सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

रविवारची अनवट भटकंती : पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड

रविवारची अनवट भटकंती : 

पाचनई - सीतामाईचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड  


रात्री दोनच्या सुमारास गाडी कळसुबाई -हरिश्चंद्र अभयारण्यातून मार्गस्थ होत होती. संपूर्ण अंधाराचेच साम्राज्य. कोतुळ - ब्राम्हणवाडा - कोथळे अशी गावे मागे पडत होती. रात्री दहाला निघालेली मंडळी झोपेची थकबाकी गोळा करत करत पाचनई गावात पोहोचली. आजचा बेत होता सह्याद्रीतील रौद्रभीषण असा कोकणकडा त्यासमोरील सीतेच्या डोंगरावरून मनसोक्त न्याहाळणाचा. त्याचे विलोभनीय असे रुपडे डोळ्यात साठवून घेण्याचा, आणि कलाडगडावरुन दिसणारे दुर्गवैभव अनुभवण्याचा. 

 

जेव्हा जेव्हा कोकणकड्यावरून सूर्यास्त पाहायचो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला जाताना नाफ्ता -डोमा, कलाडगड या शिखरांच्या मागे केशरी झालर चढलेली असायची. नाफ्ता-डोमाचे गगनचुंबी शिखरे कायम साद घालायची. कोकणकड्यावरून खाली बघताना डोळे फिरायचे पण त्यावेळेस कोकणकड्याचे अद्भुत अंतर्वक्र रूप समोरून पाहता येत तर काय मजा येईल या विचारताच सूर्यास्त व्हायचा. आज ते वेळ आली आणि ट्रेकभिडुनी प्लॅन ठरवल्यावर लागलीच पाच भटकी मंडळी निघाली. 


रात्री तीनला पाचनई गावात पोहोचून एक मंदिरात पथारी टाकली. तीन नंतर गाड्या भरून भरून पब्लिक यायला लागल्यावर थोडीफार तरी झोप होईल हि अपेक्षा सोडून दिली. साडे तीनच्या सुमारास रील बघून हरिश्चन्द्रगड "ट्रेकिंग" नव्हे तर "ट्रॅकिंग" करणारी मंडळींचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. हिंदी पब्लिक आणि उत्साही पोरींनी पहाटे तीन वाजता हासत -खिदळत गावातील शांततेचा बाजार उठवला. थंडी असल्याने पांघरून ओढून पडून राहिलो. सकाळी सर्व आवरून पुढे निघालो. 


हरिश्चंद्र गडाच्या डोईवरून मनसोक्त विहार करणारे ढग 


पूर्वेकडे झुंजूमुंजू होऊ लागलेले. आसमंतात जमलेले ढगांचे छोटे-छोटे पुंजके पश्चिमेच्या  प्रवासास लागले होते. सकाळची कोवळी किरणे लेंडी जांभळाच्या सदाहरित हिरव्यागार पानांवर पडून आसमंतात परावर्तित होत होती. समोर कलाडगड निश्चल ऊन खात पहुडलेला तर त्यामागे घनचक्कर माथा आपल्या उंचीने ढगांशी गळाभेट घेत होता. सीतेचा डोंगर समोर बघून नाळेतून चढाई चालू केली. ओळीने येणाऱ्या मोठ्या मोठ्या गुहा पाहून पावसाळ्यात येथे काय कमाल वातावरण असेल या विचारात यथेच्छ फोटो काढत मंडळी दोन तासात डोंगरावर पोहोचली. 


थोडी उंची गाठली तसे कलाडगड खुजा वाटू लागला तर पश्चिमेकडे नाफ्ता शिखराचे दर्शन होऊ लागले. समोर शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव , आजोबा पर्वत लक्ष वेधून घेत होते. जसे डोंगर चढून माथ्यावर पोहोचलो तसे वरून दिसणारे दुर्गवैभव पाहून डोळे तृप्त झाले. नाणेघाटापासून ते हटकेश्वर पर्यंतची सगळी जुन्नर दिशेची डोंगररांग आता एका दृष्टीक्षेपात आली. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच काय ते आपल्या हातात!. सहयाद्रीचे हे पुराणपुरुष आपल्या असंख्य डोंगरधारेरुपी बाहुतून आमचे जणू स्वागतच करत होत्या. 


समोर आहे तो कलाडगड. त्यामागे घनचक्कर रांग. 

माथ्यावर चढाई मागे रोहिदास शिखर 

खिंडीतून छोटीशी चढाई करून सीतेच्या डोंगराचा माथा गाठला. समोर आता कोकणकडा दिसत होता. तारामती, बालेकिल्ला उन्हाचा सोनेरी मुकुट धारण करून ध्यानस्थ बसलेले. माकडनाळ, रोहिदास शिखर आणि त्याला लागून एकमेवाद्वितीय असा अंतर्वक्र कोकणकडा. बरोबर रोहिदास शिखराच्या मागे देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर दिसला. केवळ अद्भुत अशी निसर्गचित्रे! येथून दिसणारे मायबाप सह्याद्रीचे रुपडे म्हणजे निव्वळ कमाल. सहयाद्रीच्या या सुंदरतेच्या व्याख्याच वेगळ्या. न मागता दिलेल्या या देणग्या सगळ्या बेहिशेबी! तो अखंड देत राहतो आपण आपल्या कुवतीनुसार ओंजळीत भरून घ्यायचं बस!


नाफ्ता - डोमा शिखरे. मध्ये हपट्याचा कडा 


देवदौन्डया, भोजगिरी, सिंदोळा, हडसर, निमगिरी, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, नाणेघाट, ते अगदी दुर्ग ढाकोबा पर्यंतच परिसर येथून दिसला. 

रोहिदास शिखर आणि माकडनाळ 

नाफ्ता-डोमा समोर तर मागे आजोबा - करंडा, कात्राबाई - गवळदेव - घनचक्कर- भैरवगड शिरपुंजे 


घड्याळात अकरा वाजलेले पाहून परतीचा रस्ता धरला. दिड तासात परतून कलाडगडाकडे कूच केले. एव्हाना आता उन्हाचा जोर वाढल्याने कलाडगडाची चढाई दम काढू लागली. वीस मिनिटात चढाई करून गेल्यावर कातळकोरीव पावट्यानी स्वागत केले. अश्या उंच ठिकाणी अशी कारागिरी करणाऱ्या त्या अनामिक हातांना सलाम! येथून पुढे चढून भैरव मंदिरात पोहोचलो. नमस्कार करून गड फेरीस निघालो तशी या माथ्यावरून मगाशी न दिसलेली नाफ्ता-डोमाच्या मागील दुर्गशृंखला उलगडत गेली.



येथून पॅराशूट जम्प केली तर डायरेक्ट वल्हीवरे गावात उतरता येईल .  


 कात्रा,करंडा,आजोबा ते मागे पाबरगड सगळी रेंज एका ओळीत दिसू लागली. पुन्हा एकदा हे अप्रतिम वैभव मनाच्या कप्प्यात साठवत कलाडगड उतरून खाली आलो. एक सुंदर मोठ्य्या झाडाशी जेवण करून अर्धा तास वामकुक्षी घेतली आणि मंडळी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 


चक्रासन 




प्रथम फोटो आणि हे शेवटचे काही फोटो सौजन्य : श्री विनीत दाते. 


महत्वाचे असे काही : 
  • हरिश्चंद्रगडाचे आणि जुन्नर पर्वतरांगेचे  रौद्र सौन्दर्य आणि पाहायचे असेल तर यासारखी जागा नाही. 
  • पावसाळ्यात मोठे धबधबे असल्याने चढाई अवघड होईल.  उत्तम. 
  • हपट्याचा कडा हा सीतेचा डोंगर उतरून अर्धा पाऊण तास चाल आहे. 



शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

कुंडलिका व्हॅली 2024

  

कुंडलिका व्हॅली ट्रेक 


 सिनेर खिंड - कुंडलिका व्हॅली - सावळ घाटवाट -  परातेवाडी 





शुक्रवारी पृथ्वीतलावरच्या काही रिकामटेकड्या लोकांची फोनाफोनी झाली आणी ती रिकामटेकडी मंडळी पाठीवर बोचकी घेऊन कुंडलिका व्हॅली ट्रेकला मार्गस्थ झाली. दरवर्षी नित्यनेमाने होणारा हा ट्रेक आज डोंगरदेवांच्या कृपेने आज  जुळून आला आणी सह्याद्रीचं रांगडं रूप पुन्हा एकदा मनात घर करून गेलं. 

पाच,सहा तास मोठमोठाल्या दगड धोंड्यांवरून उड्या  मारत दरीत पोहोचायच, पावसामुळे आणी कुंडलिका नदीच्या प्रवाहामुळे दरवर्षी मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत वाटचाल करायची, वाटेतले भले मोठाले रॉक पॅच, पाठीवरच् सामान आणि सुटलेले पोट हे दोन्ही घेऊन उतरायची कसरत , हिवाळ्यातही वाहणारे धबधबे आणी बारमाही पाण्याचे प्रवाह, तळ दाखवणाऱ्या हिरव्यागार पाण्यात पोहणे, दोन पुराणपुरुष भासणाऱ्या डोंगरांच्या घळीतून यथेच्छ भटकायचं, पूर्णवेळ सोबतीला अंधारबन, कुंडलिका आणी नावजी सुळके असतातच. पौर्णिमेचा चंद्र सोबतीला घ्यायचा आणी स्लिपींग बॅग मध्ये शिरून आकाशात ताऱ्यांचे मनोमन आकार बनवायचे, दरीच्या उत्तरार्धात सावळ घाटाच्या पुरातन पण सध्या वापरात नसल्याने मोडलेल्या वाटांचा मागोवा घेत खडी चढाई सुरु करायची आणी कितीतरी हजारो वर्षांपूर्वी कोणी अनामिकाने कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणी खोदीव पायऱ्या बघून अचंबित व्हायचं. 

जगलेल्या अश्या अविस्मरणीय क्षणांचे मोती आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं !


असो , तर कुंडलिका घळीचा हा ट्रेक मुळशी तालुकातल्या पिंपरी गावापासून सुरू होतो. सिनेर खिंडीमधून वाट काढत आपण कुंडलिका घळीमध्ये उतरतो. येथेच वनखात्याने सध्या चेकपोस्ट सुरु करून लोकांचा खिसा १०० रुपड्यानी हलका करायचा घाट घातलाय. आमच्या नशिबाने एवढ्या उन्हात कोणताही वनखात्याचा "वीर" सिनेर खिंड लढवत नव्हता. दक्षिणा वाचली या आनंदात मंडळी अजून चार-पाच फोटो काढून पुढे निघाली. 

घळीत पुढे जातानाच सह्याद्रीचा अनंत पसारा आपल्या पुढे उलगडत जातो. दोन देखण्या डोंगरांच्या नक्षीत मोठमोठाले दगड-धोंडे निश्चल ऊन खात पडलेले असतात. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मोठमोठाले कातळ कापून काढलेले दिसतात मग हीच वाट पकडायची आणी गणपतीचे नाव घेत या दगडांवर उड्या मारत आपली मार्गक्रमणा चालू ठेवायची. अश्या उड्या मारत चालायचा जरा कुठे कॉन्फिडन्स आला कि एखादा हलणारा दगड आपल्याला मस्त प्रसाद देतो. परत थोडं सावरून न हलणारे दगड मनोमन ताडत पायगाडी चालू ठेवायची. थोडक्यात काय तर कुंडलिका व्हॅली आपल्याला मान वर करायलाच चान्स देत नाही. 



सुमारे ९ वाजता घळ उतरायला सुरु केली आणी रमतगमत मंडळी निघाली. वाटेत दिसणारे नजारे मात्र कमाल होते. असंख्य दगडांच्या राशी, त्यात जमलेले नितळ आणी हिरवेगार पाण्याचे प्रवाह, डोंगरांच्या कडयांवर नैसर्गिकपणे तयार झालेल्या काही प्रतिकृती , निर्मनुष्य असा प्रदेश आणी दूरवर दिसणारे घळीचे शेवटचे टोक बघत सुमारे ५ तासांची पायपीट झाली.आज दिवसभर आकाश ढगाळ असल्याने सूर्यनारायचे दर्शन फारच कमी झाले. मध्येच जेव्हा नारायण दिसायचे तेव्हा झाडाच्या पानांना हिरवागार साज चढायचा, सोनसळी गवत किरणे परावर्तीत करू लागायची आणी शांत पाण्याच्या डोहात आजूबाजूची सृष्टी आपले कौतुक न्याहाळून घ्यायची. हिवाळ्यातही असलेले धबधबे मिळून एक संपन्न निसर्गसोहोळाच बनून जायचा. आजही दिसणारे धबधबे, पावसाळ्यात त्यांचे रौद्र रूप दाखवत असतील हे नक्की. 





पाच-सहा तासांच्या वाटचालीनंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सामान / तंबूची मांडामांड झाली आणी मंडळी व्हेज दालचा करायच्या कार्यक्रमात गुंतली. येतानाच लाकडे गोळा करून आणल्यामुळे शेकोटीची सोय झाली .नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली. ड्युटी संपवून नारायण डोंगरात लुप्त होऊ लागले तरी किरणांचा कटाक्ष काही चुकार ढगांमधून जाणवत होता.आकाशाच्या छपराखाली आजची रात्र अविस्मरणीय होणार होती ! 


या तयारीला 

डिस्कवरी वर दाखवतात तसा काही 

जिथे आमची पथारी पसरली होती त्या शेजारूनच पाण्याचा प्रवाह वाहत होता. थंडीशी दोन हात करायला शेकोटीचा कार्यक्रम झाला. सगळ्या ग्रुप मेंबर्सची ओळखपरेड झाली आणी काही दिग्गज मंडळींशी  भेटी-गाठी झाल्या. पौर्णिमेचे औचित्य साधून हा ट्रेकचे नियोजन केले होते पण चांदोबा अजूनही ढगांमध्येच चाचपडत होता. जशी मंडळी निद्राधीन झाली तशी संपूर्ण दरीत निरव शांतता पसरली. स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आकाशातले कवतिक न्याहाळणे एवढाच काय तो उद्योग उरलेला. मध्यरात्री संपूर्ण आकाश निरभ्र झाले आणी चांदोबाने दर्शन दिले. दोन उंच डोंगरांच्या मधोमध खाली दरीतून वरती आकाशाकडे बघताना, डोळ्यासमोर चंद्र डावीकडून उजवीकडे मार्गक्रमणा करत आणी पाठीमागे तार्यांची रांगोळी काढत जाताना दिसला. केवळ शब्दातीत असा अनुभव !








सकाळी उजाडताच आवराआवर करून पुढची वाटचाल चालू झाली. न्याहारी आटपून पुढे निघालो आणी पुढे होते अजून एक सरप्राईज! मोठाले पाण्याचे डोह! मंडळी पाण्यात उड्या  मारायला वाऱ्यासारखी सुटली.गारेगार पाण्यात पोहून जरा आत्मा शांत करून घेतला. इथेच प्रत्येकी दोन लिटर पाणी भरून घेतले. एकदा का सावळघाट चढाई सुरु झाली कि कुठेही पाणी मिळणार नव्हते. 



आता लक्ष्य होते घाटमाथ्यावरचे परातेवाडी गाव आणी मध्ये होता सावळ घाटवाटेचा थरार ! सह्याद्रीतल्या अश्या अनेक प्राचीन घाटवाटा आज मात्र वापर नसल्याने "बिकटवाट" बनल्यात. राबता नसल्याने आणी प्रचंड पावसाने या प्राचीन घाटवाटा मोडून जातात. हजारो वर्षांपूर्वी कोणी अज्ञात लोकांनी खोदलेल्या उभ्या कातळातील पायऱ्या, पाण्याचे कुंड पाहिले की वाटते, सह्याद्रीची भटकंती म्हणजे फक्त डोंगरांवरची तंगडतोड नाही तर हि आहे इतिहासाची जिवंत सफर! 






तीव्र चढण चांगलीच दमछाक करत होती. वाटेचा अंदाज घेत आणी पूर्वीच्या खुणां शोधत सर्व जण निघालो. वाटेतील झाडे झुडपे मान वर करू देत नव्हती त्यांची काटछाट करत, एकमेकांना हाकाऱ्या देत, वाटेतील दगडांवर मागच्या लोकांसाठी खडूने खुणा मारत ७० अशांश कोणातली खडी चढाई सुरु होती. वाटेत निसटते धोंडे आले, घसारा आला वा झाड पडलेले दिसले की मग मागच्या फळीतले उत्साही कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाच्या शोधात पुढे व्हायचे. 



सावळ घाट चढाई 

दोन तासांच्या चढाईने डोंगरांच्या घळीत पोहोचलो. आणी अहो आश्चर्यम!  उभ्या कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी. पाणी सध्यातरी पिण्यायोय नाही. एकदा का ही टाकी दिसली की, आपले सावळ घाटाचे दिव्य पार झाले समजावे. शेवटच्या टप्प्यात बांबूची वने लागतात आणी इथे तेथून डावीकडे गेल्यास लागतात खोदीव पायऱ्या आणी मोठाली पाण्याची टाकी. बघता क्षणी मन इतिहासात जाते. कोणी अनामिकाने कितीतरी हजारो वर्षांपूर्वी वाटसरूंच्या सोयीसाठी या पायऱ्या खोदल्या असतील ज्यावरून आज आपण प्रवास करतोय. इतक्या उंचीवर खोदलेल्या आणी अजूनही तुडुंब भरलेल्या टाक्या, त्याकाळी किती लोकांची क्षुधा शांत करत असतील?





इतिहासाचा विचार करता करता थोडे पुढे गेले की निसर्गाचे जे काही रुपडे दिसते त्याची तुलना कशाशीच नाही. डोळे विस्फारून बघत राहणे एवढेच आपल्या हातात! 




सामान खाली ठेऊन बराच वेळ निसर्गातील करामती बघत राहिलो. बरोबरची मंडळी पुढे निघून गेली होती. नाईलाजाने काढता पाय घेऊन परातेवाडी च्या दिशेने चालू लागलो. घाटमाथ्यावर येताच लाईटचे खांब दिसू लागतात त्याच्या दिशेने परातेवाडी गाव लागते. गावात पोहोचल्यावर थोडीशी पेटपूजा झाली. पुढे आलेल्या मेंबर्सने सगळी तयारी करून फक्कड मुगाची खिचडी बनवली होती. मनोमन त्यांचे आभार मानत  दोन घास खाऊन पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.


एकंदरीत कमाल असा अनुभव होता. खूप सारे सरप्रायजेस आणी निसर्गाचे लोभस रूप. 
जगणातल्या अश्या अविस्मरणीय क्षणांची बेरीज म्हणजेच आयुष्य !

वाचत रहा ! 


बुधवार, १० जानेवारी, २०२४

उत्तर कर्नाटक किल्ले आणि मंदिरे

 उत्तर कर्नाटक किल्ले आणि मंदिरे स्पेशल दिवाळीची सहल : 

१३ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर 


दिवस १ : पुणे येथून सकाळी ५ वाजता बेळगाव दिशेने प्रयाण. कोथरूड - निपाणी - किल्ले वल्लभगड - किल्ले होन्नूर - किल्ले पाच्छापूर - काकतीचा किल्ला - बेळगावचा भुईकोट - मिलिटरी दुर्गा माता मंदिर - रामकृष्ण मिशन - कमल बस्ती जैन मंदिर - बेळगाव मुक्काम. ( ४२० किलोमीटर्स )


दिवस २ : बेळगाव - किल्ले राजहंसगड उर्फ येळ्ळूरचा किल्ला - कित्तूरचा किल्ला - किल्ले सौन्दत्ती - किल्ले पारसगड - यलम्मा देवी मंदिर - हुली येथील मंदिर आणि किल्ला - तोरगळ किल्ला - रामदुर्ग - नारगुंद येथे मुक्काम ( २२० किलोमीटर्स)


दिवस ३ : नारगुंद - सिद्धेश्वरा देवस्थान - नारगुंद किल्ला - चालुक्य राजवटीची राजधानी सुडी - कलकालेश्वर मंदिर - गजेंद्रगड - सरदार संताजी घोरपडे यांचा वाडा - गौडगिरी किल्ला - त्रिकुटेश्वर मंदिर समूह - गदग मुक्काम ( २०० किलोमीटर्स)


दिवस ४ : गदग - लकुंडी मंदिर समूह - दोड्डाबस्सपा मंदिर दंबेल - महादेव मंदिर, इटगी - कोप्पळ किल्ला - बहादूर बंडी किल्ला - गवि सिद्धेश्वर मठ - कोप्पळ मुक्काम ( १७५ किलोमीटर्स )


दिवस ५ : कोप्पळ - हंपी - मातंग डोंगर - अंजनेद्री बेट्टा - आनेगुंदी किल्ला - बदामी मुक्काम ( १९० किलोमीटर्स)


दिवस ६ : बदामी - बदामी किल्ला आणि लेणी समूह - शिवयोगी मंदिर - महाकुटा मंदिर - पट्टदकलू मंदिर समूह - ऐहोले किल्ला - ऐहोळे मंदिर समूह - विजापूर - सोलापूर - पुणे ( ४८०किलोमीटर्स)

==============================================================================


अश्या प्रकारे २ राज्यांची, ५ जिल्ह्यांची, ६ दिवसांची, १६८५ किलोमीटर्सची अविस्मरणीय अशी सहल समाप्त झाली.


सहा दिवसांचा हा असा भरगच्च प्लॅन फॅमिली स्पेशली सात वर्षांचा मुलगा घेऊन पूर्ण करता आला याचा आनंदच काही वेगळा आहे. सकाळी नाश्ता करून निघाल्यावर दुपारी दिवाळीचा फराळ / फळे आणि रात्री मिळेल तिथे मुक्काम व जेवण केल्याने ६ दिवसात जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देता आली. सहा दिवसात एकदाही फिरण्याचा वेळ खाण्या-पिण्यात घालवला नाही. स्वतः गाडी चालवत गेल्याने हंपी-बदामी च्या कोणत्याही टूर्स कंपनीच्या एकाच्या किमतीच्या अध्या खर्चात तिघांची ट्रिप झाली. शहरी भाग सोडून भाषेचा अडथळा जाणवला पण खाणाखुणा आणि गुगल ट्रान्स्लेटरच्या साहाय्याने वेळ मारून नेता आली. स्थानिकांशी बोलून नवीन भटकायच्या जागा कळल्या तर कधी मुक्कामाचे स्थान शोधण्यास मदत झाली. सहा दिवस फक्त सकाळी लवकर उठायचे - मॅप लावून आजचा प्लॅन बघणे - दाक्षिण्यात्य पदार्थ खाऊन उदराम-भरणम झाले कि गाडी मारत किल्ले / मंदिरे भटकायची, आता कुठे कसे जायचे आणि काय बघायचे फक्त हेच विचार डोक्यात!


सुरुवातीला दिवस ५ आणि ६ हे कोप्पळ आणि बेल्लारी जिल्ह्यातील किल्ले ठरवले होते. घरची मंडळी २१ किल्ले पाच दिवसात बघून कंटाळलेली पाहून शेवटच्या दोन दिवसांचा प्लॅन बदलला.


दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सजलेली छोटी छोटी गावे , कर्नाटक मधील रस्ते, राजहंसगड गडाच्या पायथ्याशी सगळी मराठी किल्लेदार लोकांची असलेली घरे पाहून झालेला आनंद, राजहंसगडावरील महाराजांची भव्य अशी प्रतिमा, सौन्दत्ती / पारसगडाचे लकाकते सौदर्य, नारगुंद गावातही माहित नसलेला पण खुद्द महाराजांनी बालेकिल्ला बांधलेला नारगुंद किल्ला शोधण्याची कन्नड मधील धडपड, सर्वात देखणा गजेंद्रगड आणि एक -दिड फुटांच्या पायऱ्यांची दमवणारी चढाई - पायथ्याशी असलेल्या मराठे सरदारांचा घोरपडे वाड्यातून मराठीत "जेऊन जा" म्हणत आलेले आपुलकीचे शब्द, गौडगिरी, कोप्पळ, बहादूर बंडी किल्ल्यांचे अभेद्य बुरुज आणि स्थापत्यशास्त्र, हंपी - बदामीची दुसरी भेट, लकुंडी, हुली, तोरगळ, इटंगी , पट्टदकलू येथील डोळे आणि बुद्धी दिपवणारे शिल्प स्थापत्य आणि मंदिर स्थापत्य, आपल्या हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास दर्शवणारी आणि मानवी मती अचंबित करणारी तत्कालीन शिल्पकला. सुडी नामक छोट्या गावातील प्रचंड गणपती बाप्पा, फक्त वीस पायऱ्या उतरून आपल्याला वर्तमानातून भूतकालीन वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी सुडी येथील जुळी मंदिरे आणि पुष्करणी. सुडी येथे पैश्याची बॅग विसरून, पाच तासांनी गजेंद्रगड वरून परत गावात आल्यावर आहे तशी बॅग परत देणारा सुडी येथील शाळेतील माणूस, भाषा कळत नसून मदत करणारी माणसे, गदग मध्ये पोलिसांनी पुण्याची गाडी पाहून पकडल्यावर २००० रुपयांचे प्रकरण २०० मध्ये निस्तरताना केलेली वाचाळ बडबड, शेवटच्या दिवशीचे सलग नऊ तासांचे ड्रायविंग - असे अनेक कायम आठवणीत राहतील असे प्रसंग जगता आले. एकंदर काय तर सुट्टी सत्कारणी लागली म्हणायची !


शेवटी काय तर ,
गर्दीशो मै जो छिन गया था, सुकून लौटा रही है जिंदगी ।
किष्टों मैं ही सही, हम पर भी मेहेरबान हो रही हैं जिंदगी ।।



दुर्गा गुडी, ऐहोळे, बागलकोट

महादेव गुडी , इटगी, कोप्पळ

जोडो कळसा गुडी, सुडी [ ट्वीन टॉवर टेम्पल ]

किल्ले गजेंद्रगड

पुष्करणी , सुडी

किल्ले सौन्दत्ती

ऐहोळे किल्ला

कित्तूरचा किल्ला

कित्तूर किल्ला

किल्ले पारसगड

किल्ले तोरगळ आणि भूतनाथ मंदिर समूह

हुली येथील मंदिर



ससेकलू गणेश , हंपी


पुष्करणी , सुडी

हेमकुंट हिल्स , हंपी

कडेकाळू गणेश , हंपी

तुंगभद्रा नदी, हंपी




बदामी किल्ला

पट्टडकलू मंदिर समूह


राजगंसगड उर्फ येळ्ळूर चा किल्ला


दोड्डाबसाप्पा गुडी , लककुंडी

किल्ले वल्लभगड