शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

कुंडलिका व्हॅली ट्रेक - सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट

 

कुंडलिका व्हॅली ट्रेक 


 सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट -  परातेवाडी 





शुक्रवारी पृथ्वीतलावरच्या बेरोजगार लोकांच्या संख्येत एकने आमची भर पडली आणी रिकामटेकडी मंडळी कुंडलिका व्हॅली ट्रेक ला मार्गस्थ झाली. पावसाळ्यात अनेक वेळा या दरीचे ओले-कंच रूप वरून पहिले होते पण त्या दरीत कधी जाणे होईल असे वाटले नव्हते. नशिबाने आणि डोंगरदेवांच्या कृपेने आज काय तो योग आला आणी सह्याद्रीचं रांगडं रूप पुन्हा एकदा मनात घर करून गेलं. 

पाच,सहा तास मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या  मारत दरीत पोहोचायच, पावसामुळे आणी कुंडलिका नदीच्या प्रवाहामुळे दरवर्षी मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल करायची, वाटेतले भले मोठाले रॉक पॅच, पाठीवरच् सामान आणि सुटलेले पोट हे दोन्ही घेऊन उतरायची कसरत , हिवाळ्यातही वाहणारे धबधबे आणी बारमाही पाण्याचे प्रवाह, तळ दाखवणाऱ्या हिरव्यागार पाण्यात पोहणे, दोन पुराणपुरुष भासणाऱ्या डोंगरांच्या घळीतून यथेच्छ भटकायचं, पूर्णवेळ सोबतीला अंधारबन, कुंडलिका आणी नावजी सुळके असतातच. पौर्णिमेचा चंद्र सोबतीला घ्यायचा आणी स्लिपींग बॅग मध्ये शिरून आकाशात ताऱ्यांचे मनोमन आकार बनवायचे, दरीच्या उत्तरार्धात सावळ घाटाच्या पुरातन पण सध्या वापरात नसल्याने मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत खडी चढाई सुरु करायची आणी कितीतरी हजारो वर्षांपूर्वी कोणी अनामिकाने कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणी खोदीव पायऱ्या बघून अचंबित व्हायचं. 

जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !



असो , तर कुंडलिका घळीचा हा ट्रेक मुळशी तालुकातल्या पिंपरी गावापासून सुरू होतो. सिनेर खिंडीमधून वाट काढत आपण कुंडलिका घळीमध्ये उतरतो. येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो आणी पुढे भिरा धरणात या पाण्याने विद्युतनिर्मिती होते. याच प्रकल्पाचे पाणी सकाळी जेव्हा सोडले जाते तेव्हा निसर्गाने पाण्याचा फोर्स वाढतो आणी कोलाड जवळ या पाण्यावर राफ्टिंग केले जाते. 

घळीत पुढे जातानाच सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीत मोठमोठाले दगड-धोंडे निश्चल ऊन खात पडलेले असतात. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मोठमोठाले कातळ कापून काढलेले दिसतात मग हीच वाट पकडायची आणी गणपतीचे नाव घेत या दगडांवर उड्या मारत आपली मार्गक्रमणा चालू ठेवायची. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. थोडक्यात काय तर कुंडलिका व्हॅली आपल्याला मान वर करायलाच चान्स देत नाही. 




सुमारे ९ वाजता घळ उतरायला सुरु केली आणी रमतगमत मंडळी निघाली. वाटेत दिसणारे नजारे मात्र कमाल होते. असंख्य दगडांच्या राशी, त्यात जमलेले नितळ आणी हिरवेगार पाण्याचे प्रवाह, डोंगरांच्या कडयांवर नैसर्गिकपणे तयार झालेल्या काही प्रतिकृती , निर्मनुष्य असा प्रदेश आणी दूरवर दिसणारे घळीचे शेवटचे टोक बघत सुमारे ५ तासांची पायपीट झाली.आज दिवसभर आकाश ढगाळ असल्याने सूर्यनारायचे दर्शन फारच कमी झाले. मध्येच जेव्हा नारायण दिसायचे तेव्हा झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा, सोनसळी गवत किरणे परावर्तीत करू लागायची आणी शांत पाण्याच्या डोहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. हिवाळ्यातही असलेले धबधबे मिळून एक संपन्न निसर्गसोहोळाच बनून जायचा. आजही दिसणारे धबधबे, पावसाळ्यात त्यांचे रौद्र रूप दाखवत असतील हे नक्की. 










पाच-सहा तासांच्या वाटचालीनंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सामान / तंबूची मांडामांड झाली आणी मंडळी भेळ करायच्या कार्यक्रमात गुंतली. येतानाच लाकडे गोळा करून आणल्यामुळे शेकोटीची सोय झाली .नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली. ड्युटी संपवून नारायण डोंगरात लुप्त होऊ लागले तरी किरणांचा कटाक्ष काही चुकार ढगांमधून जाणवत होता.आकाशाच्या छपराखाली आजची रात्र अविस्मरणीय होणार होती ! 




जिथे आमची पथारी पसरली होती त्या शेजारूनच पाण्याचा प्रवाह वाहत होता. थंडीशी दोन हात करायला शेकोटीचा कार्यक्रम झाला. सगळ्या ग्रुप मेंबर्सची ओळखपरेड झाली आणी काही दिग्गज मंडळींशी  भेटी-गाठी झाल्या. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून हा ट्रेकचे नियोजन केले होते पण चांदोबा अजूनही ढगांमध्येच चाचपडत होता. जशी मंडळी निद्राधीन झाली तशी संपूर्ण दरीत निरव शांतता पसरली. स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आकाशातले कवतिक न्याहाळणे एवढाच काय तो उद्योग उरलेला. मध्यरात्री संपूर्ण आकाश निरभ्र झाले आणी चांदोबाने दर्शन दिले. दोन उंच डोंगरांच्या मधोमध खाली दरीतून वरती आकाशाकडे बघताना, डोळ्यासमोर चंद्र डावीकडून उजवीकडे मार्गक्रमणा करत आणी पाठीमागे तार्यांची रांगोळी काढत जाताना दिसला. केवळ शब्दातीत असा अनुभव !









सकाळी उजाडताच आवराआवर करून पुढची वाटचाल चालू झाली. न्याहारी आटपून पुढे निघालो आणी पुढे होते अजून एक सरप्राईज! मोठाले पाण्याचे डोह! मंडळी पाण्यात उड्या  मारायला वाऱ्यासारखी सुटली.गारेगार पाण्यात पोहून जरा आत्मा शांत करून घेतला. इथेच प्रत्येकी दोन लिटर पाणी भरून घेतले. एकदा का सावळघाट चढाई सुरु झाली कि कुठेही पाणी मिळणार नव्हते. 





आता लक्ष्य होते घाटमाथ्यावरचे परातेवाडी गाव आणी मध्ये होता सावळ घाटवाटेचा थरार ! सह्याद्रीतल्या अश्या अनेक प्राचीन घाटवाटा आज मात्र वापर नसल्याने "बिकटवाट" बनल्यात. राबता नसल्याने आणी प्रचंड पावसाने या प्राचीन घाटवाटा मोडून जातात. हजारो वर्षांपूर्वी कोणी अज्ञात लोकांनी खोदलेल्या उभ्या कातळातील पायऱ्या, पाण्याचे कुंड पाहिले की वाटते, सह्याद्रीची भटकंती म्हणजे फक्त डोंगरांवरची तंगडतोड नाही तर हि आहे इतिहासाची जिवंत सफर! 

आता आव्हान होते सावळ घाटाची कुंडलिका दरीत उतरलेली सोंडशोधण्याची  शोधण्याची! दरवर्षी पावसाने वा भौगोलिक बदलाने या वाटा मोडतात किंवा सापडत नाहीत. इथे गरज असते ती अनुभवाची ! मी ज्या ग्रुप बरोबर गेलो होतो त्या सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनचे शिलेदार गेली २० वर्ष सह्याद्रीच्या या घाटवाटांमध्ये मनमुराद भटकत आहेत. अनुभवी ट्रेक लिडरने दरीतुन डोंगरात घुसलेली वाट शोधली आणी कुठे जायचंय हे सांगितले आणी मग हातात कोयता आणि काठ्या घेऊन चालू झाला सावळ घाटवाटेचा शोध !




तीव्र चढण चांगलीच दमछाक करत होती. वाटेचा अंदाज घेत आणी पूर्वीच्या खुणां शोधत सर्व जण निघालो. वाटेतील झाडे झुडपे मान वर करू देत नव्हती त्यांची काटछाट करत, एकमेकांना हाकाऱ्या देत, वाटेतील दगडांवर मागच्या लोकांसाठी खडूने खुणा मारत ७० अशांश कोणातली खडी चढाई सुरु होती. वाटेत निसटते धोंडे आले, घसारा आला वा झाड पडलेले दिसले की मग मागच्या फळीतले उत्साही कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाच्या शोधात पुढे व्हायचे. 





दोन तासांच्या चढाईने डोंगरांच्या घळीत पोहोचलो. आणी अहो आश्चर्यम!  उभ्या कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी. पाणी सध्यातरी पिण्यायोय नाही. एकदा का ही टाकी दिसली की, आपले सावळ घाटाचे दिव्य पार झाले समजावे. शेवटच्या टप्प्यात बांबूची वने लागतात आणी इथे तेथून डावीकडे गेल्यास लागतात खोदीव पायऱ्या आणी मोठाली पाण्याची टाकी. बघता क्षणी मन इतिहासात जाते. कोणी अनामिकाने कितीतरी हजारो वर्षांपूर्वी वाटसरूंच्या सोयीसाठी या पायऱ्या खोदल्या असतील ज्यावरून आज आपण प्रवास करतोय. इतक्या उंचीवर खोदलेल्या आणी अजूनही तुडुंब भरलेल्या टाक्या, त्याकाळी किती लोकांची क्षुधा शांत करत असतील?





इतिहासाचा विचार करता करता थोडे पुढे गेले की निसर्गाचे जे काही रुपडे दिसते त्याची तुलना कशाशीच नाही. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच आपल्या हातात! 









सामान खाली ठेऊन बराच वेळ निसर्गातील करामती बघत राहिलो. बरोबरची मंडळी पुढे निघून गेली होती. नाईलाजाने काढता पाय घेऊन परातेवाडी च्या दिशेने चालू लागलो. घाटमाथ्यावर येताच लाईटचे खांब दिसू लागतात त्याच्या दिशेने परातेवाडी गाव लागते. गावात पोहोचल्यावर थोडीशी पेटपूजा झाली. पुढे आलेल्या मेंबर्सने सगळी तयारी करून फक्कड मुगाची खिचडी बनवली होती. मनोमन त्यांचे आभार मानत  दोन घास खाऊन पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.





एकंदरीत कमाल असा अनुभव होता. खूप सारे सरप्रायजेस आणी निसर्गाचे लोभस रूप. 
जगणातल्या अश्या अविस्मरणीय क्षणांची बेरीज म्हणजेच आयुष्य !

वाचत रहा ! 
खूप दिवस निद्रित अवस्थेत असलेल्या या ब्लॉगला, या ट्रेकच्या निमित्ताने नवसंजीवनी मिळाली आहे. आपले अभिप्राय नक्की कळवा. 

बुधवार, १ जानेवारी, २०२०

२०१९! पायाला भिंगरी !




आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. अनुभवांच्या पाठपिशवीत बऱ्यापैकी भर पडली असं वाटतय. काही नवीन प्रसंग,आठवणी,काही लाईफ गोल्स व बरच काही. 


प्रत्येक महिन्याकाठी कुठेतरी, अगदी जवळपास का होईना पण भटकून आला पाहिजे असा शिरस्ता, आज मागे वळून बघता बऱ्यापैकी साध्य होतोय . वर्षभरात जिथे जिथे जाऊन आलो त्याची फोटोरूपी झलक देण्याचा अजून एक प्रयत्न करतो आहे. पुढे कधीतरी मागचे भटकंती कॅलेंडर पाहून माझे मलाच छान वाटतं म्हणून हा प्रपंच.  

फोकस जरा शिफ्ट झालाय सध्या . "एक पाय नाचिव रे गोविंदा" फेज आयुष्यात चालू आहे. पोटासाठीचे व्याप सांभाळत जे काही भटकणे झाले त्याने वर्षभर लढायची ऊर्जा दिली एवढे मात्र खरे. जाऊन आलेले किल्ले परत परत करताना सुद्धा मजा आली. भर उन्हात जावळीच्या जंगलातील अशक्य होत जाणारी पायपीट, कोस्टल कर्नाटकची रन टाइम ट्रिप, छोट्या मावळ्यांना घेऊन केलेली कोकण जलदुर्गांची सफर, रतनगडावरून अनुभवलेला पाऊस सोहोळा, एका नव्याने कळलेल्या ठिकाणी गेल्यावर डोळ्यासमोर ढग फुटून कोसळणाऱ्या पावसाचे अद्भुत आणि अविश्वसनीय दृश्य, बागलाणच्या दुर्गम दुर्गांची पुनश्च सफर, कृष्ण-रास नहाणं क्रीडेचे "याची डोळा" पाहिलेले विलोभनीय क्षण सर्व काही शब्दातीत. 

तुम्ही फोटोंचा आनंद घ्या, व्हिडीओ ब्लॉग करायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तो आवडतोय का ते कळवा, कोणती माहिती हवी असल्यास बिनधास्त विचारा आणी अभिप्राय कळवत राहा. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतय या विचारानेच लिहायचा उत्साह वाढतो. 


जानेवारी : झोडगे शिवमंदिर, धुळे 



जगदीश्वर मंदिर, देवळाणे , नाशिक

फेब्रुवारी : पुरंदर , लोहगड किल्ला , विसापूर किल्ला

मार्च : रसाळगड, खेड

रसाळ गडावरील १८ तोफा





एप्रिल : मुरुडेश्वर, गोकर्ण, कोस्टल कर्नाटक





मे : रेवदंडा किल्ला, कोर्लई किल्ला, दिवेआगर , हरिहरेश्वर





जुन : केंजळगड, रायरेश्वर, धोम, मेणवली






  जुलै :  मुठा , तुंग किल्ला  

ऑगस्ट: रतनगड 

 

सप्टेंबर :  मेरुलिंग , बारा मोटेची विहिर 



ऑक्टोबर : किल्ले पिसोळ, हरगड , मुल्हेर, कपारभवानी , रास नहाणं क्रीडा 




                                          

नोव्हेंबर : किल्ले मोरगिरी 





डिसेंबर: किल्ले वासोटा 


वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच क्षण लिहिता येतील असे नाही पण फोटोनी परत हवे तेव्हा जगता मात्र येतील म्हणून हा लेखनप्रपंच. 

तर मग भटकत रहा . कोठे जाऊन काय बघायला मिळेल यु नेव्हर नो! हे संपन्न अनुभव कायम आठवणीत राहतील, पोटासाठीच्या लढाईमध्ये आयुष्यभर तजेला देतील, आणी असा काही आनंदाचा ठेवा देतील जो आपण आपल्या पुढच्या पिढीत  देऊ शकू.


चला, सर्व वाचकांना मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.

भेटत राहू …… वाचत राहा …

Youtube: 
Instagram:

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

निराधार वृद्ध महिलेसाठी मदतीचे आवाहन. 

माझ्या ओळखीच्या एक आज्जी नाव सुमन आज्जी वय ८०+ या निराधार असून त्यांना कोणीही पती अगर मुले नाहीत. त्या अवसरी खुर्द ,ता. मंचर येथे एका खाजगी मंदिरात राहत होत्या आणी देवीची पूजा व येणाऱ्या लोकांच्या मंदिरावर उदरनिर्वाह करत होत्या. 
१ जून रोजी सकाळी मंदिराशेजारील आजूबाजूच्या लोकांना त्या बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्यांनी तेथील डॉक्टरांना बोलावुन प्राथमिक उपचार केले. पक्षाघाताचा(ब्रेनस्ट्रोक)  झटका आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या माहित असलेल्या नातेवाईकांना फोन करून कळवले. आजींच्या कोणत्याही नातेवाईकाने त्यांची जबाबदारी न घेतल्यामुळे,व माझ्या बाबांच्या त्या काकू लागत असल्याने, माणुसकी म्हणून मी त्यांना अवसरी,मंचर येथून पुण्यात आणून दीनानाथ मंगेशकर येथे त्यांचे ब्रेनस्ट्रोक आजाराचे उपचार केले.
त्यानंतर त्यांना एका वृद्धाश्रमात ठेवले असता २५ जून रोजी त्या घसरून पडून त्यांचे खुब्याचे हाड मोडले. त्यांचे दीनानाथ मंगेशकर येथे "हिप रिप्लेसमेंट" चे ऑपरेशन करून सध्या त्यांना भूगाव येथील "सहजीवन" नावाच्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्या सध्या बेड-रिडन आहेत.
या आज्जीना पती अगर मुले कोणीही नसल्याने त्यांचे वरील दोन्ही वैद्यकीय उपचार मी केले आहेत.  त्यांच्या या दोन्ही उपचारासाठी आजपर्यंत सुमारे १,५०,००० रु खर्च केले असून वृद्धश्रमाचे चार्जेस दरमहा ११०००रु व औषधोपचार,डायपर असे १४००० रु मी सध्या भरत आहे.एकदा त्यांची जबाबदारी घेतल्याने त्या हयात आहेत तोपर्यंत हा खर्च करणे मला भाग आहे.
दरमहा हा खर्च करणे आता अवघड होत चालले आहे म्हणून सध्या काही ट्रस्ट, देवस्थाने  वा कोणाची मदत त्यांना मिळवून देता येईल का ते बघत आहे. यातून जी काही मदत मिळेल त्याने मला नक्कीच मोठा मदतीचा हात मिळणार आहे.
आपली कोणाची मदत करायची ईच्छा असल्यास,  थेट "सहजीवन" या वृध्दाश्रमाला तुम्ही या आजींसाठी मदत म्हणून देऊ शकता. वृध्दाश्रमाच्या नावाने चेक ( "Sahajeevan" या नावाने) देऊ शकता  वा अकाउंट ट्रान्सफर करू शकता. या केसच्या सत्यतेबाबत शंका असल्यास तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. हॉस्पिटलचे बिल,वृद्धाश्रमाचे बिल असे शक्य ते पुरावे मी देऊ शकेन.  याखेरीज कोणाला अश्या वृद्ध लोकांचे सोय होईल असे ट्रस्ट , आश्रम असे काही माहित असल्यास त्यांचे संपर्क वा तिकडचे कोणी ओळखीचे लोक त्यांचा संपर्क असे काही असल्यास ती सुद्धा एक मदतच असेल. कोणाला स्वतः त्या वृद्धाश्रमात जाऊन औषधें, डायपर अशी छोटी मदत करायची असल्यास ते स्वतः ही तेथे जाऊ शकतात. पत्ता व डिटेल्स मी देईन.
माझ्याकडे मदत देण्यापेक्षा थेट वृद्धश्रमास "सुमन शिवदे" या नावाने दिल्यास उत्तम होईल. मदत देताना मला कळविले तर मला नक्की किती मदत तिथे मिळतिये ते कळेल आणी तेवढा माझा भार हलका होईल. माझ्याकडे देण्याची ईच्छा आणी विश्वास असेल तर माझा नंबर 9975713494 असून तुम्ही PaytM/GPay  करू शकता.
आपली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याची रिसीट/पावती मी आपल्याशी शेअर करेन.
चेकवर नाव : Sahajeevan


माझा मोबाईल नं - ९९७५७१३४९४
सागर शिवदे

आभार !