गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार

रविवारची भटकंती : 

भटकंती सह्याद्रीच्या कुशीतील अवघड पण अत्यंत्य देखण्या अश्या घाटवाटांची -

 घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार. 



सहयाद्रीतील काही जागाच अश्या आहेत ना कि बघताक्षणी प्रेम! त्या यादीतील बहुप्रतीक्षित अशी हि भटकंती होती. मागच्या वर्षी काही ट्रेकभिडु जाऊन आलेले तेव्हा फोटो बघूनच जायचे नक्की केलेले तर तो योग आज जुळून आला. 


आता घोडेपाण्याची नाळ चढताना दिसणारे सहयाद्रीचे अद्वितीय रूप पाहायचे असेल तर पहिले "सिंगापूर" ला जाणे आले. मग काय सकाळी ब्राम्हमुहूर्तावर पुण्यनगरी सोडून सिंगापूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. रथाचे सारथी अत्यंत कुशल असल्याने तेवढ्या वेळात निद्रादेवीला प्रसन्न करून घेतले. ग्रुपमधले ट्रेकभिडु शरदभाऊंनी हा ट्रेक आधी दोन वेळेस केला असल्याने जायचा रस्ता, चढाईची वाट, वाटाड्या, gpx फाईल या कशाच्याही फंदात न पडता त्यांच्या पाठीमागे चालत सुटणे आणि निसर्गाच्या अदभूत सौन्दर्याने मंत्रमुग्ध होत जाणे एवढेच काय ते ध्येय होते. 


नाणेघाट आणि दाऱ्या घाट या कोकण प्रदेश आणि देश यांना जोडणाऱ्या फार पूर्वीपासून प्रचलित अश्या वाटा होत्या. आजही स्थानिक लोक याच वाटांचा वापर करतात. या वाटांवर असलेल्या राबत्यामुळे त्या जिवंत राहिल्या तश्या या दोन वाटांच्या उदरात वसलेल्या घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार या वाटा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपणच या वाटा जागत्या ठेवल्या तरच  इथली दगडं इथली कथा आणि व्यथा सांगतील. 


असो! तर सकाळी आठ वाजता घोडेपाण्याची नाळेची चढाई चालू झाली. पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा पत्ताच नव्हता. समोर जीवधन किल्ल्यावर आणि वनरलिंगीवर चढलेला सोनेरी रंग बघून नाळेच्या माथ्यावरून झकासपैकी दृश्य दिसणार याची खात्री झाली. वाटेने वाहणारे बारीकसे पाण्याचे प्रवाह ओलांडत पाण्याच्या वाटेने म्हणजे नळीतून मंडळी मार्गक्रमण करीत होती. रमतगमत आणि नियमित फोटो ब्रेक घेत चार तासात माथ्यावर पोहोचलो. येथून दिसणारा सह्याद्रीचा रौद्र राकट नजारा म्हणजे काय वर्णावा? शब्द आणि प्रतिभा दोन्ही तोकडं पडेल निव्वळ असा!


चढाई करताना अजस्त्र वाटणारे बाहुला-बाहुली सुळके आता थिटे वाटू लागले होते. या दोन सुळक्यांच्या मागून जीवधन किल्ला आणि वानरलिंगी उंच आभाळात झेपावलेले ! त्याच्या डावीकडून नानाचा अंगठा हळूच डोकं वर काढत होता. माथ्यावर संपूर्ण कारवीचेच साम्राज्य! एवढ्या दुर्गम जागेवर बिबट्याचची विष्ठा पाहून साहेब या प्रदेशात कुठेतरी असणार याची खात्री पटली. माथ्यावरून  दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅव्हर्स मारून रिठ्याच्या दाराच्या तोंडाशी पोहोचलो. गर्द कारवीचे रान बघून हातापायांना "लालेलाल" साज चढणार या तयारीनेच नाळ उतरायला घेतले. कोणत्याही सजीवांचा मागमूस नसलेल्या वाटेने दोन-तीन मोठ्ठाले रॉकपॅच वळसा घालून उतरलो तेवढा संध्याकाळ होऊ लागली होती. अश्या प्रकारे एका अनवट, देखण्या आणि तितक्याच लोभस अश्या घाटवाटांची आठ तासांची, बारा किलोमीटर्सची भटकंती पार पडली. 


असो! माथ्यावरून दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतील असे नजारे होते. त्यामुळे तूर्तास फोटोंची मजा घ्या .


घोडेपाण्याच्या नाळेतून दिसणारे ददृश्य 

नाळेची चढाई 


माथ्यावरून व्ह्यू 



रिठ्याचे दार उतराई 

रिठ्याचं दार उतराई, खाली सिंगापूर 



शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग २ [ सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड ]

 

दिवाळीपूर्व तळ कोकण भटकंती : 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : 

सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड

पूर्व लेख : 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग १ [ रामगड - भरतगड - भगवंतगड ]

=================================================

दिवस २ : मालवण किनाऱ्यावर भटकंती / वॉटर स्पोर्ट्स - रॉक गार्डन - किल्ले सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड - तारकर्ली - देवबाग - मालवण - कुणकेश्वर मंदिर मुक्काम [ ९० KM ]

=================================================================

दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त मालवणच्या किनाऱ्यावर फिरायचं आणि वॉटर स्पोर्ट्स करायचा प्लॅन होता. सकाळी हे सगळे आटोपून पुढे ओवळिये येथील सिद्धगड आणि पेंढुर येथील वेताळगड बघून धामापूर तलाव बघत संध्याकाळी सूर्यास्ताला तारकर्ली किंवा देवबाग जाऊ असा प्लॅन केलेला. 


सकाळी सकाळी कुटुंबासहित डॉल्फिन राईडने दिवसाची सुरुवात झाली. सात पॉईंट दाखवणार म्हणून सुरुवातील सांगितलेल्या राइडने सगळी ठिकाणे लांबूनच दाखवुंन अपेक्षेप्रमाणेच गंडवले होते. काहींच्या काही पॉईंट स्वतः ठरवून बोटीतूनच ते बघा हा तो अमका पॉईंट, हा बघा तमका पॉईंट असे दोन तास फिरवून आठशे रुपयांनी खिसा हलका करून आम्ही परतलो. येताना डॉल्फिन दिसले म्हणून त्यातल्या त्यात समाधान मानून स्कुबा डायविंग साठी निघालो. ऑफ सिझन असल्याने म्हणजे दिवाळीपूर्व असल्याने चारशे रुपयात स्कुबा सांगत होता. हे म्हणजे फक्त पाण्यात बुडवून खाली दहा पंधरा फूट नेऊन मास्यांना खायला देऊन त्यांच्यासमवेत काढलेल्या व्हिडिओचे पैसे होते. पण तरीही पहिल्यांदाच केल्याने मजा आली. बरीचशी लोक पैसे भरूनही घाबरून तळाशी जात नव्हती. माश्याना पावाचे तुकडे टाकून मासे आपल्या जवळ आणतात आणि व्हिडिओ काढतात. असो पाचच मिनिटात स्कुबा झालं आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. राजकोट येथील महाराजांचा पुतळा पडल्याने पोलीस तेथे सोडत नव्हते तर पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग आधी पाहून झाल्याने रॉक गार्डन बघून आम्ही निघालो सिद्धगड आणि वेताळगड. 

ओवाळिये येथील सिद्धगड:

दरवर्षी कोकणात यायचं म्हणजे कितीवेळ समुद्र बघणार म्हणून आज दोन किल्ले ठरवले होते. मालवण पासून ३५ किलोमीटर्स वर कसाल गाव आणि तेथून सात किमी ओवाळिये येथील सिद्धगड पाहण्यास आम्ही निघालो. वाटेत दोन कामगार बसची वाट पाहत होते त्यांना उचलून गाडीत घेतले तर एक सिद्धगडाच्या जवळील सिद्धगड वाडीतीलच निघाला. त्याने आम्हाला सड्यापर्यंत सोडून राम राम  केला. सड्यावरून सर्वत्र पुरुषभर उंचीचे गवत उगवलेले त्यातच गाडी पार्क करून वाट शोधत किल्ल्याला निघालो. दुर्गवीर संस्थेने बोर्ड लावल्याने किल्ला सापडतो नाहीतर नवख्या माणसाला सापडणे अवघड आहे. 

संपूर्ण किल्ला झाडाझुडुपांनी वेढलेला आहे. एक ठिकाणी तुटलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. येथे माणसांचा वावर नसल्याने सरपटणाऱ्या जनावरांचा धोका आहे. एकटाच असल्याने मोबाईल वर गाणी लावून धाडस करून किल्ल्यात निघालो. मोठमोठाली झाडे, त्यावरील मुंग्यांचे वारूळ, पायात अडकणाऱ्या वेली, उध्वस्त अश्या वास्तू, वानरांचा आवाज अश्या हॉरर पिक्चर मध्ये शोभेल अश्या  परिस्थितीत किल्ल्यात घुसलो. एका ठिकाणी महाराजनची मूर्ती पाहून थोडेसे बळ मिळाले. पुढे थोड्या अंतरावर पुरातन असे देवीचे मंदिर आणि त्यासमोरील दगडी द्विपमाळा आपले लक्ष वेधून घेतात.  पंधरा मिनिटात गडफेरी आटोपून आल्या मार्गाने परत निघालो पेंढुर गावातील वेताळगडाकडे. 





पेंढुर येथील वेताळगड : 

हा किल्ला मॅप्स वर किंवा नेटवर शोधला तर संभाजीनगर मधील वेताळवाडी किल्ला दाखवतो म्हणून पेंढुर शोधात तेथून पत्ता विचारात जावे. कट्टा गावातून पेंढुर पुढे मोगरणे फाट्याने गावडेवाडी येथे जावे. पायथ्यापर्यंत गाडी जाते. येथून एक घरातून कसे जायचे विचारून एकटाच किल्ल्यावर निघालो. घरातील आजींनी तुम्हाला सापडणार नाही जाऊ नका म्हणून पहिल्यांदाच सांगितले. तरीही ट्राय करू म्हणून निघालो. वेताळगड संपूर्ण जंगलाने वेढलेला असून माथ्यावरची उंचच उंच झाडांमुळे कुठून कुठे जायचा हाच पत्ता लागत नाही. पावसाळ्यानंतर अजून येथे कोणीही फिरकले नसल्याने आणि गावकरीही जात नसल्याने वाटा सापडत नव्हत्या. तासभर गावत तोडत भटकलो आणि कसातरी माथ्यावर पोहोचलो. आता येथून पुढे गेलो तर परत येताना मार्ग सापडणार नाही अशी परिस्थिती पाहून परत मागे फिरलो. माथ्यावरील वेताळाचे स्थान आणि कोरीव पाऊले बघायची राहिली. असो! पुन्हा कधीतरी येऊ. 

एव्हाना संध्याकाळ होत आली होती. वेताळगडावरून आल्यामार्गे कट्टा पोहोचून परत मालवणचा रस्ता धरला. सूर्यास्त पाहण्यासाठी खास जागा म्हणून देवबाग संगम येथे पोहोचलो. देवबाग तारकर्ली येथील फेमस किनारे फिरत सूर्यास्त झाला. आजची मुक्कामाची सोय म्हून हॉटेल्स विचारता कमीत कमी पाच हजार रेट होता. उद्या देवगड वरून रत्नागिरी आणि राजापूर जवळची कातळशिल्पे पाहायचा प्लॅन असल्याने मालवण आणि रस्त्नागिरी यांच्या मध्ये कुठे तरी राहू म्हणून विचार करतानाच कुणकेश्वर आठवले. दोन वर्ष्यांपुर्वी कोस्टल कर्नाटकची ट्रिप करून येथेच राहिलो होतो. मग काय मालवणला जेवण करून दोन तासात कुणकेश्वर गाठले आणि भक्तनिवात रूम घेऊन आजचा दिवस संपवला. आज जास्त न फिरताही ९० किमी झाले होते. आता पुढचे डेस्टिनेशन खुणावत होते ते म्हणजे राजापूर!  अश्वयुगीन कालखंडात कोरलेल्या कातळशिल्पांचा मागोवा घेत त्या अपरिचित वाट शोधण्याचा ! 

         


पुढचा भाग : 

अपरिचित वाटांवरून भटकताना अश्मयुगीन कालखंडात आदिमानवाने कोरलेल्या भन्नाट, अगम्य अश्या कातळशिल्पांचा शोध


गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : भाग १ [ रामगड - भरतगड - भगवंतगड ]

दिवाळीपूर्व तळ कोकण भटकंती : 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले : रामगड - भरतगड - भगवंतगड 


दरवर्षी दिवाळीनंतरची सुट्टी म्हणजे कर्नाटकाची रोडट्रीप असे झालेले समीकरण यावर्षी साधता आले नाही. जून मधली स्पिती आणि ऑक्टोबर मधली तीन केदार ट्रिप नंतर आता अजून सुट्टी मागितली असती तर शाल आणि श्रीफळ घरी कुरियरने आले असते म्हणून त्यातल्या त्यात शॉर्ट ट्रिप म्हणून मालवणची रोड ट्रिप ठरवली. सिंधुदुर्ग मधील समुद्री किल्ले झाले होते पण घाटातले किल्ले करायचे बाकी होते. हि अशी आडवाटेवरची ठिकाणे व  किल्ले भटकताना कोकणातल्या खऱ्या सुंदरतेचे दर्शन होते. राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नव्याने प्रकाशात आलेली अश्मयुगीन कातळशिल्पे म्हणजे मती गुंग करणारी अद्भुत आणि कला आवर्जून पाहायची होतीच. राजापूर म्हणजे खास आवडीची जागा असल्याने तेथेही जाणे होईल म्हणून खास प्लॅन झाला तो असा - 

=================================================================

दिवस १ : कोथरूड - कोल्हापूर - राधानगरी येथील राऊतवाडी धबधबा - दाजीपूर अभयारण्य - किल्ले रामगड - किल्ले भरतगड - किल्ले भगवंतगड - चिवळा बीच मालवण मुक्काम  [ ४२० KM ]


दिवस २ : मालवण किनाऱ्यावर भटकंती / वॉटर स्पोर्ट्स - रॉक गार्डन - किल्ले सर्जेकोट - ओवाळियेचा किल्ले सिद्धगड - पेंडूरचा किल्ले वेताळगड - तारकर्ली - देवबाग - मालवण - कुणकेश्वर मंदिर मुक्काम [ ९० KM ]


दिवस ३ : कुणकेश्वर बीच - पोखरबाव दाभोळे येथील कातळशिल्प - श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरबाव - श्री विमलेश्वर मंदिर - साखर गावातील कातळशिल्पे - निवळी कातळशिल्पे - किल्ले यशवंतगड ( नाटे) - किल्ले आंबोळगड - गगनगिरी महाराज मठ ( आंबोळगड ) - रुंधे कातळशिल्पे - देवीहसोळ कातळशिल्पे - देवाचे गोठणे कातळशिल्पे - राजापूर - माणगाव . [ ४२५ KM ]


दिवस ४ : किल्ले तळागड - कुडा लेणी - ताम्हिणीने कोथरूड [ १२५ KM ]

=================================================================

मालवण आणि तेथील हे माहित नसलेले किल्ले करताना पाहायला मिळालेले हे आडवाटेवरचे कोकण जे काही आहे ना ते म्हणजे कमाल. नारळ-पोफळीच्या बागांमधून जाणारे चिंचोळे रस्ते, कोकणी मालवणी भाषेचा हेल, चिऱ्याच्या भक्कम तटबंदीचे पण निर्मनुष्य असे किल्ले, खाडी आणि समुद्राचा संगम, ऐसपैस कौलारू टुमदार घरे, प्राचीन मंदिरे, घनदाट जंगले, देवराई, त्यांचे राखणदार त्यांची मंदिरे. सोलकढी मोदकाची मेजवानी.. सगळे काही केवळ लाजवाब! 

दिवाळीच्या चार दिवस आधी गेल्याने कुठेही गर्दी लागली नाही. सगळ्यात जास्त ट्राफिक लागले ते १२०० किमी जाऊन आल्यानंतर भूगाव मध्ये. येताना राजापूर ते घर असा मोठा पल्ला गाठायचा होता पण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचलो तरी चालण्यासारखे होते म्हणून माणगाव येथे गाडीतच दोन-तीन तास झोप काढून तळगड, घोसाळगडचा ऐनवेळी प्लॅन केला. 

पहिल्याच दिवशी मध्यरात्री तीन वाजता निघून थेट राधानगरी गाठली. राऊतवाडी नावाचा कोकणात उतरणाऱ्या रस्तावरच असलेला धबधबा अजूनही खळाळत वाहत होता. बऱ्यापैकी पाणी होते बघून कावळ्याची अंघोळ उरकली. उंचावरून वेगाने पडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हाने छानसे इंद्रधनुष्य रेखाटले होते.  येथे एक कॉलेजचा मित्र खास आमच्यासाठी दाजीपूर अभयारण्यातील शिवगड फिरवण्यासाठी कोल्हापूरवरून आलेला होता. खूप दिवसांनी भेटीगाठी झाल्या आणि मंडळी शिवगडच्या दिशेने निघाली. 

दाजीपूर अभयारण्यातील शिवगड किल्ला म्हणजे गर्द जंगलाने वेढलेला निर्मनुष्य प्रदेश. उन्हाळ्यात गावात कमी झाल्यावर लोक इथे येतात. पावसाळ्यानंतर येथे येणारे आम्ही पहिलेच असल्याने सकाळच्या वेळेत अस्वले असू शकतील असे दाजीपूरमधल्या एक माणसाने सांगितले. फॅमिली बरोबर असल्याने आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याने तो बेत रद्द करून राधानगरी बॅकवॉटर जवळ थोडी भटकंती केली. येथून पुढे कणकवली मार्गे कोकणात उतरून पुढे तीन चार किल्ले करायचे असल्याने पुढे निघालो. 

राऊतवाडी धबधबा 

                 

रामगड किल्ला : 

कणकवलीतुन आचऱ्याच्या दिशेने जाताना पहिला किल्ला लागतो तो किल्ले रामगड. मॅप लोकेशन अगदी बरोबर आपल्याला पायथ्याशी आणून सोडते. अर्ध्या -पाऊण तासाचा छोटासा किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन आम्ही निघालो. गावातून दहा मिनिटात सड्यावर येताच सुंदर असे भैरव मंदिर लागते. मंदिराच्या समोरच गजशिल्पे आहेत. येथून पुढे दहा मिनिटांच्या चढाईने आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत असून गोमुखी बांधणीचे आहे त्याच्या बाजूस १८ फूट बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पायवाटेने सरळ गेल्यास आपण होळीच्या माळावर पोहोचतो. येथे सात पुरातन तोफा निकामी करून जमिनीत उलट्या गाडून ठेवलेल्या दिसतात. तोफा चोरीस जाऊ नये म्हणून कोणीतरी नामी शक्कल केलेली दिसते. त्यासमोरच दुसरे प्रवेशद्वार असून त्याची वाट नामशेष झाली आहे. किल्ल्याच्या मध्यभागी चौथऱ्यावर गणपतीची मूर्ती आहे. तटबंदीवरुन चालत आपली गडफेरी पूर्ण होते. 






किल्ले भरतगड : 

रामगड पाहून मसुरेचा भरतगड पाहायला निघालो. एव्हाना तीन वाजत आले होते. भरतगड पाहून भगवंतगड जायचे होते आणि तेथून तोंडवळी किंवा मालवण पोहोचायचे होते. मॅपने गंडवले म्हणून विचारात विचारत मसुरे येथे गावात पोहोचलो. गाडी लावून चढाईस सुरुवात केली. सिंधुदुर्ग मधली हि अशी निर्मनुष्य पण अनवट ठिकाणे खऱ्या  अर्थाने कोकणातल्या सौन्दर्याची जाणीव करून देतात. पंधरा मिनिटात किल्ल्यात पोहोचलो. पुरुषभर उंचीचे गवत, त्यातून वाट काढत किल्ल्यात पोहोचलो. याही किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे असून तटबंदी भक्कम आणि सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या मध्ये एक मंदिर असून तटबंदीने भटकून आपली गडफेरी पूर्ण झाली. पूर्ण किल्ला हा झाडोऱ्याने वेढलेला आहे. 

                




किल्ले भगवंतगड :  

मसुरे गावातून आता भगवंतगड जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक फार लांबचा आणि एक जवळचा पण छोट्याश्या बंधाऱ्यावरून जाणारा. रस्ता सांगतानाच लोक म्हणायची कि तुम्हाला जमणार असेल गाडी काढायला तरच जा नाहीतर वांधे होतील म्हणून. बघून तर येऊ मन्नत बंधाऱ्यापाशी पोहोचलो. छोटी कार कट-टू-कट जाईल एवढ्या पुलावरून गाडी घालायची म्हणजे जाम टेन्शन आले. वेळेचं अभाव बघता देवाचं एनव्ही घेऊन गाडी घातली. बायको बाहेरून डावीकडे-उजवीकडे घे म्हणून गाईड करत होती तर मुलगा - "बाबा नीट चालवा नाहीतर गाडी खाडीत पाण्यात पडेल" म्हणून भीती वाढवत होता. शेवटी कशीबशी गाडी दुसऱ्या साईडला पोहचली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. येथेच खाडीपाशी गाडी लावून समोरच्या भगवंतगडाकडे पळत पळत प्रस्थान केले. अंधार पडायला आल्याने धावपळ करीत एकट्याने किल्ल्यावर पोहोचलो. येथे किल्ल्यावर फक्त एक मंदिर आहे आणि एक पडक्या स्थितीत प्रवेशद्वार आहे. सकाळी अस्वलाची कहाणी ऐकल्याने आणि इथे एकटाच असल्याने  थोडी पाकपुक झाली पण पटकन गडफेरी उरकून खाली आलो. 




भगवंतगड येथून आता तोंडवळी बीचला मुक्काम करू असं आपलं ठरला होता पण मालवण येथे राहण्याची जास्त सोया असेल विचार करून मालवण गाठले. चिवळा बीचच्या अगदी समोर खोली घेऊन जेवायला गावातल्या एकमेव अश्या व्हेज हॉटेलच्या शोधार्थ निघालो. एव्हाना ४२५ किलोमीटर्स झाले होते. आता अजून गाडी चालवण्याचा पेशन्स नसल्याने आणि हॉटेल जवळ असेल म्हणून चालत निघालेलो तर ते दीड किलोमीटर होते. पायाचे तुकडे पडायचे बाकी अश्या स्थितीत येऊन परत समुद्रावर जाऊन दिवस संपवला. 



भगवंतगड येथे जाणारा बंधारा. 


तिन्ही किल्ल्यांवर आमच्याखेरीज चिटपाखरू पण नव्हते. सगळे किल्ले प्रचंड झाडोऱ्याने वेढलेले आहेत. पावसाळ्यानंतर लगेच गेल्यामुळे असेल बहुतेक. हे शक्यतो उन्हाळ्यात करायला हवेत पण घामाने आणि उकाड्याने वाट लागेल हे नक्की. 


पुढच्या भागात - 

मालवण मधील भटकंती , स्कुबा डायविंग ची मजा आणि भर जंगलातील निर्मनुष्य असा सिद्धगड आणि चकवा लावणारा वेताळगड. 


शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

तीन केदार यात्रा : त्रितीय केदार : श्री तुंगनाथ धाम

 तीन केदार यात्रा : श्री केदारनाथ , मध्यमहेश्वर , तुंगनाथ 

त्रितीय केदार : श्री तुंगनाथ  ( सर्वोच्च शिवमंदिर ) 


पूर्व भाग : 
तीन केदार यात्रा : प्रथम केदार : श्री केदारनाथ धाम 
तीन केदार यात्रा : द्वितीय केदार : श्री मध्यमहेश्वर धाम 


                  


सलग पाचव्या दिवशी पहाटे उठून पाचला तुंगनाथ चढाईला प्रारंभ केला. थंडी बेताचीच होती. आठ वाजेपर्यंत अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा समोर नंदादेवी पर्वतरांग सोनेरी उन्हात न्हाऊन निघालेली होती. छोटेमोठे ढग या पर्वत शिखरांशी सलगी करू पाहत होते. अजून जास्त ढग जमायच्या आत आम्हाला शिखरावर पोहोचायचे होते याविचाराने वेग वाढविला. अजून सुमारे तासाभरात वाटेतील गणपतीच्या मंदिरापाशी पोहोचलो.गणरायाचे दर्शन घेऊन पुढे निघालो. मागील वर्षी मुलाला, ऋतुपर्णला घेऊन आलो होतो तेव्हाचे सगळे आठवायला लागले. थोडा वेळात तुंगनाथ मंदिरात पोहोचलो तेव्हा अगदीच किरकोळ गर्दी होती. सगळी मंडळी चंद्रशिला शिखरावर गेली सल्याने शांत चित्ताने देवाचे दर्शन झाले. तुंगनाथ येथे महादेवांनी आपल्या भुजांच्या म्हणजे हातांच्या स्वरूपात दर्शन दिले म्ह्णून याला "स्ट्रॉंगेस्ट केदार" म्हणतात. आम्ही पोहोचलो तहसी आरती चालू झाली. देवाचीच कृपा समजून आरतीला उभे राहिलो. आरती झाल्यावर तुंगनाथ मंदिराच्या तासभर वरती चंद्रशिला शिखरावर निघालो. 



चंद्रशिला शिखरावरून हिमालयाचे जे अफाट रूप दिसते त्याला तोडच नाही. नंदादेवी, केदारडोम, पंचचुली, निळकंठ, बंदरपूच ते चौखंबा अश्या हिमशिखरांचे अफाट दर्शन होते. मागील वर्षी जून मध्ये आलो होतो तेव्हा या शिखरांवर  खूप जास्त बर्फ होता आता त्यापेक्षा कमी झालेला आल्यामुळे त्यांचे राखाडी-पांढरे शिखरे ठळक दिसत होती.  रावणाच्या दहनानंतर रामाने येथे बसून शिवाची आराधना केली होती असे म्हणतात. येथे शिखरावर शंकराची छोटीशी पिंड आहे. येथे ऋतुपर्णने मागील वर्षी बसून लिंगाष्टकं म्हंटले होते ते आठवून मी पण थोडा वेळ बसून लिंगाष्टकं आणि शिवतांडव म्हंटले. सुंदर अश्या आठवणी घेऊन येहून उतराई चालू केली. सुमारे बारा पर्यंत परत चोपता मध्ये आलो आणि गाडीची जुळवाजुळव केली. चोपता वरून थेट हरिद्वार गाडी ठरवून हरिद्वारच्या दिशेने निघालो. 

Chandrashila Peak




आजचा दिवस हा पूर्ण रांसी ते हरिद्वार प्रवासाला आणि स्पेअर ठेवला होता पण सगळे प्लॅननुसार काटेकोर झाल्याने अर्ध्या दिवसात तुंगनाथ करून हरिद्वारला निघालो होतो. पाच दिवसात तीन केदार आणि सुमारे ८८ किलोमीटर्सची चढाई-उतराई केल्याचे समाधान आणि तिन्ही ठिकाणी देवांचे सुंदर विनासायास दर्शन झाल्याने कृतकृत्यं वाटत होते. पुढील आठ तास प्रवास करून हरिद्वार पोहोचलो तेव्हा आठ वाजले होते. मुक्कामाची जागा ठरवून रात्री थोडे भटकून दिवस संपवला. शेवटच्या दिवशी दुपारी दिड ला ट्रेन असल्याने सकाळीच लवकर निघून मनसा देवी, गंगा स्नान , शॉपिंग इत्यादी करून गुजरात भवन मध्ये जेवायला आलो. इलायचीदार श्रीखंडाचें जेवण बघून दिलखुष! खूप दिवसांनी असे सांग्रसंगीत जेवण मिळाल्याने त्यावर ताव मारून परतीचा रस्ता धरला. शनिवार , रविवार ट्रेन मध्ये काढून सोमवारी सकाळी पुण्यनगरीत पोहोचलो आणि अविस्मरणीय अश्या तीन केदार यात्रेची समाप्ती जाहली. 


ग्रुपचा संपूर्ण प्रवास हा शेअरिंग मध्ये झाला. शेअरिंग गाड्यांची सोय बघत प्लॅन नुसार चालणे हि मोठी गोष्ट यावेळेस शिकायला मिळाली. त्यामुळेच आठवड्याची हि तीन केदार यात्रा अवघ्या ८१३६ रुपयांमध्ये होऊ शकली. हिमालयात नेणारे काही ग्रुप्स यां ट्रेकचे माणशी २५००० रुपये घेतात असे कळले. यां अनुभवांचा नक्कीच पंचकेदार मधील उरलेल्या रुद्रनाथ आणि कल्पेश्वर यात्रेसाठी उपयोग होईल. 


असो वाचत राहा! आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा !

।। हर हर महादेव ।।


सलग दोन वर्षे तुंगनाथ येथे दिलेली भेट : 



शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

तीन केदार यात्रा : द्वितीय केदार : श्री मध्यमहेश्वर धाम

 

तीन केदार यात्रा : श्री केदारनाथ , मध्यमहेश्वर , तुंगनाथ 

द्वितीय केदार : श्री मध्यमहेश्वर धाम 


पूर्व भाग : 
तीन केदार यात्रा : प्रथम केदार : श्री केदारनाथ धाम


श्री मदमहेश्वर धाम 


पुढे उखीमठ ते मदमहेश्वर ट्रेकचा बेस रांसी येथे पोहोचलो. आजही जेवायला वेळ मिळाला नसल्याने लोकांची वजने घटत चालली होती. रांसी गावात छानसा असा होम स्टे घेऊन ठेवला होता. मनसोक्त जेऊन मंडळी पायाला तेल लावण्याच्या कामात गुंतली. आज मोठ्या धावपळीनंतर छान आराम होणार होता. उद्या पुन्हा १८ किलोमीटर्स ची चढाई करायची तयारी ठेऊन मंडळी निद्रादेवीची आराधन करू लागली. 

 

साखरझोपेतून नाईलाजाने उठून मंडळी आन्हिके उरकून मदमहेश्वरच्या मार्गाला लागली. रांसी गावापासून सुमारे दिड किलोमीटर रस्त्याने चालत जाऊन मग पुढे जंगलातून पहिले चार किमी उतराई आणि पुढे १२ किमी सलग चढाई असा कार्यक्रम होता. सकाळचे वॉर्मअप व्हावे या उद्देशाने आम्ही पहिले दिड किमी चालत निघालो. तासाभरात हे अंतर कापून मदमहेश्वरधामच्या जंगलातील वाटेला लागलो. वाट अतिशय सुंदर आणि वळणा-वळणाची. उंचच उंच देवदार वृक्ष आमच्या स्वागताला तयारच होते कि काय असे वाटू लागले. सुरुवातीलाच एक मोठ्या धबधब्याने आमच्या अंगावर तुषार उडवून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चार-पाच किमी उतरून वाटेतल्या पहिल्या गावापाशी आलो गौडार. येथून पुढे खतरनाक चढ चालू झाला. गौडार च्या पुढे बनतोली गाव लागले. येथे सरस्वती गंगा आणि मोरखेडा गंगा या नद्यांचा संगम होऊन मदमहेश्वर गंगा नदी नावाने ओळखली जाते. येथेच नदीवर बांधलेल्या एका लाकडी झुलत्या पुलावर यथेच्छ फोटोग्राफी झाली. येथून दिसणारे निसर्गसौन्दर्य ते काय वर्णावे? उंच उंच पर्वतराजीने वेढलेली हि छोटीशी टुमदार गावे, खळाळत वाहणारे शुभ्रधवल प्रवाह, निरव शांतता , उंच उंच देवदारचे जंगल .. तासनतास बसून बघत राहावे असे दृश्य !


          


बनतोली गावापासून जो काही चढ चालू झाला त्याने तोंडचे पाणी पळवले. कालच्या जवळपास ४० किलोमीटर्सने पायाच्या पोटऱ्या दुखू लागलेल्या त्यात थोडेसे उन्हाने घामेघूम व्हायला झाले होते. चिक्क्या, ग्लुकोन-डी यांची आवर्तने करत चढाई चालू झाली. संपूर्ण ट्रेक मार्ग मात्र खूप सुंदर होता. दूरवर दिसणाऱ्या अजस्त्र डोंगररांगा "तुम्हाला अजून एवढी उंची गाठायचीये" असे खुणावत होत्या. पुढे खटरा- नानू -मैखाम्बाचट्टी -कुनचट्टी अशी गावे ओलांडत महत्प्रयासाने दुपारी चार ला मदमहेश्वर येथे पोहोचलो. वाटेत सुंदर असे जंगल असल्याने आणि मुबलक पाणी असल्याने डाँ लागला कि रस्त्यातच पथारी पसरत मंडळी पुढे सरकत होती. समोरूनउतरून येणारी मंडळी आम्हाला बघून "जय भोले" "जय मदमहेश्वर" म्हणायची पण त्याला उत्तर द्यायचे सुद्धा त्राण शिल्लक नव्हते. केदारनाथपेक्षा जास्त चढाई येथे लागल्याने पुरती दमछाक झाली होती. शेवटचे काही किलोमीटर्स संपता संपत नव्हते आणि मंदिरही दिसत नव्हते. शेवटचे त्राण गोळा करून निघालो तेव्हा लांबवर मंदिर बघून जिवंत जीव आला. 



मंदिराचे प्रथम दर्शन होताच "जय श्री मदमहेश्वर" चा जयघोष झाला. केदारनाथ मंदिराशी साधर्म्य असलेले हे द्वितीय केदार आकाराने थोडेसे लहान आहे. येथे महादेवाने पांडवांना नाभीस्वरूपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळच पहिले राहायला रूम घेऊन तडक मंदिरापाशी निघालो. येथे केदारनाथ सारखी गर्दी नसल्याने फक्त आम्हीच मंदिराच्या आवारात होतो. मंदिर ठराविक वेळेत म्हणजे संध्याकाळी ६ ते ८ आणि सकाळी ७ ते ११ उघडे असते आणि बाकी पूर्ण वेळ बंद असते. तासभर फोटो, मेडिटेशन करून झाल्यावर सहा वाजता मंदिर उघडले आणि संध्या आरतीसाठी लाईन लावून आम्ही सज्ज झालो. लाईनीत मीच पहिला असल्याने पूर्ण आरती छान पाहता आली. शांततेत आरती होऊन थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसून राहिलो. आताशा थंडी इतकी वाढली होती दात वाजायला लागलेले. पटकन रूमवर जाऊन जेवण करून आजचा महत्चाचा दिवस संपवला. 


आतापर्यंत सगळे प्लॅन नुसार काटेकोर चालले होते. सगळे ट्रेकभिडु तयारीचे असल्याने उद्या मदमहेश्वर उतरून तेथूनच ऋषिकेश जाण्याचा प्लॅन बदलून उद्याच्या दिवशी तुंगनाथ जायचा प्लॅन ठरला. तुंगनाथ अर्ध्या दिवसात होणार असल्याने आणि तेथील चंद्रशिला पिकचे फोटो पाहून मंडळी आनंदाने तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाचला उठून मदमहेश्वर मंदिरापासून अजून दोन किमी वरती बुढा मदमहेश्वर जाण्यासाठी निघालो. येथून प्रातः प्रहरीचे चौखंबा पर्वताचे दिसणारे मनोहारी दृश्य म्हणजे कायच्या काय सुंदर असे. तांबडं फुटताच  चौखंबा पर्वतावर येणारी सोनेरी झळाळी, माथ्यावरच्या तलावामध्ये असलेले निळेशार पाणी त्यात पडलेले हिमशिखरांचे प्रतिबिंब,  वरून दिसणारे ३६० डिग्री दृश्य, सुंदर अशी निसर्गचित्रे, लांबवर दिसणारे केदारडोम, फक्त डोळ्यात साठवून घ्यावे असे ते क्षण!



चौखंबा रेंज मागे 


येथेही मनसोक्त फोटो झाल्यावर बुढा मदमहेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. एक अजून मराठी ग्रुप आला होता त्यांनी मंदिरात आरती केली. एव्हाना सात वाजत आले होते. आठ वाजता मंदिर उघडते म्हणून लगबगीने खाली येऊन सकाळीच दर्शन घेतले. सडे आठ वाजता उतरायला सुरुवात केली ते खाली रांसी गावापर्यंत यायला दुपारचे दोन वाजले. जेथे राहत होतो तेथेच जेवण सांगून ठेवले होते. पटकन जेऊन रांसी वरूनच चोपताची डायरेक्ट गाडी केली. वाटेत उखीमठ येऊन श्री ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. हिवाळ्याचे सहा महिने केदारनाथ आणि मदमहेश्वर मंदिर बंद असते तेव्हा दोन्ही देवांची ओंकारेश्वर मंदिरात उखीमठ येथे पूजा अर्चा होते. मंदिर पाहून सुमारे दोन तासात चोपता येथे पोहोचलो. चोपता हे बळच खूप महाग असल्याचे मागील वर्षी अनुभवले होते. कशीबशी रूम मिळवून थंडीशी दोन हात करत झोपेत गुडूप झालो. 


बुढा मदमहेश्वर 


क्रमशः 

पुढील भाग : 

तीन केदार यात्रा : त्रितीय केदार : श्री तुंगनाथ धाम 





















शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

तीन केदार यात्रा : प्रथम केदार : श्री केदारनाथ धाम

।। जय श्री केदारनाथ  ।।
।। जय श्री मदमहेश्वर ।।
।। जय श्री तुंगनाथ ।।


तीन केदार यात्रा : श्री केदारनाथ , मध्यमहेश्वर , तुंगनाथ 

                        


कोणीतरी म्हटलंय - "एकदा का हिमालयाचे वेड लागले ना , मग तू दरवर्षी किमान एकदा तरी हिमालयात जाशील !" ( कोणीतरी म्हणजे काय मीच म्हटलंय, पण पु.ल. म्हणतात तसे कोणी तरी म्हटलंय म्हणल्यावर काय म्हटलंय हे ऐकायला आपण कान टवकारले नसतेत. ) 

मागील वर्षी जेव्हा फॅमिली बरोबर केदारनाथ, तुंगनाथ प्लॅन केला होता तेव्हाच दरवर्षी हिमालयात कुठेतरी का होईना पण भटकायला यायचे असे मनाशी ठरवले होते. सुरुवात म्हणून केदारनाथ यात्रा आणि पंच केदार करावे याविचाराने मागील वर्षी केदारनाथ आणि तुंगनाथ दोन केदार केले होते. दोन्हीच्या मध्ये असलेले नितांतसुंदर असे द्वितीय केदार करायचे राहिले असल्याने यावर्षी जून मध्ये मदमहेश्वरचा प्लॅन ठरवला होता. आठ वर्षाच्या मुलाला घेऊन मदमहेश्वर अवघड होईल अश्या काही लोकांच्या सल्ल्याने मदमहेश्वर रद्द करून स्पिती आणि किन्नोर प्रदेशाची सुंदर अशी सहल झाली होती. महादेवाची ईच्छा असेल तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता म्हणतात तसे घडून आले आणि ऑक्टोबर मध्ये तीन केदार यात्रा घडून आली. 


हिमाचलच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये वसलेली छोटी छोटी पण अत्यंत सूंदर अशी गावे. स्वर्गाहून सुंदर भासणारी निसर्ग दृश्ये, निळेशार आकाश आणि त्यावर जणू आमच्यासाठीच  कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरेशुभ्र ढग. आसमंताशी स्पर्धा करणाऱ्या पर्वतशिखरांचा शुभ्रधवल असा बर्फाचा जिरेटोप. साक्षात कैलासावरून भूलोकावर येणारा गंगारवं ( ग्लेशिअरचे किंवा गंगेचे पाणी). आपापसात दाटीदाटीने उभ्या उंचच उंच देवदार वृक्षांची चढाओढ. बर्फाने आच्छादित मनमोहक पर्वतशिखरे. निसर्गाच्या आव्हानाला तोंड देत ख्याली खुशालीने जगणारी पहाडी मंडळी, केदारनाथच्या मंदिराजवळ जाणवणारी ती अदृश्य, अलौकिक अशी सतेज ऊर्जा, भैरोबा डोंगरावरून दिसणारे दिलखेचक दृश्य, मदमहेश्वरची न संपणारी चढाई, माथ्यावरून प्रातः प्रहरी दिसणारी चौखंबा पर्वतांची सोनेरी झळाळी, चंद्रशिला शिखरावरून चौफेर दिसणारी हिमालय शिखरे, गात्रांना तृप्त करणारे शांत आणि थंड असे गंगेचे प्रवाह, विधात्याने चित्रे रेखाटावी अशी सुंदर निसर्गचित्रे. असे अनेक कायम आठवणीत राहतील असे प्रसंग जगता आले. "केल्याने देशाटन" या उक्तीचा पुरेपूर आलेला अनुभव.


एकंदर काय तर, कधीही न कोमेजणारी ही आठवणींची सोनपुष्पे, आयुष्य नावाच्या माळेत माळत राहायचं.

असो, तर पाच दिवसात ८८ किलोमीटर्सचा तीन केदार यात्रेचा प्लॅन तर तयार होता पण पाच दिवसात तीन केदार करायचे म्हणजे ट्रेक भिडू सुद्धा तसे तयारीचे आणि दमदार हवेत. आमच्या ऑफबीट ट्रेकर्सचे सात सदस्य तयार झाल्यावर सगळी जय्यत तयारी सुरु झाली.  ऑफबीट ट्रेकर्सचा हा पहिला हिमालयीन ट्रेक. 


ट्रेक प्लॅन झाला तो असा - 

२८ सप्टेंबर - बांद्रा ते हरिद्वार. 

२९ सप्टेंबर - सोनप्रयाग कडे प्रयाण. संध्याकाळी ५ पर्यंत सोनप्रयाग पोहोचून केदारनाथ चढाई चालू. 

३० सप्टेंबर - रात्रभर ट्रेक करून पहाटे दोन-तीन वाजता केदारनाथ येथे पोहोचणे. पहाटेचे गर्भगृह दर्शन. दिवसभर केदारनाथ मंदिरापाशी. भैरव मंदिर आजूबाजूचे डोंगर. जमल्यास वासुकी ताल ट्रेक. केदारनाथ मुक्काम 

१ ऑक्टोबर - पहाटे केदारनाथ वरून उतराई. ३-४ वाजेपर्यंत सोनप्रयाग पोहोचून उखीमठ आणि पुढे रांसी गावाला मुक्काम. 

२ -ऑक्टोबर - रांसी पासून सकाळी ट्रेक चालू. मदमहेश्वर १८ किमी दुपारी ३-४ वाजेपर्यंत पोहोचू. मदमहेश्वर मुक्काम. 

३ ऑक्टोबर - बुढा मदमहेश्वर चढाई , परत मंदिर मग  मदमहेश्वर ते रांसी उतराई. रांसी ते उखीमठ ते चोपता. मुक्काम चोपता. 

४ ऑक्टोबर - पहाटे चार-पाच ला तुंगनाथ चढाई चालू. तुंगनाथ दर्शन. पुढे तासभर चंद्रशिला शिखर चढाई. तुंगनाथ उतराई १२ पर्यंत. चोपता ते हरिद्वार प्रवास. 

५ ऑक्टोबर - हरिद्वार स्थलदर्शन, गंगा स्नान, मनसा देवी मंदिर, खरेदी. हरिद्वार ते पुणे प्रवास 

६ ऑक्टोबर - पूर्ण दिवस ट्रेन मध्ये. रात्री नऊ ला बोरिवली. बोरिवली ते दादर. दादर ते पुणे सातारा एक्सप्रेस ने पहाटे दोन वाजता पुणे. यात्रा समाप्त. 


प्रथम केदार : श्री केदारनाथ धाम : 

रविवारी सकाळी हरिद्वारला पोहोचताच अजिबात वेळ न घालवता गाडीत बसून सोनप्रयागच्या दिशेने निघालो. आजचे टार्गेट होते ते संध्याकाळी सहाच्या आत गौरीकुंड पोहोचून चेकपोस्ट क्रॉस करणे. संध्याकाळी सहा नंतर गौरीकुंड पासून पुढे परवानगी मिळत नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत थांबावे लागले असते. मागील महिन्यात भूस्खलन झाल्याने संध्याकाळ नंतर पोलीस सोडत नाही असे कळले. सोनप्रयाग पार्किंगला संध्याकाळी पाचला पोहोचलो तेच लगेच पळत रेजिस्ट्रेशन स्कॅन करून पुढे निघून गौरीकुंड जाणारी टॅक्सी पकडली.  मागच्या वर्षी जून मध्ये इथे पाय ठेवायला जागा नव्हती. आज ऑक्टोबर मध्ये निवांत बसलेले पोलीस पाहून गर्दी नसल्याची खात्री झाली.बरोब्बर सहा वाजता गौरीकुंड चेकपोस्ट क्रॉस करून हुश्श म्हंटलं आणि आता पूर्ण रात्र आपली म्हणत केदारनाथची चढाई चालू केली. मागील वर्षी जून मध्ये केलेली यात्रा, तेव्हाची गर्दी, घोड्यांचा त्रास सगळे पाहता आजची आमची चढाई फारच निवांत झाली. संपूर्ण मार्गावर फक्त आम्हीच होतो. सुमारे सात तासात ठराविक वेळ विश्रांती घेत मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा भर थंडीत घामाने अंघोळ झाली होती. रात्रीचा कमी ऑक्सिजन असल्यामुळे लींचोली गावापासून सुरु होणारी खडी चढाई चढताना जोरदार दम लागू लागला.   

देवप्रयाग 
पहाटे दोन वाजताच दर्शन 

                                     

रात्री अडीच वाजता केदारनाथ मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा मनातील एक इप्सित पूर्ण झाले. सलग तीन वर्षे केदारनाथ करायची इच्छा आज दुसऱ्यांदा करून काही अंशी पूर्ण झाली. केदारनाथ मंदिराच्या समोर अगदी तुरळक गर्दी पाहून तो गर्दी नसलेला मंदिराच्या पुढे असा रेअर फोटो उरकला. मंदिरासमोर छोटीशी लाईन बघून उभा राहिलो तर कळले कि हि पैसे भरून दर्शनाची लाईन आहे. मग नेहमीच्या लाईनीत बसून पहाटे पाच पर्यंत वेळ काढला. पहाटे पाचला मंदिराचे द्वार उघडले आणि गर्भगृहात जाऊन केदारनाथ लिंगाचे सुखद दर्शन झाले. डोकं टेकवून, तुपाचा अभिषेक करून बाहेर आलो तेव्हा मंदिराच्या मागे पर्वत शिखरांवर मंगलमय सोहोळा चालू झाला होता. केदारनाथ ग्लेशिअर सोनेरी किरणांचा जिरेटोप घालून आकाशाशी स्पर्धा करत मनोहारी भासू लागला. आज पूर्ण दिवस मंदिरापाशीच घालवायचा असल्याने मनसोक्त फोटोग्राफी झाली. दुपारपर्यंत थोडीशी डुलकी काढून भैरव मंदिर आणि त्यावरच्या डोंगरावरून संपूर्ण केदारनाथ घाटीचा नजारा पाहत संध्याकाळ झाली. 



संध्याकाळी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा अगदी २०-२५ लोक लाईनीत बघून परत एकदा दर्शनासाठी गेलो. संध्याआरती साठी जागा पकडून बसलो. आरती चालू झाली तसे एकंदर वातावरण कमालीचे बदलले. मंदिराच्या आवारात जी पॉसिटीव्ह एनर्जी जाणवते ते इथपर्यंतचा यायचा सगळं त्रास शून्य करते. आजही दुर्गम आणि खडतर असा प्रवास असणाऱ्या या मंदिराची ज्या कोणी अनामिक महंतांनी स्थापना केली असेल आणि त्यानंतर कित्येक वर्षे बर्फाखाली दडलेल्या या मंदिराचा शोध घेणारे श्री शंकराचार्य यांना मनोमन दंडवत घातला. संध्याआरती नंतर परत एकदा दर्शन घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. 


काळ मनसोक्त तीन वेळा दर्शन झाल्याने आज सकाळी सहा वाजताच उतराई चालू केली. अकरा वाजता सोनप्रयाग पोहोचून श्री शंकर- पार्वती यांचा विवाह झाला ते त्रियोगिनारायण मंदिर बघायला निघालो. सोनप्रयाग पासून जाणाऱ्या गाडीशी घासाघीस करून शेवटी ड्राइवर पटवून मंडळी निघाली त्रियोगिनारायण. येथे भगवान श्री शंकर आणि पार्वती यांचा विवाहस्थळ असून आजही ते यज्ञकुंड प्रज्वलित आहे असे म्हणतात. येथूनच निलय पर्वताचे म्हणजे ओम पार्वतीचे दर्शन होते. शिखरावर बर्फ असतो तेव्हा बर्फाचा आकार "ॐ" सारखा दिसतो. येथून सोनप्रयाग पोहोचून पुढे शेअरिंग गाडीने गुप्तकाशी पोहोचलो. येथील विश्वेश्वराचे दर्शन घेऊन पुढे उखीमठ कडे निघालो. गुप्तकाशी येथील विश्वेश्वराचे मंदिर हे केदारनाथ मंदिराच्या धाटणीचे असून अवश्य पाहण्यासारखे आहे. 


पुढे उखीमठ ते मदमहेश्वर ट्रेकचा बेस रांसी येथे पोहोचलो. आजही जेवायला वेळ मिळाला नसल्याने लोकांची वजने घटत चालली होती. रांसी गावात छानसा असा होम स्टे घेऊन ठेवला होता. मनसोक्त जेऊन मंडळी पायाला तेल लावण्याच्या कामात गुंतली. आज मोठ्या धावपळीनंतर छान आराम होणार होता. उद्या पुन्हा १८ किलोमीटर्स ची चढाई करायची तयारी ठेऊन मंडळी निद्रादेवीची आराधन करू लागली. 


क्रमशः 
पुढील भाग : 
तीन केदार यात्रा : द्वितीय केदार : श्री मध्यमहेश्वर धाम 
तीन केदार यात्रा : त्रितीय केदार : श्री तुंगनाथ धाम