शनिवार, ४ जून, २०१६

राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर

राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर 

धोपेश्वरी जाण्याचा योग आला आणि बोलावणे आल्यासारखे आमचे पाय धूत-पापेश्वर मंदिराकडे आपसूकच वळले. पहिली भेटीतच हा परिसर खूपच छान वाटला. धूत पापेश्वराचे मंदिर, आजूबाजूने सुपारी-पोफळी च्या झाडांची अभेद्य तटबंदी, मृदानी नदीच्या काठावर वसलेले राजापूरवासीयांचे ग्रामदैव, कोटीतीर्थ धबधबा व त्यातील शिवलिंगे, मुख्यतः कोकणात अगदी माहेरपण जगणारे होर्नबील, खंड्या व इतर पक्षी आणि धूत-पापेश्वर शिव अवताराचा इतिहास सगळेच काही एकदा जरूर पाहावे ऐकावे असे.

राजापूर म्हणजे रत्नागिरी मधले तालुक्याचे गाव. कोकमाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द. कोअर रत्नागिरी.
आमचे पहिल्यांदा प्रवेश झाला तो डायरेक्ट गाभार्यात. ओळखीचा फायदा घेऊनच. पण गाभार्यात जाऊन शिवलिंग बारकाईने बघितले आणी ऐकलेल्या धूत-पापेश्वराच्या इतिहास डोळ्यासमोर आला.

असो. मंदिर आणि त्याचे लोकेशन अगदी मस्त आहे. सुमारे ५० मीटर सभामंडप असून मंदिराचे खांब आणि छत दोन्ही मस्त रंगकाम करून सजवलेल्या आहेत. सभामंडपातून पुढे जाताच गर्भ गृहाच्या चौथर्यावर ५ विरगळ ठेवलेले आहेत. रामायणातील काही प्रसंग त्यावर कोरलेले आढळतात. 

विरगळी च्या जवळच दग्तात कोरलेले लंबोदर आहे आणि इतर देवांच्या शिळेतून घडवलेल्या मूर्ती दिसतात. त्यामध्ये सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे राशी-शिळाचक्र. 
 एकाच अभेद्य दगडात कोरलेल्या या सप्तराशी ओळखणे मात्र अवघड आहे. कोणी माहितगार माणूस असेल तर तो नक्की सांगू शकतो. रोजची पूजा आणी बाकी इतर गोष्टींमुळे याची झीज होत आहे आणी म्हणून त्यातल्या राशी ओळखणे दुरापास्त झालय.

मुख्य मंदिरातून शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूने,मृदानी नदीच्या प्रवाहावर बांधलेल्या छोट्याश्या पुलावरून मागील दत्त मंदिराकडे जाता येते.  दत्त मंदिरापासून मात्र आजूबाजूचा परिसर सुखावह वाटतो. 

मंदिराच्या परिसरात काजू आंबा सुपारीच्या झाडांची रेलचेल असल्याने अनेक पक्षी आणि वानरे यांची मात्र येथे चैन आहे. फोटोमध्ये दिसल्याप्रमाणे खाली नदीपात्रात उतरणाऱ्या पायर्या कोटी तीर्थ कडे जातात. पावसाळ्यात नदीला पाणी असताना हा मार्ग बंद होत असला तरी येथे प्रकटणारा धबधबा प्रवाहातील कोटी-तीर्थ ( छोट्याश्या  गुहेत असलेली अनेक शिवलिंगे ) याला अभिषेक करतो.

दत्त मंदिरातून दर्शन घेऊन वरच्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र बघून खाली यावे आणी येथील माहितगार माणसाला पकडून इतिहास जाणून घ्यावा. अस्सल राजापुरी माणूस जर तुम्हाला भेटला तर मंदिराच्या  इतिहासापासून ते मंदिराच्या ट्रस्टच्या व्यवहाराबद्दलचे स्वताच्या अनुभवाचे गाठोडे तुम्हाला देऊ करेल.

याखेरीज, राजापूरची गंगा हा सृष्टीचा चमत्कार आहे. गंगा नदी काही काळासाठी येथील डोंगरावरील मंदिरात अवतरते. अचानक प्रकट होणे व अचानक गुप्त होणे हे वैशिष्ट्य.काही कुंडामधे गरम पाणी असते. या पाण्याने त्वचारोग बरे होतात असे म्हणतात.  
 

मंदिरात फोटू काढायला परवानगी नाही. ( मी काढलेत पण येथे देत नाही. तसेच इतिहास पण येथे लिहित नाही. कधी गेलात तर शिवलिंगाचा काही भाग टवका उडाल्यासारखा तुटलेला का आहे ते विचारून बघा. )  

मंदिराच्या उजवीकडील बाजूस या फुलाचे झाड आहे. शिवचाफा याचे नाव. U आकाराच्या या फुलामध्ये पराग-कणांच्या  मधोमध छोटेसे शिवलिंग असते म्हणजे तसा आकार असतो. दिसायला सुरेख अश्या फुलाचा वास घ्यायची हिम्मत मात्र करू नका. जास्त वेळ वास घेतल्यास श्वसनाचे विकार होऊ शकतात असे ऐकीवात  आले. काही लोकांनी आमची हे फुल काढायची खटपट चाललेली बघून "ते विषारी झाड आहे" असे सांगितले. वानरे व माकडांनी या परिसरात कितीही उच्छाद मांडला तरी या झाडावर मात्र ते येत नाहीत.
असो. सुरवातीला देवाचे दर्शन घ्या आणी चला पुढे राजापुरात आणी धोपेश्वरात. 

भेटू पुढच्या भागात.
राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 

वाचत राहा. 

रविवार, २२ मे, २०१६

राजापूर डायरीज

राजापूर डायरीज 


नमस्कार लोक्स, 
मोठ्या विश्रांतीनंतर एक लांबलचक अशी लेखमालिका सादर करतोय. किल्ल्यांची वा भेटी दिलेल्या स्थळांची डिटेलवार माहिती देण्यासाठी लांबलचक लेख पडण्याचा हुरूप आता मावळत चाललाय. आता थोडक्यात व बेताचे लेख लिहावे म्हणतो आणी सुरवात याच पासून करतो. 

बाकी कोकण म्हणजे काय बोलावे. प्रत्येक जणाने एक स्वताचा स्वर्ग म्हणून तो आधीच बुक करून ठेवलाच आहे.आमचाही आहे तो म्हणजे राजापूर. पहिल्याच भेटीत रात्रीचा प्रवास करताना गगन-बावडा घाटात गाडी थांबली आणी लहानपणा पासून ऐकलेली कोकणातली भूत मनात नाचायला लागली. ती भूत तेव्हा जी डोक्यावर बसली ती बसलीच. आता दरवर्षी हजेरी ही लागतेच. आमची! भूतांची नाही! :)

राजापूर म्हणजे माझ्या भावाच्या मामाचे गाव. आमच्या नशिबी "मामाच्या गावाला जाऊया" म्हणणे नसल्याने होळीसाठी भाऊ पळाला का कि त्याच्या मागे पळणे क्रमप्राप्त होते. कोकण म्हणजे समुद्रकिनारे असे असणारे समीकरण बदलून खरे लाल माती अनुभवायला मिळते. राजापुरी जाण्याचे निमित्त असते ते होळीनंतर पुढचे ३ दिवस धोपेश्वर नामक गावात साजरा होणारा 'काका महाराज पुराणिक समाधी मंदीरा'तील समाधी सोहळा. पण जोडीला झोपल्यावर तासान तास बसून, एकावर एक चहा रिचवत पक्षी निरीक्षण करणे, मृदानी नदीच्या अगम्य जंगलात दिवसभर भटकणे. सुपारीच्या बागेत यथेच्च ताणून देणे, शिमग्याला वाड्यान वाड्या पालथ्या घालणे. अश्या बऱ्याच गोष्टी असल्यावर तर  मग काय कोकण दौरा एक प्रकारचा सोहळाच बनून जातो. धूतपापेश्वर- कनकादित्य, महाकाली स्थळांच्या भेटी आणी जलदुर्गांची साथ म्हणजे तर या सोहोळ्याचा म. सा. वी.च. 

असो. तर आगामी लेखांची आणी त्यातील फोटोंची झलक घ्या आणी तयार व्हा "रत्नांगी"च्या प्रवासाला. 

राजापूर डायरीज : राजापूर, धोपेश्वर 
राजापूर डायरीज : काका महाराज पुराणिक समाधी मंदीर 
राजापूर डायरीज : धूत-पापेश्वर मंदीर 
राजापूर डायरीज : मृदानी नदी जंगल 
राजापूर डायरीज : विजयदुर्ग 
राजापूर डायरीज : आंबोळगड, गगनगिरी महाराज समाधी 
राजापूर डायरीज : कनकादित्य, कशेळी 
राजापूर डायरीज : आर्यादुर्गा, देवीहासोळ 
राजापूर डायरीज : पूर्णगड 
राजापूर डायरीज : यशवंतगड, नाटे 


















शनिवार, ९ एप्रिल, २०१६

अजून उजाडत नाही ग !

अजून उजाडत नाही ग !


गूढ सावल्या काही हलती, देहाला ओलांडून ग !
सरकत येते अंधाराची लाट, अंगणी दाटून ग !
जिथवर पणती, तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग, 
आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग, 
अजून उजाडत नाही ग, नाही ग !
                                                - संदीप खरे 

बरी सेंट एडमन्डस,  इंग्लंड 

बरी सेंट एडमन्डस,  इंग्लंड

एली, इंग्लंड

ओतूर, कळवण

भुलेश्वर 

केम्ब्रिज इंग्लंड

निळकंठेश्वर  


पांडेश्वर, पुरंदर 

सांदण दरी


सांदण दरी, भंडारदरा, इगतपुरी 


जीवधन, जुन्नर

हरगड, मुल्हेर


धोडपमाची, ओतूर, कळवण

अलंग-गाव , धोडपमाची, ओतूर, कळवण


राजापूर, रत्नागिरी

राजापूर, रत्नागिरी



शनिवार, १२ मार्च, २०१६

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

विश्वास ठेवा अगर ठेऊ नका ............ भूतांचे अस्तित्व मिटत नाही .............२७ डिसेंबर २००७ रोजी हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर नामक गावी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी वेळ लाउन काढलेला हा फोटो !!! ४ डिग्री अश्या कडाक्याच्या थंडीतही भुताचे अस्तित्व कायम रहाते !!!


सध्या काय टीव्हीवर वाढीव हेल काढून बोलणाऱ्या वाढीव लोकांची वाढीव सिरियल चालू झाल्यापासून कोकणातील भुतांना फारच गडद फुटेज मिळालेले दिसते. आता भूतांना भूतांची भिती वाटते का? या आमच्या शंकेचे निरसन झाले नसल्यामुळे आम्हाला भूतांची भिती तर सोडाच पण त्यांचा सावधान पोजिशन मधला फोटू काढण्या पर्यंत आमची मजल गेली आहे. 

आमच्या कुंडलीतच कुठला तरी ग्रह कुणाच्या तरी नीच स्थानी असून ते बापडे एकमेकांकडे वक्राकार वैगरे बघत असल्याने आणि अश्या दुर्मिळ ग्रहयोगामुळे आम्हाला अत्यंत दुर्मिळ असा स्पोर्ट्स शूज घातलेला आणि सावधान पोजिशन मध्ये खिशात हात घालून उभे असलेल्या भुताचे दर्शन घडले. आणी ते पण कुठे कोकणा-बिकणात न जाता चक्क हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर नामक गावी. 

आता हे गाव भौगोलिक दृष्ट्या मुंबई आणी अहमदनगरच्या सीमेवर आहे म्हणता अहमदनगरच्या पाणी-टंचाईची झळ त्याला बापड्यालाही बसलेली असणार म्हणूनच टेबलावर ठेवलेल्या बिसलरी बाटलीकडे भूत आकृष्ठ झाले असणार. पाण्याची शक्यता वगळता तिथे ठेवलेल्या डब्यातील गुळाच्या पोळ्यांचा मोह होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

असो लोक आजूबाजूला झोपली असतानाही त्यांचा निद्राभंग न करता, मागे टेबल असूनही शिस्तीत उभा राहणारे, चार डिग्री अश्या कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेले हात खिशात लपवलेले, कोणताही अक्राळ-विक्राळ मेकअप न करता फुल पँट घालून आलेले, भूतांची सावली पडत नसूनही शंकेखोर लोकांच्या समाधानासाठी आपली सावली पाडणारे हे एका पुण्यात्मा माणसाचेच ते भूत असावे असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. ( काहीही निष्कर्ष का निघेनात, आपल्या 'बा' चे काय जातंय.) 

पण एक मात्र नक्की. विश्वास ठेवा अगर ठेऊ नका ............ भूतांचे अस्तित्व मिटत नाही .

(घाबरलेला) सागर

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

सासवडचीये नगरी:मल्हारगड /सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा

 पूर्व लेख : 

सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

सासवडचीये नगरी: लोणी भापकर 


सासवडचीये नगरी: मल्हारगड/सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा

आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.

आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. सोनोरी गाव. 

गावात हनुमान मंदिरा मध्ये कसलातरी उत्सव भरला होता. बरीच मंडळी जमलेली होती. तेथून लांबूनच दर्शन घेऊन निघालो किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत. गावात मुरलीधर मंदिर म्हणून कृष्णाचे खूप सुरेख मंदिर आहे असे ऐकले होते. शोधत शोधत तेथे गेलो. मंदिर फार काही चांगल्या अवस्थेत नव्हते. आजूबाजूला घरांचा आणी कचऱ्याचा वेढा पडला होता. तेथे जाऊन बंद मंदिर बघून आजूबाजूला विचारू म्हंटले तर आजूबाजूला कोणीच नाही. फक्त कोंबड्या. मग एका कोंबडी ला घाबरवल्यावर ती ओरडत एका घरात गेली आणी मग तेथून एक आजोबा प्रकट झाले. 
"ह्ये मंदिर बंदच असते. कधीतरी सुट्टीच्या दिवशी मालक येतात न उघडतात. पुण्याला असतात म्हणे."-  इति आजोबा. 
असो नो प्रोब्लेम. तेथून सुटलो आणी पोहोचलो पानसे वाडा.

मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते.त्यांचाच हा वाडा. आजही इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा आपल्या भक्कम ६ बुरुज आणी अजूनही सुस्थितीत अशी तटबंदी अश्या बाहूबंदीने उभा आहे.
पानसे वाडा मुख्य दरवाजा.

मल्हारगड : सुमारे इ. स. १७५७ ते १७६० या काळातबांधला गेलेले शेवटचा किल्ला. किल्ल्यावर लावलेल्या पाटीवरही तशी नोंद आढळते.स्वराज्यातील हा शेवटचा किल्ला असल्याचे तेथे असलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी ६-७ फुट असावी पण बाकी किल्ल्यांची रचना लक्षात घेता ह्याची रचना फारच सरळसोट वाटली.
 असो. पानसे वाड्यावरून ५ मिनिटात गाडीवर पायथ्याशी आलो. लांबच लांब मोकळ्या ढाकळ्या जागेत मल्हारगड वसलेला आहे. जास्त लोकांना माहिती नसल्याने याचा पिकनिक स्पॉट झालेला नाही म्हणून का काय इथली जागा अजूनही स्वछ आहे. थोडी थोडकी कौलारू घरे, काही झोपड्या, आणी काही शेती. बाकी डोंगरच डोंगर.
मल्हारगडाचे पायथ्यावरून दर्शन.
पूर्ण निर्मनुष्य प्रदेश, "किल्ला चढून ये वरती, वरती भेटू!" म्हणत सुर्यनारायण अस्ताकडे निघालेले , उन्हे कललेली, भूस-भुशीत मातीत टायरची नक्षी काढत आणी धुराळा उडवत अस्मादिक एका घरापर्यंत पोहोचले. तेथे घरात असलेल्या मंडळींच्या साक्षीने गाडी त्यांच्या घरासमोर लावून किल्ल्याची वाट विचारून निघालो. सुमारे ५ वाजत आले होते आणी मला सूर्यास्ताच्या आत वरती जायचे होते. पावले झपझप पडायला लागली. इलेट्रिक टॉवर च्या दिशेने चालु लागलो.
किल्ला थोडा दृष्टीपथात येताच मुख्य वाट सोडून सरळ धारेवर चढाई चालू केली. अर्ध्या तासात प्रवेशद्वाराशी पोहोचलो.  न थांबता चढाई करून आल्याने थोडा दम लागलेला म्हणून तसाच एका खंदकात बसलो. उठताना लक्षात आले की, पाठीवर रेलून बसलोय आपण आणी ब्याग मधल्या अंजीरांची भेळ झालीये.


मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच समोर छोटेखानी किल्ला दिसू लागला. आजही शाबूत असलेले भलेमोठे बुरुज दिसू लागले.

मुख्य तटबंदीला समांतर असे बालेकिल्ल्याची तटबंदी आणी चोर दरवाजा दिसू लागला.

चोरदरवाजा :
एक वाट दिवे घाट सुरु होण्यापूर्वी लागणाऱ्या झेंडेवाडी गावातून येते. तेथून एक छोटासा डोंगर चढून आपण या चोर दरवाज्याशी येतो.

संपूर्ण दिवे घाट आणी परीसर यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. या बुरुजावरून दिवे घाट आणी परीसर दृष्टीस पडतो.

बालेकिल्ला दरवाजा :

बालेकिल्ल्यात दोन छान मंदिरे आहेत. एक महादेवाचे आणी एक खंडोबाचे. देवाचे बाहेरूनच दर्शन घेऊन थोडा वेळ मस्त फ्रेश हवा खात बसलो.

पूर्ण किल्ला भटकून घेतला. सगळ्या बुरुजातून खालीडोकावून पाहून झाले. सगळ्यांचे फोटो काढून झाले. मग आता थोडा वेळ येथून टेहळणी करत बसलो.

पश्चिमेच्या कागदाला जसा जसा केशरी रंग चढू लागला तसा उतरायला चालू केले. मुख्य वाट सोडून एका घासार्यावरून घसरत डायरेक्ट पायथ्याला पोहोचलो. थोडे फोटो बिटो झाल्यावर गाडीपाशी आलो. घरातून थोडे पाणी घेऊन फ्रेश झालो. माझ्याकडच्या काही गोळ्या तिथल्या लहान मुलांना दिल्या.

गाडी काढताना एक बैलगाडी चालली होती. आजोबांची एक मस्त फ्रेम काढली. 

 

एव्हाना पाखरेही आपल्या घरट्याकडे निघाली होती.


चला इट्स टाइम टू गो होम नाऊ. दिवसभरात भरपूर भटकंती झाली होती. रविवार सार्थकी लागला म्हणता येईल. येताना जेजुरी पण गेलो होतो पण तिथे असंख्य गचाळ पब्लिक बसच्या बस भरून वाहात होते. सो अर्ध्यातूनच परत फिरलो. पण त्यामुळे मल्हारगड मनसोक्त बघता आला. येथून निघून दिवे घाट->हडपसर-> कोथरूड. 

आज दिवसभरात बरेच काही उमगले होते. प्रवास असा झाला. 
कोथरूड > बोपदेव घाट > सासवड > संगमेश्वर > चांगावटेश्वर > मोरगाव > लोणी भापकर > जेजुरी > मल्हारगड >कोथरूड.

वाचत राहा. भटकत राहा. 

सागर 

 

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

क्युरीयस केस ऑफ सतारवादक आणि तबलावादक

क्युरीयस केस ऑफ सतारवादक आणि तबलावादक
प्रसंग १
 दोन दिग्गज कलाकारांची जोरदार जुगलबंदी चालू आहे. दोघेही तुफान गाणी म्हणतायेत. राजसभा भरली आहे. एक जेष्ठ आणि श्रेष्ठ गायक आसनावर बसून घाबरल्यासारखा गाणी ऐकतोय. राणी सोडून इतर सगळी (रविवारी सकाळी वारजे पुलाखाली जमणाऱ्या मंडळी सदृश्य)  डोकी फेटे/पागोटे/झब्बा घालून यथेच्च माना डोलवतायेत. गायकाच्या भावमुद्रा, त्याने घेतलेल्या आलापी, स्वर प्रेक्षकांप्रमाणे (म्हणजे आपण) राज दरबारातील सगळ्यांच्या कानांना तृप्त करून सोड्तायेत (असे दिसतंय). इतक्या की मागच्या तबला वादकाला आपण गायकाच्या आलापीलाही तबला बडवल्याचा मुक्त अभिनय करतोय याचा पत्ताही लागत नाही.

प्रसंग २: 
एक मुलगा जन्मतःच वृद्धावस्थेत जन्म घेतो. जसे दिवस लोटत जातात तसे तसे तो तरुण आणी वयाने कमी होत जातो. अजून काही काळाने तो छोट्या मुलासारखा छोटा होत होत बायकोच्याच मिठीत बाळ होऊन कालवश होतो.
(सुमारे सात वर्षांपूर्वी ब्रॅड पिट काकांचा "The Curious Case of Benjamin Button" या नावाचा अप्रतिम सिनेमा येउन गेला. वार्धक्यात जन्म घेऊन म्हणजे जन्मतः वार्धक्यात असलेल्या अर्भकाची जशी वाढ(?? येथे नक्की काय म्हणता येईल? असो काहीही म्हणा.)  होत जाते तसा तो तरुण (वयानी कमी) होत जातो अशी स्टोरी लाईन होती. तसाच एक प्रसंग मराठीत सापडला आहे. )

प्रश्न :
आता वाचकांना प्रश्न पडला असेल (पडू दे!) की पहिल्या गायनाच्या जुगलबंदीचा आणी बटन काकांच्या म्हातार्याचा तरुण होण्याचा या सदरात ( का सदरयात) काय संबंध? 

निरुपण :
हिरो लोकांच्या गाणी बजावणी कार्यक्रमात बसलेले सतार वादक आणि तबला वादक पागोट्याच्या खाली मानेवर खोटे केस लाऊन आणी झब्बा घालून आपापले वाद्य वाजवतायेत. दोघे गायक चौदा वर्षापूर्वी एकमेकांना तरुण असताना भेटलेले आता कालानुरूप प्रौढ झालेत. दोघांच्या केस,दाढी,मिश्या पिकल्यात. बाकी काही मंडळी उदा. राजा,राणी, कविराज मात्र तसेच्या तसे आहेत. काही मंडळी चिरतरुण असतात याचाच अविष्कार हा. 

पुरावा :
वर्तमान :


चौदा वर्षांपूर्वी :

निष्कर्षाकडे वाटचाल :
निसर्गाचा महिमा इतका अद्भुत की, चौदा वर्ष्यापूर्वी म्हातारे म्हणजे मिशी,दाढी पिकलेले त.वा. आणि स.वा. आजच्या घडीला तरुण आणी काळी कुळकुळीत मिशी, दाढी वागवत मस्त दाद देतायेत.सगळ्यांचा प्रवास म्हातारपणाकडे होत असला तरी हे दोघे दिवसेंदिवस तरुणच होत असावेत. स्वरांना घराण्याची बंधने नाहीत तसे या दोघांना काळाची आणी शरीर-शास्त्राची बंधने नसावीत. 
असो. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे.


निष्कर्ष:
बाकी तुम्ही आम्ही मात्र एक एक क्षण वयाने मोठेच होत जाणार म्हणून असले काही वाचण्यात आपला वेळ घालवू नका. असे साहित्यिक भोग टाळून वेळेचा सदुपयोग करायला शिका. 

जिते रहो पर वाचते रहो :)