सोमवार, ३१ मार्च, २०१४

बागलाण दुर्गभ्रमंती: हरगडबागलाण दुर्गभ्रमंती: हरगड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४   - मांगी- तुंगीजी


'बागलाण' नुसते नाव ऐकायला आले तरी मला माझे ते अविस्मरणीय ट्रेक आठवतात. हे ट्रेक करताना जेवढी मजा आली होती तशीच आजही त्यावर लिहिताना येते. याबद्दल किती लिहू आणि किती डिटेल्स देऊ असे होऊन जाते पार. म्हणूनच वरील चार भाग वाचले असतील तर तुम्हालाही धृतराष्ट जसा राजवाड्यात बसल्या बसल्या लाईव युध्द ऐकत होता तसा बसल्याजागी वर्चुअल ट्रेक केल्याचा अनुभव येईल अशी अशा करतो. 


ज्ञानेश्वरांनी जशी वयाच्या लवकरच समाधी घेतली तसा माझा हा ब्लॉग वयाच्या दुसऱ्या वर्षीच समाधी अवस्थेत जाऊ पाहत होता. आज काहीतरी लिहून अथवा काही न लिहिता नुसते फोटो डकवून आज थोडी संजीवनी देईन म्हणतो. 

हरगडा विषयी खूप लिहायचे आहे खरतर. खूपच मस्त झाला होता हा ट्रेक. धोडप आणि साल्हेर-मुल्हे ने आम्हाला आता जवळपास वाट लागलेल्या हरिश्चंद्रगडाची आठवण येणार नाही अशी सोय करूनच ठेवली आहे आधीच. त्यात अजून एकाची भर आता. हा ट्रेक डिसेंबर १३ ला केला होता खरतर पण लिहू लिहू म्हणत अगदीच राहून गेले.  सध्या फोटो आणि थोड्याश्या समालोचनावर (वा पंचनाम्यावर) समाधान मानून घ्या. वेळ मिळताच थोडी थोडी खिंड लढवत राहीनच. लोभ असावा. 


त्याआधी वरच्या दुव्यांवरून तुम्ही बागलाणात आलेला आहातच असे समजून हरगडावर चालूयात. मागे साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरागड-मांगी-तुंगी असे किल्ले केले होते तेव्हा वेळेअभावी हरगड मात्र राहिला होता. यावेळी पावसाळ्यात या किल्ल्यांचा लुफ्त अनुभवण्यासाठी परत स्वारी गेली होती. मग यावेळी साल्हेर-सालोटा-हरगड असे तीनच किल्ले केले. 

मुल्हेर किल्ला माहिती (??? - या प्रश्नचीन्हांचे उत्तर मुल्हेरच्या लेखात मिळेलच) असल्याने वाट परिचितच होती. आमची पायपीट चालू झाली तशी मजुरांना कामावर घेऊन जाणार्या गाड्यांची ये जा चालू झाली. जाता जाता त्यांना टाटा करून आम्ही निघालो. 

जातानाच हरगड दिसतच होता. हरगडाचा उजव्या बाजूने बाहेर आलेला सुळका, जीवधन किल्ल्याच्या वानरलिंगी सुळक्यासारखा दिसत होता.

मुल्हेरचीच वाट पकडून आम्ही पुढे निघालो. गणेश मंदिरापर्यंत वाट सेमच होती. गणेश मंदिरापासून मुल्हेर साठी सरळ वरती आणि हरगडासाठी मंदिराच्या मागून वाट होती.

गणेश मंदिर खरच कमाल आहे. पूर्वीच्या काळी या आवारातच गाव वसलेले होते. ते गाव गणेश मंदिरापासून चालू व्हायचे. आजही त्याचे दगडी बांधकाम आहे तसे आहे.


मंदिराच्या समोरील छोटेखानी तलावाने हिरवी शाल पांघरून डोंगरांशी बरोबरी केलीच होती.

हा फोटो पाहिल्यावेळेस आलो होतो डिसेंबर मध्ये तेव्हाचा आहे. तेव्हा पाणी इतके स्वच्छ होते कि मंदिराचे प्रतिबिंब पडले होते.
आता मंदिराच्या मागील वाट पकडून हरगडाच्या वाटेला लागलो. पहिला दरवाजा लागताच वाट बरोबर असल्याची खात्री झाली.
 किल्ल्याच्या मार्गात झाडांनी आपले साम्राज्य केव्हाच प्रस्थापिले होते. अश्या दोन फुटांच्या रस्त्याने मानच काय पूर्ण अंग वाकवून जावे लागत होते. तुफान अनुभव होता.
 दुसरा दरवाजा लागला आणि जीवात जीव आला. नाहीतर परत मुल्हेर वा प्रबळगड होतोय कि काय असे वाटत होते.
येथून चढायला सुरवात केली. दोन रस्ते होते. एक हरगडाच्या मागून नळीतून जातो तर एक सरळ पूर्वेकडून एक धार पकडून चढाई करू शकू असा. हा फारच अवघड आहे. तरीही आम्ही एका वाटेने चढून दुसर्या वाटेने उतरायचे ठरवले.
या खालच्या फोटोत जो एक माणूस उभा दिसतोय तो एकनाथ. त्याने आम्हाला रस्ता सापडत नाहीये असे समजून आपली गुरे सोडून देऊन आम्हाला रस्ता दाखवायला आला. तो आला ते बरेच झाले कारण तसेही आम्हाला पुढे वाट सापडलीच नसती.

येथून तब्बल तीन साडे तीन तासांच्या चढाई नंतर जीव पारच थकून गेला होता. वाट अवघड असल्याने कॅमेरा केव्हाच ठेऊन दिला होता. एकनाथ ने दिलेल्या काठीचा आधार घेऊन कसाबसा आलो. आता समोर जे काही होते केवळ अद्भुत!


आजपर्यंत एवढे किल्ले केले पण अश्या बांधणीचे प्रवेशद्वार कधीच पहिले नव्हते. हे प्रवेशद्वार ५ फुट उंचावर असून त्याच्या पायऱ्या मात्र तुटलेल्या आहेत. एकावर एक रचलेले दगडांवर पाय ठेऊन एकमेकांचा आधार घेऊन कसेबसे चढलो.
या वाटेवर एकून ३ दरवाजे आहेत. दोन पहिल्यांदीच लागले होते. हा तिसरा, पण हा दहाच्या बरोबरीचा होता.

अभेद्य या शब्दाचा अर्थ आज मला कळला असे म्हणता येईल. अशक्य भारी होता तो दरवाजा. शत्रू चुकून माकून इथपर्यंत आलाच तर हे प्रवेशद्वार बघूनच हुरूप मावळून परत जाईल.

हि वाट अवघड असल्याने येथे सहसा कोणी येत नाही म्हणून हा दरवाजा तेवढा कोणाला माहिती नाही. याउलट दुसरी वाट सोपी असली तरी त्या वाटेवरचे सगळे दरवाजे जमीनदोस्त झालेले आहेत.
दुर्ग वैभव का काय आपण म्हणतो ते यापेक्षा काय वेगळे असावे.

आतून काढलेला फोटो


गावामध्येच समान ठेऊन आलो असल्याने फक्त कॅमेरा आणि एक बिस्कीट पुडाच जवळ होता. डबा आणि पाणी दोन्ही भूषण कडे होते. चढताना एक अवघड वाट घेऊन मी पुढे गेलो कि तेथून परत मागे येता येईना. म्हणून भूषण दुसर्या वाटेने गेला आणि मग जी काय चुकामुक झाली ते आम्ही तीन तासांनी अंदाजे भटकत थेट किल्ल्यावरच भेटलो. पण माझ्याकडे पाणी नसल्याने माझे जे काही हाल झाले त्यावरून हरगडा वर आज माझीही समाधी लागते कि काय असे झाले होते.

माझी अवस्था बघून एकनाथ ने मला एका कड्यापाशी नेले. एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या वाटेवर एक झरा आहे हे त्याला माहित होते. तेथे गेल्यावर झरा सुकून फक्त थेंब गळत होते. मग त्याने मोठ्ठे पान आणून त्याचा द्रोण बनवला, त्यात थेंब पाणी जमवले आणि मला दिले. त्या अर्ध्या द्रोण पाण्यानेही मला जरा बरे वाटू लागले. मग आम्ही पुढे निघालो. तो म्हणत होता कि , पुढे तलाव/टाके आहे पण तुम्हाला अगदीच राहवले नाही म्हणून ते पाणी दिले.

काय आणि कसे आभार मानावे या देवदूताचे? स्वताची गुरे सोडून,आम्ही  न सांगता आमच्या मदतीला हा आला होता.

शेवटी टाके आले पण त्यातले शेवाळे बघून फुल मूड गेला. पण म्हंटले आता जीव वाचला तर पुढे हे पाणी पिउन आजार वैगरे होईल ना. :) मग काठीने शेवाळे बाजूला सारून ते पाणी पिशवीत भरले. नंतर ते रुमालाने गळून दुसर्या पिशवीत टाकून त्यात ग्लुकोन-डी टाकले.

तीन पिशव्या पाणी पिल्यावर गाडी रुळावर आली.


आता येथून सरळ सोमेश्वर मंदिरात गेलो. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अतिप्राचीन सोमेश्वर मंदिर फारच भारी आहे. ह्या मंदिराची डागडुजी नाही. पत्रे उडून गेलेत फक्त दगडी मुर्त्या उरल्यात. 

दगडी पिंड 


उभ्या कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आणि मागे मुल्हेर-मोरा किल्ले.

किल्ल्यावर पाणी मुबलक होते. एकून ६ टाकी/तलाव आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक दिशेला एक अशी रचना आहे.

थोडे फिरून झाल्यावर भूषणही चढून आलाच. फोनाफोनी चालूच होती. तो आल्यावर जेवण करून घेतले. एकनाथ नेही त्याचे जेवण कापडात बांधून आणले होते. मोठ्या आग्रहाने त्याला आमच्या बरोबर जेवायला बसवले.

आता पुढे निघालो ते हजारबागदी तोफ बघायला. हरगडावरील मोठे आकर्षण हेच आहे. १५ फुट आणि १२ टन पेक्षा जास्त वजन असलेली हि तोफ एवढ्या वरती कशी आणली असेल कल्पनाही करवत नाही.
अश्या ४ तोफा आहेत. पण एकाच सहज सापडेल अशी आहे. बाकीच्या काही बुरुज ढासळून घसरून गेल्या आहेत. एक मध्येच अडकून आहे.

 शेजारीच एक मोठा गोल खड्डा आहे. हि तोफ तेथे लावून फिरवण्यासाठी ते आहे असे कळते.

एकनाथने समोर दिसणाऱ्या सगळ्या डोंगरांची नावे सांगितली होती मला. पण तेव्हा मी ऐकायच्या आणि लक्षात ठेवायच्या मनस्थिती आणि देहस्थिती दोन्हीतही नव्हतो.

आता तो जातो म्हणाला. गुरे शोधायची आहेत म्हणत तो निघाला. थोडे पैसे दिले तर नको म्हणाला. खिशाला हात लावत "माझ्याकडे आहेत" असे म्हणत तो बघता बघता दिसेनासा झाला.

हातात खूप वेळ होता आणि मस्त वातावरण होते. मग काय पूर्ण पठार हिंडून घेतले. मुल्हेर गावाकडून खालून बघितले असता या किल्ल्यावर एवढी विस्तीर्ण जागा असेल असे वाटत नाही.
येथून समोरच हरणबारी धरण दिसत होते.

 अश्या एक एक छोट्या टेकड्या चढत आम्ही जातच राहिलो.

आता येथे गुरे आणि शेळ्याही सोबतीला आल्या होत्या.

जिथे पर्यंत नजर जात होती फक्त डोंगर रांगा आणि निसर्ग नवलाई.

एरवी निर्मनुष्य किल्ल्यावर कोण आले आहे आज असा विचार करत बैल फुल अटीट्युड देत होता. 

बरीच भंकस केल्यावर मुल्हेर किल्ल्याचे शेवटचे दर्शन घेतले आणि परतीच्या वाटेला लागलो.


उतरताना दुसरी वाट पकडून चालू झालो. हि वाट सोपी असून वाटेत ४ प्रवेशद्वारे आहे असे ऐकिवात आले पण ते आता सगळेच पडझड झालेले आहेत. चार पैकी आम्हाला दोनच सापडले.
पहिले प्रवेशद्वार:
सर्वात डाव्या दगडावर काहीतरी कोरलेले दिसत आहे. तो गणपती आहे.

दुसरे प्रवेशद्वार :
 
हरगड किल्ल्यावर ऐकून ५ गणपती आणि ८ मारुती आहेत असे गावातील लोकांकडून कळले. पण ते सगळे पाहिलेला सध्या तरी कोणी नाही गावात. एक ओळखीचा होता तो मागच्या महिन्यातच सहाव्यांदा जाऊन आला किल्ल्यावर तेव्हा त्याने २ गणपती आणि ४ मारुती शोधले.
आम्हाला १ गणपती आणि २ मारुती सापडले. हे हि नसे थोडके !


दोन तासात उतरून आलो. पायथ्याशी जरा बसलो. तेथूनच मांगी-तुंगी खुणावतच होता. पण यावेळेस तेथे जाणे शक्य नव्हते. सो, लांबूनच त्याची माफी मागून गावात परतलो.

प्रत्येक ट्रेक मध्ये काहीतरी नवे उमगते. पहिल्यांदा बागलाणात गेलो तेव्हा हे ६ किल्ले पाहून मन वेडे होऊन गेले होते. यावेळेस किल्ले पहिले असले तरी पावसाळ्यातील सृष्टीचा साज बघण्यासारखा होता. 

या ट्रेक मध्ये दोन गोष्टी साध्य झाल्या. साल्हेरवर डोळ्याचे पारणे फेडणारे आणि नशीबवान असल्याची जाणीव करून देणारे इंद्रवज्र दिसले आणि मी आजपर्यंत केलेल्या ट्रेक पैकी सगळ्यात अवघड असा  हरगड सर जाहला.   

लवकरच साल्हेर -सालोटाचे पावसाळ्यातील फोटो डकवेन.  लोभ असू द्या. 

सागर 

रविवार, २ मार्च, २०१४

शिवमंदिर - अंबरनाथ

शिवमंदिर - अंबरनाथ 

मागील महिन्यात झालेल्या जुन्नर मधील मोठ्या ट्रेक मध्ये, चावंड किल्ल्या जवळ असलेल्या पांडवकालीन कुकडेश्वर मंदिराला जाण्याचा योग आला होता. त्या मंदिराचा इतिहास आणि अखंड अश्या शिळेवर केलेले अतुल्य कोरीवकाम बघून मन थक्क होऊन गेले. त्याचा मिळाला तेवढा इतिहास मी त्या धाग्यात लिहिलेलाच आहे पण ते मंदिर बघून पुणे-मुंबई जवळची इतरही अनेक पुरातन मंदिरांचा शोध सुरु झाला. 
पुण्याजवळच अशी ५-६ पुरातन मंदिरे आहेत हे आजपर्यंत माहित नव्हते. त्यामुळे आता किल्ल्यावरून आमचा मोर्चा मंदिरांकडे वळवला. 

पुणे -मुंबई प्रवासा दरम्यान असलेले अंबरनाथ येथेही असेच पुरातन मंदिर आहे हे कळल्यावर मग तिकडे जायचा बेत केला. अंबरनाथ स्टेशन पासून चालत २०-२५ मिनिटावर हे मंदिर असून सध्या फारच वाईट दिवस भोगत आहे. एवढ्या मध्यवस्तीत असूनही ते अजून तग धरून आहे हेच विशेष. 

मंदिराच्या बाहेरून बघताच हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आहे हे आपल्या लक्षात येतेच. त्यावर कोरलेली बरीचशी शिल्पे हे ओळखता येत नाहीत. प्रवेशद्वारात असलेली काही शिल्पे ओळखता आली पण १-२ शिल्पे ओळखून मंदिर पाहिले असे म्हणणे साप चावून न घेताच तो विषारी आहे म्हणण्या सारखे आहे. :) 

मंदिराला अंदाजे सहा बाजू आहेत. प्रत्येक बाजूवर वेगवेगळ्या प्रसंग वा संदेश देणारी शिल्पे आहेत. पायथ्यापासून शिल्पांचे नक्षीकाम सर्व बाजूने एकसारखे आहे. गुडघाभर उंचीवर सर्व बाजूने हत्तींच्या आणि माहुतांच्या  प्रतिमा कोरलेल्या आहेत. 

बाकी बरेच काही आहे अजून लिहिण्यासारखे. प्रत्येक शिल्पाचा अर्थ लावून त्यावर लिहायला अभ्यासाची गरज आहे. तरच त्या हजारो वर्षापूर्वीच्या शिल्पांना न्याय दिल्यासारखे होईल. ( आता मी या स्थापत्य कलेच्या अत्तुच्य कलेला न्याय देणे म्हणजे गाढवाने स्वतच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यासारखे आहे हा भाग निराळा, पण असो. ) 

तूर्तास, काही फोटो येथे डकवत आहे. जसा जसा शिल्पांचा अर्थ लागतो तसा डिटेलवार त्यावर लेख लिहीनच. 

मंदिराला ४ प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येकाची दिशा फारच परफेक्ट आहे. मंदिराबाहेरून फोटो काढता येतात. आत फोटो काढण्यास मनाई आहे. 
हत्ती आणि माहूतकाम दिलेल्या माणसाने मनसोक्त कोरीवकाम केलेले आहे.येथे विष्णूचे ९ अवतार कोरलेले आहेत.
कुठे काय कोरले आहे तेही समजत नाही एवढे कमाल मंदिर आहे. पूर्ण प्रदक्षिणा मारायला आम्हाला दोन तास लागले एवढे चवीने बघत, फोटो काढत, अर्थ लावत आमची स्वारी चालली होती.
आम्ही त्या मंदिरावर काहीतरी बघून ते ओळखतो आहोत आणि फोटो काढत आहोत हे पाहून बरीच मंडळी आमच्या बरोबर जमली होती. रोज मंदिरात येणाऱ्या पण शिल्पांकडे ढुंकूनही न बघणारी मंडळीही आज उत्साहाने मंदिर बघत होती. प्लस आमच्या हातातील कॅमरे बघून काही लोकांना आपण पण टीव्ही मध्ये दिसू असे वाटले होते जणू, ते प्रत्येक फोटोत लुडबुड करत होती. 

असो, पण आमच्या निमित्ताने का होईना अजून चार लोकांनी ते मंदिर डोळे उघडून ( व फाडून) पाहिले याबद्दल शंकराने पुण्ण्याचा एक पोईंट माझ्या अकौंट वर जमा केला असेल एवढे नक्की. :) 


सागर