोक अश्या वेळेस बीच साईड वा परदेशात जातात आणी आम्ही दगड धोंडे बघायला जाणार होतो. पण खर सांगतो, हि ट्रिप खरोखर अनिव्हर्सरी गिफ्ट होऊ शकते. ३ दिवसांचा मूळ प्लॅन बदलून आम्ही तेथे ५ दिवस राहिलो होतो. फोटो बघून कल्पना येईलच पण हे ठिकाण त्याही पेक्षा भारी आहे. दोघांना एकमेकांसाठी निसर्गात वेळ काढायचा असेल अन कॉल्ड टूरिस्ट प्लेसेस नको असतील तर हंपी बेस्ट ! 


जुलै :  निळकंठेश्वर

आता घरच्यांनी बंड पुकारण्याचा आत आपले भटकणं बंद करू म्हणत गपचूप २-३ आठवडे काढले. आता जुलै म्हणजे पावसाळा आणी त्यात आपण घरी.. अरेरे.. शेवटी जवळच्या जवळ जाऊ म्हणून निळकंठेश्वर प्रदक्षिणा झाली.



ऑगस्ट:अंजनेरी 

आता या सगळ्यात सह्याद्री मी-मी म्हणत होता. त्यालाही न्याय दिलाच पाहिजे नाही का? वाढलेल्या वजनाला आणी सुटलेल्या पोटाला तर त्याही आधी न्याय दिला पाहिजे म्हणून सरळ एक दिवशी रात्री त्रंबक बस पकडून अंजनेरी.

आता यावरही एक लेख खरडला गेलाय. येथे टिचकी द्या बरे. ढगातील डोंगरदेव

सप्टेंबर :रामशेज , चामरलेणी

नाशिक जाणे झालेच होते तर आल्या पावली पासष्ठ वर्ष झुंजणाऱ्या रामशेजला इतिहास विचारून येऊ म्हणत चामरलेणी पण पादाक्रांत करण्यात आल्या.


ऑक्टोबर :
या महिन्यात कोठेही जाणे झाले नाही. काही प्लॅन नसले भटकायला तर एक फेरी तिकोना पॉईंट व्हायलाच पाहिजे नाही का? व्हॅलेन्टाइन डे इथे साजरा करणारी आम्ही लोक आहोत यावर अजून काही सांगत नाही. :) 




नोव्हेंबर :सुधागड 

बल्लाळेश्वराचे बोलावणे आले आणी आल्या पावली सुधागड पण काबीज झाला.

डिसेंबर: दिल्ली, आग्रा, मथुरा 

वर्षाच्या शेवटी आमचे 'नवा गडी नवे राज्य' जाहले. खुप दिवस टुरिझम बिजनेसमध्ये यायची इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाली. ११ लोकांची पहिली टीम "'दिल्ली मथुरा वृंदावन आग्रा या सहलीला घेऊन गेलो होतो. आल्यानंतर लोकांचे अभिप्राय ऐकुन ऍटलिस्ट आपण हे करु शकतो इतपत विश्वास आला आहे.



वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच लिहिता येईल असे नाही कारण डोळ्यात साठवलेले क्षण, जोडीने केलेली भटकंती, भल्या पहाटेची चांदण्यातली चढाई आणि ११ लोकांना घेऊन जाताना आलेले प्रवास अनुभव हे केवळ शब्दातीत.

कोकणात धोपेश्वरच्या जंगलात डॉक्युमेंट्रीचा निष्फळ प्रयत्न केला गेला होता. जाता जाता त्यावरही नजर टाकू शकता. 




चला, आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.


भेटत राहू …… वाचत राहा ….अभिप्राय कळवत राहा !

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

पासष्ठ महिन्यांची झुंज : रामशेज किल्ला / चामरलेणी



पासष्ठ महिन्यांची झुंज : रामशेज किल्ला

अंजनेरी पायथ्यापासून नाशिक बस पकडून नाशिक स्थानकावर आलो. पेठ बस लागलेलीच होती.
"मास्तर २ पेठ द्या.".

पेठ पासून अर्ध्‍या तासाच्‍या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते रामशेज किल्ल्याच्या पायथ्‍याशी असलेले गाव.आशेवाडी गावाच्‍या फाट्यावर उतरून ५ मिनिटात आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्‍ल्यावर चढाई करता येते. गावातून दृष्टीक्षेपात असलेल्या गडावर पोचण्‍यासाठी एक तास पुरतो.

आशेवाडी गावातून दिसणारा रामशेज किल्ला. 



गावात असलेल्या  दुकानांमधून टाईम पास पोटोबा करून किल्ल्याच्या दिशेने वाटचाल चालू होते. गावाबाहेर पडताच आजूबाजूचा मोकळा निसर्ग मी-मी म्हणू लागतो. आजूबाजूला चालू असलेले खाणकाम दुर्लक्ष करण्यास भाग पाडतो. मोरांचा आवाज ऐकत त्यांना लोकेट करत करत आपण अर्धा किल्ला चढलेला असतो.

गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ला डावीकडे ठेवत वाटचाल करत सुमारे दहा मिनिटात किल्ल्यावरील मंदिर व गुहा दृष्टीपथात येते आणि वाटेचे कन्फर्मेशन देते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या लागतात.



किल्ल्याची उंची पाहता खरेच हा किल्ला पासष्ठ महिने  कसा काय लढवला असेल असे वाटून जाते. मुघलांनी किल्ल्याच्या उंचीचे लाकडी मचाण बांधून त्यावरून तोफमारा चालवला होता हे खरेच वाटायला लागते. कुठे मचाण बांधली असेल? किल्ल्यावरून त्या मचाणावर दगडफेक करून त्या कश्या उधवस्त केल्या जात असतील? या विचारातच आपण रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो.

आता इतिहासातून बाहेर येऊन आजूबाजूला मान वळवली की, आपली चढाई आपोआप थांबते. आपल्या मनात ऐतिहासिक द्वंद्व चालू असताना इथे तर निसर्गाचा निसर्गासाठीचाच अद्वितीय सोहळाच चालू असतो. आकाशभर काळ्या ढगांनी ढकलाढकली चालू केलेली असते. एका उंच टेकाडाशी रिंगण करून फेर धरल्यासारखा भास होत असतो. सूर्यनारायणांचे लक्ष असतेच त्यामुळे या रिंगणाला सोनेरी किनार लाभते. टेकाडा-पलीकडून उंची घेतलेला वारा आता आपल्यापर्यंत येऊन ढगातील चोरून आणलेल्या दवाने आपले पापणीचे केसही भिजवतो.
Felicitation by Nature to Nature !


घड्याळाकडे लक्ष जाते आणी आपण कल्पनेतून वर्तमानात येतो. पायऱ्या चढून भल्यामोठ्या चाफ्याचा झाडापाशी आलो की चाफ्याच्या वासाने मंदिरात शिरताना आपले मनही शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते.

गडावर शिरताना वाटेत एक गुहा दिसते. त्‍या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक बारमाही टाके आहे. त्‍यामुळे गुहेत एकदम गारेगार वातावरण असते. पुजारी काकांशी थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी गुहेखाली असलेल्या पाण्याच्या टाकीत उतरायची वाटही दाखवली. वर्षातून एकदा पावसाळ्याच्या आधी गावातून वीज पंप येथे आणून या टाकीतील सगळे पाणी काढून साफ सफाई ते करतात. बारमाही जिवंत झरा असल्याने दोन दिवसात परत टाकी भरून जाते आणि अतिरिक्त पाणी खालूनच वाहून  झाडांना जाते.

राम मंदिर व  प्रशस्त गुहा. 


गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्‍यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. येथूनच थोडे खाली बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने आपण अर्ध्या तासात आशेवाडीत पोहोचतो. येथूनच समोरचा देहेरगड व भोरगड किल्ला दिसतो. सद्यस्थितीत तेथे मिलिटरी बेस असल्याने तेथे जाण्यास परवानगी घ्यावी लागते.
गुप्त दरवाजापासून वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते तेथून देहेर व आजूबाजूच्या परिसराचे मस्त दर्शन होते. तेथून फिरून आल्यावर परत पायऱ्यांच्या सुरवातीला आल्यास तेथून एक वाट खाली जाते. तेथे किल्ल्याच्या अभेद्य दरवाज्याचे दर्शन होते. येथून खाली गुहे सदृश्य जाणारी वाट ही राम मंदिराच्या बाजूस असलेल्या गुहेत निघते.



येथून बाहेर येऊन थोडे डावीकडे पठार लागते. येथे छोटी तळी आणि असंख्य मासे. गार पाण्यात पाय सोडून तळव्यांना थंडक द्यायची आणि थोडा पोटोबा करून घायचा.



येथून पुढे मोकळ्याढाक पठारावर थोडी वामकुक्षी घेतानाच वर नजर जाताच समजते कि, किल्ल्यावर आपल्याखेरीज अजून कोण तरी आहे आणि आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.
ब्राम्हणी घार आपल्या जोडीला असतेच. दोन तीन पंख मारून मग खूप वेळ निवांत उडत असलेली घार आणि उतारावर गाडी बंद करून फुकट जाणारा मी या दोघात का कुणास ठाऊक साम्य वाटून जाते.




आता उन्हे सरली आणि पाय परतीच्या वाटेला लागले. जाताना वाटेतच चामरलेणी आहेत त्याही करायच्या होत्या. किल्ला उतरून आल्यावर रस्त्यावरच यष्टीची वाट बघत ठाण मांडली. सुमारे पंधरा मिनिटात यष्टी आली आणि दहा रुपयात चामरलेणी फाटा.

रामशेज किल्ल्यावरून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.

चामरलेणी म्हणजे भयंकर पायपीट आहे. खासकरून जेव्हा एक ट्रेक करून येऊन तुम्ही ह्या सुमारे ८०० पायऱ्या चढताय तर ब्रह्मांड आठवतं.  जैन लेण्या आणि जैन तीर्थस्थाने हि सगळी अश्या उंच डोंगरावर वसलेली आहेत. चामरलेण्यांच्या पायथ्याशी जैन आश्रम व संस्थान आहे. येथे थोडीफार खाणे-पिणे व फ्रेश व्हायची व्यवस्था आहे
.
चामरलेणी 


सुमारे ८०० पायऱ्या चढून वरती बघण्यासारखे काहीही नसल्याने चिडचिड होऊन परत मार्गी लागलो. मांगी-तुंगी ची आठवण काढत आणि दम खात एकदाचे वाटेला आलो. लेण्यांच्या शिखरावरूनच शॉर्टकट  बघून ठेवला होता. येथून चालत भूषणची सासुरवाडी गाठून तेथून पाहुणचार घेऊन हायवेला आलो. 

येथूनच पेठ-पुणे गाडी मिळाली आणि पुढच्या ७ तासांची निश्चिती झाली. रात्री पुण्यनगरी गाठली आणि परत औताला जुंपायला अस्मादिक सिद्ध जाहले. 

बरं तर मग,  मराठ्यांनी मोघलांना दिलेली पासष्ठ महिन्याची झुंज आणि त्या लढाईचे वर्णन वाचायचे असेल तर येथे वाचायला मिळेल.


वाचत राहा.



रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

ढगातील डोंगरदेव



पूर्व लेख: 
3. हरीहर किल्ल्यावर सापडलेली शिवकालीन/ब्रिटीशकालीन नाणी.
4. हरीहर उर्फ हर्षेगड किल्ला


मारुतीचे जन्मस्थान: अंजनेरी पर्वत, ढगातील डोंगरदेव 


तब्बल ८ महिन्यांपेक्षा काळ लोटला आणी दोन संसारी जीव पाठीवर पिशव्या अडकवून आज परत सज्ज झाले अर्थात पूर्व परवानगीने. शुक्रवार कसाबसा संपवून रात्री साडे-दहाच्या त्रंबक यष्टीची वाट पाहणे आले. मुसंडी मारून मिळवलेली जागा आरक्षित असल्याच्या साक्षात्कार यष्टी निघाल्यावर झाल्याने शेवटचा बाक पकडला आणी खांदा पाठीच्या स्नायूंची ड्युरॅबिलिटी टेस्टिंग करून घेतली. आता यंत्रांच्या आवाजात सर्व आवाज विरून गेले आणी पहाटेच्या सुमारास गोदावरी उगमाशी पोहोचलो. 
पहाटे पहाटे एका टपरीवर चहाच्या नावाखाली एक अशक्य भिकार पेय ग्रहण करून शिवमंदिराकडे निघालो. गर्दी बघता देवाला लांबूनच नमस्कार कळवला. कुशावर्त तलावात पापे धुण्यासाठी लागलेली रीघ बघता आल्या पावली यष्टी पकडून अंजनेरी फाटा. दोन वर्षांनी बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. जिथे झोपायचे होते ते कार्तिक स्वामी मंदिर रस्ता मोठा झाल्याने कॉम्पॅक्ट झाले. येथेच पथारी टाकून सूर्यनारायणाची प्रतीक्षा करणे आले. 

उन्हे आली पण अंजनेरी सुळक्यावर ढगांनी ठाण मांडलेच होते. आता दिवसभर यांची साथ निश्चित होती. ढगात डोकी खुपसून बसलेले नवरा नवरी सुळके उजव्या हाताशी ठेवत सिद्ध हनुमान मंदिरात येताच भव्य रूपाने हात जोडले गेले. मागच्या वेळेचाच पुजारी आणी त्याची  जीर्णोद्धारासाठी देणगीची टेप दुर्लक्ष करून गावात शिरलो. 


आज गावातली मुले निवांत उनाडक्या करत होती. शनिवारची शाळा नाही का रे ? नाय आज शाळा. शिक्षक आज गेलेत मोर्च्याला. नाशिक मध्ये त्या दिवशी मराठा मोर्चा म्हणून शाळेतील सगळ्या शिक्षकांना शाळा सोडून यायला सांगितले होते. "चिमुरड्यांचा लक्षणीय सहभाग" या वाक्यासाठी शाळेतली मुले न मुली टेम्पोत भरून नेण्यात येत होती. त्रंबकच्या पुढच्या आदिवासी पाड्यातूनही लोक आज गाडीत भरून आणले गेले होते. एकाकडे विचारपूस केली असता, एक बाटली अन तीनशे रुपये यासाठी  खटाटोप चालला होता. असो. शाळा  बंद ठेऊन मोर्चे काढत फिरणाऱ्या त्या महान शिक्षकांना आरक्षणाची खरी गरज आहे हेच खरे. असो. 

आता पाड्यावरून अंजनी मातेचे दर्शन घेऊन चढाई चालू झाली. रस्ता माहिती असल्याने जवळचे रस्ते घेऊन पहिल्या खिंडीत पोहोचलो. पावसाने आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आणी खिंडीत आल्यावर पावसाबरोबर माकडांनीही आमची साथ करण्याचा निर्धार केला. 



डागडुजी करण्याच्या हेतूने नको तिथे रेलिंग्स लावून किल्ल्याची यथेच्छ वाट लावलेली आहे. खिंडीतली जैन गुहा ग्रील लावून बंद केलेली होती. मागच्या खेपेस आतून पहिली असल्याने येथे फारसे लक्ष न देता पठारावर आलो. 
आता येथे जोरदार वारा खरंतर ढग इकडून तिकडे घिरट्या घालत पाण्याचा हलकासा शिडकावा करत आमच्या वाटचालीस शुभेच्छा देत होते. थोडेसे ढग बाजूला झाले कि रस्ता दिसायचा. फोटो तर काही धड येत नव्हते पण पठारावर फुललेली रंगांची उधळण मात्र लक्ष देण्यास भाग पाडत होती. सात वर्ष्याने येणारा कारवीचा बहर पूर्ण नजरभर पसरला होता. 

लांबच लांब पसरलेले हिरवेगार गालिचे. त्यावर ही नैसर्गिक मुक्त उधळण. ढगातले पाण्याचे थेंब अंगा-अंगावर थबकून अगदी पापण्यांवरही जमा झालेले दवबिंदू. मोकळ्या आकाशाखालची मुक्त भटकंती. सगळे काही मनाप्रमाणे घडून यावे असे. 




मागच्या वर्षी पावसाळा लवकर संपून वातावरण लवकर क्लिअर झाले होते. हा खालचा मागच्या वर्षीचा सेम फ्रेम फोटो.



धुक्यातून वाट काढत अंजनीमातेच्या मंदिरापाशी आलो. २-३ काकड्या सोलून तिखट मीठ लावून खाल्ल्यावर जो काही अमृततुल्य भास झाला त्याची सर कशालाच नाही.
पोटोबा झाल्यावर कारवीच्या फुलांमधून वाट काढत आश्रमापाशी येऊन ठेपलो. ओझरते दर्शन करत सीता गुंफा गाठली.



गर्द जंगल आणी दाट धुके यामुळे मस्त माहोल झाला होता. अंधाऱ्या वाटेने कूच करत, दम खात, सुमारे साडे तीन तासाने अंजनेरी पर्वतावरच्या शिखरावर असलेल्या मारुतीच्या जन्मस्थानी पोहोचलो. 



शिखरावर मारुतीच्या मंदिरात तर कमाल वातावरण झाले होते. मंदिरात देवही दिसत नव्हता एवढे धुके होते. आम्ही नारळ फोडून आल्याची वर्दी देवाला दिली आणी प्रसाद संपवायच्या कामगिरीवर रुजू झालो.




आताशा ४ वाजून गेले होते आणी पायथ्याशी असलेली रामायणकालीन भग्न मंदिरे खुणावत होती. एक संकल्प पूर्ण झाला होता. मंदिरात शांत वातावरणात, ढगांशी मस्ती करत काढलेला अर्धा तास मनाला बराच थंडावा  घेऊन आला.

आल्या पावली निघालो तरीही ढगांनी साथ मात्र काही सोडली नाही. अंजनेरी परीसरात सापडणारी अति दुर्मिळ सेरीजोपिया अंजनेरिका वनस्पती शोधण्याचा बराच खटाटोप झाला पण त्यामुळे बाकीच्या फुलांची मस्त छायाचित्रे मिळाली.




हे बघून अवतार आठवला. स्वयंप्रकाशी वनस्पती तत्सम हे जे काही होत ते कमाल होत.








किल्ल्यावरून उतरून पुरातन मंदिरे पाहण्यात १ तास घालवला. १८ कोटी रुपयांची तरतूद या मंदिरांच्या डागडुजी साठी एप्रिल मध्ये मंजूर होऊनही अजून तरी एकही दगड जागचा हललेला नाही. 
आता डागडुजीचे नावाखाली या रामायणकालीन मंदिरांना सिमेंटने लिंपून पेंट मारला नाही म्हणजे मिळवले. 


अंजनेरी फाट्यावरच असलेल्या हॉटेल मध्ये मागच्या वेळी चांगली ओळख झाली होती. काकूंनी खास आले वैगरे टाकून फक्कड चहा बनवला. येथे २ चहा पिऊन, सामान उचलून यष्टीची वाट बघत बसलो रामशेजला जायला. मोर्च्यामुळे ठप्प असलेलं सर्व कामकाज सुरळीत होऊ लागलं होतं. नेताना गाडीत भरून नेलेली माणसे मिळेल त्या वाहनाने परतत होते. त्रंबकवरून आलेल्या गाडीला हात दाखवला आणी निघालो पेठ. 

६ वर्ष अजिंक्य राहिलेल्या रामशेज किल्ल्याने आमची उत्सुकता तर वाढवलीच होती. रामशेजच्या जवळच भूषणची सासुरवाडी असल्याने रात्रीचा राहायचा प्रश्न निकालात निघाला. 

आता उद्या लक्ष होते रामशेज आणी चामरलेणी. आता त्याबद्दल पुढच्या लेखात. 

वाचत राहा. 




रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

!! गणरायांचे आगमन !!

!! गणरायांचे आगमन !!


बाप्पांच्या सुबक व शास्त्रशुद्ध गणेश मूर्तींची नोंदणी चालू झाली आहे. 
आजच आपला आवडता बाप्पा बुक करा. 
आर्या एंटरप्रायजेस , कोथरूड ,पुणे ३८.




आता स्वतःचा ब्लॉग असताना झैरात करायची म्हणजे सोपेच काम की हो. 
असो, गणपती नंतर आपण चाललोय हंपी आणी बदामीला या ब्लॉगमधून. तेव्हा लक्ष असू द्या. 
अगदी "स्टे ट्यून" वैगरे गरज नाहीये. छापला लेख की कळवेनच फुकाच्या पुस्तकावर. :) 


आपलाच,
सागर